श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १६ वा

परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणाले - शौनका ! पांडवांच्या महाप्रयाणानंतर भगवंताचा परम भक्त राजा परीक्षित श्रेष्ठ ब्राह्मणांच्या उपदेशानुसार पृथ्वीचे पालन करू लागला. त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिष्यांनी त्याच्याविषयी जे काही सांगितले होते, ते सर्व श्रेष्ठ गुण त्याच्यामध्ये होते. त्याने उत्तराची कन्या इरावतीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला जनमेजय आदि चार पुत्र झाले. त्याने कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगातटाकी तीन अश्वमेध यज्ञ केले, त्यावेळी ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिली. त्या यज्ञात देवतांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन आपापला भाग ग्रहण केला. एकदा दिग्विजय करीत असताना त्याने शूद्र असून कली, राजाचा वेष घेऊन गाय आणि बैल यांना लाथांनी मारीत आहे, असे पाहिले. तेव्हा राजाने मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला पकडून शासन केले. (१-४)

शौनकाने विचारले - सूत महोदय, दिग्विजयाच्या वेळी परीक्षिताने कलियुगाला केवळ शासन करूनच का सोडले ? कारण राजाचा वेष धारण केला होता तरी तो एक शूद्र होता व गायीला लाथांनी मारत होता. भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या चरणकमलांच्या मधुररसाचे पान करणार्‍या भक्तांशी या घटनेचा संबंध असेल तर सांगा. ज्यात आयुष्य फुकट जाते, अशा व्यर्थ गोष्टी बोलून काय फायदा ? सूत महोदय, जे मोक्षाची इच्छा करतात, परंतु अल्पायुषी असल्यामुळे मृत्यूचा घास होतात, अशांच्या कल्याणासाठी भगवान यमांना आवाहन करून त्यांना येथे शामित्रकर्मासाठी नियुक्त केले आहे. जोपर्यंत येथे यमराजा आहे, तोपर्यंत कोणाला मृत्यू येणार नाही. मनुष्य लोकातील मृत्यूने ग्रासलेले लोक देखील भगवंतांच्या अमृततुल्य लीलाकथांचे पान करतील, यांसाठीच महर्षींनी भगवान यमाला येथे बोलाविले आहे. एक तर कमी आयुष्य आणि अल्प समजूत. अशा अवस्थेत संसारातील अभागी माणसांचे आयुष्य व्यर्थ जात आहे. रात्र निद्रेमध्ये आणि दिवस व्यर्थ कामे करण्यात ! (५-९)

