श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ८ वा

परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणाले - यानंतर पांडव श्रीकृष्णांच्यासह स्त्रियांना पुढे करून, मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले. तेथे त्या सर्वांनी मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला. त्यानंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले. कुरुराज महाराज युधिष्ठिर, त्यांचे बंधू, धृतराष्ट, पुत्रशोकाने व्याकूळ झालेली गांधारी, कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनांच्यासाठी शोक करीत होते. भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनींसह त्यांचे सांवन करून त्यांची समजूत घातली की, संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत. मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. (१-४)

अशा प्रकारे, धूर्त बंधुंनी कपटाने हिसकावून घेतलेले राज्य, भगवान श्रीकृष्णांनी अजातशत्रू युधिष्ठिर महाराजांना त्यांचे त्यांना देऊन टाकले. तसेच द्रौपदीच्या केशसंभाराला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्ट राजांचा वध करविला. त्याप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले. याप्रमाणे शंभर यज्ञ करणार्‍या इंद्राच्या यशाप्रमाणे, युधिष्ठिराचे पवित्र यश दशदिशांत पसरविले. तदनंतर भगवान श्रीकृष्णांनी निथून जाण्याचा विचार केला. व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला. त्या सर्वांचीही भगवान श्रीकृष्णांचा मोठाच सत्कार केला. त्यानंतर श्रीकृष्ण, सात्यकी आणि उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. त्याचवेळी त्यांनी पाहिले की, भयाने विव्हळ झालेली उत्तरा समोरून पळत येत आहे. (५-८)

उत्तरा म्हणाली - देवाधिदेवा, जगदीश्वरा, आपण महान योगी आहात. आपण माझे रक्षण करा. या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय अन्य् कोणीही नाही. कारण इथे तर प्रत्येकजण दुसर्‍याच्या मृत्यूलाच कारण होत आहे. हे प्रभो, आपण सर्वशक्तिमान आहात. तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडेच येत आहे. स्वामी, हा माझे खुशाल भस्म करो, परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोहोचवू नये (९-१०)

सूत म्हणाले - तिचे करुणावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान समजून चुकले की, अश्वत्थाम्यानेच पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. हे मुनिश्रेष्ठ, जळत असलेले पाच बाण आपल्याकडेच येत असलेले पांडवांनी त्याच वेळेस पाहिले, म्हणून त्यांनीही आपापली अस्त्रे सज्ज केली. सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून, आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले. योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत. पांडवांची वंशपरंपरा चालू राहण्यासाठी, त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला. शौनका, जरी ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही, तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्यावर ते शांत झाले. हे आश्चर्य समजण्याचे काही कारण नाही. कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्यांचे निधान आहेत. ते स्वतः अजन्मा असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करतात. जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले, तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालांतून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदीसह सती कुंतीने याप्रकारे स्तुती केली (११-१७)

कुंती म्हणाली - आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहात आहात; तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिये आणि वृत्ती यांने पाहिले जाऊ शकत नाही. मी आपणांस नमस्कार करते. इंद्रियांद्वारा जे काही जाणले जाते, त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता, परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता, मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणांस कशी जाणूं शकेन ? नटाचा वेष धारण करण्यार्‍यास प्रत्यक्ष पाहूनही मंद बुद्धीचे लोक ओळखू शकत नाहीत, तसेच आपण आम्हांस ओळखू येत नाहीत. आपण शुद्ध हृद्याच्या, विवेकी, जीवोन्मुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल ? हे श्रीकृष्णा, वासुदेवा, देवकीनंदना, नंदगोपाचे लाडके बाळ, गोविंदा, आपणांस आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीतून कमल प्रगट झाले आहे, ज्यांनी सुंदर कमलांची माळ धारण केली आहे, ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत, ज्यांच्या चरणांवर कमलाचे चिन्ह आहे, अशा तुम्हांला माझा वारंवार नमस्कार असो. हे हृषीकेशा, दुष्ट कंसाने कैद केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोकग्रस्त असलेल्या देवकीचे जसे आपण रक्षण केलेत, त्याचप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्रांचेही आपणच वेळोवेळी संकटांपासून रक्षण केलेत. आपण आमचे स्वामी आहात. सर्वशक्तिमान आहात. संकटनिवारणाचे किती म्हणून प्रसंग सांगावेत ? विषप्रयोगापासून, लाक्षागृहाला लागलेल्या भयानक आगीपासून, हिडिंब इत्यादी राक्षसांच्या तावडीतून, दुष्टांच्या द्यूतसभेच्या वेळी, वनवासातील आपत्तीपासून, अनेक वेळा झालेल्या युद्धाच्या वेळी महारथांच्या अस्त्रांपासून आणि आता आता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपण आमचे रक्षण केलेत. हे जगद्‌गुरू, आमच्या जीवनात पावलापावलांगणिक आमच्यावर संकटे येत राहोत, कारण संकटांच्या वेळीच आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातूनच सुटका होते. उच्च कुळात जन्म, विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ठ झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाहीत. कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणार्‍यांनाच दर्शन देता. आपण निर्धनांचे धन आहात, मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममाण असता. आपण परम शांतस्वरूप आहात. मोक्षाचे आपणच अधिपती आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करते. (१८-२७)

