|
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य - अध्याय ३ रा
भक्तीच्या कष्टांची निवृत्ती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नारद म्हणाले - भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीशुकदेवांनी सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथांद्वारा मी उज्ज्वल ज्ञानयज्ञ करीन. हा यज्ञ कोठे केला पाहिजे, ते ठिकाण आपण मला सांगा. आपण वेद जाणणारे आहात, तेव्हा शुकांनी सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा. श्रीमद्भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा ॥ १-३ ॥ सनकादिक म्हणाले - नारदमुनी, आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात. आम्ही आपणांस सविस्तर सांगतो, ऐका. हरिद्वाराजवळ आनंद नावाचा एक घाट आहे. तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत. तसेच देवता आणि सिद्धपुरुषही त्या स्थानाचा लाभ घेतात. नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे. हा घाट एकांतात असून रमणीय आहे. तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो. त्याच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीही एकमेकांशी वैर करीत नाहीत. आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा. तेथे विशेष काही प्रयत्न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल. आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ति कथास्थानी येईल. जेथे श्रीमद्भागवतकथा चालू असते तेथे भक्ति इत्यादी स्वतः जातील. तेथे कथेचे शब्द कानी पडताच ह्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल. (४-९) सूत म्हणाले - असे म्हणून सनकादिकही नारदांबरोबर श्रीमद्भागवतकथामृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगातटाकी आले. ज्यावेळी हे सर्वजण गंगातटाकी पोहोचले, त्याचवेळी भूलोक, देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तेथे जाण्यासाठी धांदल उडाली. भागवतकथामृतपानासाठी जे रसिक विष्णुभक्त होते, ते सर्व धावत धावत आधी आले. भृगु, वसिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर व्यास आणि पराशर, छायाशुक, जाजलि आणि जह्नू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य आणि पत्नींसमवेत, प्रेमभराने तेथे आले. यांच्याखेरीज वेद, उपनिषदे, मंत्र, तंत्र, सतरा पुराणे आणि सहा शास्त्रे तेथे मूर्तरूप धारण करून आली. (१०-१५) गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्रे, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्ये, हिमालय आदी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. स्वतःस श्रेष्ठ समजणारे जे आपणहून आले नाहीत, त्यांची महर्षी भृगूंनी समजून घालून त्यांना आणले. (१६-१७) त्यावेळी श्रीकृष्णभक्त सनकादी, नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकविण्यासाठी बसले. त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला. श्रोत्यांमध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर नारदमुनी त्या सर्वांच्या पुढे बसले. एका बाजूला ऋषिगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद-उपनिषदे, एकीकडे तीर्थक्षेत्रे बसली; तर दुसर्या बाजूला स्त्रिया बसल्या. त्यावेळी सगळीकडे जयजयकार, नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागले. तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. काही काही प्रमुख देव तर विमानांत बसून, सभेत बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले. (१८-२२) सूत म्हणाले - अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्रचित्त झाले, तेव्हा सनकादिक ऋषी, मुनिवर नारदांना श्रीमद्भागवताचे माहात्म्य स्पष्ट करून सांगू लागले. (२३) सनकादिक म्हणाले - आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा (भागवतशास्त्राचा) महिमा सांगतो. याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते. श्रीमद्भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात. या ग्रंथाचे अठरा हजार श्लोक आणि बारा स्कंध आहेत. यात श्रीशुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण हे भागवतशास्त्र लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत एक क्षणभर का होईना, या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसारचक्रात भटकत राहतो. इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार ? त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होतो. मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत-शास्त्रच पुरेसे आहे. ज्या घरात नित्य श्रीमद्भागवताची कथा होते, ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात, त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते. हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकत नाहीत. हे तपोधन हो, जो पर्यंत मनुष्यमात्र श्रीमद्भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करीत नाहीत, तोपर्यंतच त्यांच्या शरीरामध्ये पापांनी ठाण मांडलेले असते. फलाच्या दृष्टीने पाहिले, तर, गंगा, गया, काशी, पुष्कर किंवा प्रयाग ही तीर्थेही शुकशास्त्रकथेची बरोबरी करू शकत नाहीत. (२४-३२) जर आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद्भागवताच्या अर्ध्या अगर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य-नियमाने पाठ करीत जा. ॐ कार, गायत्री मंत्र, पुरुषसूक्त, तिन्ही वेद, श्रीमद्भागवत, ॐ नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र, सूर्यभगवान, प्रयाग, संवत्सररूप काल, ब्राह्मण, अग्निहोत्र, गाय, द्वादशी तिथी, तुळस, वसंत-ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धीमान लोक तत्त्वतः समान मानतात. जो पुरुष नित्य अर्थासहित श्रीमद्भगवतशास्त्र पठण करतो, त्याच्या कोट्यवधी जन्मांचे पाप नाहीसे होते, यात मुळीच शंका नाही. जो मनुष्य नियमीतपणे भागवताच्या अर्ध्या किंवा चतुर्थांश का होईना श्लोकाचा पाठ करतो, त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. नित्य भागवताच्या पाठ करणे, भगवंतांचे चिंतन करणे, तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे, हे सर्व एकसारखे आहे. जो पुरुष अंतकाळी श्रीमद्भागवत ऐकतो, भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठधामाला नेतात. जो पुरुष सुवर्णसिंहासनासह भागवताचे दान विष्णुभक्ताला देतो, त्यला भगवंतांचे सायुज्यपद अवश्य प्राप्त होते. (३३-४१) ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भागवतामृताचा थोडासुद्धा आस्वाद घेतला नाही, त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालविला. एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसववेदना देण्यासाठीच तो जन्माला आला. ज्याने हे शुकशास्त्र थोडेसुद्धा ऐकले नाही, तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. स्वर्गलोकातील इंद्रादी प्रधान देवताही असेच म्हणतात की, "पृथ्वीला भारभूत असणार्या अशा पशुतुल्य माणसाचा धिक्कार असो." (४२-४३) कोट्यवधी जन्मातील पुण्यसंचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद्भागवतकथा जगात दुर्लभच आहे. नारदमुने, आपण बुद्धीमान आणि योगी आहात. आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका. ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचेच असे काही बंधन नाही. नेहमी ऐकणेच चांगले. ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्यपालन पूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे. परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनींनी सांगितलेला विशेष विधी समजावून घेतला पाहिजे. कलियुगात पुष्कळ दिवसांपर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे, नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्याच पुण्यकर्माला वाहून घेणे अवघड असल्याने सात दिवसांच्या श्रवणाचा विधी सांगितला आहे. श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते, तेच फळ सात दिवसांच्या श्रवणविधीमध्ये श्रीशुकदेवांनी सांगितले आहे. मनाचा निग्रह नसणे, रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य, तसेच कलियुगातील अनेक दोष यांमुळे सप्ताहश्रवणाचेच विधान सांगितले आहे. जे फळ तप, योग आणि समाधीमुळे मिळत नाही, ते संपूर्ण फळ सप्ताहश्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. सप्ताहश्रवण यज्ञ, व्रत, तप, तीर्थयात्रा, योग, धान्य आणि ज्ञान या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. अहो, याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे ? हे सप्ताहश्रवण तर सर्वांत श्रेष्ठ आहे. (४४-५२) शौनकांनी विचारले - ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली. हे भागवतपुराण निश्चितच योगवेत्ते, ब्रह्मदेव यांचे आदिकारण असणार्या श्रीनारायणांचेच निरूपण करीत आहे; पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान, इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली ? (५३) सूत म्हणाले - हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला (गोलोकाला) जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले, तेव्हा त्यांच्या तोंडून अकराव्या स्कंधातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनीही असेच विचारले होते. (५४) उद्धव म्हणाले - हे गोविंद, आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामास जाऊ इच्छिता, परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे. माझी चिंता ऐकून तिचे निरसन करून आपण माझे समाधान करा. आता घोर कलियुग आलेच आहे. आता पुन्हा अनेक दुष्ट प्रगट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील, तेव्हा त्याच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल ? हे कमलनयना, मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून हे भक्तवत्सला, साधुपुरुषांवर कृपा करा आणि येथून जाऊ नका. भगवन, आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तांसाठीच हे सगुण रूप धारण केले आहे. तर मग आपला वियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील ? निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा. (५५-५९) प्रभासक्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की, भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल ? तेव्हा भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पावून त्यांनी या भागवतरूपी समुद्रात प्रवेश केला. म्हणून ही भगवंतांची प्रत्यक्ष वाङ्मयमूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठण, किंवा दर्शनसुद्धा मनुष्याची पापे नष्ट करते. असे असल्याने याचे सप्ताहश्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे. कलियुगात हाच एक असा धर्म आहे की, ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि काम-क्रोधादि शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो. भगवंतांच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवांनाही अवघड आहे, तिथे मनुष्याची सुटका कशी होणार ? म्हणून मायापाश सुटण्यासाठीसुद्धा सप्ताहश्रवणाचा विधी सांगितला आहे. (६०-६५) सूत म्हणाले - शौनका, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताहश्रवणविधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते, त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडले. ते मी तुला सांगतो, ऐक. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ति तेथे अकस्मात प्रगट झाली. ती मुखाने "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव ॥" या नामांचा वारंवार जयघोष करीत होती. तेव्हा सभासदांनी सुंदर वेष धारण केलेली भक्ती भगवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले. मुनींच्यामध्ये हिचे आगमन कसे झाले, याविषयी सभेतील सर्वजण तर्क-वितर्क करू लागले. तेव्हा सनकादिक म्हणाले की, "भागवतकथेच्या अर्थातून आत्ताच ही येथे प्रगट झाली आहे." हे ऐकून भक्ति आपल्या पुत्रांसह अत्यंत विनम्र भावाने सनत्कुमारांना असे म्हणाली - (६६-६९) भक्ती म्हणाली - कलियुगात माझा लोप झाला होता. कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत. आपण मला आता असे सांगा की, "मी कोठे राहू ?" हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले, तू भक्तांना भगवत्स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आहेस, म्हणून तू धैर्य धारण करून विष्णूभक्तांच्या हृदयांत निरंतर वास करून रहा. या कलियुगातील दोघांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोघांची दृष्टीसुद्धा पडू शकणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ति ताबडतोब भक्तांच्या हृदयांत विराजमान झाली. (७०-७२) ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे, ते भले निर्धन का असेनात, परम धन्य आहेत; कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम (गोलोक) सोडून भक्तांच्या हृदयांत येऊन निवास करतात. या पृथ्वीतलावर, हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे. याची महती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावी ? भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा, दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्यमुक्ती प्राप्त होते, म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे ? (७३-७४) अध्याय तिसरा समाप्त |