|
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य - अध्याय २ रा
भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नारद म्हणाले - बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस ? तू इतकी चिंतातुर का झाली आहेस ? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन कर. तुझे दुःख नाहीसे होईल. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरींचे ज्यांनी पालन केले, ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्यांना नेहमी प्राणांहूनही अधिक प्रिय अशी तू भक्ति आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्याही घरात जातात. सत्य, त्रेता आणि द्वापर या तीन युगांत ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती; परंतु कलियुगात केवळ भक्ति मोक्षप्राप्ती करून देणारी आहे, असे निश्चित जाणून परमानंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरींनी सत्स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे. तू श्रीकृष्णांना प्रिय अशी सुंदरी आहेस. एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होते की, "मी काय करू ?" तेव्हा श्रीकृष्णांनी "माझ्या भक्तांचे पोषण कर," अशी तुला आज्ञा केली होती. (१-६) तू ते स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञान-वैराग्यांना पुत्ररूपात तुझ्य्या स्वाधीन केले. तू तुझ्या मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस; तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिली आहेस. (७-८) तू मुक्ति, ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वीतलावर आलीस आणि सत्ययुग ते द्वापरयुगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस. मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली होती, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने वैकुंठलोकात गेली. तू स्मरण करताच मुक्ती येथे येते आणि परत जाते. परंतु या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्याजवळच ठेवले आहेस. कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत. परंतु तू चिंता करू नकोस. यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो. हे सुंदरी, कलीसारखे दुसरे कोणतेही युग नाही. या युगात मी घराघरात, प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करीन. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकांत मी तुझा प्रचार केला नाही, तर मी श्रीहरींचा दास म्हणवून घेणार नाही. या कलियुगात जे जीव भक्तिमार्गाला लागतील, ते पापी असल्यासही निर्भयपणे श्रीकृष्ण धामाला जातील. ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ति निरंतर निवास करते, ते शुद्धान्तःकरणाचे लोक स्वप्नातदेखील यमाला पाहात नाहीत. ज्यांच्या हृदयात भक्ति आहे, त्यांना प्रेत, पिशाच्च, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाहीत, ते केवळ भक्तीनेच वश होतात. गोपी याचे उत्तम उदाहरण आहे. हजारो जन्मांच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ति, केवळ भक्तीच सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात. भक्तीशी द्रोह करणारे तिन्ही लोकांत दुःखाचेच धनी होतात. एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वासऋषींना दुःख प्राप्त झाले होते. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादि साधनांची काहीही आवश्यकता नाही. एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. (९-२१) सूत म्हणाले - आपले माहात्म्य निर्णायकरीत्या नारदांच्या तोंडून ऐकल्यानंतर भक्ती सर्व अंगांनी पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली. (२२) भक्ति म्हणाली - नारदमुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करीन. आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केलेत. परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही. म्हणून आपण यांना जागे करा. यांच्यात चैतन्य आणा. (२३-२४) सूत म्हणाले - भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांना हाताने हलवून जागे करू लागले. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की, हे ज्ञाना, ऊठ. लवकर जागा हो ! हे वैराग्या, ऊठ. लवकर जागा हो ! नंतर नारदांनी वेदघोष, वेदान्तघोष आणि वारंवार गीतापाठ करून त्यांना जागे केले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. परंतु आळसाने ते दोघेही जांभई देत राहिले. डोळे उघडून पाहू शकले नाहीत. त्यांचे बहुतेक केस बगळ्याच्या रंगासारखे पांढरे झाले होते. सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते. अशा रीतीने तहान-भूकेने व्याकूळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले आहेत, असे पाहून नारदांना मोठी चिंता लागून राहिली आणि ते विचार करू लागले की, आता आपण काय करावे ? यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल ? शौनका ! अशी काळजी करीत नारद भगवच्चिंतन करू लागले. त्याचवेळी आकाशवाणी झाली, "मुनिवर्य खेद करू नका. तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते, ते तुम्हाला संतशिरोमणी महात्मे सांगतील. त्या सत्कर्माचे अनुष्ठान करताक्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. ही आकाशवाणी तेथील सर्वांनीच स्पष्ट ऐकली. त्यामुळे नारदांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणू लागले, "मला तर याचा आशयच कळला नाही." (२५-३४) नारद म्हणाले - या आकाशवाणीनेसुद्धा गुप्तरूपानेच ही गोष्ट सांगितली. ज्यामुळे यांचे कार्य तडीस जाईल, असे साधन सांगितलेच नाही. ते संत कोठे भेटतील व कोणते साधन सांगतील बरे ! आता आकाशवाणीने जे काही सांगितले, त्यानुसार आता मला काय केले पाहिजे ? (३५-३६) सूत म्हणाले - शौनका ! ज्ञान व वैराग्य यांना तेथेच सोडून नारदमुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणार्या ऋषिवर्यांना ते साधन विचारू लागले. त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते; परंतु निश्चित उत्तर कोणीच देत नव्हते. कोणी सांगितले, "हे अशक्य आहे", दुसरे कोणी म्हणाले, "याचे योग्य उत्तर मिळणे दुरापास्त आहे." तर काहीजण गप्प राहिले आणि अन्य काहीजण आपले हसे होईल या भितीने उत्तर देणे टाळण्यासाठी तेथून निघून गेले. त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाहाकार माजला. लोक एकमेकांशी कानाजवळ जाऊन कुजबुजु लागले. जर वेदपठण, वेदांतघोष आणि वारंवार गीतापठण ऐकवूनही भक्ति, ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणता आली नाही तर अन्य कोणताही उपाय दिसत नाही. परम योगी नारदमुनींनाही ज्याचे ज्ञान नाही, अशा बाबतीत अन्य सामान्य लोक काय सांगू शकतील ? अशाप्रकारे ज्या ज्या ऋषिवर्यांना विचारले गेले, त्यांनी असाच निर्णय दिला की, ही गोष्ट असाध्य आहे. (३७-४२) तेव्हा नारद चिंतातुर अवस्थेत बद्रीवनात आले. ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणण्यासाठी "मी येथे तप करीन" असा त्यांनी निश्चय केला. त्यचवेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्यांच्या सारखे अत्यंत तेजस्वी असे सनकादिक मुनी दिसले. त्यांना मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले - (४३-४४) नारद म्हणाले - माझ्या महद्भाग्यानेच आपली व माझी यावेळी भेट झाली. कुमारांनो, कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे. आपण सर्वजण महान योगी, बुद्धीमान आणि बहुश्रुत आहात. आपण ५-५ वर्षांचे बालक दिसत असलात, तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात. आपण नेहमी वैकुंठधामात राहता, सदैव हरिकीर्तनामध्ये तत्पर असता. भगवंतांच्या लीलामृताचे पान करीत त्यातच तल्लीन होता आणि भगवत्कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे. "श्रीहरिः शरणम्" हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो. आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाधू शकत नाही. पूर्वी एकदा ज्या भुवया आपण वक्र करताच भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले. माझ्या सौभाग्यानेच मला आता आपले येथे दर्शन होत आहे. मी दीन आहे तर आपण दयाळू आहात. म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले, ते साधन कोणते ? त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे ? हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल ? सर्व वर्णांमध्ये यांचीच कोणत्या प्रयत्नांनी प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल. (४५-५२) सनकादिक म्हणाले - देवर्षी, आपण चिंता करू नका. मन प्रसन्न ठेवा. त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. नारदमुने, आपण धन्य आहात. आपण विरक्तांचे शिरोमणी, श्रीकृष्ण भक्तांत अग्रगण्य तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात. आपण भक्तीसाठी जे प्रयत्न करीत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही. भक्तीची पुनःस्थापना करणे हे कार्य भगवद्भक्तांसाठी सर्वथैव योग्य आहे. या संसारात ऋषिमुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रकट केले आहेत. परंतु ते सर्व कष्टसाध्य आणि बहुधा स्वर्गप्राप्ती करून देणारे आहेत. परंतु भगवत्प्राप्तीचे साधन मात्र गुप्तच ठेवल आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो. आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हांला सांगतो. आपण प्रसन्न आणि स्थिरचित्त होऊन ऐका. (५३-५८) द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ हे कर्मांचे सूचक आहेत. विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्मांचे सूचक मानले आहे. शुकादी महामुनींनी ज्याचे गायन केले आहे. ते श्रीमद्भागवताचे पारायण हेच ते सत्कर्म होय. त्याचे शब्द ऐकूनच भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. यामुळे ज्ञान-वैराग्यांचे कष्ट नाहीसे होतील आणि भक्तीला आनंद होईल. सिंहगर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात, त्याप्रमाणे श्रीमद्भागवताच्या शब्दांनीच कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील. त्यावेळी प्रेमरस वाहात नेणारी भक्ति, ज्ञान आणि वैराग्याला बरोबर घेऊन घरोघरी प्रकट होईल. (५९-६३) नारद म्हणाले - वेद-वेदांताचे पठण आणि गीतापाठ करून भक्ति-ज्ञान-वैराग्यरूप हे तिघे जर जागे झाले नाहीत, तर श्रीमद्भागवतकथा ऐकून ते कसे जागे होतील ? कारण त्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदांचाच सारांश कथन केलेला आहे. आपण शरणागतवत्सल आहात. आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही. म्हणून माझी ही शंका दूर करा. विलंब करू नका. (६४-६६) सनकादिक म्हणाले - श्रीमद्भागवताची कथा, वेद आणि उपनिषदे यांच्या सारसर्वस्वातूनच प्रकट झाली आहे. पण ही स्वतंत्र फलरूप असल्याने वेद-उपनिषदांपेक्षा उत्तम ठरली आहे. ज्याप्रमाणे झाडातील रस बुंध्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही, पण ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने वेगळा प्रकट होतो, तेव्हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दुधामध्ये तूप असतेच, परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही. तेच तूप दुधापासून वेगळे काढले जाते, तेव्हा ते देवतांसाठीही स्वादिष्ट बनते. उसाच्या सर्वांगात साखर व्यापून असते, परंतु ती वेगळी झाल्यानंतरच तिची गोडी समजते. भागवतकथा ही अशीच आहे. हे भागवतपुराण वेदांच्या बरोबरीचे आहे. श्रीव्यासांनी भक्ति, ज्ञान, वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केले आहे. वेद-वेदांतात पारंगत आणि गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी एकदा खिन्न होऊन अज्ञानांधकारात चाचपडत होते, तेव्हा आपणच त्यांना चार श्लोकांत याच भागवताचा उपदेश केला होता. तो ऐकूनच त्यांची खिन्नता तत्काळ नाहीशी झाली होती. असे असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हांलाच का प्रश्न करीत आहात ? आपण त्यांना शोक दुःखाचा नाश करणारे श्रीमद्भागवतपुराण ऐकविले पाहिजे. (६७-७४) नारद म्हणाले - ज्यांचे दर्शन सर्व पापांना तत्काळ नाहीसे करते आणि जे संसारदुःखाच्या वणव्याने तप्त झालेले आहेत, त्यांचेवर कल्याणाचा वर्षाव करणारे आहे. सहस्रमुख शेष गात असलेल्या भगवत्कथामृताचे आपण नेहमी पान करीत असता. प्रेमलक्षणा भक्ति उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणास शरण आलो आहे. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मांतील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो, तेव्हा त्याचा अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होऊन त्याचे ठिकाणी विवेकाचा उदय होतो. (७५-७६) अध्याय दुसरा समाप्त |