श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय १० वा

भागवताची दहा लक्षणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणाले - परीक्षिता ! या भागवत पुराणात सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वन्तर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा दहा विषयांचे वर्णन आले आहे. यातील दहावे जे आश्रय तत्त्व आहे त्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने, कधी तात्पर्याने तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य नऊ विषयांचे महात्म्यांनी वर्णन केले आहे. ईश्वराच्या संकल्पाने सत्त्व-रज-तम गुणांमध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्याने जी आकाशादी पंचमहाभूते, शब्दादि तन्मात्रा, इंद्रिये, अहंकार आणि महत्तत्त्वरूप विराटाची जी उत्पत्ती होते, त्याला ’सर्ग’ म्हणतात. ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टी निर्माण होतात, त्यांचे नाव ’विसर्ग’. प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणार्‍या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी सिद्धता होते, तिचे नाव ’स्थान’. भगवंतांची भक्तांच्यावर जी कृपा होते, तिचे नाव ’पोषण’. मन्वंतरांचे अधिपती जी भगवद्‌भक्ति आणि प्रजापालनरूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात, ते ’मन्वन्तर’ म्हटले जाते. जीवांना कर्मांच्याद्वारे बंधनात टाकणार्‍या वासना त्या ’ऊती’. भगवंतांच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानांनी युक्त अशा ज्या कथा, त्या ’ईशानुकथा’ होत. योगनिद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात, तेव्हा जीवाचे आपल्या उपाधींसह भगवंतांत लीन होणे, त्याला ’निरोध’ म्हणतात. अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादि अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजे ’मुक्ति’ होय. परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्त्वाने प्रकाशित होतात, ते परब्रह्मच ’आश्रय’ आहे. नेत्र इत्यादि इंद्रियांचा जो अभिमानी द्रष्टा जीव आहे, तोच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सूर्य इत्यादि रूपांतसुद्धा आहे. आणि जो नेत्रगोल इत्यादींनी दिसणारा देह आहे, तोच या दोहोंना वेगवेगळे करतो. या तिघांपैकी एकाचा जरी अभाव झाला, तरी दुसर्‍या दोघांचे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून तिघांपैकी जो जाणतो, तो परमात्माच सर्वांचे अधिष्ठान असलेले ’आश्रय’ तत्त्व आहे. त्याचा आश्रय तो स्वतःच आहे, दुसरा कोणी नाही. (१-९)

विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडला, तेव्हा तो स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला. त्या शुद्धसंकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र पाणी निर्माण केले. विराट पुरुष ’नरा’ पासून उत्पन्न झाल्याकारणाने पाण्याचे नाव ’नार’ असे पडले. त्या आपणच उत्पन्न केलेल्या ’नारा’ मध्ये तो पुरुष एक हजार वर्षांपर्यंत राहिला, म्हणून त्याचे नाव ’नारायण’ पडले. त्या नारायणांच्या कृपेनेच द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव आदींची सत्ता आहे. त्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही. त्या अद्वितीय नारायणांनी योगनिद्रेतून जागे होऊन ’अनेक’ होण्याची इच्छा केली. तेव्हा त्यांनी आपल्या मायेने अखिल ब्रह्मांडाचे बीजस्वरूप अशा आपल्या सुवर्णमय वीर्याचे तीन भाग केले - अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत. परीक्षिता, विराट पुरुषाचे एकच वीर्य तीन भागात कसे विभागले गेले, ते ऐक. (१०-१४)

विराट पुरुषाच्या इकडे तिकडे हालण्याने त्याच्या शरीरातील आकाशापासून इंद्रियबल, मनोबल आणि शरीरबलाची उत्पत्ती झाली. त्यांपासून या सर्वांचा राजा जो ’प्राण’ तो उत्पन्न झाला, राजाच्या पाठोपाठ त्याचे सेवक जसे चालतात, तसेच सर्वांच्या शरीरातील प्राण प्रबळ असेल तरच सर्व इंद्रियेसुद्धा प्रबळ राहतात आणि प्राण जेव्हा सुस्त होतो, तेव्हा सर्व इंद्रियेसुद्धा सुस्त होतात. जेव्हा प्राणाचे येणे जाणे वेगाने होऊ लागते, तेव्हा विराट पुरुषाला तहान-भुकेचा अनुभव येऊ लागला. खाण्यापिण्याची इच्छा होताच सर्वात प्रथम त्याच्या शरीरात मुख प्रगट झाले. मुखापासून टाळू आणि टाळूपासून रसनेंद्रिय प्रगट झाले. यानंतर ज्यांना जीभ ग्रहण करते ते अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले. जेव्हा त्याला बोलण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या मुखातून वाक् इंद्रिय, त्याची अधिष्ठान-देवता अग्नि आणि त्याचा विषय बोलणे, हे तीन प्रगट झाले. यानंतर पुष्कळ दिवसपर्यंत त्या जलातच तो पडून राहिला. (१५-१९)

श्वासाच्या वेगामुळे नासिकाछिद्रे प्रगट झाली. जेव्हा त्याला वास घेण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या नाकात घ्राणेंद्रिय येऊन बसले आणि त्याची देवता - वास पसरविणारा - वायू प्रगट झाला. प्रथम त्याच्या शरीरात प्रकाश नव्हता. नंतर त्याला जेव्हा स्वतःला आणि दुसर्‍या वस्तू पाहण्याची इच्छा झाली, तेव्हा डोळे, त्यांचा अधिष्ठाता सूर्य आणि नेत्रेंद्रिय प्रगट झाले. जेव्हा वेदरूपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करून त्याला जागे करू लागले, तेव्हा त्याला ऐकण्याची इच्छा झाली. त्याच वेळी कान, त्यांची अधिष्ठात्री देवता दिशा आणि श्रोत्रेंद्रिय प्रगट झाले. यांमुळेच शब्द ऐकू येतो. जेव्हा त्याला वस्तूंची कोमलता, कठिणपणा, हलकेपणा, जडपणा, उष्णता आणि थंडपणा जाणण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली. पृथ्वीतून जशी झाडे उगवतात, त्याचप्रकारे त्या त्वचेतून रोम निर्माण झाले आणि त्याच्या आत-बाहेर राहणारा वायु प्रगट झाला. स्पर्श ग्रहण करणारे त्वचा-इंद्रिय निर्माण होऊन, त्याने शरीराला सगळीकडून लपेटून घेतले. त्यायोगे त्याला स्पर्शाचा अनुभव येऊ लागला. जेव्हा त्याला अनेक कर्मे करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याला हात फुटले. त्यांना ग्रहण करण्याची शक्ती आणि त्याची अधिदेवता इंद्र तसेच या दोन्हींच्या आश्रयाने होणारे ग्रहणरूप कर्म प्रगट झाले. जेव्हा त्याला इष्ट स्थळी जाण्याची इच्छा झाली, तेव्हा त्याच्या शरीराला पाय आले. त्याच्याबरोबरच अधिष्ठाता यज्ञपुरुष प्रगट झाला आणि चालण्याचे कर्म प्रगट झाले. माणसे याच चरणांनी चालून यज्ञसामग्री एकत्रित करतात. संतान, स्त्रीसुख आणि स्वर्गभोगाची इच्छा झाल्यावर विराट पुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पत्ती झाली. त्यात उपस्थ-इंद्रिय आणि प्रजापति देवता तसेच या दोहोंच्या आश्रयाने राहणार्‍या कामसुखाचा आविर्भाव झाला. जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली, तेव्हा गुदद्वार प्रगट झाले. त्यानंतर त्यात पायु-इंद्रिय आणि मित्रदेवता उत्पन्न झाली. या दोहोंच्या द्वारा मलत्यागाची क्रिया होते. अपानमार्गाद्वारे एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यावर नाभी प्रगट झाली. त्यातून अपान आणि मृत्यूदेवता प्रगट झाली. या दोन्हींच्या आश्रयानेच प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू येतो. जेव्हा विराट पुरुषाला अन्न-पाणी घेण्याची इच्छा झाली, तेव्हा पोट, आतडी आणि नाड्या उत्पन्न झाल्या. त्याचबरोबर आतड्यांची देवता समुद्र, नाड्यांची देवता नद्या, तसेच समाधान आणि पोषण हे दोन्ही त्यांच्यावर असणारे विषय उत्पन्न झाले. जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा केली, तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली. त्यापासून मनरूप इंद्रिय, आणि मनाची देवता चंद्र, तसेच कामना आणि संकल्प प्रगट झाले. विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी, जल आणि तेजापासून त्वचा, चर्म, मांस, रक्त, मेद, मज्जा आणि हाडे असे सात धातू प्रगट झाले. तसेच आकाश, जल आणि वायूपासून प्राणाची उत्पत्ती झाली. श्रोत्रादि इंद्रिये शब्दादि विषयांना ग्रहण करणारी आहेत. ते विषय अहंकारातून उत्पन्न झाले आहेत. मन सर्व विकारांचे उत्पत्तीस्थान आहे आणि बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे. भगवंतांच्या या स्थूल रूपाचे वर्णन मी तुला सांगितले. हे रूप बाहेरून पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्त्व आणि प्रकृति या आठ आवरणांनी आच्छादिलेले आहे. याच्याही पलिकडे भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. हे अव्यक्त, निर्विशेष, आदी, मध्य आणि अंत यांनी रहित, तसेच नित्य आहे. वाणी आणि मन तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. (२०-३४)

