श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १८ वा

राजा परीक्षिताला श्रृंगी ऋषींचा शाप -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणाले - अद्‌भुत कर्मे करणार्‍या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने, राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळूनही मरण पावला नाही. ब्राह्मणाच्या शापाने त्यला दंश करण्यासाठी तक्षक आला, त्यावेळी प्राण जाण्याच्या मोठ्या भयानेही तो भयभीत झाला नाही. कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले होते. त्याने सर्वाची आसक्ती सोडली, गंगातटावर जाऊन श्रीशुकदेवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून भगवंतांचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला. जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथन करीत राहतात, त्या कथामृताचे मेहमी पान करतात आणि त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना अंतकालीही मोह होत नाही. जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्युपुत्र महाराज परीक्षित सम्राट होते, तोपर्यंत सर्वत्र राहूनही कलीचा काही प्रभाव पडला नाही. ज्या दिवशी, ज्या क्षणी, भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा त्याग केला, त्याचवेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग आले होते. भ्रमरासारखे सार ग्रहण करणार्‍या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही. कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्यकर्माचे फळ मिळते; परंतु पापकर्माचे फळ संकल्पाने नव्हे, तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावरच मिळते. लांडग्याप्रमाणे मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणार्‍या आणि निश्चयी पुरुषांना भिणार्‍या कलीला काय किंमत आहे ? धर्महीन मनुष्यांना मात्र आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो. ऋषींनो, आपण विचारलेले भगवंतांच्या कथांनी युक्त असे राजा परीक्षिताचे पवित्र चरित्र मी आपणास सांगितले. वर्णन करण्यासारखी मोठमोठी कृत्ये करणार्‍या भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचा संबंध असणार्‍या जितक्या कथा आहेत, त्या सर्वांचे कल्याण इच्छिणार्‍या पुरुषांनी सेवन केले पाहिजे. (१-१०)

ऋषी म्हणाले - सूत महोदय, आपणांस दीर्घायुष्य लाभो. कारण जन्ममृत्यूच्या प्रवाहात पडलेल्या आम्हा लोकांना, आपण भगवान श्रीकृष्णांच्या अमृतमय उज्ज्वल कीर्तीचे श्रवण घडविता. अनेक यज्ञांच्या धुरामुळे आमचे शरीर धूसर झाले आहे. असे असूनही या कर्माचा काही भरवसा नाही. अशावेळी आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मधु-मधुर अमृत आम्हांला पाजत आहात. भगवत्प्रेमी भक्तांच्या क्षणभर झालेल्या सत्संगाची स्वर्ग किंवा मोक्षाशीसुद्धा तुलना केली जाऊ शकत नाही. मग तुच्छ सांसारिक उपभोगांची काय कथा ? महापुरुषांचे एकमेव जीवनसर्वस्व असलेल्या श्रीकृष्णांच्या कथांनी कोणता रसिक तृप्त होईल ? सर्व प्राकृत गुणांच्या पलिकडे असलेल्या त्या भगवंतांच्या गुणसमुच्चयाचा ब्रह्मा, शंकर इत्यादि योगेश्वरांनाही अंत लागत नाही. हे विद्वन, आपण भगवंतांनाच अढळ स्थान मानीत आहात. म्हणून आपण, सत्पुरुषांचा एकमात्र आश्रय असलेल्या भगवंतांच्या उदार आणि विशुद्ध चरित्राचे, आमच्यासारख्या श्रद्धाळू श्रोत्यांसाठी विस्तारपूर्वक वर्णन करावे. भगवंतांवर परम प्रेम असणार्‍या बुद्धिमान परीक्षिताने मोक्षस्वरूप भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेतली, आपण ते ज्ञान आणि परीक्षिताचे परम पवित्र उपाख्यान यांचे वर्णन करा. ज्यामध्ये कोणतीच गोष्ट गुप्त राहिलेली नसेल आणि भगवत्प्रेमाच्या अद्‌भुत योगनिष्टेचे निरूपण केलेले असेल, शिवाय ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचेच वर्णन केलेले असेल असे प्रसंग भगवंतांच्या प्रिय भक्तांना ऐकण्यात फारच आनंद वाटतो. (११-१७)

