|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १३ वा
विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणाले - विदुर तीर्थयात्रेत महर्षी मैत्रेय यांचेकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला. जे जाणण्याची त्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली होती. विदुराने मैत्रेय ऋषींना जे प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरे ऐकण्या अगोदरच विदुराची श्रीकृष्णांचे ठिकाणी अनन्य भक्ति असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षाच उरली नाही. शौनक महोदय, आपला चुलता विदुर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर, त्याचे चारही भाऊ, धृतराष्ट्र, युयुत्सू, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी तसेच पांडव-परिवारातील अन्य सर्व स्त्री-पुरुष आणि आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया, असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्याच्या स्वागतासाठी सामोरे गेले. योग्य रीतीने आलिंगन, नमस्कार इत्यादि द्वारा सर्वजण त्याला भेटले आणि विरहदुःखामुळे व्याकूळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. युधिष्ठिराने त्याला आसनावर बसवून त्याचा यथोचित सत्कार केला. भोजन व विश्रांती झाल्यानंतर विदुर समाधानाने आसनावर बसला, तेव्हा युधिष्ठिर विनयपूर्वक, सर्वांच्या देखत त्याला म्हणाला, (१-७) युधिष्ठिर म्हणाला - काका, विषप्रयोग, लाक्षागृहात जळून मारणे यांच्यासारख्या आमच्यावर आलेल्या संकटप्रसंगी आपण मातेसह आम्हांला वाचविले आहे. आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची आपणास कधी आठवण येत होती काय ? पृथ्वीवर भ्रमण करीत असता कोणत्या पद्धतीने आपण जीवननिर्वाह चालविलात ? पृथ्वीवरील कोणकोणत्या मुख्य तीर्थक्षेत्रांचे आपण दर्शन घतले ? प्रभो, आपल्यासारखे भगवंतांचे भक्त स्वतःच तीर्थरूप असतात. आपल्या हृदयात विराजमान झालेल्या भगवंतांच्या द्वारा आपण तीर्थांनाच महातीर्थाची योग्यता मिळवून देता. आमचे सुहृद, बंधु-बांधव यादव, ज्यांचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण आहेत, ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना ? आपण त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांचेविषयी ऐकले तरी असेल. (८-११) युधिष्ठिराने असे विचारल्यानंतर विदुराने तीर्थक्षेत्रे आणि यदुवंशीयांच्या संदर्भात जे काही अनुभवले होते, ते सविस्तर सांगितले. फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल तो काही बोलला नाही. करुण हृदय असलेला विदुर पांडवांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हता. म्हणून त्याने ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाही. नाहीतरी ती घटना आपोआप समजणार होतीच. (१२-१३) पांडव विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत असत. तो काही दिवस सुखाने हस्तिनापुरात राहिला आणि आपले थोरले बंधू धृतराष्ट्र यांचे कल्याण चिंतीत त्याने सर्वांना प्रसन्न केले. विदुर तर साक्षात यमराज होता. मांडव्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे तो शंभर वर्षांसाठी शूद्र जन्मात आला होता. या काळात यमराजाच्या स्थानावर अर्यमा होते व ते पाप्यांना योग्य दंड देत होते. राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालांसारख्या असलेल्या बंधूंसह राजा युधिष्ठिर, आपला वंश चालविणार्या परीक्षिताला पाहून श्रेष्ठ राज्यलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागला. याप्रकारे पांडव गृहस्थाश्रमाच्या व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही की आपले आयुष्य संपत आले आहे. पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही, ती आलीच. (१४-१७) परंतु काळाची गती जाणून विदुर धृतराष्ट्राला म्हणाला - महाराज, आता काळ तर मोठा कठीण आला आहे. तेव्हा झटपट येथून निघावे. हे राजा, सर्वसमर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घिरट्या घालू लागला आहे, ज्याला टाळण्याचा कोठेच कोणताही उपाय नाही. काळाच्या अधीन होऊन, जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो; तर मग धन इत्यादि वस्तूंची काय कथा ? आपले चुलते, बंधू, नातेवाईल