|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ५ वा
भगवंतांच्या यश-कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणाले - त्यानंतर आरामात बसलेल्या, हातात वीणा घेतलेल्या, परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले. (१) नारदांनी विचारले - हे व्यासमहर्षे, आपले शरीर मन दोन्हीही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहेत ना ? आपली मनीषा निश्चितच पूर्ण झाली असेल, कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे, ती अत्यंत अद्भूत आहे. ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे. सनातन ब्रह्मव्रताचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेही आहे. असे असतानाही हे प्रभो, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करीत आहात ? (२-४) व्यास म्हणाले - आपण माझ्याबद्दल म्हणालात, ते सर्व खरे आहे. असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही, याचे कारण समजत नाही. आपले ज्ञान अगाध आहे. आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारीत आहे. आपण सर्व गुप्त रहस्ये जाणता. कारण आपण त्या पुराणपुरुषाची उपासना केली आहे की, जो प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हींचा स्वामी आहे, स्वतः निःसंग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने, गुणांच्या द्वारे, या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत राहतो. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकांत भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्य अंतःकरणाचे साक्षी आहात. मी नियमपालनांच्या द्वारा परब्रह्म आणि शब्दब्रह्म या दोन्हींचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असताही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. (५-७) श्रीनारद म्हणाले - आपण बहुधा भगवंतांच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही. मला असे वाटते की, ज्यामुळे भगवम्त संतुष्ट होत नाहीत, असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषार्थांचे जसे निरूपण केले आहे, तसे भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे निरूपण केले नाही. ज्या रसभावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगताला पवित्र करणार्या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन केले नाही, तर अशी वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात, तशी अपवित्र मानली जाते. मानससरोवरात रममाण होणारे भगवत्चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. याउलट, जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे, परंतु जिचा प्रत्येक श्लोक भगवंतांच्या सुयशसूचक नामांनी भरलेला आहे, तीच वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करतात. मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान, भगवद्भक्तिविरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी, अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते, ते काम्य कर्म (साधन) आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहेतुकदेखील कर्म तरी कसे बरे शोभेल ? व्यासमहर्षे, आपली दृष्टी अचूक असून कीर्ति पवित्र आहे. आपण सत्यवती आणि दृढव्रती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी, अचिंत्यशक्ती भगवंतांच्या लीलांचे स्मरण करा. जो मनुष्य भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त दुसरी काही सांगण्याची इच्छा करतो, तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नाम-रूपांच्या फेर्यात सापडतो. जसे झंझावाताने डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते, त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कोठेच स्थिर होत नाही. संसारी लोक स्वभावतःच विषयांत गुंतलेले आहेत. धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम कर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे, हे सर्व उलटेच झाले. कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणार्यांचे म्हणणे ऐकत नाहीत. भगवंतांचे गुण अनंत आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंतांच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळित झाले आहेत, त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवच्चरणांची सेवा करतो, परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन-पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का ? परंतु दुसरा कोणी भगवंतांचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो, त्याला कोणता बरे लाभ होतो ? अशाच वस्तूच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व उच्च-नीच योनीत केलेल्या कर्मांचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अचिंत्यगति काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषयसुख सर्वांना स्वभावतःच प्राप्त होते. हे मुने, जो भगवान श्रीकृष्णांचा चरणसेवक आहे, तो भगवद्भजन न करणार्या पण धर्म-कर्म करणार्या मनुष्याप्रमाणे, दैववशात काही पापकर्म झाले तरी जन्म-मृत्यूच्या फेर्यात अडकत नाही. तो सेवक भगवच्चरणाच्या आलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही, कारण त्याला भगवद्रसाची गोडी लागलेली असते. ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो, ते भगवम्तच या विश्वाच्या रूपाने आहेत. ही गोष्ठ आपण जाणत आहातच, तरीसुद्धा मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे. आपली दृष्टी अचूक आहे. आपण हे समजून घ्या की, आपण पुरुषोत्तम भगवंतांचे कलावतार आहात. आपण अजन्मा असूनही जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे. म्हणून आपणच विशेष करून भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. विद्वानांचे म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप, वेदाध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की, पुण्यकीर्ति श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे. (९-२२) हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसम्पन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करीत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. मी जरी लहान होतो, तरीपण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे, इंद्रिये माझ्या अधीन होती. खेळण्याबागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन-पूजन करीत असत, त्यात मला गोडी वाटू लागली. त्या सत्संगात लीलागानपरायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रियकीर्ति भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले. (२३-२६) हे महामुनि, जसजशी मला भगवंतांच्या विषयी ओढ वाटू लागली, तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिरबुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारणरूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्मास्वरूप आत्म्यामध्ये, "ही माया आहे," अशी कल्पना करू लागलो. अशा प्रकारे वर्षा आणि शरद या दोन ऋतुकालांत ते महात्मे दिवसातून तिन्ही वेळी श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता, ते ज्ञान, त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन, तेथून जातेवेळी मला दिले. त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो. जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते. (२७-३१) हे ब्रह्मन्, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्मे समर्पित करणे, हेच संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे, हे मी आपणास सांगितले. प्राण्यांना ज्या पदार्थाच्या सेवनामुळे एखादा रोग होतो, त्याच पदार्थाची चिकीत्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार नाही काय ? याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्म-मृत्यूरूप संसारचक्रात अडकवितात, तरीसुद्धा जर ती कर्मे भगवंतांना समर्पण केली, तर त्याचे कर्मपणच (कर्मबंधन) नष्ट होते. या लोकी जे शास्त्रविहित कर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केले जाते, त्यापासूनच पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. त्या भगवत्प्रीत्यर्थ केल्या जाणार्या कर्ममार्गावर, भगवंतांच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंतांचे गुण व नामांचे कीर्तन करीत त्यांचे स्मरण करतात. प्रभो ! भगवान श्रीवासुदेवांना माझा नमस्कार असो. आम्ही आपले ध्यान करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण यांनाही नमस्कार असो. या प्रकारे जो पुरुष भगवंतांच्या मूर्तींच्या नामद्वारा, मंत्राखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या, मंत्रमूर्ती भगवान यज्ञपुरुषाचे पूजन करतो, त्याचेच ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे. (३२-३८) ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंतांच्या आज्ञेचे याप्रकारे पालन केले, तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञान, ऐश्वर्य आणि आपली भक्ती प्रदान केली. आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंतांच्या कीर्तीचे वर्णन करा. त्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. जे लोक संसारदुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत, त्यांच्या दुःखाची निवृत्तीही यामुळे होऊ शकते. दुसरा कोणताही उपाय नाही. अध्याय पाचवा समाप्त |