श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ३ रा

भगवंतांच्या अवतारांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणतात - सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी महत्तत्त्व आदींपासून दहा इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले. पाण्यात पहुडून योगनिद्रा घेत असताना त्यांच्या नाभिसरोवरातून प्रगट झालेल्या कमळापासून भगवंताम्च्या त्या विराट रूपाच्या अंग-प्रत्यंगांतच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे. ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध असे सत्त्वमय श्रेष्ठ रूप आहे. योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचे दर्शन करतात. भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय, जांघा, हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे. त्यालाच हजारो डोकी, कान, डोळे नाके, तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादि अलंकारांनी शोभून दिसते. भगवंतांचे हे पुरुषरूप ज्याला नारायण म्हणतात, अनेक अवतारांचे उगमस्थान आहे. यातूनच सर्व अवतार प्रगट होतात. या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशु-पक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. (१-५)

त्याच प्रभूनी पहिल्या कौमार-सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले. समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतांनीच दुसर्‍यावेळी या सृष्टीच्या कल्याणकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरूप धारण केले. ऋषिसर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सात्वत-तंत्राचा (नारद-पंचरात्राचा) उपदेश केला. या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते, याचे वर्णन आहे. धर्मपत्‍नी मूर्तीपासून त्यांनी नर-नारायणाच्या रूपाने चौथा अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली. पाचव्या अवतारात हे सिद्धांचे स्वामी ’कपिल’ रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्त्वनिर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. अनसूयेने वर मागितल्यावरून सहाव्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले. या अवतारात त्यांनी अलर्क, प्रह्लाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. सातव्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकूतिनामक पत्‍नीपासून यज्ञरूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वायंभुव मन्वंतराचे संरक्षण केले. भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्‍नी मेरुदेवीपासून आठवा अवतार धारण केला. या रूपाने, सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा पर्महंस मार्ग दाखविला. हे ऋषींनो ! ऋषींनी प्रार्थना केल्यावरून नवव्या वेळी ते पृथू (राजा) च्या रूपाने अवतीर्ण झाले. या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या. त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला. चक्षुष मन्वंताराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते, तेव्हा त्यांनी मत्स्यरूपाने दहावा अवतार घेतला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसवून वैवस्वत मनूचे रक्षण केले. देवता आणि दैत्य समुद्र-मंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतांनी कासवरूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला. धन्वंतरीच्या रूपात बारावा अवतार धारण करून, अमृत घेऊन समुद्रातून ते प्रगट झाले आणि तेरावा अवतार मोहिनीरूपाने धारण करून, दैत्यांना मोहित करून, देवांना अमृत पाजले. चौदाव्या अवतारात त्यांनी नरसिंह-रूप धारण केले आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकशिपूची छाती आपल्या नखांनी अशी फाडली, जसा, चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो. पंधराव्या वेळी वामनरूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले. त्रैलोक्य मिळविण्यासाठी केवळ तीन पावले ठेवण्याइतकी जमीन मागितली. सोळाव्या परशुराम अवतारात राजेलोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. यानंतर सतराव्या अवतारात पराश ऋषींपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवम्त अवतीर्ण झाले. लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा (विभाग) तयार केल्या. देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतु-बंधन, रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या. एकोणिसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावांनी प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला. यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणार्‍या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगधदेशात (बिहार) जनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल. यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजेलोक लुटारूसारखे बनतील, तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्किरूपाने अवतार घेतील. (वरील बावीस अवतारांखेरीज हंस आणि हयग्रीव हे दोन अवतार धरून चोवीस अवतार होतात.) (६-२५)

हे ऋषींनो ! एखाद्या न आटणार्‍या सरोवरातून जसे असंख्यछोटे छोटे प्रवाह निघतात, त्याचप्रमाणे सत्त्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात. ऋषी, मनू, देव, प्रजापती, मनुपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहेत, ते सर्व भगवंतांचेच अंश आहेत. हे सर्व भगवंतांचे अंशावतार किंवा कलावतार आहेत. परंतु श्रीकृष्ण स्वतः ’भगवंत’ आहेत. जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचारांनी व्याकूळ होते, तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवम्त प्रजेचे रक्षण करतात. भगवंतांच्या दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातःकाळी भक्तीने पठन करतो, तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो. (२६-२९)

निराकार चिन्मय भगवंताम्चे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे, ते त्यांच्याच मायेच्या महत्तत्त्वादी गुणांनी भगवंतावर कल्पिले आहे. जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धूळीचा वायूवर आरोप करतो, त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो. या स्थूलरूपाच्या पलीकडे भगवंतांचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे, ज्याला स्थूलासारखा आकार नाही, जे पाहता किंवा ऐकता येत नाही, तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे. यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो. अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो, त्याचवेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. तत्त्वज्ञानी लोक हे जाणतात की, ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते, त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो. वास्तविक ज्यांना जन्म-कर्म नाही, त्या हृदयेश्वर भगवंतांच्या मायाश्रित जन्म-कर्मांचे तत्त्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात. कारण भगवंतांचे जन्म-कर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे. (३०-३५)

भगवंतांची लीला निश्चित कार्य करणारी आहे. ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात, परंतु त्यात आसक्त होत नाहीत. प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिये आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात. परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यांपासून अलिप्त राहतात. ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही, त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेदवाणीद्वारा भगवंतांनी प्रगट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धी जीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत. चक्रपाणी भगवंतांची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत, ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत. जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरणकमलांच्या सुगंधाचे सेवन करतो, तोच त्यांचे स्वरूप किंवा लीलांच्या रहस्यांना जाणू शकतो. हे ऋषींनो ! आपण मोठे भाग्यशाली आहात. कारण सर्वांचे स्वामी असणार्‍या भगवान श्रीकृष्णांविषयी आत्मभाव ठेवून त्यांचेवर अनन्य प्रेम करीत आहात. त्यामुळे या जन्म-मरण रूप संसारात परत यावे लागत नाही. (३६-३९)

भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य, भगवच्चरित्राने परिपूर्ण, असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे. त्यांनी हे प्रशंसनीय, कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणासाठी आपल्या आत्मज्ञानशिरोमणी पुत्राला सांगितले. यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केले आहे. शुकदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकविले. त्यावेळी परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगातटाकी बसला होता. भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म, ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला गेले, तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले, त्यांच्यासाठी हा पुराणऋपी सूर्य उगवला. हे ऋषींने ! जेव्हा महातेजस्वी श्रीशुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते, तेव्हा मी तेथे बसलो होतो. तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले. माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले, त्यानुसार मी आपणांस सांगेल (४०-४५)

अध्याय तिसरा समाप्त

GO TOP