|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ११ वा
श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणाले - श्रीकृष्णांनी आपल्या समृद्ध अशा आनर्त देशात जाऊन पोहोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरह-वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजविला. भगवंतांच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवितेवेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की, जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्चस्वरात मधुर गान गात आहे. संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंतांच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरी आली. भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही नीरांजन ओवाळतात, त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णांचे स्वागत केले. सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले. सर्वांचे सुहृद आणि संरक्षक अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्षगद्गद वाणीने अशा प्रकारे स्तुती करू लागले की, जशी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या बोलाने बोलतात. हे नाथ, आम्ही आपल्या चरणकमलांना सदैव प्रणाम करतो. ज्या चरणांना ब्रह्मा, शंकर, इंद्रसुद्धा वंदन करतात, ते चरण या संसारात परम कल्याण इच्छिणार्यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत, त्यांना शरण गेल्याने परम समर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. हे विश्वबंधो, आपणच आमचे माता-पिता, सुहृद आणि स्वामी आहात. आपणच सद्गुरू आणि परम आराध्यदैवत आहात. आपल्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपण आमचे कल्याण करा. अहाहा ! आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो. कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत. तसेच प्रेमळ स्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुखकमल आम्हांला पाहायला मिळत आहे. हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे. कमलनयन श्रीकृष्णा, आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता, तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एकेक क्षण आम्हांला कोट्यवधी वर्षांइतका मोठा वाटतो. सूर्याशिवाय डोळ्यांची जशी, तशी आमची आपल्याखेरीज अवस्था होते. प्रजेच्या मुखांतून अशी स्तुतिवचने ऐकत आणि आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला. (१-१०) ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे भगवंतांसारख्याच बलवान मधू, भोज, दाशार्ह, अर्ह, कुकुर, अंधक आणि वृष्णिवंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते. द्वारकापुरी सर्व ऋतूंच्या संपूर्ण वैभवांनी संपन्न होती. तसेच पवित्र वृक्ष आणि वेलींच्या बागांनी युक्त होती. ठिकठिकाणी फळांचे वृक्ष, फुलांच्या बागा आणि क्रीडावने होती. अधूनमधून दिसणारी कमळांनी शोभणारी सरोवरे नगराची शोभा वाढवीत होती. नगरातील दरवाजे, महालांची दारे आणि रस्त्यांवर भगवंतांच्या स्वागतासाठी तोरणे लावली होती. चारी बाजूंनी रंगीवेरंगी ध्वज आणि पताका फडकत होत्या. त्यामुळेच त्या ठिकाणी प्रखर सूर्यकिरण जाणवत नव्हते. तेथील राजमार्ग, अन्य सडका, बाजार आणि चौक येथे झाडझूड करून तेथे सुगंधित द्रव्यांचा सडा टाकला होता. भगवंतांच्या स्वागतासाठी उधळलेली फळे, फुले, अक्षता इत्यादी सगळीकडे पसरल्या होत्या. घरोघरींच्या दारांवर दही, अक्षता, फळे, ऊस, पाण्यांनी भरलेले कलश, भेटवस्तू, धूप-दीप इत्यादींनी सजावट केली होती. (११-१५) जेव्हा उदार अंतःकरणाचे वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्भूत पराक्रमी बलराम, प्रद्युम्न, चारुदेष्ण आणि जांबवतीपुत्र सांबाने असे ऐकले की, आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत, तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप, उठणे, बसणे, भोजन इत्यादी सोडून दिले. प्रेमोल्हासाने त्यांची हृदये उचंबळून आली. शुभशकून व्हावे, म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगल-पाठांचे गायन करणार्या मंगलमय सामग्रींनी सुसज्ज अशा ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते निघाले. शंख, तुतार्या आदी वाद्ये वाजू लागली आणि वेदघोष होऊ लागला. मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंतांच्या स्वागतासाठी निघाले. गालांवर चमकणार्या कुंदलांचा प्रकाश पडल्याने ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या, अशा शेकडो वारांगना भगवंतांच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यांत बसून भगवंतांच्या स्वागतासाठी निघाल्या. पुष्कळसे नट, नर्तक, गायक, कीर्ति गाणारे सूत, मागध आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत चरित्र गायन करू लागले. (१६-२०) भगवान श्रीकृष्णांनी बांधव, नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांचा सन्मान केला. कोणाला मस्तक लववून नमस्कार केला, कोणाला शब्दांनी अभिवादन केले, कोणाला आलिंगन दिले, कोणाशी हस्तांदोलन केले, कोणाकडे हास्यमुद्रेने पाहिले, तर कोणाला केवळ नजरेने पाहिले. ज्याची जशी इच्छा होती, तशी पूर्ण केली. अशा रीतीने अंत्यजांपर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन, सपत्नीक ब्राह्मण, वृद्ध, तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत आणि बंदीजनांकडून स्तुती ऐकत सर्वांसह वर्तमान भगवान श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश केला. (२१-२३) शौनक महोदय ! भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते, तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंतांच्या दर्शनातच परमानंद मानीत आपापल्या गच्चीवर चढून बसल्या. भगवंतांचे वक्षःस्थळ मूर्तिमान सौंदर्यलक्ष्मीचे निवासस्थान आहे. त्यांचे मुख नेत्रांनी पिण्याचे सौंदर्य-सुधेने भरलेले पात्र आहे, त्यांचे बाहू लोकपालांचे निवासस्थान आहेत. त्यांचे चरणकमल भक्तांचे आश्रयस्थान आहेत. त्यांचे अंगप्रत्यंग शोभेचे धाम आहे. भगवंतांचे हे रूप द्वारकावासी नित्य-निरंतर पाहात असतात; तरीसुद्धा त्यांच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर शुभ्र वर्णाचे छत्र धरले होते, शुभ्र वर्णाच्या चवर्या ढाळल्या जात होत्या, चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती, पीतांबर आणि वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यामुळे श्याम-वर्णाचा मेघ एकाच वेळी, सूर्य, चंद्र, इंद्रधनुष्य आणि विद्युत्-तेजाने शोभिवंत दिसावा, तसे श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते. (२४-२७) भगवान सर्वप्रथम आपल्या माता-पित्यांच्या महालात गेले. तेथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी आदी आपल्या सात मातांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि मातांनीही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसवून घेतले. त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या, त्यांचे हृदय हर्षाने पुलकित झाले आणि आनंदाश्रुंनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या. नंतर मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोग-सामग्रींनी संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनांत ते गेले. तेथे सोळा हजार पत्न्यांचे निरनिराळे महाल होते. आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राण्यांची हृदये आनंदाने भरून गेली. त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिल्या, त्यांनी आपल्या केवळ आसनाचाच नव्हे तर पती परगावी गेल्यानंतर जे नियम पाळले होते, त्यांचाही त्याग केला. त्यावेळी त्यांच्या मुखांवर आणि नेत्रांवर लज्जा दाटून आली. भगवंतांविषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते. त्यांनी प्रथम मनोमन, नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसे त्यांना आलिंगन दिले. शौनक महोदय ! त्यवेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रूधारा वाहू लागल्या, संकोचास्तव त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण प्रेमभावातिरेकाने अश्रू ओघळेच. जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्याजवळ राहत असत, तरीसुद्धा त्यांचे चरणकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत असत. स्वभावाने चंचल असणारीही लक्ष्मी ज्यांना क्षणभरसुद्धा जेथे सोडीत नाही, तेथे त्यांचे सान्निध्यात कोणती स्त्री तृप्त होईल ? (२८-३३) ज्याप्रमाणे वायू बांबूंचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो, त्याचप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजांमध्ये परस्पर फूट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता, भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अनेक अक्षौहिणी सैन्यांसह एकमेकांकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले. साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्य लोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणीरत्नांमध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले. ज्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य त्यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावनांचे सूचक होते, ज्यांच्या लज्जापूर्ण कटाक्षाने विव्हल होऊन शुद्ध हरपून, विश्वविजयी कामदेवानेसुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता, अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या काम-चेष्टांनी ज्यांच्या मनात यत्किंचितही क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाहीत, त्या निःसंग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात, हा त्यांचा मूर्खपणाच आहे. हीच भगवंतांची महती आहे की, प्रकृतीत राहूनसुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाहीत. जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही. जसे अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्मांनी युक्त आहे असे मानते, त्याप्रमाणे त्या मूर्ख स्त्रियासुद्धा श्रीकृष्णांना आपला एकांतसेवी, स्त्रीलोलुप भक्तच समजत होत्या. कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नव्हत्या. (३४-३९) अध्याय अकरावा समाप्त |