श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ६ वा

विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मदेव म्हणाले - त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नी उत्पन्न झाला. सात धातूंपासून गायत्री, त्रिष्टुप्, अनुष्टुप्, उष्णिक, बृहती, पंक्ति आणि जगती या सात छंदांची उत्पत्ती झाली. रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण, मनुष्य, पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न, सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले. त्याच्या नाकांच्या छिद्रांपासून प्राण, अपान, व्यान, उदान, आणि समान हे पाच प्राण तसेच वायू आणि घ्राणेंद्रियापासून अश्विनीकुमार, सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले. त्याचे डोळे रूप, तेज, डोळे, स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत. त्याच्या कानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोत्रेंद्रियापासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली. त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार, तसेच सौंदर्याचा खजिनाच होय. त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ, स्पर्श आणि वायू निघाले आहेत. त्याचे रोम उद्‌भिज पदार्थांचे जन्मस्थान आहेत किंवा ज्यापासून यज्ञ संपन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत. त्याचे केस, दाढी, मिशा, आणि नखांपासून मेघ, वीज, पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू, तसेच भुजांपासून विश्वाचे बहुधा संरक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले आहेत. त्याचे चालणे-फिरणे हे भूलोक, भुवर्लोक आणि स्वर्लोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे. सर्व इच्छांची पूर्तता करणार्‍या त्याचे चरणकमल, जे मिळाले आहे, त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात. विराट पुरुषाचे लिंग हे पाणी, वीर्य, सृष्टी, मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे. तसेच त्याचे जननेंद्रिय प्रजनन व आनंदाचा उगम आहे. नारदा, विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय यम, मित्र, मलत्याग यांचे; तर गुदद्वार हिंसा, निर्‌ऋती, मृत्यू आणि नरकाचे उत्पत्तिस्थान आहे. त्याच्या पाठीपासून पराजय, अधर्म आणि अज्ञान तर नाड्यांपासून नद-नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाला आहेत. त्याच्या पोटात मूळ प्रकृती, रस नावाचा धातू, समुद्र, समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे. त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय. नारदा, मी, तू, धर्म, सनकादी, शंकर, विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहेत. मी, तू, हे तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी, शंकर, देवता, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूत-प्रेते, सर्प, पशू, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, आकाश, पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव, ग्रह, नक्षत्रे, धूमकेतू, तारे, वीज, आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत. हे संपूर्ण विश्व, जे होते, जे आहे व जे असेल, सर्वांना त्यानेच वेढले आहे. इतकेच काय पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ वीतभरच आहे. जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवितो, त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो. मुनिवरा, मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते, त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तोच अमृत, तसेच मोक्षाचा स्वामी आहे. म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही. संपूर्ण लोक भगवंतांचे अंशमात्र आहेत. तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात. भूलोक, भुवर्लोक, आणि स्वर्लोक यांच्या वर महर्लोक आहे. त्याच्याही वर जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहे. तेथे क्रमशः अमृत, क्षेम आणि अभय यांचा नित्य निवास आहे. (१-१८)

जन, तप आणि सत्य या तीन लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमांतील लोक निवास करतात. दीर्घकालपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही, असे गृहस्थ लोक भूलोक, भुवर्लोक आणि स्वर्गलोक येथेच निवास करतात. मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप उपासनामार्ग यांपैकी एकावरून वाटचाल करतो. परंतु दोन्हींचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून हे ब्रह्मांड, पंचमहाभूते, अकरा इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे, ते प्रभूसुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहूनसुद्धा त्यांपासून सर्वतोपरी अलिप्त आहेत. (१९-२१)

ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला, त्यवेळी या पुरुषांच्या अंगांव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञसामुग्री मिळाली नाही. त्यावेळी मी त्याच्या अंगांमधूनच यज्ञाचा पशू, स्तंभ, कुश, ही यज्ञभूमि आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली. हे ऋषिश्रेष्ठा, यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू, जव, तांदूळ अशी धान्ये, तूप, आदी स्निग्धपदार्थ, सहा रस, लोखंड, माती, पाणी, ऋक्, यजु, साम, चातुर्होत्र, यज्ञांची नावे, मंत्र, गती, मती, श्रद्धा, प्रायश्चित्त, आणि समर्पण अशी सर्व यज्ञसामुग्री मी विराट अंगांपासूनच एकत्रित केली. अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगांपासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने त्या यज्ञस्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले. त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या नऊ प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली. नंतर वेळोवेळी मनू, ऋषी, पितर, देवता, दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंतांची आराधना केली. हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे, जे स्वतः गुणरहित आहेत; परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात. त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो, त्यांच्याच अधीन राहून रुद्र याचा संहार करतो आणि सत्त्व, रज, तमरूप तीन शक्ति धारण करणारे ते स्वतः विष्णुरूपाने याचे पालन करतात. पुत्रा, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले. भाव किंवा अभाव, कार्य किंवा कारण या रूपांत भगवंतांपासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. (२२-३२)

प्रिय नारदा, भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो, म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही, माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिये कधी कुमार्गाने जात नाहीत. मी वेदमूर्ति आहे, माझे जीवन तपस्यामय आहे, मोठ मोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे. मी मोठ्या निष्टेने योगाचेही अनुष्ठान केले, परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्म-मृत्यूपासून सोडविणार्‍या, परम कल्याणस्वरूप अशा, भगवंतांच्या चरणांनाच नमस्कार करतो. जसे आकाश आपल्या महिम्याचा अंत जाणत नाही, तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाहीत. अशा स्थितीत दुसर्‍या कोणाला त्यांचा अंत कसा लागेल ? मी, माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाहीत; तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील ? त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो (३३-३६)

आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो, पण त्यांचे तत्त्व जाणत नाही. त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत. प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात, त्याचे रक्षण करतात आणि त्याचा संहार करतात. ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. त्यांना ना आदि, ना अंत. ते तिन्ही गुणांनी रहित, सनातन तसेच अद्वितीय आहेत. नारदा, महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतःकरण, इंद्रिये आणि शरीराला पूर्ण शांत करतात, ज्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो. परंतु जेव्हा कुतर्कांच्या पडद्यात त्यांना झाकले जाते, तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही. (३७-४०)

परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्या खेरीज काल, स्वभाव, कार्यकारणात्मक प्रकृती, महत्तत्त्व, पंचमहाभूते, अहंकार, तीन गुण, इंद्रिये, ब्रह्मांड-शरीर, वैराज, स्थावर आणि जंगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंतांचीच रूपे आहेत. मी, शंकर, विष्णू, दक्ष आदि प्रजापती, तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्त जन, स्वर्गलोकाचे रक्षक, पक्ष्यांचे राजे, मनुष्यलोकांचे राजे, पाताळलोकांचे अधिनायक, यक्ष, राक्षस, साप, आणि नागांचे स्वामी, महर्षी, पितृपती, दैत्येंद्र, सिद्धेश्वर, दानवराज, शिवाय प्रेत-पिशाच्च, भूत-कूष्मांड, जलजंतू, पशुपक्ष्यांचे राजे, यांखेरीज संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर्य, तेज, इंद्रियबल, मनोबल, शरीरबल, किंवा क्षमा यांनी युक्त आहेत, किंवा जे काही विशेष सौंदर्य, लज्जा, वैभव आणि विभूतींनी युक्त आहे. तसेच जितक्या काही वस्तू अद्‌भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत, हे सर्व परमतत्त्वमय असे भगवत्स्वरूपच आहे. नारदा, याशिवाय परम पुरुष परमात्म्याचे जे मुख्य मुख्य लीलावतार शास्त्रांत वर्णिले आहेत, त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो. त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियांचे दोष दूर करणारी आहेत. तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे. (४१-४५)

स्कंध दुसरा - अध्याय सहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP