श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ९ वा

ब्रह्मदेवाचे भगवद्‌धामदर्शन आणि त्यांना
भगवंतांच्या द्वारा चतुःश्लोकी भागवताचा उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणार्‍याचा संबंध नसतो, तसेच देहाहून वेगळ्या अशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थांबरोबर काहीही संबंध नसतो. विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासतो. जेव्हा तो त्या गुणांत रममाण होतो, तेव्हा ’हा मी आहे, आणि हे माझे आहे’ असे मानू लागतो. परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हींच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो, तेव्हा ’मी, माझे’ हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो. ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करविले आणि आत्मतत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी ज्या परम सत्य वस्तूचा उपदेश केला, तोच मी आता तुला सांगतो. (१-४)

तिन्ही लोकांचे परम गुरू आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टिरचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले, परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टिनिर्मिती खात्रीने होऊ शकेल, ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही. हे राजा, एक दिवस ते प्रभू असा विचार करीत बसले असता प्रपयकाळच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील सोळावे आणि एकविसावे अक्षर ’त’ आणि ’प’, ’तप’ (तप कर) या प्रकारे दोन वेळा ऐकले. महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात. हे ऐकून ब्रह्मदेवांनी हे शब्द उच्चारणार्‍याला पाहण्याच्या इच्छेने चारी दिशांकडे पाहिले, पण तेथे दुसरे कोणीच दिसले नाही. जे आपल्या कमळावर बसले आणि "मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे" असा निश्चय करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला. ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वांत मोठे तपस्वी आहेत. त्यांचे ज्ञान अमोघ आहे. त्यांनी त्यावेळी दिव्य एक हजार वर्षांपर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण, मन , कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना आपल्या अधीन ठेवून तपश्चर्या केली. त्यामुळे ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले. (५-८)

त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना जो सर्वांत श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या पलीकडे दुसरा लोक नाही, असा आपला वैकुंठ लोक दाखविला. त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश, मोह आणि भय नाही. आत्मवेत्ते ज्ञानी त्याचीच स्तुती करीत असतात. तेथे रजोगुण, तमोगुण आणि यांनी मिश्र असा सत्त्वगुणपण नाही. तेथे काळाचा प्रभाव चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही. तेथे इतरांची काय कथा ? तेथे देव-दानवांनी पूजिलेले भगवंतांचे पार्षद राहतात. त्या पार्षदांचे उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे. कमळाप्रमाणे नेत्र आहेत. ते पीतांबरधारी आहेत. त्यांचे तेज दिव्य असून ते कोमलतेची मूर्तीच आहेत. सर्वांना चार-चार हात आहेत. ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्‍नजडित सुवर्णाची प्रभायुक्त आभूषणेही ते धारण करतात. त्यांचे रूप प्रवाळ, वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूंसारखे आहे. त्यांच्या कानांत कुंडले, मस्तकांवर मुगुट आणि गळ्यांत माळा शोभून दिसत आहेत. जसे आकाश चमकणार्‍या विजेप्रमाणे असनार्‍या ढगांनी शोभून दिसते, तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे कांती असणार्‍या दिव्य, तेजोमय, महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित झालेला असतो. त्या वैकुंठलोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतींद्वारा भगवंतांच्या चरणकमलांची अनेक प्रकारे सेवा करीत असते. कधी कधी ती झोपाळ्यावर बसून आपल्या प्रियतम भगवंतांच्या लीलांचे गायन करू लागते, तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागतात. (९-१३)

ब्रह्मदेवांनी पाहिले की, त्या दिव्य लोकात सर्व भक्तांचे रक्षणकर्ते, लक्ष्मीचे पती, यज्ञपती तसेच विश्वपती भगवंत विराजमान आहेत आणि सुनंद, नंद, प्रबल, अर्हण इत्यादि मुख्य मुख्य पार्षदगण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत. प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य व लालसर नेत्रांनी युक्त आहे. दृष्टी मोहक आणि मधुर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानांत कुंडले आहेत. त्यांनी पीतांबर परिधान केला आहे. ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षःस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे. ते एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत. पुरुष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, मन, दहा इंद्रिये, शब्दादि पाच तन्मात्रा आणि पंचमहाभूते, या पंचवीस शक्ति मूर्त स्वरूपात त्यांच्या चारी बाजूंनी उभ्या आहेत. समग्र ऐश्वर्य, धर्म, कीर्ति, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणार्‍या सहा ऐश्वर्यांनी ते युक्त आहेत. ते सर्वेश्वर आपल्याच नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात. त्यांचे दर्शन होताच ब्रह्मदेवाचे हृदय आनंदाच्या उद्रेकाने भरून आले. शरीर पुलकित झाले, प्रेमभराने डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. परमहंसांच्या निवृत्तिमार्गाने जे प्राप्त होतात, त्या चरणांना ब्रह्मदेवांनी नमस्कार केला. आपल्या आज्ञेला पात्र असणार्‍या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टिनिर्मितीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंदहास्ययुक्त मधुर वाणीने ते म्हणाले. (१४-१८)

