श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय २ रा

भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा
तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणाले - सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतांपासून लुप्त झालेली सृष्टिविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती. यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली. त्यायोगे त्यांनी प्रलयापूर्वीप्रमाणेच या जगताची निर्मिती केली. (१)

वेदांची वर्णनशैलीही अशाच प्रकारची आहे की, लोकांची बुद्धी स्वर्ग आदि मिथ्या सुखाच्या फेर्‍यात अडकते, जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखा भटकत राहतो; पण त्या मायामय नगरीत कोठेच त्याला खर्‍या सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावाच्या पदार्थांशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे. त्यांच्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे. संसारातील पदार्थ विनासायास प्रारब्धानुसार मिळतात, हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्‍न करू नयेत. जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्‍न कशाला ? हात आपोआप मिळाले आहेत तर उशा-तक्क्यांची काय आवश्यकता ? ओंजळीने काम भागते, तर पुष्कळशा भांड्यांची जरुरी काय ? वल्कले किंवा दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता ? अंग झाकण्यासाठी रस्त्यात चिरगुटे मिळत नाहीत का ? केवळ दुसर्‍यांसाठीच शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यावर फळाफुलांची भिक्षा देत नाहीत का ? पाण्याची आवश्यकता असणार्‍यांसाठी नद्या एकदम आटल्या आहेत की काय ? राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत काय ? आपल्याला शरण आलेल्यांचे भगवंत रक्षण करीत नाहीत काय ? अशा स्थितीत बुद्धिमान पुरुषसुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्यांचे लांगूलचालन कां करतात ? अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान, स्वतःसिद्ध, आत्मस्वरूप, परम प्रियतम, परम सत्य जे अनंत भगवान आहेत, त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे. कारण त्यांचे भजन केल्यानेच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकविणार्‍या अज्ञानरूप कारणाचा नाश होतो. या संसाररूप वैतरणी नदीत पडून आपली कर्मजन्य दुःखे भोगणार्‍या लोकांना पाहणारा पशूखेरीज दुसरा कोणता मनुष्य भगवंतांची मंगल धारणा सोडून, या नाशवंत विषयभोगात आपले चित्त भटकू देईल ? (२-७)

काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या, चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणार्‍या, प्रादेशाएवढ्या भगवंतांच्या स्वरूपाची धारणा करतात. त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे, नेत्र कमळासारखे विशाल आहेत, त्यांनी कदंबाच्या फुलातील केसराप्रमाणे पीतांबर धारण केला आहे, श्रेष्ठ रत्‍नजडित अशी कुंडले कानात झगमगत आहेत. त्यांची चरणकमले योगेश्वरांच्या उमललेल्या हृदयकमलाच्या कोशावर विराजमान झालेली आहेत, त्यांच्या हृदयावर श्रीवत्स चिह्न आहे, गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आणि वक्षःस्थळावर कधी न कोमेजणारी वनमाला रुळत आहे. त्यांनी कमरेला मेखला, बोटामध्ये बहुमूल्य अंगठ्या, पायांमध्ये नूपुरे आणि हातांमध्ये कडी असे अलंकार धारण केलेले आहेत. त्यांच्या केसांच्या बटा अतिशय सुंदर, निर्मल, कुरळ्या आणि काळ्याभोर आहेत. त्यांचे मुख मंद हास्याने शोभून दिसत आहे. लीलेने केलेले मुक्त हास्य आणि कृपादृष्टियुक्त कटाक्षांनी ते भक्त जनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत. जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही, तोपर्यंत वारंवार चिंतनाने भगवंतांकडे पाहण्याचा प्रयत्‍न करावा. भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी. जसजशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल, तेव्हा ते सोडून दुसर्‍या अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल, तेव्हा ते सोडून दुसर्‍या अंगाचे ध्यान करावे. जोपर्यंत सगुण-निर्गुण द्रष्टास्वरूप भगवंतांशी अनन्य भक्तियोग साधत नाही, तो पर्यंत साधकाने नित्यनैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंतांच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे. परीक्षिता, जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करील, तेव्हा त्याने देश व कालाला मनात थारा देऊ नये. सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून, प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा. त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे. नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून, धैर्यवान पुरुषाने, त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे. यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लज राहात नाही. या अवस्थेत सत्त्वगुणही नाही तर रजोगुण आणि तमोगुण कोठून असणार ? अहंकार, महत्तत्त्व आणि प्रकृतीचेही तेथे अस्तित्व नाही. अशा स्तितीत जेथ देवतंच्या नियामक अशा काळाचाही प्रभाव चालत नाही, तेथे देव आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार ? "हे नाही, हे नाही.." असे म्हणून योगी लोक परमात्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्याच्यासंबंधी पदार्थांमध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून, हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंतांच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात, तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असे सांगतात. (८-१८)

