|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ७ वा
अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] शौनकांनी विचारले - सूतमहोदय, नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केले ? (१) सूत म्हणाले - ब्रह्मनदी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. तेथे ऋषी नेहमी यज्ञ करतात. तेथेच व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे. त्याच्या चारी बाजूंनी बोरीच्या झाडांचे सुंदर बन आहे. त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले. त्यांनी भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले आणि आदिपुरुष परमात्मा व त्याच्या आश्रयाने राहणार्या मायेला पाहिले. याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलतः तिन्ही गुणांच्या पलीकडील असूनही आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणार्या अनर्थांना भोगतो. भगवंताची भक्ती ही एकच या अनर्थांच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे. परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत. हे लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमद्भागवताची रचना केली. याच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परमप्रेममय भक्ती निर्माण होते. त्यामुळे जीवाचा शोक, मोह आणि भय नष्ट होते. त्यांनी या भागवतसंहितेची निर्मिती करून नंतर ती आपला वैराग्यशील पुत्र शुक याला शिकविली. (२-८) शौनकांनी विचारले - श्रीशुकदेव तर अत्यंत निवृत्त आहेत. त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही. ते नेहमी आत्मचिंतनात रममाण असतात. असे असता त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन कशासाठी केले ? (९) सूत म्हणाले, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममाण झालेले असतात, असे लोकही भगवंतांची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंतांचे गुण इतके मधूर आहेत की, ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. भगवान शुकदेव तर भगवद्भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत. त्यांच्या हृदयाला भगवंतांच्या गुणांनी आकर्षून घेतले आहे आणि त्याचमुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले. (१०-११) आता मी राजर्षी परीक्षिताचा जन्म, कर्म आणि मोक्ष, तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो. कारण त्यातूनच भगवान श्रीकृष्णांच्या अनेक कथांचा उगम होतो. ज्यावेळी कौरवपांडवांच्या युद्धात दोन्ही पक्षांतील पुष्कळसे वीर मारले गेले आणी भीमाच्या गदाप्रहाराने आपला राजा दुर्योधनाची मांडी भंगली, तेव्हा अश्वत्थाम्याने आपला राजा दुर्योधन याचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली. हे दुर्योधनाला आवडले नाही. कारण अशा नीच कर्माची सर्वचजण निंदा करतात. त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्रांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली. तिच्या नेत्रांतून आसवे वाहू लागली. ती रडू लागली. अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला. हे कल्याणी, जेव्हा मी त्या आततायी अधम ब्राह्मणाचे मस्तक माझ्या गांडीव धनुष्याच्या बाणांनी छाटूनतुला ते भेट म्हणून आणून देईन, आणि जळलेल्या आपल्या मुलांचा अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील, त्याचवेळी मी तुझे अश्रू पुसले असे होईल. अर्जुनाने अशा मधुर पण विलक्षण शब्दांनी द्रौपदीचे सांत्वन केले आणि आपले सुहृद भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवून अंगावर कवच धारण करून, आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र अश्वत्थाम्याचा त्याने पाठलाग सुरू केला. मुलांची हत्या केल्याने घाबरलेला अश्वत्थामा अर्जुन आपल्यावरच चालून येत असल्याचे पाहून आपले प्राण रक्षण करण्यासाठी जेथपर्यंत पळून जाता येईल तेथेपर्यंत पळत सुटला, जसा रुद्राला भिऊन सूर्य पळाला होता त्याप्रमाणे. जेव्हा ब्राह्मणपुत्राने पाहिले की, आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आणि आपण असहाय आहोत, तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन केवळ ब्रह्मास्त्रच आहे, हे त्याने ओळखले. जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती, तरी प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले, ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले. त्या अस्त्राचे सर्व दिशांना एक प्रचंड तेज पसरले. अर्जुनाने जाणले की, आता आपल्या प्राणावरच बेतले आहे. तेव्हा त्याने श्रीकृष्णांना प्रार्थना केली. (१२-२१) अर्जुन म्हणाला - हे श्रीकृष्णा, महाबाहो, आपण भक्तांना अभय देणारे आहात. संसाराच्या धगधगत्या आगीत होरपळून निघणार्या जीवांना त्यापासून मुक्ति देणारे आपणच आहात. आपण आदिपुरुष, प्रकृतीपलीकडील, साक्षात् परमेश्वर आहात. मायेला आपल्या चित्शक्तीने निरस्त करून आपण आपल्या अद्वितीय स्वरूपात स्थित असता. मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादिस्वरूप कल्याणाचा मार्ग दाखविता. पृथ्वीवरील दैत्यांचा भार नाहीसा करण्यासाठी आणि तुमच्या अनन्यप्रेमी भक्तांनी तुमचे निरंतर स्मरण, ध्यान करावे, यासाठीच तुमचा हा अवतार आहे. स्वयंप्रकाश श्रीकृष्णा, हे भयंकर तेज सर्व दिशांनी माझ्याकडे येत आहे. हे काय आहे आणि ते कोठून येत आहे, याचे मला ज्ञान नाही. (२२-२६) भगवान म्हणाले - अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्रह्मास्त्र सोडले आहे, असे समज. परंतु हे पुन्हा मागे कसे घ्यावे, याचे त्याला ज्ञान नाही. या अस्त्राचा पाडाव करण्याची अन्य कोणत्याही अस्त्रात शक्ती नाही. तू शस्त्रास्त्रविद्या चांगली जाणतोस. तुम्ह्या ब्रह्मास्त्राच्या तेजानेच या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज शमव. (२७-२८) सूत म्हणाले - शत्रुपक्षातील वीरांना मारण्यात अर्जुन निपुण होता. भगवम्तांचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले, भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसर्या ब्रह्मास्त्राची योजना केली. (२९) बाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांचे तेज सूर्य आणि अग्नीप्रमाणे, एकमेकांना टक्कर दिल्याने, आकाश आणि सर्व दिशांना व्यापून टाकत वाढू लागले. तिन्ही लोकांना जाळणार्या, वाढत जाणार्या, त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांच्या ज्वाळांनी पोळणार्या प्रजेला प्रलयकाळ ओढवला असे वाटले. त्या आगीने तिन्ही लोक आणि प्रजेचा नाश होत असलेला पाहून, भगवंतांची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली. अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. झडप घालून त्याने क्रूर अश्वत्थाम्याला पकडून एखादा पशू दोरखंडाने बांधावा, तसे त्याला बांधले. अर्जुन मोठ्या ताकदीने अश्वत्थाम्याला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता, तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्ण कोपाविष्ट होऊन त्याला म्हणाले, "पार्था, या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही. त्याचा वध कर. रात्री झोपलेल्या निरपराध मुलांची याने हत्या केली आहे. धर्माचरण करणारा पुरुष मद्याने धुंद, बेसावध, वेडसर, झोपलेला, बालक, स्त्री, अविवेकी, शरणागत, रथहीन आणि भयभीत, अशा शत्रूला कदापिही मारीत नाही. जे दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसर्यांना मारून आपल्या प्राणांचे पोषण करतो, त्याचा वध करणेच श्रेयस्कर आहे. कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला, तर् तो आणखी पाप करील आणि नरकात जाईल. शिवाय माझ्यादेखत तू द्रौपदीपुढे प्रतिज्ञा केली होतीस की, ’हे मानिनी, ज्याने तुझ्या पुत्रांचा वध केला, त्याचे मी मस्तक तोडून आणीन.’ या पापी, कुळाला कलंक असलेल्या आततायीने तुझ्या पुत्रांचा वध केला, एवढेच नव्हे तर आपला स्वामी दुर्योधन यालाही दुःखित केले आहे. म्हणून हे वीर अर्जुना, तू याचा वध कर." भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या धर्माचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी; परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते. जरी अश्वत्थाम्याने त्याच्या पुत्रांची हत्या केली होती, तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती. (३०-४०) यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णांबरोबर तो युद्धाच्या छावणीत परतला आणि त्याने आपल्या मृत पुत्रांचा शोक करीत असलेल्या द्रौपदीकडे अश्वत्थाम्याला सोपविले. द्रौपदीला दिसले की, अश्वत्थाम्याला पशूसारखे बांधून आणले आहे. निंद्य कर्म केल्याने तो खाली पाहात होता. आपले अनिष्ट केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयात करुणा उत्पन्न झाली आणि तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केला. पुरुपुत्राला अशा प्रकारे बांधून आणल्याचे सती द्रौपदीला सहन झाले नाही. ती म्हणाली - "सोडा, सोडा याला. हा ब्राह्मण आहे, म्हणून आपल्याला पूज्य आहे. ज्यांच्या कृपेने संपूर्ण रहस्यासह धनुर्वेद, त्याचे प्रयोग आणि उपसंहारासह सर्व शस्त्रास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले, ते आपले आचार्य द्रोण, पुत्राच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत. त्यांची अर्धांगिनी वीरमाता कृपी सती गेली नाही. ती अद्याप जिवंत आहे. हे धर्मज्ञा, ज्या गुरुवंशाची नित्य पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे, त्याला व्यथित करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे आणि सारखी अश्रू ढाळीत आहे, तसे याच्या पतिव्रता माता गौतमीने रडू नये. ज्या उच्छृंखल राजांनी आपल्या दुष्कृत्याने ज्या ब्राह्मणकुळाला राग आणला असेल, ते कोपिष्ट ब्राह्मणकुळ त्या राजांना त्यांच्या परिवारासह शोकाग्नीमध्ये ढकलून लगेच त्या कुळाचे भस्म करते." (४१-४८) ब्राह्मण हो ! द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते. त्यामध्ये कपट नव्हते, तर करुणा आणि समदृष्टी होती. म्हणून राजा युधिष्ठिराने राणीच्या या हितकारक श्रेष्ठ वचनांचे कौतुक केले. त्याचबरोबर नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन, स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री-पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली. त्यावेळी भीम क्रुद्ध होऊन म्हणाला, "ज्याने झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी किंवा आपल्या स्वामीसाठी नव्हे, तर निष्कारण मारले आहे, त्याचा वध करणेच उत्तम होय." द्रौपदी आणि भीमाचे म्हणणे ऐकून, अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले. (४९-५२) श्रीकृष्ण म्हणाले - "पापकृत्य केलेल्याही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आततायीला तर मारले पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितल्या आहेत. म्हणून माझ्या दोन्ही आज्ञांचे पालन कर. द्रौपदीचे सांत्वन करताना तू जी प्रतिज्ञा केली होतीस, तिचे पालन कर. त्याचबरोबर भीम, द्रौपदी आणि मला जे प्रिय असेल, तेसुद्धा कर." (५३-५४) सूत म्हणाले - अर्जुनाने भगवंतांच्या म्हणण्याचा मथितार्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी केसांसह उपटून काढला. मुलांची हत्या केल्यामुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्त्वहीन झाला होता, त्यात त्याचा मणी आणि ब्रह्मतेजही नाहीसे झाले. अशा त्याचे दोरखंडाचे बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालवले. मुंडन करणे, धन काढून घेणे आणि निर्वासित करणे, हाच अधम ब्राह्मणांचा वधहोय. याखेरीज त्यांच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही. पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले होते. नंतर त्यांनी आपल्या मृत बांधवांचे अंत्यविधी पार पडले. (५५-५८) अध्याय सातवा समाप्त |