|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ७ वा
भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] ब्रह्मदेव म्हणाले - प्रलयकालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण यज्ञमय असे वराहशरीर ग्रहण केले. पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्याक्ष लढण्यासाठी त्यांच्यासमोर आला. इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते, तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले. (१) पुढे प्रभूंची रुची नामक प्रजापतीपासून आकूतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला. त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली. यावरून स्वायंभुव मनूने त्यांना ’हरि’ हे नाव ठेवले. (२) नारदा, कर्दम प्रजापतीच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी नऊ बहिणींसह भगवंतांनी कपिलरूपाने अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यायोगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मल - तीन गुणांच्या आसक्तीचा चिखल धुऊन टाकून ती कपिल भगवानांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली. (३) भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावे, अशी महर्षी अत्रींची इच्छा होती. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की, "मी स्वतःला तुम्हांला दिले आहे." म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंतांचे नाव ’दत्त’ (दत्तात्रेय) पडले. त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू, सहस्रार्जुन इत्यादींनी योगाच्या भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या. (४) नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन ’तप’ अर्थात ’सन’ नावांनी युक्त होऊन भगवंतांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार रूपांमध्ये अवतार धारण केला. या अवरातारांत त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील, विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाचा ऋषींना जसाच्या तसा उपदेश केला. त्यामुळे तांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्त्वाचा साक्षात्कार करून घेतला. (५) धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रगट झाले. त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता. इंद्राने पाठविलेली कामसेना म्हणजेच अप्सरा, त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत. शंकर आदी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्याच जळणार्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत. तोच क्रोध-नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्याअगोदरच थरथर कापतो, मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल ? (६-७) राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुवबाळाला त्याच्या सावत्र आई - सुरुचीने शब्दबाणांनी घायाळ केले. तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासठी तो वनात निघून गेला. त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन त्या ध्रुवाच्या वरखाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षिगण त्याची स्तुती करतात. (८) कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकाररूपी वज्राने जळून भस्म झाले. तो नरकात पडू लागला. ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीरमंथनातून पृथूच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली. अशा प्रकारे ’पुत्र’ शब्दाचे सार्थक केले. त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या. (९) राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला. या अवतारात, सर्व आसक्तिंपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन, स्वतःला वेड्याप्रमाणे भासवून योगाचरण केले. या अवस्थेला महर्षी लोक ’परमहंसपद’ किंवा ’अवधूतचर्या’ असे म्हणतात. (१०) यानंतर स्वतः त्या यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला. भगवंतांचा हा अवतार वेदमय, यज्ञमय आणि सर्वदेवमय आहे. त्यांच्याच नासिकेतून वाहणार्या श्वासातून वेदवाणी प्रगट झाली. (११) चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी मनू सत्यव्रताने भगवंतांना मत्स्यरूपाने प्राप्त करून घेतले. त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्याकारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले. प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले. (१२) जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते, तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले. त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने, त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली. त्यामुळे ते काही क्षण निद्रासुख घेऊ शकले. (१३) देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले. थरथराणार्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते. त्यांना पाहताच हिरण्यकशिपू गदा घेऊन, त्यांच्या अंगावर तुटून पडला. यावर भगवान नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असताही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले. (१४) मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला, जेव्हा थकून जाऊन तो घाबरला, तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमल-पुष्प घेऊन "हे आदिपुरुषा ! हे समस्त लोकांच्या स्वामी ! ह पवित्रकीर्ती ! हे नामश्रवणानेच कल्याण करणार्या भगवंता !" असा भगवंतांचा धावा केला. त्याचा धावा ऐकून अनंतशक्ति भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोंड पकडून त्याची त्या संकटातून सुटका केली. (१५-१६) भगवान वामन अदितीच्या पुत्रांपैकी सर्वांत लहान होते. परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वांत श्रेष्ठ होते. कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात, बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले. वामन बटू बनून त्यांनी तीन पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच; परंतु यातून हेच सिद्ध केले की, सन्मार्गावरून चालणार्या पुरुषांना, समर्थ पुरुषसुद्धा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाहीत. (१७) हे नारदा, दैत्यराज बलीने आपल्या डोकावर वामनांचे चरणतीर्थ घेतले. किंवा तो देवतांचा राजा होता, यात काही विशेष नाही. आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता. एवढेच काय, भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर्पित केले, यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे. (१८) नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग, ज्ञान आणि आत्मतत्त्वाला प्रकाशित करणार्या भागवतधर्माचा उपदेश केला. भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो. तेच भगवंत स्वायंभुव आदि मन्वंतरात मनूच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे दाही दिशांना विनासायास निष्कंटक असे राज्य करतात. तिन्ही लोकांच्या वर असणार्या सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ति पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला सारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात. (१९-२०) स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वन्तरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोग्यांच्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात. त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेला यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रकट केला. (२१) जेव्हा जगात ब्राह्मणद्रोही, आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरकयातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले, तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने एकवीस वेळा त्यांचा संहार केला. (२२) मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकुवंशात अवतीर्ण झाले. या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यांसह वनवासात गेले. त्याच वेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला. जसे भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले, तसे ज्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोहोचले, त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की, त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थरथर कापणार्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली. जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन ऐरावत याच्या दातांचा चक्काचूर होऊन ते सगळीकडे पसरतील, त्यामुळे दिशाही पांढर्या शुभ्र होतील, तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागेल. आपल्या पत्नीला पळवणार्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणत्कारानेच प्राणांसह तत्काळ नाहीसा करतील. (२३-२५) दैत्यांच्या झुंडींनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील. ते आपला महिमा प्रगट करणार्या अद्भूत लीला करतील. त्या लीला लोकांना बिलकूल समजू शकणार नाहीत. बालपणातच पूतनेचे प्राण हरण करणे, तीन महिन्याच्या वयात पायाने भलामोठा छकडा उलटून टाकणे आणि गुडघ्यांवर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जुन वृक्षांमध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे, अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही. जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेच पाणी पिऊन वासरे आणि गोपबालक मरतील, तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विषशक्तीने जीभ हलविणार्या कालियानागाला तेथून हुसकून लावतील, त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथेच यमुनातटावर निद्रिस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन चारी बाजूंनी जळू लागेल, तेव्हा बलरामासह, त्या प्राणसंकटांत सापडलेल्या व्रजवासीयांना त्यांचे डोळे बंद करावयास सांगून, ते त्यांना गोकुळात नेतील. ही त्यांची लीला तर अलौकिकच असेल. कारण त्यांची शक्ति अचिंत्य आहे. त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी जी दोरी आणील, ती ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही. तसेच जांभई देतेवेळी श्रीकृष्णांच्या मुखामध्ये चौदा भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल, पण नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील. ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील. मग दानवाचा पुत्र व्योमासुर जेव्हा गोपबालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवील, तेव्हा ते त्यांना तेथून वाचवतील. दिवसभर कामधंद्यात व्यग्र असणार्या गोकुळातील लोकांना, ते आपल्या परमधामाला घेऊन जातील. हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील, तेव्हा इंद्र व्रजभूमी बुडविण्यासाठी चारी बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील. त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पशूंचे रक्षण करण्यासाठी सात वर्षांचे कृपाळू भगवंत सात दिवसपर्यंत गोवर्धन पर्वत, एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील. वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरलेले असेल, तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील. ही तान ऐकून प्रेमविह्वल होऊन आलेल्या गोपींचे कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करील, तेव्हा ते त्याचे मस्तक उडवतील. आणखीही पुष्कळ पलंबासुर, धेनुकासुर, बकासुर, केशी, अरिष्टासुर इत्यादि दैत्य, चाणूरादि पहिलवान, कुवलयापीड नावाचा हत्ती, कंस, कालयवन, भौमासुर, मिथ्यावासुदेव, शाल्व, द्विविद वानर, बल्वल, दंतवक्र, राजा नग्नजिताचे सात बैल, शंबरासुर, विदूरथ आणि रुक्मी तसेच कांबोज इत्यादि, मत्स्य, कुरू, कैकेय