सूत म्हणाले - राजा परीक्षित जेव्हा कुरुजांगल देशात राहात होता, त्यावेळी त्याने ऐकले की, सैन्याने सुरक्षित अशा माझ्या राज्यात कलियुगाचा प्रवेश झाला आहे. ही अप्रिय वार्ता ऐकून युद्धवीर परीक्षिताने धनुष्य हातात घेतले. श्यामवर्णाचे घोडे जुंपलेल्या, सिंहध्वज असलेल्या, सुसज्जित अशा रथावर आरूढ होऊन दिग्विजयासाठी परीक्षित नगराबाहेर पडला. त्यावेळी रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ अशी चतुरंग सेना त्याच्याबरोबर होती. त्याने भद्राश्व, केतुमाल, भारत, उत्तरकुरु, किंपुरूष इत्यादि सर्व देश जिंकून तेथील राजांकडून भेटी स्विकारल्या. सर्व देशांमध्ये त्याला आपल्या पूर्वज महात्म्यांची यशोगाथा ऐकावयास मिळाली. त्या यशोगानातून पदोपदी भगवान श्रीकृष्णांचा महिमा प्रगट होत होता. श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या ज्वालांपासून कोणत्या प्रकारे त्याचे रक्षण केले, यादव आणि पांडव यांचे एकमेकांवर किती प्रेम होते, तसेच पांडवांची श्रीकृष्णांवर किती भक्ति होती, हे सर्व त्याला ऐकावयास मिळाले. जे लोक त्याला हे चरित्र ऐकवीत होते, त्यांच्यावर महात्मा राजा परीक्षित अत्यंत प्रसन्न होईल. त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येत. मोठ्या उदार अंतःकरणाने तो त्यांना बहुमोल वस्त्रे आणि मोत्यांचे हार भेट म्हणून देत असे. त्याला असेही ऐकावयास मिळत होते की, अत्यंत प्रेमामुळे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे सारथ्य केले. ते त्यांचे सभासद झाले, त्यांनी त्याची सेवाही केली, मित्र होतेच, ते त्यांचे दूतही झाले. रात्री शस्त्र हातात घेऊन वीरासन घालून ते बसत व शिबिरावर पहारा देत, त्यांच्या मागे मागे जात, त्यांची स्तुती व त्यांना प्रणाम करीत. इतकेच काय, आपल्या प्रेमपात्र पांडवांच्या चरणांवर सर्व जग त्यांनी झुकविले. हे ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर परीक्षिताची भक्ती अधिकच दृढ होईल. अशा प्रकारे दिवसेंदिवस परीक्षित पांडवांच्या आचरणाचे अनुकरण करीत दिग्विजय करीत होता. त्याच दिवसांत त्याच्या शिबिरापासून थोड्याच अंतरावर एक आश्चर्यकारक घटना घडली ते मी आपल्याला ऐकवितो. बैलाचे रूप धारण करून धर्म एका पायावर चालत होता. एके ठिकाणी त्याला गायीच्या रूपात पृथ्वी भेटली. पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाने माता जशी दुःखी होते, त्याप्रमाणे गायीच्या नेत्रांतून अश्रू वाहात होते. तिचे शरीर निस्तेज दिसत होते. धर्माने पृथ्वीस विचारले, (१०-१८)

धर्म म्हणाला - हे कल्याणि, तू सुखरूप आहेस ना ? तुझे मुख म्लान झाले आहे. तू निस्तेज झाली आहेस. तुझ्या मनात काहीतरी सलत आहे, असे वाटते. आई, तुझे कोणी स्नेही दूरदेशी गेले आहेत आणि त्यांची तू चिंता करीत आहेस काय ? माझे तीन पाय तुटले आणि एकच राहिला, म्हणून तू माझीच चिंता करीत नाहीस ना ? शूद्र तुझ्यावर आता शासन करतील यासाठी तू शोक करीत आहेस का ? ज्यांना आता यज्ञामध्ये आहुती दिली जात नाही, त्या देवतांसाठी तुला खेद होत आहे का ? किंवा पाऊस न पडल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रजेसाठी तर तू खेद करीत नाहीस ना ? हे पृथ्वी, राक्षसांसारखे वर्तन असणार्‍या माणसांकडून अरक्षित स्त्रिया आणि पीडित बालके यांच्यासाठी तू शोक करीत आहेस काय ? निषिद्ध कर्म करणार्‍या ब्राह्मणांच्या हाती विद्या पडली आहे आणि ब्राह्मणद्रोही राजांची सेवा करण्यात ब्राह्मण गुंतले आहेत, याचे तुला दुःख होत आहे काय ? आजकालचे नाममात्र राजे संपूर्णपणे कलियुगी प्रवृत्तीचे झाले आहेत, त्यांनी मोठमोठे देश उजाड केले आहेत. आजकालचे लोक तर खाणे-पिणे, स्नान आणि स्त्रीसहवास इत्यादींमध्ये शास्त्रीय नियमांचे पालन न करता स्वैराचारी झाले आहेत, त्यांच्यासाठी तू दुःखी आहेस काय ? हे माते पृथ्वी, भगवान श्रीकृष्णांनी तुझा भार नाहीसा करण्यासाठी अवतार घेऊन मोक्षाला कारणीभूत लीला केल्या आणि अन्तर्धान पावून तुझा त्याग केला, त्यांची तुला आठवण येते काय ? हे वसुंधरे, तू ज्यामुळे इतकी दुर्बल झाली आहेस, त्या तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. असे वाटते की, बलवांनाही नेस्तनाबूत करणार्‍या या काळाने, देवतांनाही वंदनीय असे तुझे सौभाग्य हिरावून घेतले असावे. (१९-२४)

