श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १४ वा

अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणाले - स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता. पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही, त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले. त्यांनी पाहिले की, काळाची गति भयंकर होऊ लागली आहे. ज्यावेळी जो ऋतू असावयास पाहिजे तो असत नाही आणि त्याच्या क्रियाही उलट्या होत आहेत. लोक क्रोधी, लोभी आणि असत्य बोलणारे झाले आहेत. आपला जीवन - निर्वाह चालविण्यासाठी लोक पापी वर्तन करू लागले आहेत. सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत. एवढेच काय मैत्रीमध्येही कपट आहे. पिता, माता, सगे-सोयरे, बंधू, पति-पत्‍नी यांच्यात तंटे होऊ लागले आहेत. कलियुग असल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ, दंभ, अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातही अरिष्टसूचक अपशकुन होऊ लागले आहेत. हे सर्व पाहून युधिष्ठिर धाकट्या भावास भीमसेनास म्हणाले, (१-५)

युधिष्ठिर म्हणाले - भीमसेना ! अर्जुनाला आम्ही द्वारकेला यासाठी पाठविले होते की, तेथे जाऊन त्याने पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण काय करीत आहेत याची माहिती घ्यावी आणि सगेसोयर्‍यांना भेटून यावे. सात महिने होऊन गेले तरी तुझा धाकटा भाऊ अजून परतला नाही. तो अजून का आला नाही, याचे योग्य कारण मला तरी काही समजत नाही. देवर्षी नारदांनी सांगितले होते की, भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात. ती वेळ तर आली नाही ना ? त्याच भगवंतांच्या कृपेने आम्हांला ही संपत्ती, राज्य, पत्‍नी, प्राण, कुल, संतान, शत्रूंवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे. हे नरश्रेष्ठा, बघ ना ! आकाशात उल्कापात इत्यादी, पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरात रोग इत्यादी कितीतरी भयंकर अपशकुन होऊ लागले आहेत. त्यावरून वाटते की लवकरच बुद्धी मोहाने झाकून टाकणारे संकट आपल्यावर येणार आहे. भीमसेना, माझी डावी मांडी, डावा डोळा आणि डावा हात वारंवार फडफडू लागला आहे. हृदयात धडकी भरली आहे. लवकरच काही तरी अनिष्ट होणार आहे. बंधो, सूर्योदय होताच ही भालू सूर्याकडे तोंड करून रडू लागली आहे. बघ ना ! तिच्या तोंडातून ज्वाळाही निघत आहेत. आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भुंकत आहे. भीमसेना, गायीसारखे शुभ पशू माझ्या डाव्या बाजूने आणि गाढवासारखे अशुभ पशू माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले आहेत. माझे घोडे मला रडताना दिसत आहेत. मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कश आवाजाने माझ्या मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहात आहेत. दिशा धूसर झाल्या आहेत, सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारंवार खळी पडत आहेत. पृथ्वीवर पर्वतांसह भूकंप होऊ लागले आहेत. ढग जोराने गडगडत आहेत आणि चहूकडे विजा पडू लागल्या आहेत. शरीराला झोंबणारा आणि धुळीने अंधार पसरविणारा झंझावात सुरू झाला आहे. ढग जणू किळसवाणा रक्ताचा सडा पाडू लागले आहेत. पहा ना ! सूर्य फिका दिसू लागला आहे. आकाशात ग्रहांची एकमेकांशी टक्कर होत आहे. भूत-गणांच्या गर्दीमुळे पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे. नद्या, नद, तळी आणि लोकांची मने क्षुब्ध होऊ लागली आहेत. तूप घातले तरी अग्नी पेटत नाही. हा भयंकर काळ काय करील हे सांगता येत नाही. वासरे दूध पीत नाहीत, गायी दूध देत नाहीत, गोठ्यामध्ये गायी आसू ढाळीत आहेत. बैलही उदास आहेत. देवतांच्या मूर्ति रडवेल्या चेहेर्‍याच्या दिसत आहेत. त्यांच्या अंगातून घाम वाहात आहे आणि त्या हलूही लागल्या आहेत. बंधो, हा देश, गाव, शहरे, बगीचे, खाणी आणि आश्रम निस्तेज आणि आनंदरहित झाले आहेत. हे आम्हांला कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे ? हे मोठमोठे उत्पात पाहून मला तर असे वाटू लागले आहे की, निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंतांच्या, अन्य कोणाकडेही न आढळणार्‍या सौंदर्याने शोभणार्‍या चरणांना पारखी झाली आहे. शौनक महोदय, हे भयंकर उत्पात पाहून राजा युधिष्ठिर मनोमन चिंताग्रस्त झाले होते. एवढ्यात द्वारकेहून अर्जुन परत आला. युधिष्ठिरांनी पाहिले की, अर्जुन इतका हवालदिल पूर्वी कधीच झाला नव्हता. त्याने तोंड खाली घातले होते. त्याच्या कमळासारख्या नेत्रांतून अश्रू वाहात होते आणि शरीरावर बिलकुल तजेला नव्हता. अशा स्थितीतच अर्जुनाने युधिष्ठिरांच्या चरणांवर लोटांगण घातले, तेव्हा युधिष्ठिर भयभीत झाले. देवर्षी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व सुहृदांच्या समक्ष त्यांनी अर्जुनाला विचारले. (६-२४)

युधिष्ठिर म्हणाले - बंधो ! द्वारकानगरीत आपले नातलग असलेले मधू, भोज, दशार्ह, अर्ह, सात्वत, अंधक आणि वृष्णिकुलातील यादव यांचे कुशल आहे ना ? आपचे परमपूज्य आजोबा शूरसेन सुखरूप आहेत ना ? वसुदेव मामा आपल्या धाकट्या बंधूसह खुशाल आहेत ना ? त्यांची पत्‍नी देवकी आणि तिच्या सात बहिणी आपल्या पुत्र-सुनांसह आनंदात आहेत ना ? ज्याचा मुलगा कंस अतिशय दुष्ट होता, तो राजा उग्रसेन धाकटा भाऊ देवक यांच्यासह हयात आहे ना ? हृदीक, त्याचा मुलगा कृतवर्मा, अक्रूर, जयंत, गद, सारण तसेच शत्रुजित इत्यादी यादव-वीर कुशल आहेत ना ? यादवांचे स्वामी भगवान बलराम आनंदात आहेत ना ? वृष्णिवंशातील सर्वश्रेष्ठ महारथी प्रद्युम्न सुखरूप आहे ना ? युद्धामध्ये मोठी चपळता दाखविणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना ? सुषेण, चारुदेष्ण, जांबवतीपुत्र सांब आणि आपल्या पुत्रांसहित ऋषभ आदी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्रसुद्धा प्रसन्नचित्त आहेत ना ? तसेच भगवान श्रीकृष्णांचे श्रुतदेव, उद्धव इत्यादी सेवक, सुनंद, नंद इत्यादी प्रमुख यदुवंशी, जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत ते सर्वजण कुशल आहेत ना ? आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का ? (२५-३३)

भक्तवत्सल ब्राह्मणभक्त भगवान श्रीकृष्ण, आपल्या स्वकीयांसह द्वारकेतील सुधर्मासभेत आनंदात आहेत ना ? ते आदिपुरुष श्रीकृष्ण, बलरामांसह जगाचे परम मंगल, कल्याण आणि उन्नती व्हावी, म्हणून यदुवंशरूपी क्षीरसागरात विराजमान आहेत. त्यांच्याच शौर्यामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यदुवंशीय पृथ्वीवरील सर्वांच्या द्वारा सन्मानित झाले असून श्रीविष्णूंच्या पार्षदांप्रमाणे मोठ्या आनंदाने विहार करीत आहेत. सत्यभामा इत्यादी सोळा हजार राण्या केवळ भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्यामुळे युधामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्राणीलाच उपभोग्य असणार्‍या पारिजात आदी वस्तूंचा उपभोग घेत आहेत. यदुवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या देवतांनी बसण्यास योग्य अशी सुधर्मासभा आपल्या चरणांनी आक्रमण करीत आहेत. (३४-३८)

बंधु अर्जुना ! हे पण सांग की तू कुशल आहेस ना ? मला तू निस्तेज दिसतोस. तू तेथे पुष्कळ दिवस राहिलास. यावेळी तुझ्या मानसन्मानात कमतरता तर आली नाही ना ? तुझा कोणी अपमान तर केला नाही ना ? अपमानास्पद, अमंगल अशा शब्दांनी कोणी तुझे अंतःकरण दुखावले नाही ना ? किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचकाला त्याने मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस, असे तर झाले नाही ना ? तू नेहमी शरण आलेल्याचे रक्षण करीत आलेला आहेस. तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण, बालक, गाय, वृद्ध, रोगी, स्त्री किंवा अन्य प्राणी अशाला तू झिडकारले नाहीस ना ? तू समागमास अयोग्य स्त्रीशी समागम तर केला नाहीस ना ? किंवा समागमास योग्य स्त्रीशी असभ्य रीतीने वागला नाहीस ना ? येताना वाटेत तुझ्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या असणार्‍याने तुला पराजित तर केले नाही ना ? किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना अथवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन तर केले नाहीस ना ?तुला न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केले नसशील, याची मला खात्री आहे. न जाणो, परम प्रियतम, अभिन्न हृदय, परम सुहृद, अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल. म्हणूनच तू असा उदास असावास. याशिवाय तुला दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण असणार नाही. (३९-४४)

अध्याय चौदावा समाप्त

GO TOP