आणि पुत्र सर्व मारले गेले, आपले वयही झाले आहे, शरीर वृद्धत्वाची शिकार झाली आहे आणि आपण दुसर्याच्या आश्रयाला येऊन राहिलात ! पहा ना ! या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते ती ! म्हणूनच आपण भीमाने देलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात ! ज्यांना आपण अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलात, विषप्रयोग करून मारण्याची इच्छा केलीत, भर सभेत ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केलेत, ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतलेत, त्यांच्याच अन्नावर प्राणांचे पोषण करण्यात काय अर्थ आहे ? अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता, ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच म्हणायची. वृद्धापकाळाने गलितगात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे. या शरीराने आता तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही. यात गुंतू नका. ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा. जो आपल्या सगे सोयर्यांना नकळत शरीराचा त्याग करतो, तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो. स्वतःच्या समजाने अगर दुसर्याने समजविल्याने, जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो, तोच उत्तम पुरुष होय. यापुढील काळ, मनुष्यांचे गुण कमी करणारा असेल, म्हणून आपण आपल्या कुटुंबियांच्या नकळत उत्तराखंडाकडे निघून जा. (१८-२७) जेव्हा लहान भाऊ विदुराने अंध राजा धृतराष्ट्राला याप्रमाणे समजाविले, तेव्हा बांधवांचे सुदृढ स्नेहपाश तोडून टाकून, भावाने दाखविलेल्या मार्गाने तो निघाला. ज्याप्रमाणे वीरपुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या न्यायोचित प्रहारांनी सुखप्राप्ती होते, त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्याने संन्यास घेतलेल्यांना होते, अशा हिमालयाच्या यात्रेला आपले पतिदेव निघाले आहेत असे पाहून परम पतिव्रता सुबलनंदिनी गांधारी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ चालू लागली. (२८-२९) अजातशत्रू युधिष्ठिराने दुसरे दिवशी प्रातःकाळी संध्यावंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केला, त्यांना तीळ, गायी, भूमी आणि सुवर्णाचे दान दिले. त्यानंतर जेव्हा तो गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून राजमहालात गेला, तेव्हा त्याला धृतराष्ट्र, विदुर आणि गांधारी दिसले नाहीत. युधिष्ठिने खिन्न होऊन तेथे बसलेल्या संजयाला विचारले, संजया, माझे ते वृद्ध अंध काका धृतराष्ट्र कुठे आहेत ? पुत्रशोकाने पीडित झालेली दुःखी काकू गांधारी आणि माझे हितैषी चुलते विदुर कोठे गेले ? धृतराष्ट्र तर आपले पुत्र आणि बांधव मारले गेल्याने दुःखी झाले होते. मीच कसा मंदबुद्धी पहा ! माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारीसह त्यांनी गंगेत उडी घेतली नसेल ना ? आमचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला, तेव्हा आम्ही लहान होतो. त्यावेळी या दोन्ही चुलत्यांनी कठीण प्रसंगी आम्हांला वाचविले. ते येथून कोठे निघून गेले बरे ? (३०-३३) सूत म्हणाले - आपले स्वामी धृतराष्ट्र दिसत नाहीत हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यांमुळे व्याकूळ झालेला संजय विरहाने अत्यंत कष्टी झाला होता. तो दुःखावेगामुळे युधिष्ठिराला काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने हातांनी अश्रू पुसले, स्वतःला सावरले आणि आपले स्वामी धृतराष्ट्र यांच्या चरणांचे स्मरण करीत तो युधिष्ठिराला म्हणाला, (३४-३५) संजय म्हणाला - हे कुरुकुलनंदना, आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांनी काय विचार केला, याची मला मुळीच कल्पना नाही. महाबाहो, त्या महात्म्यांनी तर मला पोरके केले. तेवढ्यात तुम्बुरू गंधर्वांसह देवर्षी नारद तेथे आले. युधिष्ठिराने आपल्या बंधूंसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हटले. (३६-३७) युधिष्टिर म्हणाला - भगवन, माझ्या दोन्ही चुलत्यांचा मला ठावठिकाणा लागत नाही. ते दोघे आणि पुत्रशोकाने व्याकूळ झालेली बिचारी माता गांधारी येथून कोठे गेले असतील बरे ? भगवन्, या अथांग दुःखसमुद्रातून नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहत. तेव्हा देवर्षी भगवान नारद म्हणाले. धर्मराज, तू कोणासाठीही शोक करू नकोस; कारण हे सर्व ईश्वराच्या अधीन आहे. हे सगळे लोक आणि लोकपाल ज्याच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसर्याशी भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त करतो. ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात, त्याचप्रमाणे मनुष्यसुद्धा वर्णाश्रमादी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंतांच्या आज्ञेचे पालन करतात. ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा-साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते, त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेनेच मनुष्यांचे संयोग-वियोग होतात. तू लोकांना जीवरूपाने नित्य देहारूपाने अनित्य, अथवा शुद्धब्रह्मस्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही, असे मानले, तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्ति व्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाहीत. म्हणून धर्मराजा, ते दीन-दुःखी चुलते-चुलती अशा असहाय अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील, हा अज्ञानजन्य मनाचा विमनस्कपणा सोडून दे. हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काल, कर्म आणि गुण यांच्या अधीन आहे. अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर, दुसर्यांचे संरक्षण कसे करू शकेल ? बिनहातवाले हे हातवाल्यांचे, बिनपायांचे गवत इत्यादि चार पायांच्या पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहेत. अशा प्रकारे एक जीव दुसर्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो. हे राजा, जीवांची ही जी अनेक रूपे आहेत, त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्या द्वारे अनेक प्रकारांनी प्रगट होत आहे, त्या ईश्वराला पाहा. महाराज, सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे तेच भगवान यावेळी या पृथ्वीतलावर देवांचा द्रोह करणार्यांचा नाश करण्यासाठी कालरूपाने अवतीर्ण झाले आहेत. त्यांनी देवतांचे काम पुरे केले आहे. उरलेले काम पुरे करण्यासाठी ते थांबले आहेत. जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत, तोपर्यंत आपण येथे थांबावे. (३८-४९) हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्तर्षींच्या प्रसन्नतेसाठी गंगामातेने स्वतःला वेगवेगळ्या सात धारात विभागले आहे, ज्याला सप्तस्रोत असे म्हणतात, तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र, पत्नी गांधारी आणि विदुर, यांचेबरोबर गेले आहेत. तेथे ते त्रिकाल स्नान आणि विधिपूर्वक अग्निहोत्र करतात. आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही. ते फक्त पाणी पिऊन शांतचित्ताने तेथे राहात आहेत. आसन सिद्ध करून, प्राणांना वश करून घेऊन, त्यांनी आपल्या सहाही इंद्रियांना विषयांपासून मागे खेचले आहे. भगवंतांचीच धारणा केल्याने त्यांचे तम, रज आणि सत्त्वगुणाचे दोष नाहीसे झाले आहेत. त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले आहे. शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते, त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान् असलेल्या ब्रह्माशी एकरूप केले आहे. त्यांनी आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणार्या गुणांच्या परिणामांना सर्वथैव मिटवून टाकले आहे. सर्व कर्मांचा संन्यास करून वठलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तू विघ्न आणू नयेस. हे धर्मराजा, आजपासून पाचव्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील. आणि ते शरीर जळून भस्म होईल. गार्हपत्य इत्यादि अग्नीद्वारा, पर्णकुटीसहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साध्वी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करील. धर्मराजा, ते आश्चर्य पाहून हर्षित पण वियोगामुळे दुःखित झालेला विदुर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल. एवढे बोलून देवर्षी नारद तुंबरू गंधर्वासह स्वर्गाकडे गेले. युधिष्ठिराने त्यांचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला. (५०-५९) अध्याय तेरावा समाप्त |