श्रीमद् भागवत महापुराण

माहात्म्य - अध्याय ४ था

गोकर्ण-उपाख्यान प्रारंभ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणाले - त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ति पाहून भक्तवत्सल श्रीभगवान आपले स्थान सोडून तेथे आले. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते, त्यांनी पीतांबर धारण केला होता, कमरेभोवती मेखला शोभत होती. ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते. वक्षःस्थळावर कौस्तुभमणी चमकत होता, संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता. त्यांनी जणू कोट्यवधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते. ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूस होते. असे मनोहर मुरलीधर, आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले होते. वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्तरूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते. तेव्हा जयघोष होऊ लागला. भक्तिरसाचा अद्‌भुत प्रवाह वाहू लागला. गुलाल, बुक्का, फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागला. त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह, घरदार आणि अंतःकरणाचीही जाणीव नाहीशी झाली ते असे तन्मय झालेले पाहून नारदमुनी म्हणाले - (१-७)

मुनिगण हो ! सप्ताह श्रवणाचा, एक अलौकिक महिमा मी पाहात आहे. येथे आलेल्यांत मूर्ख, धूर्त आणि पशु-पक्षीही असून ते सर्वच अत्यंत निष्पाप झाले आहेत. म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी, मृत्युलोकातील पापसंचय नाहीसा करणारे भागवतकथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही. मुनिवर, आपण मोठे कृपाळू आहात. लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे. या कथारूप सप्ताहयज्ञाने कोणकोण पवित्र होतात हे आपण मला सांगावे. (८-१०)

सनकादिक म्हणाले - जे लोक नेहमी पापकर्मे करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाममार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी आणि कामातुर असतात, असे सर्वजण या कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. सत्यापासून परावृत्त झालेले, माता-पित्यांची निंदा करणारे, कामनांनी ग्रस्त झालेले, आश्रमधर्मांचे पालन न करणारे, दांभिक, दुसर्‍यांचा मत्सर करणारे आणि दुसर्‍यांना पीडा देणारे, हे सर्व कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. मद्यपान, ब्राह्मणहत्या, सुवर्ण-चोरी, गुरुस्त्रीगमन आणि विश्वासघात ही पाच महापापे करणारे, कपट व ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, पिशाच्चांप्रमाणे निर्दय, बाह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी, हे सर्व कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. जे धूर्त हट्टाने नेहमी मन, वाणी आणि शरीराने पापकर्म करीत असतात, दुसर्‍याच्या धनाने पुष्ट होतात, तसेच मलिन मन आणि दुष्टवासनांनी युक्त आहेत, ते सुद्धा कलियुगात सप्ताहयज्ञाने पवित्र होतात. (११-१४)

आता आम्ही तुम्हांला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सर्व वर्णांचे लोक, आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्मे यांत तत्पर असत. त्या नगरात सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौत-स्मार्त कर्मांत निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहात होता. तो जणू दुसरा सूर्यच होता. तो धनवान असून पौरोहित्य करीत असे. त्याची पत्‍नी धुंधुली कुलीन घराण्यातील आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती. लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाने क्रूर होती. नेहमी काहीबाही बडबड करीत असे. गृहकृत्यात निपुण, कंजूष तसेच भांडखोरही होती. याप्रकारे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते. त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती. परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते. अखेर त्यांनी संतानप्राप्तीसाठी गरिबांना गायी, जमीन-जुमला, धन, सुवर्ण, वस्त्रे इत्यादि दान करण्यास आरंभ केला. अशा रीतीने दान-धर्मात त्याने आपली अर्धी संपत्ती खर्च केली, तरीसुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातुर झाला. (१५-२२)

तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. माध्याह्नकाळी त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला. संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तेथेच बसला. थोड्याच वेळात तेथे एक संन्यासी आला. संन्यासी पाणी प्याल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकीत उभा राहिला. (२३-२५)

संन्याशाने विचारले - हे ब्राह्मणा, तू का रडतोस ? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस ? तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. (२६)

ब्राह्मण म्हणाला - यतिमहाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू ? माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कार्‍यांनी गरम होते. तेच ते पितात. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाहीत. संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की, मला सर्व सुनेसुने वाटत आहे. मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो. संतानहीन धनाचा, संतानहीन कुळाचा धिक्कार असो. मी ज्या गाईचे पालन करतो, तीही वांझ होते. जे झाड लावतो, त्यालाही कधी फुले-फळे येत नाहीत. मी माझ्या घरात जे फळ आणतो, ते लवकरच सडून जाते. मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या ह्या जीवनात काय अर्थ आहे ? असे म्हणून तो ब्राह्मण संन्याशाजवळ ओक्साबोक्शी रडू लागला. तेव्हा त्या संन्याशाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली. ते संन्यासी योगनिष्ठ होते. ब्राह्मणाची ललाटरेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले. (२७-३३)