मी तुला भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा ज्या दोन रूपांचे वर्णन ऐकविले, ती दोन्हीही रूपे भगवंतांच्या मायेच्या द्वारे रचलेली आहेत. म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करीत नाहीत. वास्तविक भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या शक्तीनेच ते सक्रिय बनतात. नंतर ते ब्रह्माचे रूप धारण करून शब्द आणि त्याचा अर्थ या रूपांत प्रगट होतात. नंतर ते अनेक नामे, रूपे आणि क्रिया यांचा स्वीकार करतात. परीक्षिता, प्रजापती, मनू, देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, साप, किंपुरुष, उरग, मातृका, राक्षस, पिशाच, प्रेत, भूत, विनायक, कूष्मांड, उन्माद, वेताळ, यातुधान, ग्रह, पक्षी, मृग, पशू, वृक्ष, पर्वत, सरपटणारे प्राणी आणि संसारात जेवढी नाम-रूपे आहेत, ती सर्व भगवंतांचीच आहेत. जगात चर आणि अचर भेदाने दोन प्रकारचे तसेच जरायुज, अंडज, स्वेदज, आणि उद्‌भिज अशा भेदाचे चार प्रकारचे, असे जितके जलचर, स्थलचर आणि आकाशात उडणारे प्राणी आहेत, ते सर्वच्या सर्व शुभ-अशुभ आणि मिश्र कर्मांची फळे आहेत. सत्त्वगुणाच्या प्राधान्याने देवता, रजोगुणाच्या प्राधान्याने मनुष्य आणि तमोगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय योनींची प्राप्ती होते. यागुणांमध्ये सुद्धा जेव्हा एक गुण दुसर्‍या दोन गुणांमुळे दबला जातो, तेव्हा प्रत्येक गतीचे आणखी तीन तीन भेद होतात. (३५-४१)

ते भगवंत जगाचे पालन पोषण करण्यासाठी विष्णुरूप घेऊन देव, मनुष्य, पशु-पक्षी, इत्यादी रूपांत अवतार घेतात आणि विश्वाचे पालनपोषण करतात. प्रलयाचा काल आल्यावर तेच भगवान आपणच निर्माण केलेल्या या विश्वाला जसा वायू मेघमालेला आपल्यात लीन करून घेतो, त्याप्रमाणे कालाग्निस्वरूप रुद्राचे रूप धारण करून आपल्यात लीन करून घेतात. (४२-४३)

महात्म्यांनी भगवंतांचे अशा प्रकारे वर्णन केले आहे. परंतु याच्याही पलीकडील ते असल्याकारणाने, तत्त्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशा रूपातच केवळ पाहता कामा नये. सृष्टीची रचना इत्यादि कर्मांचे निरूपण परमात्म्याशी कर्माचा किंवा कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेला नाही, तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठीच केलेले आहे. कारण ते मायेमुळे कल्पिलेले आहे. हे मी ब्रह्मदेवाचे महाकल्पासह इतर कल्पांचे वर्णन केले आहे. सर्व कल्पांमध्ये सृष्टिक्रम एकसारखाच आहे. फरक एवढाच आहे की, महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशः महत्तत्त्व इत्यादीची उत्पत्ती होते आणि कल्पाच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशीच राहते. फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते. कालाचे मोजमाप, कल्प आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या मन्वंतरांचे वर्णन यापुढे करण्यात येईल. आता तू पाद्मकल्पाचे वर्णन लक्ष देऊन ऐक. (४४-४७)

शौनकांनी विचारले - सूत महोदय, आपण आम्हांस सांगितले होते की, भगवंतांचे परम भक्त विदुरांनी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्री भ्रमण केले. त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांचा मैत्रेय ऋषींबरोबर अध्यात्मासंबंधी संवाद कुठे झाला ? तसेच त्यांनी प्रश्न विचारल्यावर मैत्रेय ऋषींनी कोणत्या तत्त्वाचा उपदेश केला ? सूतमहोदय, विदुरांचे चरित्र आपण आम्हांला ऐकवावे. त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा ते त्यांच्याकडे का परत गेले ? (४८-५०)

सूत म्हणाले - ऋषींनो, राजा परीक्षिताने विचारल्यावर त्याच्या प्रश्नांना अनुसरून शुकाचार्यांनी त्याला जे काही सांगितले होते, तेच मी आपणास सांगतो, लक्षपूर्वक ऐका. (५१)

स्कंध दुसरा - अध्याय दहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP