श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ४ था

महर्षी व्यासांचा असंतोष -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले - त्या दीर्घकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनींमध्ये ऋग्वेदी, विद्या-वयोवृद्ध कुलपती शौनकांनी याप्रमाणे सांगणार्‍या सूतांची प्रशंसा केली आणि म्हटले. (१)

शौनक म्हणाले - वक्त्यांत श्रेष्ठ असणारे सूत महोदय ! जी कथा भगवान श्रीशुकांनी सांगितली, ती भगवंतांची पुण्यमय कथा आपण आम्हांला सांगावी. (२)

ही कथा कोणत्या युगात, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या हेतूने झाली होती ? मुनिवर व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली ? त्यांचे पुत्र शुकदेव महान योगी, समदृष्टी असलेले, आपपरभावरहित, संसारनिद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात. त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने ते वेड्यासारखे भासतात. संन्यास घेण्यासाठी वनात जाणार्‍या पुत्राच्या पाठोपाठ जेव्हा व्यासमुनी जाऊ लागले, त्यावेळी सरोवरात स्नान करणार्‍या तरुण स्त्रियांनी नग्नावस्थेतील शुकांना पाहून आपण वस्त्र धारण केले नाही. परंतु वस्त्रे नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने वस्त्रे धारण केली. हे आश्चर्य पाहून व्यासांनी कारण विचारल्यावर त्या स्त्रिया म्हणाला की, "आपल्या दृष्टीत जो स्त्री-पुरुष भेद आहे, तो आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीत नाही." कुरुजांगल देशातील हस्तिनापुरास जाऊन ते शुकदेव वेडसर, मुके आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरत असतील. गावातील लोकांनी त्यांना कसे ओळखले ? शुकमुनींचा आणि पांडवपुत्र राजर्षि परीक्षिताचा संवाद कसा झाला, ज्यामध्ये ही भागवतसंहिता सांगितली गेली. गृहस्थांच्या घरांना तीर्थक्षेत्राचे माहात्म्य प्रदान करण्यासाठी महामुनी श्रीशुकदेव, त्यांच्या घरी फक्त गायीची धार काढण्याइतकाच वेळ थांबतात. सूतमहोदय, आम्ही असे ऐकले आहे की, अभिमन्युपुत्र परीक्षित भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते. अत्यंत आश्चर्यकारक अशा त्यांच्या जन्म आणि कर्मांचे वर्णन आम्हांला सांगावे. ते परीक्षित पांडववंशाचा गौरव वाढविणारे सम्राट होते. त्यांनी साम्राज्यलक्ष्मीचा त्याग करून, गंगातटावर बसून आमरण उपोषणाचे व्रत का बरे घेतले ? त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळसे धन त्यांना अर्पण करून त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत. ते मोठे वीर होते. त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राज्याचा आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा का बरे केली ? ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे, ते तर जगताचे परम कल्याण, लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठीच आपले जीवन वेचतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. त्यांचे शरीर तर परहितासाठी होते. असे असता त्याचा त्यांनी विरक्त होऊन त्याग का बरे केला ? वेदवाणीखेरीज अन्य सर्व शास्त्रांत आपण पारंगत आहात, असे मला वाटते. म्हणून यावेळी आम्ही आपणास जे विचारले, ते सर्व आम्हांला सांगा. (३-१३)

सूत म्हणाले - चार युगांपैकी तिसरे द्वापर सुरू होते, तेव्हा महर्षी पाराशरांपासून वसु-कन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंतांचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला. एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून ते एकांतात पवित्र स्थानावर बसले होते. महर्षी व्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत होते. त्यांची दृष्टी अचूक होती. त्यांनी असे पाहिले की, न समजणार्‍या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंच्या शक्तीही क्षीण होत जातात. समाज श्रद्धाहीन आणि शक्तिरहित होतो. त्यांची बुद्धी कर्तव्यांचा योग्य निर्णय करून शकत नाही आणि दिवसेंदिवस आयुष्यही कमी होऊ लागले आहे. लोकांचे हे दुर्भाग्य पाहून श्रीव्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने, सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे हित कसे होईल यावर विचार केला. त्यांनी विचार केला की, अग्निष्टोमादी वेदोक्त कर्मांनी लोकांचे हृदय शुद्ध होते. त्या दृष्टीने यज्ञांचा विस्तार केला. व्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार प्रकारे वेदांचे पृथक्करण केले. इतिहास आणि पुराणांना पाचवा वेद म्हटले जाते. त्यांपैकी ऋग्वेदाचे पैल, सामवेद गायक विद्वान जैमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैशंपायन झाले. इतिहास आणि पुराणांचे अध्ययन माझे वडील रोमहर्षण यांनी केले. या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले. याप्रमाणे शिष्य, प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य यांच्याद्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. स्मरणशक्ती कमी असणार्‍या लोकांनाही वेद शिकता यावेत, म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभाग केले. (१४-२४)

स्त्री, शूद्र आणि संस्कारशून्य द्विज असे तिघेही वेदश्रवणाचे अधिकारी नाहीत. ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील. त्यांचेही कल्याण व्हावे, या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत या इतिहासग्रंथाची रचना केली. ऋषी हो ! जरी व्यासांनी याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासाठीच आपली संपूर्ण शक्ती खर्च केली, तरे जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही, तेव्हा खिन्न मनाने धर्मवेत्ते व्यासमुनी मनोमन विचार करीत म्हणाले. मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यवादी व्रतांचे पालन करीत वेद, गुरुजन आणि अग्नी यांची सेवा केली आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी वेदांचाही अर्थ उघड करून सांगितला. त्यामुळे स्त्री, शूद्र इत्यादी आपापल्या धर्म-कर्मांचे ज्ञान प्राप्त करू शकतील. जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणार्‍यांत श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झाला नाही, असे मला वाटते. किंवा मी भगवंतांची प्राप्ती करून देणार्‍या धर्मांचे बहुधा अजून निरूपण केले नाही. कारण तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहेत. श्रीकृष्ण-द्वैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते, त्याचवेळी देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांना आल्याचे पाहून व्यासमुनी लगेच उठून उभे राहिले, आणि देवांनीही पूजिलेल्या देवर्षी नारदांचे त्यांनी विधिपूर्वक पूजन केले. (२५-३३)

अध्याय चौथा समाप्त

GO TOP