सूत म्हणाले - अहो ! विलोम जातीमध्ये उच्च वर्णातील माता व कनिष्ठ कुळातील पिता यांपासून जन्म होऊनही महात्म्या पुरुषांची सेवा केल्यामुळे आज आमचा जन्म सफल झाला. कारण केवळ महापुरुषांशी संवाद केल्यानेही कनिष्ठ कुळात जन्म घेतल्याची मनोव्यथा तत्काळ नाहीशी होते. भगवंत हेच ज्यांचा एकमात्र आश्रय आहे, अशा सत्पुरुषांबद्दल तर काय बोलावे ? भगवंतांची शक्ती अनंत आहे, ते स्वतः अनंत आहेत आणि त्यांच्या अंगी वसणार्‍या अनंत गुणांमुळेच त्यांना ’अनंत’ असे म्हटले जाते. भगवंतांच्या गुणांशी बरोबरीही जर कोणी करू शकत नाही; तर त्यांच्यापेक्षा अधिक गुणावान कोण असू शकेल ? त्यांच्या गुणांची विशेषता समजण्यासाठी एवढे सांगणेच पुरेसे आहे की, जिच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करणार्‍या ब्रह्मादी देवांना सोडून, भगवंतांनी इच्छा न करताही लक्ष्मी भगवंतांच्या चरणकमलरजाचे सेवन करीत आहे. ब्रह्मदेवांनी भगवंतांचे चरण धुण्यासाठी जे पाणी समर्पित केले होते, तेच त्यांच्या पायाच्या नखातून निघून गंगेच्या रूपाने वाहू लागले. हे महादेवासहित सर्व जगाला पवित्र करीत आहे. अशा स्थितीत या त्रिभुवनात श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त भगवान शब्दाला कोण पात्र होऊ शकतो. ज्यांच्या प्रेमाची प्राप्ती करून धैर्यवान पुरुष निःसंकोचपणे शरीर, घर इत्यादि आसक्ति सोडून देतो आणि अंती ज्या अवस्थेत कोणालाही कष्ट न देणे आणि सर्व दृष्टीने शांतीचा अनुभव घेणे हाच धर्म असणार्‍या परमहंस आश्रमाचा (संन्यासाचा) स्वीकार करतो. सूर्यासमान तेजस्वी असणार्‍या महात्म्यांनो, आपण मला जे काही विचारले, ते मी आपणास माझ्या कुवतीनुसार सांगत आहे. जसे पक्षी आपापल्या शक्तिनुसार आकाशात उडतात, तसेच विद्वान लोकसुद्धा आपापल्या बुद्धीनुसार श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करतात. (१८-२३)

एके दिवशी राजा परीक्षित धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनात गेला होता. पशूंच्या मागे धावता धावता तो थकून गेला आणि त्याला अतिशय तहान आणि भूक लागली. जवळपास कोठे जलाशय दिसला नाही तेव्हा तो जवळच्याच एका ऋषीच्या आश्रमात गेला. तेथे त्याने पाहिले की, एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर शांत चित्ताने बसले आहेत. इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी यांचा निरोध केल्याने ते बाह्य जगापासून निवृत्त झाले होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अशा निर्विकार, ब्रह्मरूप, तुरीय अवस्थेत स्थिर झाले होते. विस्कटलेल्या जटांनी आणि कृष्णमृगाजिनाने त्यांचे शरीर जवळ जवळ झाकले गेले होते. तहानेने घसा कोरडा पडला असल्याने राजा परीक्षिताने तशा अवस्थेतही त्यांच्याकडे पाणी मागितले. जेथे राजाला बसण्यासाठी दर्भासन मिळाले नाही, भूमीवर ’बसा’ असेही कोणी म्हणाले नाही; तेथे अर्घ्य आणि आदरयुक्त मधुर वाणी कोठून मिळणार ? तेव्हा आपला अपमान झाला असे वाटून राजाला राग आला. शौनका, राजा भूक आणि तहानेने व्याकूळ झाला होता; म्हणून लगेच त्याच्या मनात त्या ब्राह्मणाविषयी ईर्ष्या आणि क्रोध उत्पन्न झाला. असा प्रसंग त्याच्या जीवनात पहिल्यांदाच आला होता. तेथून परत जातेवेळी क्रोधविवश होऊन त्याने धनुष्याच्या टोकाने एक मेलेला साप उचलून ऋषींच्या गळ्यात अडकवून तो राजधानीकडे निघून गेला. परीक्षिताच्या मनात असे आले की यांनी डोळे मिटले आहेत, त्याअर्थी खरोखरच इंद्रिये आवरून घेतली आहेत काय ? का राजाशी आपल्याला काय कर्तव्य आहे, असे मानून खोटे-खोटेच समाधीचे सोंग घेतले आहे ? (२४-३१)

त्या शमीक मुनींचा पुत्र मोठा तेजस्वी होता. तो इतर ऋषिकुमारांसह बाजूलाच खेळत होता. त्याने जेव्हा ऐकले की, राजाने आपल्या पित्याशी असभ्य वर्तन केले आहे, तेव्हा तो म्हणाला, उष्टे अन्न खाणार्‍या कावळ्यांप्रमाणे पुष झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्याय ! दरवाजावर पहारा देणार्‍या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही आपल्या धन्याचाच हे तिरस्कार करतात. ब्रह्मणांनी क्षत्रियांना आपले द्वारपाल बनविले आहे. त्यांनी दरवाजावर उभे राहून संरक्षण केले पाहिजे. घरात घुसून भांड्यातील अन्न खाण्याचा त्यांना अधिकार नाही. अधर्माने वागणार्‍यांना शासन करणारे भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करणार्‍यांना आज मी शासन करतो. माझे तपोबल पहाच ! आपल्या सवंगड्यांना अशा प्रकारे सांगून क्रोधाने लालभडक डोळे झालेल्या त्या ऋषिकुमाराने कौशिकी नदीच्या पाण्याने आचमन करून आपल्या वाणीरूपी वज्राचा प्रयोग केला. "कुलाला कलंक झालेल्या या परीक्षिताने माझ्या पित्याचा अपमान करून आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे. सबब, माझ्या शापाने याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्प दंश करील." (३२-३७)

यानंतर तो बालक आपल्या आश्रमात आला आणि आपल्या पित्याच्या गळ्यातील साप पाहून त्याला अतिशय दुःख झाले व तो धाय मोकलून रडू लागला. विप्रवर शौनका, शमीक मुनींनी आपल्या पुत्राचे रडणे ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले आणि पाहिले तर आपल्या गळ्यात एक मेलेला साप आहे. सापाल फेंकून देऊन त्यांनी आपल्या मुलाला विचारले, "पुत्रा ! तू का रडत आहेस ?कोणी तुझा अपमान केला काय ?" असे विचारल्यानंतर मुलाने सर्व कहीकत सांगितली. राजाल दिलेल्या शापाची कहाणी ऐकून ब्रह्मर्षी शमीकांनी मुलाचे कौतुक केले नाही. कारण त्यांच्या दृष्टीने परीक्षिताला शाप देण्य योग्य नव्हव्ते. ते म्हणाले, मूर्खा ! तू मोठे पाप केले आहेस. त्यांच्या लहानश्या चुकीसाठी तू त्यांना एवढे मोठे शासन केलेस, याचा मला खेद होत आहे. तुझी बुद्धी अजूनही अपरिपक्व आहे. भगवत्स्वरूप राजाला तू सामान्य माणूस समजणे योग्य नव्हे. कारण राजाच्या असह्य तेजामुळेच प्रजा सुरक्षित आणि निर्भय होऊन आपले कल्याण करून घेते. ज्यावेळी राजाचे रूप धारण करणारे भगवंत पृथ्वीवर दिसणार नाहीत, त्यावेळी चोरांची संख्या वाढेल आणि असुरक्षित बोकडांच्या कळपाप्रमाणे एका क्षणात लोकांचा नाश होऊल. राजाच नाहीसा झाल्यावर धनादिकांची दोरी करणारे चोर जे पाप करतील, त्याच्याशी आपल्या काही संबंध नसूनही ते आपल्यालाच लागू होईल. रारण राजा नसेल तर चोरडाकूंची संख्या वाढते. ते आपापसात मार-पीट, शिव्याशाप देणे इत्यादि करतात. इतकेच नव्हे तर पशू, स्त्रिया आणि धन-संपत्ती यांची लूट करतात. त्यावेळी लोकांचा वैदिक वर्णाश्रमाचारयुक्त आर्यधर्म लुप्त होतो. संपत्तीचा लोभ आणि कामवासनेच्या आहारी जाऊन लोक कुत्री आणि माकडांप्रमाणे वर्णसंकर करतात. सम्राट परीक्षित तर मोठे यशस्वी आणि धर्मदुरंधर आहेत. त्यांनी पुष्कळसे अश्वमेध यज्ञ केलेले आहेत आणि ते भगवंतांचे प्रिय भक्त आहेत. तेच राजर्षी तहान-भुकेने व्याकूळ होऊन आपल्या आश्रमात आले होते. त्यांना आपण शाप देणे कधीही योग्य नाही. या अज्ञान बालकाने आपल्या निष्पाप सेवक असलेल्या राजाचा अपराध केला आहे. सर्वांतरात्मा भगवान याला क्षमा करोत. भगवंतांच्या भक्तांमध्येही बदला घेण्याची शक्ती असते. परंतु ते दुसर्‍यांनी केलेला अपमान, फसवणूक, शिव्या-शाप देणे, अधिक्षेप करणे किंवा मारहाण करणे यासारख्या गोष्टींचा कधी बदला घेत नाहीत. महामुनी शमीकांना पुत्राने केलेल्या अपराधाचा मोठा पश्चात्ताप झाला. राजा परीक्षिताने त्यांचा जो अपमान केला होता, त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. महात्म्यांचा स्वभावच असा असतो की, जगातील दुसरे लोक जेव्हा त्यांना सुख-दुःखरूपी द्वंद्वात पाडतात, तेव्हा ते सहसा आनंदित किंवा व्यथीत होत नाहीत. कारण आत्म्याचे स्वरूप तर गुणांच्या पलीकडे आहे, हे त्यांना माहीत असते. (३८-५०)

अध्याय अठरावा समाप्त

GO TOP