आणि सृंजय आदि देशांचे राजे, तसेच जे जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील, ते सर्व बलराम, भीमसेन, आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंतांच्या कडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील. (२६-३५) काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ति कमी होत जाते, आयुष्यही कमी होऊ लागते, त्यावेळी भगवंत असे पाहतात की, आता हे लोक माझे तत्त्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत. तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रगट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील. (३६) देवांचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या, अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील, तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेष धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळशा उपधर्मांचा उपदेश करतील. कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरीसुद्धा भगवंतांचे कथा-कीर्तन होणार नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील. एवढेच काय पण कोठेही ’स्वाहा’, ’स्वधा’ आणि ’वषट्कार’ चा ध्वनीही ऐकू येणार नाही, तेव्ह कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत "कल्कि" अवतार ग्रहण करतील. (३७-३८) जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते, तेव्हा तप, नऊ प्रजापती, मरीची आदि ऋषी आणि मी अशा रूपात; जेव्हा सृष्टिरक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म, विष्णू, मनू, देवता आणि राजाच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप तसेच दैत्य आदिंच्या रूपात सर्वशक्तिमान भगवंतांच्या या विभूती मायेने प्रगट होतात. पृथ्वीवरील एकेक धूलिकण मोजू शकणाराही कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तींची गणना करू शकेल ? जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करीत होते, त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृतिरूप अंतिम आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते. तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले. समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे. अशा अनन्त शक्तींचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही, तुझे ज्येष्ठ बंधू सनकादिकही जाणत नाहीत; तर इतर कोण जाणू शकेल ? आदिदेव भगवान शेष सहस्र मुखांनी त्यांच्या गुणांचे गायन करीत आहे; परंतु अजूनही त्याला त्यांचा पार लागलेला नाही. जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात, त्यांच्यावर जे अनंत भगवान स्वतःच दया करतात, असे भक्तच त्यांची दुस्तर माया तरून जातात. आणि अशा भक्तांचीच कोल्हाकुत्रांचे भक्ष्य असलेल्या देहाविषयी ’मी, माझे’ ही बुद्धी असत नाही. प्रिय नारदा, परमपुरुषाच्या त्या योगमायेला मी, तुम्ही, भगवान शंकर, दैत्यकुलभूषण प्रह्लाद, शतरूपा, मनू, मनुपुत्र, प्राचीनबर्ही, ऋभू आणि ध्रुव जाणतात. यांच्याशिवाय इक्ष्वाकू, पुरूरवा, मुचुकुंद, जनक, गाधी, रघू, अंबरीष, सगर, गय, ययाती, मांधाता, अलर्क, शतधन्वा, अनु, रन्तिदेव, भीष्म, बली, अमूर्तरय, दिलीप, सौभरी, उत्तंक, शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वत, उद्धव, पराशर, भूरिषेण, बिभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, आर्टिषेण, विदुर, श्रुतदेव इत्यादि महात्मेसुद्धा जाणतात. ज्यांना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळालेले असते, ते स्त्रिया, शूद्र, हूण, भिल्ल आणि पापांमुळे पशु-पक्षी आदि योनीत जन्मलेलेसुद्धा भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसारसागरातून कायमचे तरून जातात; तर जे लोक वेदविहित सदाचाराचे पालन करतात, त्यांच्याबद्दल काय सांगावे ? (३९-४६) परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस, शांत, भयरहित तसेच केवळ ज्ञानस्वरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत् आणि असत् दोन्हीच्या पलीकडे ते आहे. कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एवढेच काय, स्वतः मायासुद्धा त्यांच्यासमोर न जाता लाजेने दूर उभी राहते. परमपुरुष भगवंतांचे तेच परमपद आहे. महात्मे लोक त्याच शोकरहित, अनंत, आनंदस्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात. इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्याकारणाने पाण्यासठी विहीर खोदण्याकरता कुदळ जवळ बाळगीत नाही, त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणार्या ज्ञान-साधनांनाही दूर लोटतात. सर्व कर्मांचे फळही भगवंतच देतात, कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभ कर्म करतो, ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते. या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही. (४७-४९) पुत्रा नारदा, केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणार्या षडैश्वर्यसंपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्यासमोर केले, जो काही कार्य-कारणभाव किंवा अभाव आहे, तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही. असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्तही आहेत. भगवंतांनी मला जे सांगितले होते, तेच हे ’भागवत’ होय. यात भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे. तू याचा विस्तार कर. जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्वस्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल, अशा प्रकारे याचे वर्णन कर. जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ति असलेल्या मायेचे वर्णन करतो किंवा दुसर्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो, अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो, त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही. (५०-५३) स्कंध दुसरा - अध्याय सातवा समाप्त |