|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय २ रा
भगवत्कथा आणि भगवद्भक्तीचे माहात्म्य - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीव्यास म्हणतात - शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली. (१) कोणतेही लौकिक - वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास विरहाने व्याकूळ होऊन पुत्रा, पुत्रा, म्हणून हाका मारून लागले. तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ’ओ’ देऊ लागले. अशा सर्व चराचराच्या हृदयांत विराजमान झालेल्या श्रीशुकमुनींना मी नमस्कार करतो. अत्यंत प्रभावी, सर्व वेदांचे सार असलेले, संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणार्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे, अद्वितीय रहस्यमय श्रीमद्भागवत पुराण, संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले, त्या मुनींचे गुरू असण्यार्या व्यासपुत्र श्रीशुकाचार्यांना मी शरण जातो. पुरुष श्रेष्ठ नर-नारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्रीव्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद्भागवताचे पठण करावे. (२-४) ऋषिवर्य हो ! संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे. कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे. त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी, निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते, तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो. धर्माचे योग्य तर्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्यांच्या हृदयांत भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल, तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होत. धर्माचे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही. धन धर्मासाठीच आहे. भोग-विलास हे धनाचे फळ मानलेले नाही. भोग विलासांचे फळ इंद्रियतृप्ती नव्हे; तर त्याचा हेतू केवळ जीवननिर्वाह आहे. जीवनाचे फळ म्हणजे तत्त्वजिज्ञासा, कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे. तत्त्ववेत्ते लोक ज्ञाता (जाणाणारा) आणि ज्ञेय (जे जाणावयाचे ते) या भेदांनी रहित, अद्वितीय, अशा ज्ञानालाच तत्त्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात. श्रद्धाळू मुनी भागवतश्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्यमुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. हे ऋषींनो ! म्हणूनच मनुष्यांनी आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल, त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय. म्हणून एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे. विवेकी पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात, त्या भगवंतांच्या लीला-कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही ? (५-१५) हे ऋषींनो ! पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणार्याला भगवत्कथेत रुची उत्पन्न होते. भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोनीही पवित्र करणारी आहेत. संतांचे सुहृद भगवान, आपली कथा ऐकणार्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात. श्रीमद्भागवत किंवा भगवद्भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा पवित्रकीर्ति भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्त्वगुणामध्ये स्थिर, तसेच निर्मल होते. याप्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन, हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवत्-तत्त्वाचा अनुभव येऊ लागतो. हृदयात आत्मस्वरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात, सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. म्हणून बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते. (१६-२२) प्रकृतीच्या सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र ही तीन नावे धारण केली आहेत. परंतु मनुष्यांचे परमकल्याण, सत्त्वगुणाचा स्वीकार करण्यार्या श्रीहरींपासूनच होते. जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञयागांद्वारा अग्नी सद्गती देणारा आहे, त्याचप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्त्वगुण श्रेष्ठ आहे. कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्त्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत. आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात, त्यांचे तसेच कल्याण होते. जे लोक हा संसारसागर पार करू इच्छितात, ते कोणाचे दोष पाहात नसले, तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्त्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचेच भजन करतात. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे, ते धन, ऐश्वर्य, पुत्र-पौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात. कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळताजुळता असतो. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे. यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे. योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते, तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते, धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत. जरी भगवान श्रीकृष्ण, प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत, तरीसुद्धा त्यांनी ’जी प्रपंचदृष्टीने आहे; परंतु तत्त्वदृष्टीने नाही अशा’ आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम विश्वाची रचना केली. हे तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे. परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंदघन आहेत. अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तिस्थान असणार्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रगट होतो, त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत, असे वाटते. भगवम्तच सूक्ष्म-भूत-तन्मात्रा, इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीव (योनी) निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवांत प्रवेश करून त्या त्या जीवांना अनुरूप विषयभोग घेतात. तेच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता, पशु-पक्षी, मनुष्य इत्यादी योनींत लीलावतार धारण करून सत्त्वगुणाच्या द्वारा जीवांचे पालन-पोषण करतात. (२३-३४) अध्याय दुसरा समाप्त |