|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ५ वा
सृष्टिवर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नारदांनी विचारले - तात आपण अनादी, देवाधिदेव आणि सृष्टिकर्ते आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याच्यामुळे आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो, ते ज्ञान आपण मला सांगावे. प्रभो, या संसाराचे लक्षण काय आहे ? याचा आधार काय ? याची निर्मिती कोणापासून झाली ? याचा प्रलय कशामध्ये होतो ? हा कोणाच्या आधीन आहे ? आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे ? आपण याचे सत्य स्वरूप मला सांगावे. जे काही झाले, होत आहे आणि होणार आहे, याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण जाणताच. हा सगळा संसार तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टिपथातच आहे. आपल्याला हे ज्ञान कोठून मिळाले ? आपण कोणाच्या आधारावर उभे आहात ? आपले स्वामी कोण आहेत ? आपले स्वरूप काय आहे ? आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमहाभूतांच्या द्वारा प्राण्यांची उत्पत्ती करता. कोळी सहजतया जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्याच्याशीच खेळतो, तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम पडत नाहीत. जगामध्ये नाम, रूप आणि गुणांवरून जे काही जाणले जाते, त्यांपैकी कोणतीही वस्तू, ती सत्-असत्, उत्तम, मध्यम किंवा अधम कशीही असो, आपल्या शिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही. अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली, यावरून मला अशी शंका येते की, आपल्यापेक्षा उच्चकोटीचा कोणी आहे काय ? आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात. मी जे काही विचारीत आहे, ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की, जेणे करून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन. (१-८) ब्रह्मदेव म्हणाले - पुत्रा नारदा, सर्व जीवांबद्दल वाटणार्या करुणतेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस. कारण यामुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे. कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडील असे भगवत्तत्त्व जाणले जात नाही, तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील. जसे सूर्य, अग्नी, चंद्र, ग्रह, नक्षत्रे आणि तारे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात, तसाच मीसुद्धा भगवंतांच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतो. ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्गुरू म्हणतात, त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो. ही माया तर लाजून त्यांच्यासमोर उभीसुद्धा राहात नाही. परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन "हा मी, हे माझे" अशा प्रकारे बडबड करतात. हे नारदा द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव यांपैकी वास्तविक भगवंतांखेरीज अशी कोणतीच वस्तू नाही. वेद नारायणांचेच वर्णन करणारे आहेत. देवता नारायणांशीच एकरूप आहेत आणि सर्व यज्ञसुद्धा नारायणांच्या प्रसन्नतेसाठीच आहेत. यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणांमध्येच कल्पिलेले आहेत. सर्व योगसाधना नारायणांच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात. सर्व प्रकारचे तप नारायणांकडेच घेऊन जाते, ज्ञानानेही नारायणांनाच जाणले जाते. सर्वांचे फलही भगवान नारायणच होत. ते द्रष्टा असूनही ईश्वर आहेत. निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहेत. त्यांनीच मला निर्माण केले आहे. आणि त्यांच्या दृष्टिनेच प्रेरित झालेला मी सृष्टि रचना करतो. मायेच्या गुणांनी रहित अशा भगवंतांनी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यासाठी रज, तम आणि सत्त्व हे गुण मायेच्या द्वारे स्वीकारलेले आहेत. हे तीन गुण द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्य, कारण आणि कर्तेपणा यांच्या अभिमानाने बद्ध करतात. नारदा, इंद्रियातीत असणारे भगवान गुणांच्या या तीन आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात, म्हणून लोक त्यांना ओळखत नाहीत. माझे आणि सर्व विश्वाचे एकमात्र स्वामी तेच आहेत. (९-२०) मायापती भगवंतांना "आपण अनेक व्हावे" अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल, धर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला. भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला, स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्तत्त्वाला जन्म दिला. रजोगुण आणि सत्त्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महत्तत्त्वापासून ज्ञान, क्रिया आणि द्रव्यरूप असा तमःप्रधान विकार उत्पन्न झाला. त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला. ते तीन भेद वैकारिक, तेजस आणि तामस. नारदा, हे क्रमशः ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति आणि द्रव्यशक्तिप्रधान आहेत. जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार रूपांतरित झाला, तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशाचा गुण शब्द आहे. या शब्दाच्या द्वारेच द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो. जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला, तेव्हा त्यापासून वायूची उत्पत्ती झाली, त्याचा गुण स्पर्श आहे. इंद्रियांच्यामध्ये स्फूर्ती, शरीरात जीवनशक्ति, ओज आणि बल हे याचे रूप आहे. काल, कर्म आणि स्वभावाने वायूमध्ये सुद्धा विकार उत्पन्न होऊन त्याच्यापासून तेजाची उत्पत्ती झाली. याचा प्रधान गुण रूप आहे. आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श हेही गुण याच्यात आहेत. तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली. याचा गुण आहे रस. याला कारणतत्त्व असणार्यांचे शब्द, स्पर्श आणि रूप हेही गुण याच्यात आहेत. पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली. तिचा गुण आहे गंध. कारणाचे गुण कार्यात येतात, या न्यायाने शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आले. वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनीकुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती या दहा देवतांची उत्पत्ती झाली. तैजस अहंकारापासून कान, त्वचा, डोळे, जीभ, पाय गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. त्याचबरोबर ज्ञानशक्तिरूप बुद्धी आणि क्रियाशक्तिरूप प्राण हेही तैजस अहंकारापासून उत्पन्न झाले. (२१-३१) हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी, ज्यावेळी ही पंचमहाभूते, इंद्रिये, मन आणि सत्त्व इत्यादी तीन गुण हे सर्व एकमेकांशी संगठित झाले नव्हते, तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगांचे साधनरूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत. जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने यांना प्रेरित केले, तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. त्यांनी आपापसात कार्यकारणभावाचा स्वीकार करून व्यष्टिरूप पिंड एक जीव आणि समष्टिरूप ब्रह्मांड सर्व चराचर जीव या दोहोंची रचना केली. ते ब्रह्मांडरूप अंडे एक हजार वर्षेपर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले. नंतर काल, कर्म आणि स्वभाव यांच्या साह्याने भगवंतांनी त्याला जीवित केले. ते अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला. त्याच्या मांड्या, पाय, हात, डोळे, तोंड आणि मस्तके हजारो होती. विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगामध्ये समस्त लोकांची कल्पना करतात. त्याच्या कमरेपासून खालील अंगात सप्त पाताळांची आणि वरील अंगात सप्त स्वर्गांची कल्पना केली जाते. या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख आहे, क्षत्रिय हात आहेत. वैश्य याच्या मांड्यांपासून आणि शूद्र पायांपासून उत्पन्न झाले आहेत. याच्या पायांमध्ये भूलोकाची कल्पना केली गेली आहे. नाभीमध्ये भुवर्लोक, हृदयात स्वर्लोक, आणि परमात्म्याच्या वक्षःस्थळामध्ये महर्लोकाची कल्पना केली गेली आहे. त्याच्या गळ्यामध्ये जनलोक, दोन्ही स्तनांमध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे. त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल, मांड्यांमध्ये वितल, गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुतललोक आणि पोटर्यांमध्ये तलातलाची कल्पना केली गेली आहे. घोट्यांमध्ये महातल, पायांच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ समजावे. अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे. किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी, नाभीमध्ये भुवर्लोक आणि मस्तकात स्वर्लोक अशा प्रकारे सुद्धा तिन्ही लोकांची कल्पना केली जाते. (३२-४२) स्कंध दुसरा - अध्याय पाचवा समाप्त |