पृथ्वी म्हणाली - हे धर्मा ! तू आता मला जे काही विचारीत आहेस, ते तुला सर्व ठाऊक आहे. सत्य, पवित्रता, दया, क्षमा, त्याग, संतोष, सरलता, शम, दम, तप, समता, तितिक्षा, उपरती, शास्त्रविचार, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, वीरता, तेज, बल, स्मृती, स्वतंत्रता, कौशल्य, कांती, धैर्य, कोमलता, निर्भीकता, विनय, शील, साहस, उत्साह, बल, सौभाग्य, गंभीरता, स्थिरता, आस्तिकता, कीर्ति, गौरव आणि निरहंकारिता या एकोणचाळीस सहज गुणांनी युक्त अशा चारी चरणांद्वारा तू सर्व संसाराला सुखी करीत होतास. वरील गुणांखेरीज महत्त्वाकांक्षी ज्यांची इच्छा करतात, असे अन्य पुष्कळ गुण भगवंतांची सेवा करण्यासाठी त्यांच्या ठायी नित्य वास करतात. त्या सर्व गुणांचे आश्रयस्थान असलेले, सौंदर्यधाम असे भगवान श्रीकृष्ण यांनी यावेळी ही सृष्टी रहित झाली असून पापमय कलियुगाच्या वाईट नजरेची शिकार बनली आहे. स्वतःसाठी, सर्व देवता श्रेष्ठ असणार्‍या तुझ्यासाठी तसेच देवता, पितर, ऋषी, साधू आणि सर्व वर्णाश्रमांच्या मनुष्यांसाठी मला दुःख होत आहे. लक्ष्मीचा कृपाकटाक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्मा आदि देवता भगवंतांना शरण जाऊन पुष्कळ दिवसपर्यंत तपश्चर्या करीत; परंतु तीच लक्ष्मी आपले निवासस्थान असलेल्या कमलवनाचा त्याग करून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या ज्या चरणकमलांच्या सौभाग्ययुक्त छत्रछायेचा आश्रय घेते, त्याच भगवंतांच्या कमल, वज्र, अंकुश, ध्वज आदि चिह्नांनी युक्त असलेल्या श्रीचरणांनी मी विभूषित झालेली असल्याने मला मोठेच वैभव प्राप्त झाले होते आणि तिन्ही लोकांहून माझे महत्त्व अधिक होते. अभागिनी असलेल्या मला भगवंतांनी सोडून दिले आहे. मला असे वाटते की, माझ्या सौभाग्याचा मला गर्व झाला होता; म्हणून त्यांनी मला दंड केला आहे. (२५-३३)

आपले तीन पाय नष्ट झाल्याने तू मनातून कुढत होतास. म्हणून आपल्या पुरुषार्थाने तुला आपल्यामध्येच परिपूर्ण आणि स्वस्थ करण्यासाठी ते अत्यंत रमणीय असे श्यामसुंदराचे रूप घेऊन यदुवंशात प्रगट आणि असुरवंशी राजांच्या शेकडो अक्षौहिणी सैन्याच्या रूपाने माझ्यावर असणारा भार त्यांनी नष्ट केला. कारण ते स्वतः अगदी स्वतंत्र होते. ज्यांनी आपल्या स्नेहार्द्र दृष्टीने, मधुर हास्याने आणि गोड शब्दांनी सत्याभामा इत्यादि मधु-मधुर मानीनींच्या मानाबरोबर त्यांचे धैर्यही नाहीसे केले होते आणि ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने मी सदैव रोमांचित होत असे, त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा विरह कोणाला सहन होईल बरे ? (३४-३५)

धर्म आणि पृथ्वी यांचा याप्रकारे आपापसात संवाद चालू असतानाच राजर्षी परीक्षित पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या तटावर येऊन पोहोचला. (३६)

अध्याय सोळावा समाप्त

GO TOP