श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १९ वा

हिरण्याक्षवध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - ब्रह्मदेवाचे कपटरहित असे हे अमृतमय वचन ऐकून भगवंतांनी त्याच्या भोळेपणावर हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षाद्वारे त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. नंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या त्यांनी उडी मारून आपल्यासमोर निर्भयपणे संचार करणार्‍या शत्रूच्या हनुवटीवर गदेचा प्रहार केला; पण हिरण्याक्षाच्या गदेला भिडून ती गदा भगवंतांच्या हातून निसटली आणि भिरभिरत जमिनीवर आदळून शोभू लागली. परंतु ही मोठी अद्‌भुत घटना घडली. त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळूनही हिरण्याक्षाने त्यांना निःशस्त्र पाहून, युद्धधर्माचे पालन करीत, त्यांच्यावर आक्रमण केले नाही. भगवंतांचा क्रोध वाढावा, म्हणूनच त्याने असे केले. गदा खाली पडल्यानंतर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शनचक्राचे स्मरण केले. (१-५)

चक्र ताबडतोब येऊन भगवंतांच्या हातात फिरू लागले; परंतु ते विशेषतः आपला प्रमुख पार्षद दैत्याधम हिरण्याक्षाबरोबर खेळू लागले. त्या वेळी त्याच्या प्रभावाला न जाणणार्‍या देवांचे हे त्वरा करणारे शब्द ऐकू येऊ लागले की, "प्रभो ! आपले कल्य़ाण असो ! याला लगेच मारून टाका." जेव्हा हिरण्याक्षाने पाहिले की, कमलदललोचन श्रीहरी आपल्यासमोर चक्र घेऊन उभे आहेत, तेव्हा त्याची सर्व इंद्रिये प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने उसासे टाकीत दात-ओठ चावू लागला. त्यावेळी तो तीक्ष्ण दाढा असलेला दैत्य, आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे अशा रीतीने पाहू लागला की, जणू तो आता भगवंतांना भस्म करून टाकील. उसळी मारून ‘अरे, आता तू वाचणार नाहीस’ अशी गर्जना करीत श्रीहरींवर त्याने गदेने प्रहार केला. हे साधो ! यज्ञमूर्ती श्रीवराह भगवानांनी शत्रूच्या देखत सहजपणे आपल्या डाव्या पायाने ती वायुवेगाने येणारी गदा पृथ्वीवर आदळली आणि ते त्याला म्हणाले -"अरे दैत्या, तू मला जिंकू इच्छितोस ना ? मग उचल ते शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वार !" भगवंतांनी असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोळी ठोकली. आपल्या रोखाने गदा येत आहे असे पाहून भगवंतांनी ते जिथे उभे होते तिथूनच गरुड जसा नागिणीला पकडतो, तशी गदा सहज पकडली. (६-११)

आपले शौर्य अशा प्रकारे व्यर्थ झालेले पाहून त्या महादैत्याचा गर्व नाहीसा झाला आणि त्याचे तेज नष्ट झाले. भगवंतांनी देऊ करूनही त्याने गदा घेणे पसंत केले नाही. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मणावर जारण-मारणादी प्रयोगाचा निष्फळ प्रयत्‍न करावा, त्याप्रमाणे त्याने श्रीयज्ञपुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित अग्नीसारखा तळपता त्रिशूळ हातात घेतला. महाबली हिरण्याक्षाने अत्यंत वेगाने सोडलेला तो त्रिशूल आकाशात मोठया तेजाने चमकू लागला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तो इंद्राने गरुडाचा पंख तोडावा तसा तोडला. भगवंतांच्या चक्राने आपल्या त्रिशूळाचे असंख्य तुकडे झालेले पाहून त्याला फार राग आला. त्याने जवळ जाऊन, ज्याच्यावर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसते, त्या भगवंतांच्या विशाल वक्षःस्थळावर एक जोरात ठोसा मारला आणि मोठयाने गर्जना करून तो अंतर्धान पावला. (१२-१५)

विदुरा, ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे त्याने याप्रकारे मारलेल्या ठोशाने भगवान आदिवराह जराही ढळले नाहीत. तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायापती श्रीहरींवर अनेक प्रकारच्या मायावी कृत्यांचा प्रयोग करणे सुरू केले. त्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली आणि तिला असे वाटू लागले की, आता जगात प्रलयकाल होणार. प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला. सगळीकडून दगडांचा असा मारा होऊ लागला जणू गोफणीने दगड फेकले जात आहेत. विजा चमकू लागल्या आणि त्यांच्या कडकडाटाबरोबरच मेघ दाटून आल्याने आकाशात सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह-तारे झाकले गेले. पाठोपाठ आकाशातून अखंडितपणे पू, केस, रक्त, विष्ठा, मूत आणि हाडे यांचा वर्षाव होऊ लागला. हे विदुरा, हरतर्‍हेच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले. केस मोकळे सोडलेल्या आणि हातात त्रिशूळ घेतलेल्या नग्न राक्षसिणी दिसू लागल्या. पुष्कळसे पायदळ, घोडेस्वार, रथी आणि हत्तींवर चढलेल्या सैनिकांसह आततायी यक्ष-राक्षसांचा "मारा, मारा," असा अत्यंत क्रूर आणि हिंसक आरडाओरडा ऐकू येऊ लागला.(१६-२१)

अशा प्रकारे प्रगट झालेल्या त्या आसुरी मायाजालाचा नाश करण्यासाठी यज्ञमूर्ती भगवान वराहांनी आपले प्रिय सुदर्शन चक्र सोडले. त्यावेळी आपल्या पतीच्या कथनाचे स्मरण होऊन दितीच्या हृदयाचा थरकाप होऊ लागला आणि तिच्या स्तनातून रक्त वाहू लागले. आपले मायाजाल नष्ट झाल्यावर तो दैत्य पुन्हा भगवंतांच्या जवळ आला. त्याने त्यांना क्रोधाने आवळून धरून चिरडून टाकण्य़ाच्या इच्छेने कवेत घेतले, परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरच उभे होते. आता तो भगवंतांवर आपल्या वज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला. तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे वृत्रासुरावर प्रहार केला होता, त्याप्रमाणे भगवंतांनी त्याच्या कानफटीत एक ठोसा मारला. (२२-२५)

विश्वविजयी भगवंतांनी जरी सहज ठोसा मारला होता, तरी त्या प्रहाराने हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला, त्याचे डोळे बाहेर आले, हात, पाय आणि केस छिन्नभिन्न झाले आणि तो वावटळीमुळे उखडलेल्या विशाल वृक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला. हिरण्याक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते. त्या भयानक दाढा असलेल्या दैत्याला दात-ओठ चावीत पृथ्वीवर पडलेला पाहून तेथे युद्ध पाहाण्यासाठी आलेले ब्रह्मदेव इत्यादी देव त्याची प्रशंसा करीत म्हणू लागले की, ‘अहो ! असे मरण कोणाला प्राप्त होते ?’ आपल्या मिथ्या लिंगशरीरापासून सुटण्यासाठी योगीजन समाधियोगाच्या द्वारा ज्यांचे ध्यान करतात, त्यांच्याच चरणांच्या प्रहाराने घायाळ झालेल्या या दैत्यराजाने त्यांचेच मुखकमल पाहात पाहात आपल्या शरीराचा त्याग केला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघे भगवंतांचेच पार्षद आहेत. त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे. आता काही जन्मातच हे पुन्हा आपल्या स्थानावर परत जातील. (२६-२९)

देव म्हणू लागले- "प्रभो, आपणाला वारंवार नमस्कार असो ! आपण संपूर्ण यज्ञांचा विस्तार करणारे आहात. तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्त्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात. जगाला कष्ट देणारा हा दुष्ट दैत्य मारला गेला ही मोठी आनंदाची गोष्ट झाली. आता आपल्या चरणांच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हांलाही सुख मिळाले." (३०)

मैत्रेय म्हणाले - अशा प्रकारे महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मादी देवतांनी स्तुती केलेले भगवान आदिवराह आपल्या अखंड आनंदमय धामाकडे परतले. मित्रा विदुरा, भगवंतांनी अवतार घेऊन भीषण संग्रामात खेळणे मोडावे तसा महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध केला, ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जसे ऐकले, तसे तुला सांगितले. (३१-३२)

सूत म्हणाले - शौनक महोदय, मैत्रेयांच्या मुखातून भगवंतांची ही कथा ऐकून परम भगवद्‌भक्त विदुराला फार आनंद झाला. जर अन्य पवित्रकीर्ती आणि परम यशस्वी महापुरुषांचे चरित्र ऐकूनही फार आनंद होतो, तर श्रीवत्सधारी भगवंतांच्या लीला ऐकून आनंद होईल, यात काय सांगावे ? ज्यावेळी मगरीने पकडल्यानंतर गजेंद्र प्रभूंच्या चरणांचे ध्यान करू लागला आणि त्याच्या हत्तिणी दुःखाने आक्रोश करू लागल्या, त्यावेळी ज्यांनी त्या सर्वांना तत्काळ दुःखातून सोडविले, तसेच जे सर्व बाजूंनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या सरलहृदय भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतात, परंतु दुष्टांना मात्र अत्यंत दुराराध्य आहेत, त्या प्रभूंच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणार नाही ? शौनकादी ऋषींनो, कार्यासाठी वराहरूप धारण करणार्‍या श्रीहरींची हिरण्याक्षवधाची परम अद्‌भुत लीला जो पुरुष ऐकतो, गातो किंवा तिला अनुमोदन देतो, तो ब्रह्महत्येसारख्या घोर पापातूनही सहज सुटून जातो. हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद, परम पवित्र, धन व यशाची प्राप्ती करून देणारे, आयुष्य़वर्धक आणि कामनांची पूर्ती करणारे, युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती वाढविणारे आहे. जे लोक हे चरित्र ऐकतात, त्यांना अंती श्रीभगवंतांचा आश्रय प्राप्त होतो. (३३-३८)

स्कंध तिसरा - अध्याय एकोणिसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP