श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १० वा

श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनकांनी विचारले - आपले परंपरागत राज्य बळकावण्याची इच्छा असलेल्या आततायींचा नाश करून धर्मशिरोमणी महाराज युधिष्ठिरांनी आपल्या बंधूंसह कशाप्रकारे राज्य केले आणि कोणकोणती कामे केली. कारण बंधुवधाच्या दुःखाने राज्यभोगाविषयी ते विरक्त होते. (१)

सूत म्हणाले - संपूर्ण सृष्टीला पुनरुज्जीवित करणारे भगवान श्रीहरी परस्परातील कलहाग्नीने दग्ध झालेल्या कुरुवंशाला अंकुरित करून आणि युधिष्ठिराला राज्यसिंहासनावर बसवून प्रसन्न झाले. भीष्म आणि श्रीकृष्ण यांनी केलेल्या उपदेशाच्या श्रवणाने युधिष्ठिराच्या अंतःकरणात विज्ञानाचा उदय झाला आणि त्याचे सर्व संशय फिटले. भगवंतांच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या सार्‍या पृथ्वीचे ते इंद्राप्रमाणे शासन करू लागले. भीमसेन आदी त्यांचे बंधू त्यांच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करीत होते. युधिष्ठिराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता, पृथ्वी सर्व आवश्यक वस्तू उत्पन्न करीत होती, दुधाने पुष्ट झालेल्या सडांच्या गायी प्रसन्नतेने गोशालांना दुधाने भिजवीत होत्या. नद्या, समुद्र, पर्वत, वनस्पती, वेली आणि औषधी प्रत्येक ऋतूत आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या. अजातशत्रू महाराज युधिष्ठिराच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच आधि-व्याधी तसेच दैविक, भौतिक किंवा आत्मिक क्लेश होत नसत. (२-६)

आपल्या बंधूंचा शोक नाहीसा करण्यासाठी आणि बहीण सुभद्रेच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिनेपर्यंत हस्तिनापुरात राहिले. जेव्हा त्यांनी युधिष्ठिराकडे द्वारकेला जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा राजाने त्यांना आलिंगन देऊन संमती दिली. त्यांना प्रणाम करून भगवंत रथावर बसले. काही समवयस्क लोकांनी त्यांना आलिंगन दिले, तर कनिष्ठांनी नमस्कार केला. त्यावेळी सुभद्रा, द्रौपदी, कुंती, उत्तरा, गांधारी, धृतराष्ट्र, युयुत्सु, कृपाचार्य, नकुल, सहदेव, भीम, धौम्य, सत्यवती आदी स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णांवरील अतीव प्रेमामुळे त्यांचा विरह सहन करू शकले नाहीत. भगवद्‌भक्त सत्पुरुषांच्या संगतीने ज्यांचा दुःसंग सुटला ते विवेकी पुरुष, भगवंतांचे मधुर-मनोहर यश केवळ एक वेळ ऐकल्यावरही त्यांना सोडू शकत नाहीत. तर मग त्याच भगवंतांचे दर्शन, स्पर्श, त्यांच्याशी संवाद करणे, तसेच त्यांचेबरोबर निद्रा घेणे, उठणे, बसणे आणि भोजन करण्याने ज्यांचे हृदय भगवंतांना संपूर्ण समर्पण झाले होते, असे पांडव त्यांचा विरह कसा सहन करू शकतील ? अंतःकरण द्रवलेले ते पापण्या न मिटणार्‍या नेत्रांनी भगवंतांकडे पाहात, स्नेहबंधनाने विव्हळ होऊन ते जातील तिकडे जात होते. श्रीकृष्ण घरून निघतेवेळी, त्यांच्या बंधुपत्‍न्यांचे नेत्र दुःखित अंतःकरणामुळे अश्रूंनी भरून आले होते, परंतु प्रवासात त्यांना अपशकुन होईल, या भितीने मोठ्या प्रयत्‍नांनी त्यांनी आपले अश्रू आवरून घेतले. (७-१४)

भगवंतांच्या प्रस्थानाच्या वेळी मृदंग, शंख, भेरी, वीणा, ढोल, तुतार्‍या, धुंधुरी, नगारे, घंटा, दुंदुभी इत्यादी वाद्ये वाजू लागली. भगवंतांच्या दर्शनाच्या लालसेने कुरुवंशातील स्त्रिया प्रासादाच्या गच्चीवर जाऊन तेथूनच प्रेम, लज्जा व मंद हास्ययुक्त नेत्रांनी भगवंतांना पहात पहात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या. त्यावेळी भगवंतांचा प्रिय सखा अर्जुनाने आपल्या प्रियतम श्रीकृष्णांचे मोत्यांची झालर लावलेले, रत्‍नजडित दांडा असलेले पांढरे छत्र आपल्या हातात घेतले होते. उद्धव आणि सात्यकी सुंदर चवर्‍या ढाळीत होते. भगवान श्रीकृष्णांवर वाटेत चारी बाजूंनी पुष्पवर्षा होत होती. ते दृश्य अत्यंत मनोहर होते. ठिकठिकाणी ब्राह्मणांनी दिलेले सत्य आशीर्वाद कानावर येत होते, ते आशीर्वाद सगुण भगवंतांना अनुरूप होते. कारण त्यांच्यामध्ये सर्व गुण होते. परंतु निर्गुण भगवंतांना अनुरूप नव्हते. ज्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांमध्ये रममाण झाले होते अशा हस्तिनापुरातील कुलीन स्त्रिया आपापसात अशा गोष्टी करीत होत्या की, त्याकडे सर्वांचे कान आणि मन लागून राहिले होते. (१५-२०)

त्या आपसात म्हणत होत्या - ज्यावेळी सत्त्व-रज-तम हे सृष्टीचे मूल तीन गुणसुद्धा राहात नाहीत, जीव आणि जगदात्मा ईश्वरात लीन होऊन जातात आणि महत्तत्त्व आदी समस्त शक्ति आपले मूळ कारणे जे अव्यक्त त्यात निद्रा घेतात. सख्यांनो, अशा प्रलयाच्या वेळी सुद्धा आपल्या अद्वितीय निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे हेच ते सनातन परम पुरुष होत. त्यांनीच पुन्हा आपला नामरूपरहित स्वरूपात, नाम-रूपाच्या निर्माणाची इच्छा केली आणि त्यांच्याच अंशभूत जीवांना जी मोहात पाडते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते, त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रकृतीचे अनुसरण केले. तसेच व्यवहारासाठी म्हणून वेद इत्यादि शास्त्रांची रचना केली. या जगात ज्यांच्या स्वरूपाचा साक्षात्कार, जितेंद्रिय योगी आपल्या प्राणांना वश करून, भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल हृदयात करून घेतात, तेच हे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत. वास्तविक यांच्याच भक्तीने अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होऊ शकते. (२१-२३)