संनासी म्हणाले - हे ब्राह्मणा, संतानप्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठी प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे. हे विप्रवरा, ऐक. मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. यापुढील सात जन्मात तुला संतानप्राप्तीचा मुळीच योग नाही. पूर्वी राजा सगर आणि अङ्‌ग यांना मुलांमुळे दुःख भोगावे लागले आहे. हे ब्राह्मणा, तू आता संसाराची आशा सोड. संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे. (३४-३६)

ब्राह्मण म्हणाला - विवेकाने माझे काय समाधान होणार ? आपल्या सामर्थ्याने का होईना, आपण मला पुत्र द्या. नाहीतर शोकाकुल मी आपल्यासमोरच प्राणत्याग करतो. ज्यामध्ये पुत्र, पत्‍नी इत्यादी सुख नाही, असा संन्यास सर्वथैव नीरस आहे. लोकाचारात पुत्र-पौत्रांनी भरलेला गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे. (३७-३८)

ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्यासी म्हणाला, विधात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले. एखाद्याचे प्रयत्‍न दैव जसे उलथून पाडते, त्याप्रमाणे तुलासुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही. तू मोठ्या हट्टाने माझ्याकडे याचकाप्रमाणे उभा आहेस. या परिस्थितीत मी तुला काय सांगू ? (३९-४०)

ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्यासी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत्‍नीस खावयास दे. त्यायोगे तिला एक पुत्र होईल. तुझ्या पत्‍नीने एक वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान यांचे पालन करून दिवसातून एकवेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. त्यायोगे पुत्र सुस्वभावी निपजेल. (४१-४२)

असे म्हणून ते योगिराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या पत्‍नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला. त्याची पत्‍नी कपटी स्वभावाची होती. रडतरडत ती आपल्या सखीस म्हणाली, सखी, मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे. मी हे फळ खाणार नाही. फळ खाल्ल्याने गर्भ राहील, त्यामुळे पोट मोठे होईल. मग मला खाता-पिता येणार नाही आणि मी अशक्त होईन. अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल ? आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली, तर गरोदर मी कशी पळून जाऊ शकेन ? तसेच जर शुकदेवाप्रमाणे गर्भ पोटातच अधिक काळ राहिला, तर त्याला बाहेर कसे काढता येईल ? प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवा आला तर कदाचित प्राणही गमवावे लागतील. शिवाय, प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात. मी अशी नाजूक, हे सर्व कसे सहन करू शकेन ? मी जर अशक्त झाले, तर माझी नणंद येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल. शिवाय, सत्य, पावित्र्य इत्यादि नियमांचे पालन करणेही अवघड आहे. जी स्त्री मुलाला जन्म देते, तिला त्याचे लालन-पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात. मला तर वाटते की वांझ किंवा विधवा स्त्रीच सुखी आहे. (४३-४९)

मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही. पतीने जेव्हा विचारले, ’फळ खाल्ले का ?’ तेव्हा तिने उत्तर दिले ,’होय, खाल्ले.’ एक दिवस तिची बहीण सहज तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगून म्हटले, "माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे. याच चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले आहे. हे भगिनी, मी काय करू ?"

बहीण म्हणाली, "मी गर्भवती आहे. प्रसूत झाल्यानंतर ते मूल तुला देईन. तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने राहा. तू माझ्या पतीला काही धन दिलेस, तर तो तुला माझे मूल देईल. आपण अशी युक्ती करू की, सर्व लोक म्हणतील की, हिचे बालक सहा महिन्यांचे होऊन मरून गेले. मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचे लालन-पालन करीन. तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल." ब्राह्मणाने स्त्रीस्वभावानुसार बहिणीने सांगितले तसे तसे केले. (५०-५५)

यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी गुपचूप तो मुलगा धुंधुलीला आणून दिला. आणि तिने पतीला सांगितले की, मला सुखरूपपणे पुत्र झाला. अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला. ब्राह्मणाने त्या मुलाला जातकर्म संस्कार करून ब्राह्मणांना दाने दिली आणि त्याच्या घरासमोर मंगल वाद्ये वाजू लागली. तसेच मंगल कृत्ये होऊ लागली. धुंधुली आपल्या पतीला म्हणाली, "माझ्या स्तनातून दूध येत नाही. तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने या बालकाचे पालन-पोषण मी कसे करू ? माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले होते, ते गेले. तिला बोलावून आपल्या घरी ठेवून घ्या. म्हणजे ती तुमच्या बाळाचे पालन-पोषण करील." तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले. माता धुंधुलीने त्या बालकाचे नाव धुंधुकारी असे ठेवले. (५६-६१)

त्यानंतर तीन महिने झाल्यावर त्या गायीलाही (मनुष्याकृती) मुलगा झाला. तो सर्वांगसुंदर, दिव्य, निर्मळ तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती. त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे सर्व संस्कार केले. हे वृत्त ऐकून इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्या बालकाला पाहण्यासाठी आले. ते म्हणू लागले, "पहा, पहा ! आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आले ! हे केवढे आश्चर्य आहे की गाईलासुद्धा देवासारखा मुलगा झाला." दैवयोगाने हे रहस्य कोणालाही समजले नाही. त्या बलकाने त्याचे नाव ’गोकर्ण’ ठेवले. (६२-६५)

काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केले. त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला, परंतु धुंधुकारी मोठा दुष्ट झाला. स्नान, वगैरे तो करीतच नव्हता, अभक्ष्यही भक्षण करीत होता. क्रोधाच्या आहारी गेला होता. वाईट वस्तूंचा तो संग्रह करीत असे. प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्नही तो खात असे. चोरी करणे, सर्वांचा द्वेष करणे, दुसर्‍यांच्या घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव होता. लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घेई आणि त्यांना विहिरीत टाकून देत असे. हत्या करणे, हातात शस्त्र घेऊन आंधळे, दीन-दुःखी यांना त्रास देणे हे त्याचे काम असे. चांडाळांविषयी त्याला विशेष प्रेम होते. हातात फास घेऊन, कुत्र्यांना बरोबर घेऊन तो शिकार करण्यासाठी भटकत असे. वेश्यांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली. एक दिवस माता-पित्यांना बडवून घरातील सर्व भांडीकुंडी तो घेऊन गेला. (६६-७०)

अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप ओक्शाबोक्शी रडत म्हणाला - "वांझपणा परवडला, पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा ठरतो. आता मी कोठे राहू ? कोठे जाऊ ? माझे हे दुःख कोण नाहीसे करील ? माझ्यावर तर मोठे संकट आले आहे. या दुःखामुळेच मी आता जीव देतो." त्याचवेळी ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करीत समजावण्याचा प्रयत्‍न केला. गोकर्ण म्हणाला, हा संसार असार आहे. हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणारा आहे. कोणाचा पुत्र ? कोणाचे धन ? आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो. इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही. केवळ विरक्त, एकांतात जीवन कंठणारे मुनीच सुखी असतात. ’हा माझा पुत्र आहे’ या अज्ञानाचा त्याग करा. मोहामुळे नरकप्राप्ती होते. हे शरीर तर नाहीसे होणारच आहे. म्हणून सर्वसंगत्याग करून वनामध्ये निघून जा. (७१-७६)

गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला; आणि त्याला म्हणू लागला - पुत्रा, वनात राहून मी काय करावे, ते मला तू सविस्तर सांग मी खरोखर मूर्ख आहे, पूर्वकर्माने मोहपाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधार्‍या विहिरीत पडून राहिलो आहे. हे दयाळू, यातून माझा उद्धार कर. (७७-७८)

गोकर्ण म्हणाला - हे शरीर, हाडे, मांस आणि रक्ताचे कोठार आहे. शरीर म्हणजे ’मी’ असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्री-पुत्रांना सुद्धा ’आपले’ मानू नका. हा संसार क्षणभंगुर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्यरसात आनंद मानून भगवंतांची भक्ती करा. नेहमी धर्माचा आश्रय करून राहा. सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा, साधु-संतांची सेवा करा, भोगलालसेला जवळही येऊ देऊ नका, दुसर्‍यांच्या गुण-दोषांचा विचार करणे तत्काळ सोडून द्या आणि भगवत्सेवा व भगवंतांच्या कथांचा नित्य आनंद लुटा. (७९-८०)

याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला. त्याचे साठ वर्षांचे वय झाले होते, तरी बुद्धी स्थिर होती. रात्रंदिवस भगवंतांची पूजा-अर्चा आणि नियमितपणे भागवताच्या दशम स्कंधांचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली. (८१)

अध्याय चौथा समाप्त

GO TOP