श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच. तू सृष्टिरचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस. मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योगसाधन करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाहीत. तुझे कल्याण असो. तुझी इच्छा असेल, तो वर माझ्याकडे माग. वर देण्यास मी समर्थ आहे. जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यवसान माझे दर्शन हेच आहे. तू एकान्तात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस. म्हणूनच माझ्या इच्छेनेच तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले. सृष्टिरचनेविषयी किंकर्तव्यमूढ झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली. कारण, हे निष्पाप ब्रह्मदेवा, तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे. मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो. तपानेच तिचे धारण-पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो. तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे. (१९-२३)

ब्रह्मदेव म्हणाले - भगवन्, आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात साक्षीरूपाने विराजमान असता. आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता. हे नाथ, रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन, ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा. आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संपल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो आपल्यातच लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन विविध शक्तिसंपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूपे घेता आणि क्रीडा करता. हे आपण कसे करता, त्याचे मर्म मी जाणू शकेन, असे ज्ञान आपण मला द्या. आपण माझ्यावर अशी कृपा करा की, मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करतेवेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला जाणार नाही. प्रभो, आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे. म्हणून मी जेव्हा सृष्टिरचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेन आणि सावधानतेने पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेन, तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ नये. (२४-२९)

श्रीभगवान म्हणाले - अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त, असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो, ते तू ग्रहण कर. माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे, गुण आणि लीला आहेत, त्यांच्या तत्त्वांचा तू माझ्या कृपेने योग्य रीत्या अनुभव घे. "सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे, तेही मीच होतो. तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील, तेही मीच असेन. ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टिदोषाने दोन चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रांन राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही, ती माझी माया समज. प्राण्यांच्या पंचमहाभूतरचित लहानमोठ्या शरीरांत आकाशाची पंचमहाभूते, ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते, पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारणरूपाने ती असल्याकारणाने प्रवेश करीतही नाहीत. हे जसे, तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे, असे वाटते. पण आत्मदृष्टीने पाहता माझ्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही. जे सर्व ठिकाणी सदोदित असते, तेच आत्मतत्त्व होय, हेच तत्त्वजिज्ञासू माणसाने अन्वयव्यतिरेकाने जाणावे. ब्रह्मदेवा, तू अविचल समाधीने या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेव. यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. (३०-३६)

श्रीशुक म्हणाले - लोकपितामह ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांना जन्म नाही, अशा भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या देखत आपले रूप अदृश्य केले. सर्वभूतस्वरूप ब्रह्मदेवाने, भगवंतांनी आपले इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले, तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि पहिल्या कल्पांप्रमाणेच या विश्वाची रचना केली. धर्मपती, प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचे कल्याण व्हावे, हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने विधिपूर्वक यम आणि नियमांचे आचरण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी व्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी सर्वांत अधिक प्रिय, परम भक्त अशा देवर्षी नारदांनी मायापती भगवंतांच्या मायेचे तत्त्व जाणण्याच्या इच्छेने संयम, विनय आणि सौम्यता धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली आणि आपल्या सेवेने त्यांना संतुष्ट केले. आपले लोकपितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत, असे पाहून देवर्षी नारदांनी तू मला विचारलेलाच प्रश्न विचारला. त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले. मग त्यांनी हे दहा लक्षणांनी युक्त असे भगवंतांनी सांगितलेले भागवतपुराण आपला पुत्र नारद याला सांगितले. परीक्षिता, ज्यावेळी परमतेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होते, त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते. विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली हा आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तू मला विचारलेस, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देत आहे. (३७-४५)

स्कंध दुसरा - अध्याय नववा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP