|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ९ वा
युधिष्ठिर आदींचे भीष्मांजवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणाले - अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता. नंतर सर्व धर्मांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जेथे भीष्मपितामह शरशय्येवर पडले होते, त्या कुरुक्षेत्रावर गेला. शौनकादी ऋषींनो, त्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे जुंपले होते, अशा सुवर्णजडित रथात बसून ते सर्व पांडव बंधू युधिष्ठिरामागोमाग गेले. व्यास, धौम्य आदी मुनीही त्यांच्या बरोबर होते. शौनका, भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले. तेव्हा त्या सर्व बंधूंच्यासह युधिष्ठिर, यक्षसमुदायात कुबेर शोभून दिसावा, तसा शोभून दिसत होता. आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तेथे गेल्यानंतर पांडवांना दिसले की, स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्मपितामह पृथ्वीवर पडले होते. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. शौनका, भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्मपितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी तेथे आले होते. पर्वत, नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहदश्व, भारद्वाज तसेच आपल्या शिष्यांसह परशुराम, वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, गृत्समद, असित, कक्षीवान, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्धहृदय असणारे महात्मे, तसेच शिष्यांसहित कश्यप, अंगिरापुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगणही तेथे आले. देश कालनिर्णय जाणणार्या धर्मज्ञ भीष्मपितामहांनी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांचा मनाने व दृष्टीने यथायोग्य सन्मान केला. ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते. स्वलीलेने मनुष्यरूप धारण करून तेथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान् श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली. (१-१०) पांडव मोठ्या नम्रतेने आणि प्रेमाने भीष्मपितामहांजवळ बसले. त्यांना पाहून भीष्मपितामहांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. ते त्यांना म्हणाले, हे धर्मपुत्रांनो, तुम्ही सर्वजण ब्राह्मण, धर्म आणि भगवंतांचे आश्रित असूनही तुम्हांला एवढे कष्ट झाले आणि तुमच्यावर एवढा अन्याय झाला. अरेरे ! हे तुमच्या वाट्यास यायला नको होते.अतिरथी पांडूच्या मृत्युसमयी तुम्ही सर्वजण लहान होता. त्यावेळी मुले लहान असलेल्या कुंतीराणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले. जसे ढग वार्याच्या अधीन असतात, त्याचप्रमाणे लोकपालांसहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन आहे. मला तर असे वाटते की, तुम्हां सर्वांच्या जीवनात ज्या अप्रिय घटना घडल्या, त्या सर्व त्याचीच लीला होय. जेथे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर, गदाधारी भीमसेन अस्त्रवेत्ता अर्जुन, गांडीव धनुष्य आणि स्वतः श्रीकृष्ण सन्मित्र, तिथेही विपात्ति याव्यात ना ! राजा, या कालरूप ईश्वराची इच्छा कोणीच माणूस जाणू शकत नाही. मोठमोठे ज्ञानी पुरुषसुद्धा याला जाणण्याच्या इच्छेने मोहित होतात. हे युधिष्ठिरा, म्हणून संसारातील या घटना ईश्वरेच्छेच्या अधीन आहेत. त्याला अनुसरून तुम्ही या अनाथ प्रजेचे पालन करा. कारण आता तुम्हीच त्यांचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थआहात. (११-१७) हे भगवान श्रीकृष्ण साक्षात आदिपुरुष नारायण आहेत. आपल्या मायेने लोकांना मोहित करीत यदुवंशामध्ये गुप्तरूपाने हे लीला करीत आहेत. यांचा अत्यंत गूढ प्रभाव भगवान शंकर, देवर्षी नारद आणि स्वतः भगवान कपिल हेच जाणतात. ज्याला तुम्ही आपला मामेभाऊ, प्रिय मित्र, सर्वांत श्रेष्ठ असा हितकर्ता मानता, तसेच प्रेमाने ज्याला तुझी आपला मंत्री, दूत एवढेच काय सारथी बनवितानाही संकोच केला नाही, ते श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत. हा सर्वात्मा, समदर्शी, अद्वितीय, अहंकाररहित आणि निष्पाप असून उच्च-नीच कारणांमुळे कधी कोणात भेद-भाव करीत नाही. हे युधिष्ठिरा, पहा ना ! अशाप्रकारे समदृष्टी असूनही, ते आपल्या अनन्यप्रेमी भक्तांवर किती कृपा करतात ! आणि केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणत्यागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी मला साक्षात दर्शन दिले. योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. त्यामुळे ते कामना आणि कर्म बंधनातून मुक्त होतात. प्रसन्न हास्य आणि रक्तकमलाप्रमाणे अरुण नेत्र असणारे ज्यांचे मुखकमल आहे, ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते, ते चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत येथेच राहावेत. (१८-२४) सूत म्हणाले - शरशय्येवर पडलेल्या भीष्मपितामहांचे हे बोलणे ऐकून अनेक ऋषींच्या समोरच युधिष्ठिराने त्यांना नानाप्रकारच्या धर्मांसंबंधी विचारले. तेव्हा तत्ववेत्त्या भीष्मपितामहांनी वर्ण आणि आश्रमानुसार असणारे पुरुषांचे स्वभावविहित धर्म वैराग्य व आसक्तिमुळे होणारी निवृत्ती आणि प्रवृत्तीरूप द्विविध धर्म, दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्रीधर्म आणि भगवद्धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले. शौनका ! त्याचबरोबर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ, त्यांच्या प्राप्तीची साधने, यांविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागशः वर्णन केले. अशा प्रकारे भीष्मपितामह धर्म-प्रवचन करीत होते, तशात उत्तरायण सुरू झाले. इच्छामरणी योगी पुरुष याचीच इच्छा करतात. त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदिपुरुष पीतांबरधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले. त्यांच्या शस्त्रप्रहारांच्या वेदना भगवंतांच्या दर्शनानेच तत्काळ नाहीशा झाल्या. तसेच भगवन्मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले. आता शरीरत्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली. (२५-३१) भीष्म म्हणाले - माझी अत्यंत शुद्ध आणि कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्युसमयी यदुवंशशिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टीपरंपरा चालू आहे, त्या प्रकृतीचा ते सदा-सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात. ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर, तसेच तमालवृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आहे, ज्यावर सूर्यकिरणांसमान श्रेष्ठ पीतांबर झळकत आहे, ज्यांच्या कमलमुखावर कुरळे केस भुरभुर उडत आहेत, त्या अर्जुनसखा श्रीकृष्णांवर माझे निष्काम प्रेम असो. युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहर्यावर भुरभुर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि घर्मबिंदु त्यावर शोभत होते. मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो, त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण होवो. आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडव-सेना आणि कौरव-सेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून ज्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रुपक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले, त्या पार्थसखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम निर्माण होवो. अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यांतील प्रमुख अशा आम्हांला पाहिले, तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला. त्यावेळी ज्यांनी गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला, त्या परम पुरुष श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीति जडो. ’श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यावयास लावीन’, अशी मी प्रतिज्ञा केली होती. ती सत्य आणि श्रेष्ठ ठरविण्यासाठी त्यांनी आपली शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो, त्याप्रमाणे रथाचे चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली. त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की, त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली. आततायी अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर, रक्तबंबाळ होऊ लागले होते, अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्यकडे येत होते. असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असोत. अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणार्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परम प्रीति निर्माण होवो. युद्धात मरणारे वीर याच रूपाचे दर्शन करीत राहिल्या कारणाने सारूप्य मोक्षाला प्राप्त झाले. ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा, मधुर हास्य, प्रेमपूर्ण दृष्टी यांमुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी, रासलीलेत जेव्हा ते श्रीकृष्ण अंतर्धान पावले, तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन, ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या, त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम राहो. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत, ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती, ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्यासमोर उभे आहेत. जसा एकच सूर्य, अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो, तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयांत ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते एकच आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेद-भ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे. (३२-४२) सूत म्हणाले - अशा प्रकारे भीष्मांनी आपले मन, वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतले. त्यांचे प्राण तेथेच विलीन झाले व ते शांत झाले. त्यांना अनंत ब्रह्मात लीन झाल्याचे पाहून दिवस मावळल्यावर पक्ष्यांचा कलकलाट थांबतो, त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले. त्यावेळी देवता आणि मनुष्ये नगारे वाजवू लागले. साधुस्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. हे शौनका, युधिष्ठिरांनी त्यांची अंत्यक्रिया करविली. त्यावेळी काही वेळ ते शोकमग्न झाले. त्यावेळी मुनिवर्यांनी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची रहस्यमय नावांनी स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपापल्या आश्रमात परत गेले. तत्पश्चात भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिर हस्तिनापुरात परत आले आणि तेथे त्यांनी आपले चुलते धृतराष्ट्र आणि तपस्विनी गांधारी यांचे सांत्वन केले. धृतराष्ट्राची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन समर्थ राजा युधिष्ठिराने आपल्या वंशपरंपरागत साम्राज्याचे धर्माने पालन करण्यास सुरुवात केली. (४३-४९) अध्याय नववा समाप्त |