श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ४ था

राजाचे सृष्टिविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणाले - श्रीशुकदेवांचे बोलणे भगवत्तत्त्वाचा निश्चय करणारे होते. उत्तरेचा पुत्र राजा परीक्षिताने ते वचन ऐकून आपली शुद्ध बुद्धी भगवन श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्यभावाने समर्पित केली. शरीर, पत्‍नी, पुत्र, राजमहाल, पशू, धन, बांधव आणि निष्कंटक राज्य यांच्याविषयीची सवयीने दृढ झालेली ममता त्यांनी एका क्षणात सोडून दिली. शौनकादी ऋषींनो, महामना परीक्षिताने आपल्या मृत्यूची निश्चित वेळ जाणली होती. म्हणून त्याने धर्म, अर्थ आणि कामाशी संबंध असणारी सर्व कर्मे सोडून दिली. नंतर भगवान श्रीकृष्णांमध्ये आत्मभावाने मिसळून जाऊन मोठ्या श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचा महिमा ऐकण्यासाठी त्याने श्रीशुकदेवांना तोच प्रश्न विचारला, जो आपण मला विचारीत आहात. (१-४)

परीक्षिताने विचारले - "भगवत्स्वरूप मुनिवर, आपण परमपवित्र आणि सर्वज्ञ आहात. आपण जे काही सांगितले ते सत्य आणि योग्य आहे. आपण जसजशी भगवंतांची कथा सांगत आहात, तसतसा माझा अज्ञानाचा पडदा नाहीसा होऊ लागला आहे. मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की, भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात ? कारण या सृष्टीची रचना ब्रह्मदेवांसारख्यांनाही कळण्यासारखी नाही. भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात ? अनंतशक्ती परमात्मा कोणकोणत्या शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनून त्यांच्याशी खेळतात ? तसेच हे ब्रह्मांड कसे बनवितात आणि पुन्हा कसे मिटवून टाकतात ? हे मुनिवर्य, भगवान श्रीहरींच्या लीला मोठ्या अद्‌भुत आणि अचिंत्य आहेत. विद्वांनाही त्यांच्या लीलांचे रहस्य समजणे अवघड जाते. एकटे भगवंत पुष्कळशी कर्मे करण्यासाठी पुरुषरूपाने प्रकृतीच्या विभिन्न गुणांना एकाच वेळी धारण करतात ? मुनिवर, आपण वेद आणि ब्रह्मतत्त्व दोन्हींचेही मर्म जाणत आहात; म्हणून आपण माझ्या या जिज्ञासेचे समाधान करावे ? (५-१०)

सूत म्हणाले - जेव्हा परीक्षिताने भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा श्रीशुकदेवांनी भगवान श्रीकृष्णांचे वारंवार स्मरण करून प्रवचनाला प्रारंभ केला (११)

श्रीशुकाचार्य म्हणाले - जे संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी सत्त्व, रज आणि तमोगुणरूप तिन्ही शक्तींचा स्वीकार करून ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात, जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामीरूपाने विराजमान आहेत, ज्यांचे स्वरूप आणि ते जाणण्याचा मार्ग बुद्धीला न कळणारा आहे. अशा अनंत महिमा असणार्‍या परमपुरुषांना मी नमस्कार करतो. सत्पुरुषांचे दुःख नाहीसे करणार्‍या, दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळ्या देवता बनून त्यांना मागेल तेवढेच फळ देणार्‍या आणि परमहंस संन्याशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आत्मवस्तूचे दान करणार्‍या परमात्म्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जे भक्तवत्सल आहेत, भक्ती नसलेल्यांना जे अज्ञात असतात, ज्यांच्यासारखे ऐश्वर्य कोणाचेच नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक कसे असू शकेल ? अशा ऐश्वर्याने युक्त असूनही जे नेहमी ब्रह्मस्वरूप असणार्‍या आपल्याच धामामध्ये विहार करतात, त्या भगवानांना मी वारंवार नमस्कार करतो. ज्यांचे कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण आणि पूजन जीवांची पापे तात्काळ नाहीशी करते, त्या पुण्यकीर्ति भगवानांना वारंवार नमस्कार असो ! विवेकी पुरुष ज्यांच्या चरणकमलांना शरण जाऊन आपल्या हृदयातून या व परलोकाची आसक्ती काढून टाकतात आणि कोणत्याही परिश्रमाविना ब्रह्मपद प्राप्त करून घेतात, त्या मंगल कीर्ति असणार्‍या भगवान श्रीकृष्णांना अनेक वेळा नमस्कार असो. मोठेमोठे तपस्वी, दानशूर, यशस्वी, सदाचारी आणि मंत्रवेत्ते जोपर्यंत आपली मोक्षप्राप्तीची साधने स्वतःसह त्यांच्या चरणी समर्पित करीत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही. अशा कल्याणकारी कीर्ति असणार्‍या भगवान श्रीकृष्णांना वारंवार नमस्कार असो. किरात, हूण, आंध्र, पुलिन्द, पुल्कस, आभीर, कङ्क, यवन, खस इत्यादी कनिष्ठ जाती तसेच पापी, ज्यांच्या शरणागत भक्तांना शरण जाऊनच पवित्र होतात, त्या सर्वशक्तिमान भगवंतांना पुन्हा नमस्कार असो. (१२-१८)

तेच भगवान ज्ञानी पुरुषांचे आत्मा, भक्तांचे स्वामी, कर्मकांड करणार्‍यांसाठी वेदमूर्ती, धार्मिकांच्यासाठी धर्ममूर्ती आणि तपस्वी लोकांसाठी तपःस्वरूप आहेत. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवसुद्धा शुद्ध हृदयाने त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करतात आणि आश्चर्यचकित होऊन राहतात, ते माझ्यावर कृपेचा वर्षाव करोत. लक्ष्मीदेवीचे पती, सर्व यज्ञांचे भोक्ते आणि फल देणारे, प्रजेचे रक्षक, सर्वांच्या अंतर्यामी, सर्व लोकांचे पालनकर्ते, पृथ्वीदेवीचे स्वामी, अंधक, वृष्णी आणि यादवांचे प्रमुख तसेच आधार, भक्तवत्सल आणि संतांचे सर्वस्व असे श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न होवोत. विद्वान पुरुष ज्यांच्या चरणकमलांच्या चिंतनरूप समाधीने शुद्ध झालेल्या बुद्धीच्या द्वारा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार करून घेतात आणि आपापल्या आवडीनुसार ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत राहतात, ते भगवान मुकुन्द माझ्यावर प्रसन्न होवोत. ज्यांनी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या हृदयात आधीच्या कल्पाची स्मृती जागृत करण्यासाठी सरस्वती देवीला प्रेरित केले, तेव्हा ती स्वतः अंगांसहित वेदरूपाने त्यांच्या मुखातून प्रगट झाली, ते ज्ञानाचे मूळ कारण असलेले भगवान माझ्यावर कृपा करोत. भगवंतच पंचमहाभूतांपासून या शरीरांना निर्माण करून त्यामध्ये जीवरूपाने शयन करतात आणि या पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण व मन या सोळा कलांनी युक्त होऊन सोळा विषयांचा उपभोग घेतात, ते भगवान माझ्या वाणीला अलंकृत करोत. ज्यांच्या मुखकमलातून मकरंदाप्रमाणे पाझरलेल्या ज्ञानमय अमृताचे जे संत पुरुष सेवन करतात, त्या वासुदेवावतार सर्वज्ञ भगवान व्यासांच्या चरणी माझा नमस्कार असो. (१९-२४)

परीक्षिता ! वेदगर्भ, स्वयंभू ब्रह्मदेवाने नारदांनी प्रश्न विचारल्यावरून हेच सांगितले होते. त्याचा स्वतः भगवान नारायणांनी त्याला उपदेश केला होता. आणि तेच मी तुला सांगत आहे. (२५)

स्कंध दुसरा - अध्याय चौथा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP