श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १२ वा

परीक्षिताचा जन्म -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनक म्हणाले - अश्वत्थाम्याने सोडलेल्या अत्यंत तेजस्वी ब्रह्मास्त्राने उत्तरेचा गर्भ नष्ट झाला होता, परंतु भगवंतांनी तो पुन्हा जिवंत केला. ज्याला शुकदेवांनी ज्ञानोपदेश केला होता, त्या महाज्ञानी व महात्मा परीक्षिताचा जन्म, कर्म, मृत्यू आणि त्यानंतर त्याला जी गति प्राप्त झाली, ते सर्व आपणांस ओग्य वाटत असेल तर, आम्हांस सांगावे. (१-३)

सूत म्हणाले - धर्मराज युधिष्ठिर आपल्या प्रजेला प्रसन्न ठेवीत पित्यासमान तिचे पालन करीत होते. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेमुळे ते सर्व भोगांबाबत निःस्पृह झाले होते. (४)

त्यांच्याजवळ विपुल संपत्ती होती, मोठे मोठे यज्ञ केल्याकारणाने त्यांच्या फलस्वरूप श्रेष्ठ लोकांचा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला होता. त्यांच्या पत्‍न्या आणि बंधू त्यांना अनुकूल होते. सर्व पृथ्वीवर त्यांची सत्ता होती. ते जंबूद्वीपाचे स्वामी होते आणि त्यांची कीर्ति स्वर्गापर्यंत पोहोचली होती. हे ऋषींनो, ज्याची देवताही इच्छा करतात अशी भोगसामग्री त्यांच्याजवळ होती. परंतु भुकेलेल्याला अन्नाखेरीज अन्य वस्तूंची अपेक्षा नसते, त्याप्रमाणे भगवंतांशिवाय अन्य कोणतीच गोष्ट त्यांना सुखी करू शकत नव्हती. (५-६)

शौनकमहोदय, उत्तरेच्या गर्भातील तो वीर ब्रह्मास्त्राच्या तेजाने जळू लागला, तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला. तो अच्युत अंगठ्याएवढा, अत्यंत शुद्ध, सुंदर, श्यामवर्ण, विजेसारखा चमकणारा पीतांबर धारण केलेला, डोक्यावर झळकणारा मुकुट घातलेला, सुंदर व लांब चार भुजा असलेला, चमकणार्‍या सुवर्णाची सुंदर कुंडले कानांमध्ये घातलेला, लालसर डोळे असलेला होता. तो हातामध्ये कोलितासारखी जळत असलेली गदा घेऊन वारंवार ती फिरवीत स्वतः त्या शिशूभोवती फिरत होता. जसा सूर्य आपल्या किरणांनी धुक्याला पिटाळून लावतो, त्याप्रमाणे त्या गदेने तो अस्त्रतेजाला शांत करीत होता. आपल्याजवळ असलेल्या त्या पुरुषाला बघून "हा कोण आहे ?" असा तो शिशू विचार करू लागला. अशा प्रकारे त्या दहा महिन्यांच्या गर्भस्थ शिशूच्या समोरच धर्मरक्षक, अप्रमेय, भगवान श्रीकृष्ण अस्त्रतेजाला शांत करून तेथेच अंतर्धान पावले. (७-११)

त्यानंतर अनुकूल ग्रहांचा उदय झाला असता, सर्व सद्‌गुणांना विकसित करणार्‍या शुभ मुहूर्तावर पांडुवंशीय परीक्षिताचा जन्म झाला. तो बालक इतका तेजस्वी होता की, जणू पांडु राजानेच पुन्हा जन्म घेतला होता. महाराज युधिष्ठिरांनी प्रसन्न मनाने धौम्य, कृपाचार्य आदी ब्राह्मणांकडून पुण्याहवाचन करवून त्यचा जातकर्म संस्कार केला. दान देण्यासाठी योग्य काळ जाणणार्‍या युधिष्ठिरांनी प्रजातीर्थकाळातच (नाळ तोडण्यापूर्वी) ब्राह्मणांना सुवर्ण, गायी, जमीन, गावे, उत्तम प्रतीचे हत्ती-घोडे आणि उत्तम अन्न हे दान दिले. संतुष्ट होऊन ब्राह्मण त्या विनयशील युधिष्ठिरांना म्हणाले - "हे पुरुवंशशिरोमणी, प्रतिकूल कालगतीमुळे हा पवित्र पुरुवंश खंडित होऊ लागला होता. परंतु तुमच्यावर कृपा करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा बालक देऊन त्याचे रक्षण केले आहे. म्हणून याचे नाव ’विष्णूरात’ ठेवावे. हा बालक संसारात मोठा यशस्वी, भगवंतांचा परमभक्त आणि महापुरुष होईल, हे निःसंशय." (१२-१७)

युधिष्टिर म्हणाले - हे महात्म्यांनो ! हा बालक आपल्या उज्ज्वल यशाने आमच्या वंशाचे पवित्रकीर्ति महात्मे राजर्षी, यांचे अनुकरण करील ना ? (१८)

ब्राह्मण म्हणाले - धर्मराज ! मनुपुत्र इक्ष्वाकूप्रमाणेच हा पुत्र आपल्या प्रजेचे पालन करील आणि दशरथपुत्र श्रीरामांच्यासारखा ब्राह्मणभक्त आणि सत्यप्रतिज्ञ होईल. हा, उशीनर देशाच्या राजा शिबीप्रमाणे दानशूर आणि शरणागतवत्सल होईल. तसेच यज्ञकर्त्यांमध्ये दुष्यंतपुत्र भरताप्रमाणे आपल्या वंशाचे यश पसरवील. धनुर्धार्‍यांमध्ये हा सहस्रार्जुन तसेच कौंतेय अर्जुन यांच्यासारखा अग्रगण्य होईल. हा अग्नीसारखा अजिंक्य आणि समुद्रासारखा दुस्तर होईल. हा सिंहासारखा पराक्रमी, हिमालयासारखा आश्रय घेण्यास योग्य, पृथ्वीसारखा क्षमाशील आणि माता-पित्यांसारखा सहनशील होईल. पितामह ब्रह्मदेवांप्रमाणे याच्या अंगी समता असेल. भगवान शंकरांसारखा हा कृपाळू होईल आणि सर्व प्राणिमात्रांना आश्रय देण्यामध्ये हा लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या समान होईल. समस्त सद्‌गुण धारण करणार्‍यांमध्ये हा श्रीकृष्णांचा अनुयायी होईल, रन्तिदेवासारखा उदार आणि ययातीसारखा धार्मिक होईल. (१९-२४)

हा बलीसारखा धैर्यवान आणि भगवान श्रीकृष्णांवर प्रह्लादासारखा निष्ठावान होईल. हा पुष्कळ अश्वमेध यज्ञ करील आणि गुरुजनांची सेवा करील. याचे पुत्र राजर्षी होतील. मर्यादांचे उल्लंघन करणार्‍यांना हा दण्ड देईल. पृथ्वीच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी हा कलीला शासन करील. ब्राह्मणकुमाराच्या शापाने तक्षकापासून आपला मृत्यू होणार, हे ऐकून हा सर्व आसक्ती सोडून देऊन भगवत्‌चरणांना शरण जाईल. हे राजा, व्यासपुत्र शुकदेव यांचेकडून हा आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेईल आणि शेवटी गंगातटाकी आपल्या शरीराचा त्याग करून निश्चितपणे अभयप्रद प्रप्त करून घेईल. (२५-२८)

ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना याप्रमाणे सांगून आणि मान - सन्मान स्वीकारून ते आपापल्या घरी परतले. तो हा बालक पृथ्वीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला आला, कारण या श्रेष्ठ बालकाने गर्भामध्ये असताना ज्या पुरुषाचे दर्शन घेतले होते, त्याचे स्मरण करीत तो लोकांची अशा रीतीने परीक्षा घेत होता की, यातील कोण त्या पुरुषासारखा आहे ? जसा शुक्लपक्षातील चंद्र दिवसेंदिवस आपल्या कलांनी पूर्ण होत होत वाढत जातो, तसाच तो राजकुमार वडील करीत असलेल्या पालन - पोषणाने दिवसेंदिवस वाढत गेला. (२९-३१)

याचवेळी स्वजनांच्या वधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून राजा युधिष्ठिरांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार केला. परंतु प्रजेकडून वसूल केलेला कर आणि दंड, या व्यतिरिक्त अन्य धन नसल्याने ते काळजीत पडले. त्यांचे मनोगत जाणून भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्यांच्या भावांनी उत्तर दिशेला राजा मरुत्त आणि ब्राह्मणांनी सोडून दिलेले पुष्कळसे धन आणले. त्या धनातून यज्ञासाठी लागणारी सामग्री गोळा करून स्वजनवधामुळे भ्यालेल्या धर्मपुत्र महाराज युधिष्ठिरांनी तीन अश्वमेध यज्ञांच्या द्वारा भगवंतांची पूजा केली. युधिष्ठिरांच्या आमंत्रणावरून आलेल्या भगवंतांनी ब्राह्मणांच्या द्वारा त्यांचा यज्ञ संपन्न करून आपले सुहृद पांडव यांच्या प्रसन्नतेसाठी ते काही महिने तेथेच राहिले. अहो शौनक ! यानंतर बंधूंसहित राजा युधिष्ठिर आणि द्रौपदीचा निरोप घेऊन यादवांसह भगवान, अर्जुनाला बरोबर घेऊन द्वारकेला गेले. (३२-३६)

अध्याय बारावा समाप्त

GO TOP