|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ३ रा
इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवद्भक्तीच्या माहात्म्याचे निरूपण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, तू मला जे विचारले होतेस की, मृत्यूसमयी बुद्धीमान मनुष्याने काय केले पाहिजे, त्याचे उत्तर मी तुला दिले. ब्रह्मतेजाची इच्छा करणार्याने इंद्राची आणि संतानप्राप्तीची लालसा असेल, त्याने प्रजापतीची उपासना करावी. ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गा देवीची, तेजाची इच्छा असणार्याने अग्नीची, धन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल, त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे. ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने अदितीची, स्वर्गकामना असणार्याने अदितिपुत्रांची, राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वेदेवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणार्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे. दीर्घायुष्याची इच्छा असणार्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे. सौंदर्याच्या इच्छुकांनी गंधर्वांची, पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची, आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे. ज्याला यशप्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञपुरुषाची, अपार संपत्तीची इच्छा असेल त्याने वरुणाची, विद्याप्राप्तीची आकांक्षा असणार्याने भगवान शंकरांची आणि पति-पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे. धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची, वंशपरंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची, पीडांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षांचे आणि बलवान होण्यासाठी मरुद्गणांची आराधना केली पाहिजे. राज्यासाठी मन्वन्तरांचे अधिपती देवांना, जादूटोणा करता येण्यासाठी निर्ऋतीला, निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे. आणि जो बुद्धिमान पुरुष आहे, तो कामनारहित असो, सर्वकामना युक्त असो किंवा मुमुक्षू असो, त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे. जेवढे उपासक आहेत, त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे. अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लीला-कथांचे कथन होते, त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे संसारसागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणार्या तरंगांच्या बसणार्या थपडा शांत होतात, हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो, इंद्रियांची विषयांत आसक्ती राहात नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो. भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे ? (१-१२) शौनक म्हणाले - राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणार्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले ? विद्वन सूत महोदय ! त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो. कृपा करून आपण तो अम्हांला ऐकवावा. कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की, ज्यांचे पर्यवसान भगवंतांच्या रसमय कथामध्येच होते. पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवद्भक्त होता. लहानपणी खेळतानासुद्धा श्रीकृष्णलीलेतच त्याला गोडी होती. भगवन्मय असलेले श्रीशुक जन्मापासूनच भगवत्परायण आहेत. अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत. भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा श्रवण यांमध्ये ज्यांचा वेळ जातो, त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्ताबरोबर हिरावून घेत असतो. वृक्ष जिवंत राहात नाहीत का ? गावातील अन्य प्राणी मनुष्यांप्रमाणे खात-पीत किंवा मैथुन करीत नाहीत काय ? ज्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही, ती पशुतुल्य माणसे पशु, कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढवे यांच्यासारखीच होत. (१३-१९) जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही, त्याचे कान म्हणजे बिळेच होत. जी जीभ भगवंतांच्या लीलांचे गायन करीत नाही ती, बेडकाच्या जिभेप्रमाणे डराँव डराँव करणारीच होय. जे मस्तक भगवंतांच्या चरणांवर नमत नाही, ते रेशमी वस्त्रांनी वेष्टित व मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय. जे हात भगवंतांची सेवा-पूजा करीत नाहीत, ते सुवर्णकंकणांनी युक्त असले तरी मुडद्याच्या हातांप्रमाणेच होत. जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहात नाहीत, ते मोरपिसांवरील डोळ्यांसारखे निरर्थक होत. जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत, ते माणसांचे पाय झाडांसारखेच होत. ज्या मनुष्याने भगवत्प्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणांवर अर्पण केलेल्या तुलसीपत्राचा सुगंध घेतला नाही, तो श्वास घेत असूनही श्वासरहित शवासारखाच होय. सूत महोदय ! भगवंतांच्या मंगलमय नामाचे श्रवण - कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही, ते हृदय नसून लोखंडच होय. ज्यावेळी हृदय विरघळते, त्यावेळी डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात. सूत महोदय ! आपण आमच्या मनाला आवडेल, असे बोलता. म्हणून भगवंतांचे परम भक्त, आत्मविद्येत प्रवीण अशा श्रीशुकदेवांनी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले, ते आपण आम्हांला ऐकवा. (२०-२५) स्कंध दुसरा - अध्याय तिसरा समाप्त |