ज्ञानदृष्टीच्या बळावर ज्याच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत, त्या ब्रह्मनिष्ठ योग्याने प्रथम टाचेने शिवणीवर दाब देऊन स्थिर व्हावे, नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्रभेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे. जितेंद्रिय योग्याने नाभिस्थानातील मणिपुर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहतचक्रात, तेथून उदानवायुद्वारा वक्षःस्थळावरील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळू हळू टाळूच्या मुळापर्यंत न्यावे. त्यानंतर दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन छिद्रे आणि मुख ही सात छिद्रे बंद करून टाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला भूमध्यातील आज्ञाचक्रात घेऊन जावे. कोणत्याच लोकात जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटकापर्यंत त्या वायूला तेथेच थांबवून ठेवून स्थिर करावे. यानंतर ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीर सोडावे. (१९-२१)

परीक्षिता, जर योग्याची इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे, अष्ट महासिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणार्‍या सिद्धांच्या बरोबर विहार करावा, किंवा त्रिगुणमय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा, तर त्याने मन आणि इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे. योग्यांचे शरीर वायूसारखे सूक्ष्म असते. उपासना, तपस्या, योग आणि ज्ञान यांची साधना करणार्‍या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते. कर्मांनी जाता येत नाही. परीक्षिता, योगी ज्योतिर्मय मार्ग असलेल्या सुषुम्नेच्या द्वारा जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो, तेव्हा प्रथम तो आकाशमार्गाने अग्निलोकात जातो, तेथे त्याच्या पापाचा उरला-सुरला मळ निघून जातो. तेथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिंशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो. भगवान विष्णूंचे हे शिंशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे. त्याचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महर्लोकात जातो. हा महर्लोक ब्रह्मवेत्त्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणार्‍या देवता विहार करीत असतात. जेव्या प्रलयकाळ जवळ येऊन ठेपतो, तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो. जे सिद्ध योगी ब्रह्मलोकातील विमानांवर निवास करीत असतात, त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे दोन परार्धांचे असते. तेथे शोक नाही की दुःख नाही. म्हातारपण नाही की मृत्यू नाही. असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल ? तेथे फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे. ते म्हणजे या परमपदाला ना जाणणार्‍या लोकांच्या जन्म-मृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना पाहून तेथीला लोकांना दयेमुळे जे मोठेच दुःख होते ते. तो योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उतावीळ न होता सात आवरणांचे भेदन करतो. पृथ्वीरूपाने पाण्यात, पाणीरूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो. तेथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणार्‍या आकाशरूप आवरणात मिसळून जातो. अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडीत असता त्याची इंद्रियेसुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात. घाणेंद्रिय गंधतन्मात्रेत, रसना रसतन्मात्रेत, डोळे रूपतन्मात्रेत, त्वचा स्पर्शतन्मात्रेत, कान शब्दतन्मात्रेत आणि कर्मेंद्रिये आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्मस्वरूपाला प्राप्त होतात. अशा प्रकारे योगी स्थूल व सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो. तेथे सूक्ष्म भूतांना तामस अहंकारात, इंद्रियांना राजस अहंकारात, मन आणि इंद्रिये यांच्या अधिष्ठाता देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो. यानंतर अहंकारासहित लयरूप गतिद्वारा महत्तत्त्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृतिरूप आवरणाला जाऊन मिळतो. परीक्षिता, महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृतिरूप आवरणाचाही लय होतो, तेव्हा तो योगी स्वतः आनंदरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते, त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही. परीक्षिता, तू जे विचारले होतेस, त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही सनातन मार्गांचे - सद्योमुक्ति आणि क्रममुक्ति तुला वर्णन करून सांगितले. प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते, तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. (२२-३२)

या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला, ज्या साधनाने भगवान विष्णूंची अनन्य भक्ति प्राप्त होईल, त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही. भगवान ब्रह्मदेवांनी एकाग्र चित्ताने सर्व वेदांचे तीन वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की, ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल, तोच सर्वश्रेष्ठ मार्ग होय. समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच दृग्गोचर होतात. कारण बुद्धी इत्यादी दृश्यपदार्थांचे साक्षीभूत एकमात्र द्रष्टे भगवान आहेत, या अनुमानावरून हे सिद्ध होते. परीक्षिता, यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितींमध्ये, आपल्या शक्तीनुसार, भगवान श्रीहरीचेच श्रवण, कीर्तन आणि स्मरण करावे. हे राजन्, संतपुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंतांच्या मधुर कथांचे अमृत जे आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून त्यांचे श्रवण करतात, ते विषयांनी विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांपाशी जातात. (३३-३७)

स्कंध दुसरा - अध्याय दुसरा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP