|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १७ वा
महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणाले - हे शौनका, तेथे गेल्यावर राजा परीक्षिताला असे दिसले की, एक राजाचा वेष धारण करणारा शूद्र हातात काठी घेऊन एका गाय आणि बैलाच्या जोडीला अशा रीतीने मारीत होता की, त्यांना कोणी वाली नाही. कमलातील तंतूप्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि त्या शूद्राच्या मारण्यामुळे दुःखी आणि भयभीत होऊन मूत्र त्याग करीत होता. धार्मिक कृत्यांसाठी दूध, तूप असे आहूतीचे पदार्थ देणारी गायसुद्धा शूद्राच्या वारंवार लत्ताप्रहारांनी अत्यंत दुःखी झाली होती. एक तर ती अशक्त होती, शिवाय तिचे वासरूही तिच्याजवळ नव्हते. तिला भूक लागली होती, त्यामुळे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. स्वर्णजडित रथात बसलेल्या राजा परीक्षिताने आपले धनुष्य सज्ज केले आणि घनगंभीर आवाजात त्याने शूद्राला विचारले. अरे, स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारहाण करणारा तू कोण आहेस ? एखाद्या नटाप्रमाणे राजाचा वेष तू धारण केला आहेस, पण तुझे कृत्य तर शूद्रासारखे दिसत आहे. अर्जुनासह श्रीकृष्णांच्या परमधामाला जाण्याने, निर्जन स्थानात निरपराध्यांवर अशा प्रकारे प्रहार करणारा तू अपराधी आहेस. म्हणून वध करण्यास योग्य आहेस. (१-६) परीक्षिताने धर्माला (बैलाला) विचारले, बिसतंतुप्रमाणे तुझा श्वेतवर्ण आहे. आणि तीन पाय नसलेला तू एकाच पायावर फिरतोस, हे पाहून मला फार दुःख होत आहे. बैलाच्या रूपात तू कोणी देव आहेस काय ? सध्या ही पृथ्वी कुरुवंशी राजांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे. तेथे तुझ्याशिवाय अन्य कोणाही प्राण्याला दुःखाने अश्रूपात करताना मी पाहिले नाही. हे धेनुपुत्रा, तू आता शोक करू नकोस. गोमाते, मी दुष्टांना शासन करणारा असताना तू अश्रू ढाळू नकोस. तुझे कल्याण असो. हे देवी, ज्या राजाच्या राज्यामध्ये दुष्टांच्या उपद्रवामुळे सर्व प्रजा त्रस्त झालेली असते, त्या उन्मत्त राजाची कीर्ति, आयुष्य, ऐश्वर्य, एवढेच काय परलोकही नष्ट होतो. दुःखितांचे दुःख दूर करणे हा राजाचा परम धर्म आहे. हा महादुष्ट आणि प्राण्यांना पीडा देणारा आहे. म्हणून मी आता याला मारून टाकतो. हे सुरभिनंदना, तू तर चार पायांचा पशू आहेस. तुझे तीन पाय कोणी तोडले. जे राजे श्रीकृष्णांचे भक्त आहेत, त्यांच्या राज्यात कोणीही आपल्यासारखा दुःखी असता कामा नये. हे वृषभा, तुझे कल्याण असो. मला सांग की, तुझ्यासारख्या निरपराध साधुवृत्तीच्या प्राण्याचे अवयव तोडून कोणत्या दुष्टाने पांडवांच्या कीर्तिला कलंक लावला ? जो कोणी निरपराध प्राण्यांना पीडा देतो, तो कोठेही असला तरी त्याला माझ्यापासून अवश्य भय राहील. दुष्टांचे दमन केल्याने साधूंचे कल्याणच होते. जी उन्मत्त व्यक्ति निरपराध प्राण्यांना दुःख देते, ती साक्षात देवता असली तरी, मी त्या व्यक्तीचे बाजूबंद घातलेले हात तोडून टाकीन. आपत्काल नसताना शास्त्रमर्यादा