श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ८ वा

राजा परीक्षिताचे विविध प्रश्न -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजा म्हणाला - भगवन, आपण वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली, तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला ? कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणार्‍या भगवंतांच्या कथाच लोकांचे परम मंगल करणार्‍या आहेत. म्हणून त्या मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की, ज्यायोगे मी माझ्या आसक्तिरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन. जे लोक श्रद्धेने त्यांच्या लिलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात, त्यांच्या हृदयात लवकरच भगवम्त प्रगट होतात. श्रीकृष्ण कानांच्या छिद्रांतून आपल्या भक्तांच्या भावमय हृदयकमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात. रागद्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते, तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही. ज्याप्रमाणे प्रवासाचा शीण झालेला वाटसरू आपले घर सोडीत नाही. (१-६)

भगवन, जीवाचा पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्याचे शरीर पंचमहाभूतांपासूनच बनते. हे आपोआप होते की, अन्य काही कारणामुळे ? आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात. आपण सांगितलेत की, भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रगट झाले, त्यातून सृष्टीची रचना झाली. हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिछिन्न आहे, तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले, हे कसे ? ज्यांच्या कृपेने सर्वभूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभिकमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत. सर्वांतर्यामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात ? पहिल्यांदा आपण सांगितले होते की, विराट पुरुषाच्या अंगांपासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती आणि नंतर हेही सांगितलेत की, लोक आणि लोकपालांच्या रूपात त्याच्या अंगांची कल्पना झाली. या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय ? (७-११)

महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत अवांतर कल्प किती आहेत ? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते ? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्यसुद्धा ठरलेले आहे काय ? अहो ब्राह्मणश्रेष्ठ, कालाची सूक्ष्म गती, चुटकी इत्यादि, आणि स्थूलगती, वर्ष इत्यादि, कोणत्या प्रकारे जाणली जाते ? विविध कर्मांमुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात ? देव, मनुष्य इत्यादि योनी, सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या कालस्वरूपच प्राप्त होतात. त्या इच्छिणार्‍या जीवांपैकी कोण-कोण, कोण-कोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात ? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी समुद्र, द्वीप आणि त्यांत राहणार्‍या जीवांची उत्पत्ती कशी होते ? ब्रह्मांडाचे आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणे सांगा. त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्मांचे निरूपण करा. युगांचे भेद, त्यांची परिमाणे, त्यांचे वेगवेगळे धर्म, तसेच भगवंतांच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रेसुद्धा सांगा. मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोण-कोणते आहेत ? भिन्न भिन्न व्यवसाय करणार्‍या लोकांचे, राजर्षींचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्त्वांची संख्या किती आहे ? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते ? भगवम्तांची आराधना आणि अध्यात्मयोगाचा विधी कोणता आहे ? योगेश्वरांना कोण-कोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंति त्यांना कोणती गति मिळते ? योग्यांचे लिंगशरीर कोणत्या प्रकारे भंग होते ? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे ? सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिति आणि प्रलय कसा होतो ? तळी, विहिती खोदणे इत्यादि स्मार्त, यज्ञ यागादि वैदिक तसेच काम्य कर्मांचा आणि धर्म, अर्थ, काम यांच्या साधनांचा विधी काय आहे ? प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते ? पाखंडांची उत्पत्ती कशी होते ? आत्म्याच्या बंध - मोक्षाचे स्वरूप काय आहे ? आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो ? भगवंत परम स्वतंत्र आहेत. ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षीभावाने उदासीन कसे राहतात ? भगवन, मी हे सर्व आपल्याला विचारीत आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. मनामुने, आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांचे तात्त्विक निरूपण करावे. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परम प्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्वपरंपरेने ऐकली-सांगितलेलीच माहिती सांगतात. ब्रह्मन, रागावलेल्या ब्रह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही. कारण मी आपल्य मुखकमलातून निघणार्‍या भगवंतांच्या अमृतमय लीलाकथांचे श्रवण करीत आहे. (१२-२६)

सूत म्हणाले - जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीलाकथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद् भागवतमहापुराण सांगितले, जे ब्राह्म कल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. (२७-२८)

पांडुवंशशिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते, ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले. (२९)

स्कंध दुसरा - अध्याय आठवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP