|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ६ वा
नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणाले - देवर्षी नारदांची जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवतीपुत्र भगवान श्रीव्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला. (१) व्यास म्हणाले - आपल्याला ज्ञानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले, तेव्हा आपण काय केले ? आपण तर त्यावेळी वयाने अगदी लहान होता. हे ब्रह्मपुत्रा, त्यानंतर आपले उर्वरीत आयुष्य कसे व्यतीत झाले आणि मृत्युसमयी आपण कोणत्या रीतीने आपल्या शरीराचा त्याग केला ? देवर्षी, काळ तर सर्व वस्तूंना नष्ट करतो. असे असता काळाने आपली पूर्वकाल्पातील स्मृती कशी नाहीशी केली नाही ? (२-४) नारद म्हणाले - मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळी मी लहान होतो तरी मी माझे जीवन असे व्यतीत केले. मी आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई एक तर स्त्री, त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती. मलासुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते. माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करीत असे; परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करून शकत नव्हती. ज्याप्रमाणे कठपुतळी सूत्रधार नाचवील तशी नाचते, त्याप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे. (५-७) आईच्या स्नेहबांधनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो. मी फक्त पाच वर्षांचा असल्याने मला दिशा, देश, काळ यांविषयीचे काहीही ज्ञान नव्हते. एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गाईची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळप्रेरित साप तिला चावला. भक्तांचे कल्याण इच्छिणार्या भगवंतांचीच ही कृपा आहे, असे समजून मी उत्तर दिशेला निघालो. (८-१०) त्या मार्गात मला धन-धान्य संपन्न असे अनेक देश, नगरे, गावे, भटक्या जमातींच्या फिरत्या वस्त्या, खेडी नद्या, पर्वताच्या रांगा, बागा उपवने आणि रंगीबेरंगी धातूंनी युक्त असे विचित्र पर्वत लागले. काही ठिकाणी वृक्ष होते. त्यांच्या मोठमोठ्या फांद्या हत्तींनी मोडून टाकल्या होत्या. मध्ये मध्ये पवित्र जलाने भरलेले जलाशय होते. तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवरे होती. त्यांवर पक्षी मनमोहक किलबिलाट करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. हे पहात पहात मी पुढे गेलो. मी एकटाच होतो. पुष्कळसे अंतर चालून गेल्यानंतर मला एक घनदाट जगंल लागले. तिथे वेत, बांबू, गवत, दर्भ, वेळू आणि गुहा होत्या. त्या जंगलात साप अस्वले, कोल्हे असे भयानक प्राणी रहात होते. ते पाहूनच भिती वाटत होती. चालून चालून माझे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले. मला खूप तहान लागली. भूक तर लागली होतीच. तेथे एक नदी होती. त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले. आचमन करून पाणी प्यालो. त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला. त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांच्याकडून मी जसे ऐकले होते, त्याप्रमाणे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे मी मनोमन ध्यान करू लागलो. भक्तिभावपूर्वक भगवंतांच्या चरण-कमलांचे ध्यान करू लागताच भगवत्प्राप्तीच्या उत्कट इच्छेने माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळू हळू भगवंत प्रगट झाले. व्यासमुनी ! प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले. हृदय अत्यंत शांत झाले. त्या आनंदाच्या पुरात मी असा बुडून गेलो की, मला माझे आणि ध्येयवस्तूचेही भान राहिले नाही. भगवंतांचे ते अनिर्वचनीय रूप सर्व प्रकारच्या शोकांचे नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते. ते एकाएकी दिसेनासे झाल्याने मी दुःखी झालो. आणि निराश होऊन आसनावरून उठून उभा राहिलो. (११-१९) मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती; परंतु मन हृदयात स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मी ते स्वरूप पाहू शकलो नाही. मी अतृप्त असल्याने व्याकूळ झाल्यासारखा झालो होतो. अशा प्रकारे निर्जन वनात मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीरगंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करीत मला म्हणाले. खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस. ज्यांच्या वासना पूर्णतया नाहीशा झाल्या नाहीत, त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणून मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखविली. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळे तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. तू आता या मलीन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आकाशासारखा अव्यक्त असणारा, सर्व शक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला. त्याच्या त्या कृपेची अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लववून नमस्कार केला. त्या वेळेपासून मी लज्जा, संकोच सोडून भगवंतांच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगल नामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागलो. उच्छा आकांक्षा आणि मद मत्सर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते. आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. (२०-२७) अशाप्रकारे भगवंतांच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीशी झाली आणि मी श्रीकृष्णपरायण झालो. आकाशात एकाएकी वीज चमकावी, त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला. माझी प्रारब्धकर्मे संपल्यानंतर मला शुद्ध भगवत्-पार्षद-शरीर प्राप्त होण्याची वेळ आली, तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले. कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरविले, त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतः मध्ये विलीन करून प्रवेश करू लागले, तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला. एक हाजार चतुर्युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियांतून मरीची आदी ऋषींसह मीही प्रगट झालो. तेव्हापासून भगवंतांच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो. भगवद्भजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते. भगवंतांनी या स्वरब्रह्मविभूषित [सारेगमपधनी या सात स्वरांना ब्रह्मरूप मानले जाते.] वीणेवर तान छेडीत मी त्यांच्या लीलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो. ज्यांच्या चरणकमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो, आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे, ते भगवंत, मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो, तेव्हा बोलाविल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. ज्यांचे चित्त नेहमी विषय-भोगाच्या कामनेने आतुर झालेले असते, त्यांच्यासाठी, भगवंतांच्या लीलांचे कीर्तन, संसारसागरातून पार होण्याचे जहाज आहे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्णसेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते, तशी यम-नियम आदी योगमार्गांनी शांती प्राप्त होत नाही. हे व्यासमुनी, आपण निष्पाप आहात. आपण मला जे विचारले होते, ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोषप्राप्तीचा उपाय मी सांगितला. (२८-३७) सूत म्हणाले - देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन, वीणा वाजवीत, स्वच्छंदाने विचरण करण्यासाठी ते निघून गेले. अहो, हे देवर्षी नारद धन्य आहेत. कारण शारङ्पाणी भगवंतांची कीर्ति आपल्या वीणेवर गाऊन ते स्वतः आनंदमग्न तर होतातच; पण त्याचबरोबर त्रितापांनी पोळलेल्या या जगालाही आनंदित करतात. (३८-३८) अध्याय सहावा समाप्त |