मी आपल्याला अनादी, अनंत सर्वव्यापक, सर्वांचे नियंते, काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते. भेदभावामुळे, आपापसात कलह करणार्‍या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता. भगवन्‌, आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करता, तेव्हा काय करू इच्छिता, हे कोणाला समजत नाही. आपणास कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. आपल्यासंबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे. आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाही की कर्म करीत नाही. तरीसुद्धा पशु-पक्षी, मनुष्य, ऋषी, जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या त्या योनींनुसार दिव्य कर्मेसुद्धा करता. ही आपली लीलाच होय. जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागावली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली. ते पाहून आपल्या डोळ्यांत अश्रू आले. त्यामुळे गालांवरून काजल ओघळू लागले, डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिला, तेव्हाच्या आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते. भयही ज्याला भिते, त्याची काय ही अवस्था ! आपण अजन्मा असूनही जन्म घेतल्याचे कारण सांगताना काही महापुरुष असे म्हणतात की, ज्याप्रमाणे मलयपर्वताची कीर्ति पसरविण्यासाठी तेथे चंदनाची झाडे प्रगट होतात, त्याप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ति पसरविण्यासाठी आपण त्याच्या वंशामध्ये अवतार घेतला आहे. अन्य काही असेम्हणतात की, वसुदेव-देवकीने पूर्व जन्मामध्ये (सुतपा आणि पृश्नीच्या रूपाने) आपल्याकडून हाच वर मागितला होता, म्हणूनच आपण अजन्मा असूनही जगाचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात. दुसरे काही असे म्हणतात की, समुद्रात बुडणार्‍या जहाजाप्रमाणे, दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर, पीडित झाली, तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रगट झालात. काही महापुरुष असे म्हणतात की, जे लोक या संसारात अज्ञान, वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत, त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केलात. भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण, गायन, कीर्तन, आणि स्मरण करून आनंदित होतात, त्यांना आपल्या चरणकमलांचे तत्काळ दर्शन होते. त्यामुळे त्यांचा जन्म-मृत्यूचा प्रवाह कायमचा थांबतो. (२८-३६)

भक्तांच्या इच्छा पुरविणार्‍या हे प्रभो, आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोयरे असलेल्या आम्हांला सोडून जाणार काय ? राजांच्या वधाचे पाप केलेल्या आम्हांला आपल्या चरणकमलांखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही. जसे जीव नसेल तर इंद्रिये शक्तिहीन होतात, त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही, तर यदुवंशी किंवा पांडव यांच्या नावा-रूपाला काय किंमत आहे ? हे गदाधारी, आपल्या असामान्य पदचिह्नांनी युक्त अशी ही कुरुदेशाची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे, तशी आपल्या निघून जाण्याने राहणार नाही. आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धन-धान्य आणि लता-वृक्षांनी समृद्ध झाला आहे. ही वने, हे पर्वत, नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दृष्टिक्षेपानेच वृद्धिंगत होत आहेत. आपण विश्वाचे स्वामी, आत्मा आणि विश्वरूप आहात. यदुवंशी आणि पांडव यांचेविषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे. आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावेत. श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात, त्याप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैर-भैर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहो. हे श्रीकृष्णा, अर्जुनाच्या प्रिय सख्या, यदुवंशशिरोमणे, आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेषधारी दैत्यांना जाळण्यासाठीच अग्निस्वरूप आहात. आपली शक्ती अनंत आहे. हे गोविंदा, आपला हा अवतार गायी, ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे. योगेश्वरा, चराचराचे गुरु भगवंता, मी आपणांस नमस्कार करते. (३७-४३)

सूत म्हणाले - अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दांनी भगवंतांच्या अधिकाधिक लीलांचे वर्णन केले. हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने कुंतीला मोहित करीत मंद हास्य करू लागले. ते कुंतीला म्हणाले - "ठीक आहे" आणि तेथून हस्तिनापुराला परत आले. तेथे कुंती, सुभद्रा आदींचा निरोप घेऊन ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले, तेव्हा राजा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले. आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर मोठा शोकाकुल झाला होता. भगवंतांच्या लीलांचे मर्म जाणणारे व्यासांसारखे महर्षी आणि अद्‌भुत चरित्र दाखविणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजाविण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला. परंतु त्याचे समाधान झाले नाही, तो शोक करीतच राहिला. शौनकादी ऋषींनो, धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आपल्या स्वजनांच्या वधाचा विचार करकरून अविवेकयुक्त चित्तामुळे स्नेह आणि मोहवश होऊन म्हणू लागला - माझ्या दुरात्म्याच्या हृदयात दृढ झालेले अज्ञान तर पहा ! कोल्ह्या-कुत्रांचा आहार असलेल्या या शरीरासाठी अनेक अक्षौहिणी सैन्याचा नाश केला. (४४-४८)

मी बालक, ब्राह्मण, सोयरे. मित्र, काका, बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला आहे. कोट्यवधी वर्षानंतरही माझी नरकातून सुटका होणार नाही. राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धांमध्ये शत्रूंचा वध केला तर त्यास पाप लागत नाही, या शास्त्रवचनाने माझे समाधान होत नाही. स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांचा जो अपराध झाला आहे, त्याचे परिमार्जन यज्ञयागादी कर्मांनीही मी करू शकणार नाही. जसे चिखलाने गढूळ पाणी स्वच्छ करता येत नाही, मदिरेने मदिरेची अपवित्रता नाहीशी करता येत नाही, त्याप्रमाणे अनेक हिंसायुक्त यज्ञांनी एका प्राण्याच्या हत्येचेही परिमार्जन होत नाही. (४९-५२)

अध्याय आठवा समाप्त

GO TOP