उल्लंघन करणार्यांना शास्त्रानुसार शासन करून धर्मानुसार वागणार्या लोकांचे पालन करणे, हाच राजाचा परम धर्म आहे. (७-१६) धर्म म्हणाला - राजन्, दुःखितांना अभय देणे हे आपल्यासारख्या पाण्डूच्या वंशजांना योग्यच आहे. कारण आपल्या पूर्वजांनी त्यांच्या या श्रेष्ठ गुणांमुळे भगवान श्रीकृष्णांना आपले सारथी, दूत इत्यादी बनविले होते. हे नरेंद्रा, शास्त्रांच्या वेगवेगळ्या वचनांनी मोहित झाल्यामुळे परमपुरुषाला आम्ही ओळखत नाही. त्यामुळे संसारक्लेशांची कारणे उत्पन्न होतात. कोणत्याही प्रकारचे द्वैत ज्यांना मान्य नाही, ते स्वतःलाच स्वतःच्या दुःखाचे कारण समजतात. कोणी प्रारब्धाला कारणीभूत ठरवितात, तर कोणी कर्माला; काही लोक स्वभावाला तर अन्य ईश्वरालाच दुःखाचे कारण मानतात. राजर्षे, काही जणांचे तर निश्चयपूर्वक असे म्हणणे आहे की, दुःखाचे कारण तर्काने जाणले जाऊ शकत नाही आणि वाणीने सांगितले जाऊ शकत नाही. आता यांपैकी कोणते मत बरोबर आहे, याचा तूच आपल्या बुद्धीने विचार कर. (१७-२०) सूत म्हणाले - ऋषिश्रेष्ठ शौनका, धर्माचे हे प्रवचन ऐकून सम्राट परीक्षित अतिशय प्रसन्न झाला, त्याचा खेद नाहीसा झाला. शांत चित्ताने तो धर्माला म्हणाला - (२१) परीक्षित म्हणाला - धर्माचे तत्त्व जाणणारे वृषभदेव, आपण धर्माचा उपदेश करीत आहात. आपण निश्चितच वृषभरूपात असणारे धर्म आहात. आपण आपल्याला दुःख देणार्याचे नाव यासाठी सांगितले नसावे की, अधर्म करणार्याला जसा नरक प्राप्त होतो, तसाच नरक चहाडी करणार्यालाही प्राप्त होतो. किंवा असाही एक सिद्धांत आहे की, प्राण्यांच्या मन आणि वाणीद्वारा परमेश्वराच्या मायेच्या स्वरूपाचे निरूपण केले जाऊ शकत नाही. धर्मदेव, सत्ययुगात आपले तप, पवित्रता, दया आणि सत्य असे चार पाय होते. आता अधर्माचे अंश असलेले गर्व, आसक्ती आणि मद यांमुळे तीन चरण नष्ट झाले आहेत. आता सत्य हा आपला चवथा चरणच फक्त शिल्लक आहे. त्याच्याच बळावर आपण जीवित आहात. असत्याने पुष्ट झालेले हे अधर्मी कलियुग त्यालाही गिळंकृत करू इच्छित आहे. ही गोमाता साक्षात पृथ्वी आहे. भगवंतांनी हिच्यावरील प्रचंड भार नष्ट केला होता आणि त्यांच्या अपूर्व सौंदर्याने युक्त अशा चरणचिन्हांमुळे ही सर्वत्र प्रेक्षणीय झाली होती. आता हिचा भगवंतांपासून वियोग झाला आहे. ही साध्वी अभागिनीप्रमाणे नेत्रातून अश्रू ढाळीत चिंता करीत आहे की आता राजाचे सोंग घेतलेले ब्राह्मणद्रोही शूद्र माझा उपभोग घेतील. माझ्यावर राज्य करतील. (२२-२७) नंतर महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले. नंतर अधर्माचे कारण ठरलेल्या कलीला मारण्यासाठी त्याने तीक्ष्ण तलवार हातात घेतली. आता हा मला मारून टाकणार हे कलीने जाणले आणि लगेच त्याने आपली राजचिन्हे काढून ठेवून भयाने व्याकूळ होऊन परीक्षिताच्या चरणांवर मस्तक ठेवले. परीक्षित मोठा यशस्वी, दीनवत्सल आणि शरणागताचे रक्षण करणारा होता. कलियुगाने आपल्या चरणांवर मस्तक ठेवले आहे, हे पाहून कृपाळूपणाने त्याने त्याला मारले नाही. परंतु