हे सखी, ज्यांच्या सुंदर लीलांचे गायन वेदांत आणि अन्य गोपनीय शास्त्रांत व्यासांसारख्या रहस्यवादी ऋषींनी केले आहे, तेच हे आहेत. हेच अद्वितीय परमात्मा आहेत. हे आपल्या लीलेने जगताची निर्मिती, पालन-पोषण तसेच संहार करतात; पण त्यात आसक्त होत नाहीत. जेव्हा तामसी वृत्तीचे राजे अधर्माने वागू लागतात, तेव्हा हे सत्त्वगुणाचा स्वीकार करून ऐश्वर्य, सत्य, शाश्वत नियम, दया, आणि यश हे गुण प्रगट करतात आणि जगताच्या कल्याणासाठी युगा-युगांमध्ये अनेक अवतार धारण करतात. अहो पहा ना ! हा यदुवंश अत्यंत प्रशंसनीय आहे. कारण लक्ष्मीपती पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी जन्म घेऊन या वंशाचा सन्मान केला आहे. ते पवित्र मधुवनही अत्यंत धन्य होय. जे यांनी आपल्या हिंडण्या-फिरण्याने सुशोभित केले आहे. केवढी आनंदाची गोष्ट आहे की, द्वारकापुरीने स्वर्गाच्या यशाचा तिरस्कार करून पृथ्वीचे पवित्र यश वृद्धिंगत केले आहे. म्हणूनच येथील प्रजा मोठ्या प्रेमाने आणि मंद हास्ययुक्त कृपादृष्टीने पाहणार्‍या आपल्या स्वामी भगवान श्रीकृष्णांचे सदैव दर्शन घेत असते. अग सखी ! ज्यांचे यांनी पाणिग्रहण केले आहे, त्या स्त्रियांनी निश्चितच व्रत, स्नान, होम-हवन इत्यादींनी परमात्म्याची आराधना केली असली पाहिजे. कारण ज्यांच्या केवळ स्मरणाने व्रजगोपी आनंदविभोर होऊन मूर्छित होत, त्यांच्या अधरामृताचे या वारंवार सेवन करतात. स्वयंवरात यांनी शिशुपाल आदी उन्मत्त राजांची मानहानी करून आपल्या बाहुबलाने ज्यांना जिंकून आणले होते, तसेच प्रद्युम्न, सांब, अम्ब इत्यादी ज्यांचे पुत्र आहेत, त्या रुक्मिणी आदी आठ पट्टराण्या आणि भौमासुराला मारून आणलेल्या ज्या हजारो पत्‍न्या आहेत, त्या खरोखरच धन्य होत ! कारण या सगळ्याजणींनी स्वतंत्रता आणि पावित्र्य यांनी रहित असणार्‍या स्त्रीजीवनास पवित्र आणि उज्ज्वल बनविले आहे. यांच्या महिम्याचे काय वर्णन करावे ? यांचे पती साक्षात कमलनयन श्रीकृष्ण प्रिय भाषणाने आणि प्रिय वस्तू देऊन यांच्या हृदयातील प्रेम वृद्धिंगत करीत यांच्या घरातून कधीही दुसरीकडे जात नाहीत. (२४-३०)

हस्तिनापुरातील स्त्रिया याप्रमाणे वार्तालाप करीत असता श्रीकृष्ण मंद हास्ययुक्त प्रेमळ दृष्टीने त्यांचे अभिनंतन करीत तेथून निघाले. स्नेहभावामुळे अजातशत्रू युधिष्ठिराने रस्त्यात शत्रूने त्यांच्यावर आक्रमण करू नये म्हणून चतुरंग सेना श्रीकृष्णांबरोबर दिली. सुदृढ प्रेमबंधनामुळे कुरुवंशी पांडव भगवंतांच्या बरोबर बर्‍याच अंतरापर्यंत आले. ते श्रीकृष्णांच्या विरहामुळे व्याकूळ झाले होते. त्यांना परत पाठवून श्रीकृष्ण, सात्यकी, उद्धव आदी मित्रांबरोबर द्वारकेकडे गेले. शौनका ! ते कुरूजाड़्गल, पांचाल, शूरसेन, यमुना तटवर्ती प्रदेश, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, मत्स्य, सारस्वत आणि मरुधन्व देह पार करून सौवीर आणि आभीर देशांच्या पश्चिमेकडील आनर्त देशात आले. त्यावेळी बरीच वाटचाल झाल्याकारणाने भगवंतांच्या रथाचे घोडे थोडेसे थकले होते. मार्गामध्ये ठिकठिकाणी लोक भेटवस्तू देऊन भगवंतांचा सन्मान करीत होते. भगवंत सायंकाळ झाली की रथातून खाली उतरत आणि जलाशयावर जाऊन संध्यावंदन करीत. (३१-३६)

अध्याय दहावा समाप्त

GO TOP