हसत हसत म्हटले - (२८-३०) परीक्षित म्हणाला - तू हात जोडून शरण आला आहेस. तेव्हा अर्जुनाच्या यशस्वी वंशातील कोणाही वीरापासून तुला भय बाळगण्याचे कारण नाही. परंतु तू अधर्माचा सहायक असल्याने माझ्या राज्यात अजिबात राहू नकोस. राजांच्या शरीरातील तुझ्या वास्तव्यामुळेच लोभ, असत्य, चोरी, दुष्टता, स्वधर्म-त्याग, दारिद्र्य, कपट, कलह, दंभ आणि अन्य पापे वाढत आहेत. हे अधमसहायका, म्हणून तू या ब्रह्मवर्तात एक क्षण देखील राहू नकोस, कारण हे धर्म आणि सत्याचे निवासस्थान आहे. या क्षेत्रात यज्ञविधी जाणणारे महात्मे यज्ञांच्या द्वारा यज्ञपुरुष भगवंतांची आराधना करीत असतात. या देशात भगवान श्रीहरी यज्ञरूपात निवास करीत असतात, यज्ञांच्या द्वारा त्यांची पूजा केली जाते आणि यज्ञ करणार्याचे ते कल्याण कारतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारे ते भगवान वायूप्रमाणे समस्त चराचर जीवांच्या आत आणि बाहेर निवास करून त्यांच्या कामना पूर्ण करीत असतात. (३१-३४) सूत म्हणाले - परीक्षिताची ही आज्ञा ऐकून कली थरथर कापू लागला. हातात यमराजासमान तलवार घेऊन मारण्यासाठी सज्ज झालेल्या परीक्षिताला तो म्हणाला. (३५) कली म्हणाला - हे सार्वभौम राजा, आपल्या आज्ञेप्रमाणे जेथे कोठे मी राहण्याचा विचार करतो, तेथे आपण धनुष्याला बाण लावून उभे आहात, असे मी पाहतो. हे धार्मिकशिरोमणी, जेथे मी राहू शकेन, असे ठिकाण मला सांगावे. (३६-३७) सूत म्हणाले - कलियुगाची विनंती मान्य करून राजा परीक्षिताने त्याला चार ठिकाणे राहण्यासाठी दिली - द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा. या स्थानात क्रमशः असत्य, मद, आसक्ति आणि निर्दयता या चार रूपांत अधर्म निवास करतो. कलियुगाने आणखी ठिकाणे मागितली, तेव्हा सामर्थ्यवान परीक्षिताने त्याला राहण्यासाठी सुवर्ण (धन) हे आणखी एक ठिकाण दिले. अशा प्रकारे कलियुगाची असत्य, गर्व, कामवासना, वैर आणि रजोगुण ही राहण्याची पाच ठिकाणे झाली. अधर्माचे मूळ कारण असलेला कली परीक्षिताने दिलेल्या या पाच ठिकाणी राजाज्ञेचे पालन करीत राहू लागला. म्हणून आत्मकल्याण इच्छिणार्या पुरुषांनी या पाच ठिकाणांचा कधीही आश्रय घेऊ नये. विशेषतः धार्मिक राजा, प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता आणि धर्मोपदेश करणारे गुरू यांनी तर सावध राहून या ठिकाणांचा त्याग केला पाहिजे. यानंतर परीक्षिताने तप, शुद्धता आणि दया हे तीन चरण वृषभरूप धर्माला जोडून दिले आणि त्याला आश्वासन देऊन पृथ्वीचे रक्षण केले. परीक्षिताचे पितामह राजा युधिष्ठिरांनी वनात जातेवेळी महाराज परीक्षिताला राजसिंहासनावर बसविले होते, तोच आता तेथे विराजमान आहे. तोच परम यशस्वी, सौभाग्यशाली, चक्रवर्ती सम्राट राजर्षी परीक्षित यावेळी हस्तिनापुरात कौरवकुलाच्या राजलक्ष्मीने शोभत आहे. हा अभिमन्युपुत्र राजा परीक्षित असा प्रभावशाली आहे. त्याच्याच शासनकालात आपण सर्वजण या दीर्घकाल चालणार्या यज्ञाची दीक्षा घेतली आहे. (३८-४५) अध्याय सतरावा समाप्त |