श्रीमद् भागवत महापुराण

माहात्म्य - अध्याय १ ला

देवर्षी नारदांची भक्तीशी भेट -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंदस्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो. (१)

कोणतेही लौकिक - वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास विरहाने व्याकूळ होऊन पुत्रा ! पुत्रा ! म्हणून हाका मारू लागले. तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ’ओ’ देऊ लागले. अशा सर्व चराचराच्या हृदयांत विराजमान झालेल्या श्रीशुकमुनींना मी नमस्कार करतो. (२)

भगवत्‌कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणार्‍या मुनिवर शौनकांनी नैमिषरण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सूतांना नमस्कार करून म्हटले. (३)

शौनक म्हणाले - सूत महोदय, अज्ञानांधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठायी कोट्यवधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीचे आहे. कानाला अमृतासमान असणारी सारभूत कथा आपण आम्हांला सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो ? तसेच वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात ? या घोर कलियुगामध्ये मनुष्यप्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहेत. विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध (दैवी शक्तिसंपन्न) होण्याचा शर्वश्रेष्ठ उपाय कोणता ? (४-६)

आपण आम्हांस असे शाश्वत साधन सांगा की, ज्यायोगे अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल, आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्गप्राप्ती करून देऊ शकेल; परंतु सद्‌गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठधाम प्राप्त करून देतात. (७-८)

सूत म्हणाले - शौनक महोदय, तुमच्या हृदयात भगवत्प्रेम आहे; म्हणून मी विचारपूर्वक तुम्हांला जन्ममृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांतांचा निष्कर्ष सांगतो. ज्यामुळे भक्तिप्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते, ते साधन मी तुम्हांला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. कलियुगात मनुष्यप्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष्य झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्रीशुकदेवांनी श्रीमद्‌भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे. मनःशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो, त्याचवेळी त्यास भागवतशास्त्र ऐकण्यास मिळते. परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्रीशुकदेव सभेमध्ये आले, तेव्हा देव अमृतकलश घेऊनच तेथे आले. आपले काम साधून घेण्यात चतुर असणार्‍या देवांनी शुकमुनींना प्रणाम केला व म्हणाले की, हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण आम्हांस भागवत कथामृताचे दान द्यावे. अशी देवाण-घेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करील (त्यामुळे तो अमर होईल) आणि आम्ही श्रीमद्‌भागवतरूप अमृत प्राशन करू. या असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्‍न यांची तुलना होत नाही, त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवतकथा ! असा श्रीशुकांनी विचार करून देवांचा उपहास केला. देवांना अभक्त समजून शुकांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही. अशी ही श्रीमद्‌भागवतकथा देवांनाही दुर्लभ आहे. (९-१७)

पूर्वी श्रीमद्‌भागवतकथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता, हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवद्‌रूप असे भागवतशास्त्रच पठण-श्रवणाने तत्काळ वैकुण्ठलोक प्राप्त करून देते. सप्ताहविधीने श्रवण केल्यावर भागवत खात्रीने मुक्ति प्राप्ती करून देते. हे शास्त्र पूर्वी दयार्द्र अंतःकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केले होते. जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवांकडून श्रवण केले होते, तरी त्याचा सप्ताहश्रवणविधी मात्र त्यांना सनकादिकांनीच सांगितला होता. (१८-२२)

शौनकांनी विचारले - संसारपाशातून मुक्त तसेच नित्य संचार करण्यार्‍या नारदांची सनकादिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी लागली ? (२३)

सूत म्हणाले - श्रीशुकदेवांनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे भक्तिपूर्ण कथानक एकांतात मला सांगितले, ते मी तुम्हांला सांगतो. एकदा बद्रीनारायणक्षेत्री ते चारही निर्मल अंतःकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असता नारदांना त्यांनी पाहिले. (२४-२५)

सनकादिकांनी विचारले - ब्रह्मन्, आपण उदास व चिंताक्रांत का दिसत आहात ? इतक्या घाईने आपण कुठे जात आहात ? आपण कोठून आलात ? एखाद्याने धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकूळ झालेला दिसतो, तसे आपण दिसत आहात. याचे कारण काय ? आपल्यासारख्या आसक्तिरहित पुरुषाला हे शोभणारे नाही. तरी कारण सांगा. (२६-२७)

नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे, असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम (सेतुबंध) इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला. परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्ती झाली नाही. सध्या अधर्माला साहाय्य करणार्‍या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्यप्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणविणारे दांभिक आहेत, वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्‍नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्याविक्रय करू लागले आहेत आणि नवरा-बायकोमध्ये कलह होत आहे. महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवीत आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. (२८-३६)

अशा तर्‍हेने कलियुगाचे दोष पहात पहात पृथ्वीवर संचार करीत असता मी, जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या, त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो. मुनिवर, ऐका. तेथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसली होती. त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निपचितपणे पडले होते व ते जोरात सुस्कारे टाकीत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागविण्याचा प्रयत्‍न करीत होती आणि त्यांच्यापुढे रडत होती. आपल्या रक्षणकर्त्याला ती दशदिशांना शोधत होती. तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या. दुरूनच हे दृश्य पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती तरुणी उभी राहिली व व्याकुळतेने म्हणाली - (३७-४१)

तरुणी म्हणाली - हे साधुपुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात. आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येथे, त्याचवेळी आपले दर्शन होते. (४२-४३)

नारद म्हणाले - हे देवी, तू कोण आहेस ? हे दोन पुरुष कोण आहेत ? तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत ? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग (४४)

युवती म्हणाली - माझे नाव भक्ति. ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत. कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत. या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत. अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही. हे तपस्वी, आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका. खरेतर माझी कथा सर्वश्रुत आहे; तरीपण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा. (४५-४७)

द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजराथमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले. तेथे घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्नविच्छिन्न केले. दीर्घ कालपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रांसह अशी दुर्बल आणि निस्तेज झाले. परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले. परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले-भागलेले आहेत. हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे. मी तर तरुण आहे, पण माझे हे दोन पुत्र वृद्ध कसे ? आम्ही तिघे एकत्र राहाणारे आहोत. तरी असे विपरीत का ? वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असावयास पाहिजे. या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्याने मी शोकमग्न आहे. आपण बुद्धिमान आणि योगी आहात. म्हणून हे असे का, याचे कारण मला सांगा. (४८-५४)

नारद म्हणाले - साध्वी, मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्‍न करतो. तुला दुःख करण्याचे कारण नाही. श्रीहरी तुझे कल्याण करील. (५५)

सूत म्हणाले - मुनिवर नारदांनी एका क्षणात कारण जाणले व ते म्हणाले. (५६)

नारद म्हणाले - देवी, लक्षपूर्वक ऐक. हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार, योगसाधन व तप ही सर्व लुप्त झाली आहेत. लोक लुटारूवृत्ती आणि दुष्कर्मे यांत प्रवृत्त होऊन राक्षसी वृत्तीचे बनले आहेत. या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत; तर दुष्ट सुखी आहेत. या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील, तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा. ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली आहे. तिला स्पर्श करणे राहोच, ती दृष्टी टाकण्यायोग्य देखील राहिलेली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही. आता तुझ्या पुत्रांसह तुझे दर्शनही कोणास होत नाही. विषयांध झालेल्या जीवांकडून उपेक्षित झाल्याकारणाने तू जर्जर झाली होतीस वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस. येथे भक्ती आनंदाने नृत्य करीत आहे, म्हणूनच वृंदावनधाम धन्य होय. परंतु तुझ्या या दोन पुत्रांचे येथे कोणीही चाहते नाहीत म्हणून यांचे वृद्धत्व नाहीसे होत नाही. इथे यांना किंचितसे आत्मसुख प्राप्त झाल्याकारणाने ते निद्रिस्त झाल्यासारखे वाटतात. (५७-६२)

भक्ती म्हणाली - राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला येथे आश्रय का दिला ? याच्या आगमनानेच सर्व वस्तूंतील मोठे सारच कोठे नाहीसे झाले ? करुणामय श्रीहरींना हा अधर्म कसा पाहवतो ? मुनिवर, माझ्या या संशयाचे निराकरण करा. आपल्या वचनांनी मला खूपच शांती प्राप्त झाली आहे. (६३-६४)

नारद म्हणाले - बालिके, तू विचारलेच आहेस, तर मी तुला सर्व सांगतो. प्रेमाने ऐक. जेणेकरून हे कल्याणी, तुझे दुःख नाहीसे होईल. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या परमधामाला गेला, त्या दिवसापासून सर्व साधनांमध्ये विघ्न आणणार्‍या कलियुगाची सुरुवात झाली. दिग्विजयाच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली, तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राही बुद्धीच्या राजाने असा निश्चय केला की, मी याचा वध करता कामा नये. कारण जे फळ तपस्या, योगसाधना आणि समाधीपासूनही मिळत नाही, तेच फळ कलियुगात श्रीहरिकीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते. अशाप्रकारे साररहित असूनही एकप्रकारे उपयुक्त आहे, असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणार्‍या मनुष्यमात्रांच्या सुखासाठी त्याला राहू दिले. (६५-६९)

यावेळी लोक निंद्य कर्मांत प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूंमधील रस नाहीसा झाला असून सर्व पदार्थ बी नसलेल्या भुश्याप्रमाणे झाले आहेत. ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी, प्रत्येकाकडे जाऊन भागवतकथा कथन करू लागले आहेत. त्यामुळे कथेचे सार निघून गेले आहे. तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारची घोर कर्मे करणारे, नास्तिक तसेच नरकात जाण्याजोगे पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्रांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ज्यांचे चित्त नेहमी काम, क्रोध, अतिलोभ आणि अभिलाषा यांसाठी व्याकूळ आहे, ते सुद्धा तप करू लागल्यामुळे तपाचेही सार निघून गेले आहे. मनावर नियंत्रण न राहिल्या कारणाने, तसेच लोभ, दंभ आणि नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने, शास्त्राभ्यास न करण्याने ध्यानयोगाचे फलही नाहीसे झाले आहे. विद्वानांची अशी स्थिती आहे की, ते पशूंप्रमाणे स्व-स्त्रीशी संततिनिर्मितीच्या हेतूने रममाण होतात आणि मुक्ति मिळविण्याच्या साधनांकडे दुर्लक्ष करतात. संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णुभक्ति कोठे दिसत नाही. अशा प्रकारे सगळीकडे, सर्व वस्तूंचे सारसर्वस्वच नाहीसे झाले आहे. हा तर कलियुगाचा स्वभाव आहे. तेव्हा याचा दोष अन्य कोणाला देणार ? याच कारणाने पुंडरीकाक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्व सहन करीत आहेत. (७०-७७)

सूत म्हणाले - शौनका, देवर्षी नारदांचे असे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले. त्यावर ती पुन्हा काय म्हणली, ते ऐक. (७८)

भक्ती म्हणाली - देवर्षी, आपण धन्य आहात. माझ्या सद्‌भाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली. या संसारात साधूंच्या दर्शनानेच सर्व सिद्धी प्राप्त होतात. आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कयाधूचा पुत्र प्रह्लाद याने मायेवर विजय मिळविला होता. आपल्या कृपेनेच ध्रुवाने ध्रुवपदही प्राप्त केले होते. आपण सर्व मंगलांचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवांचे पुत्र आहात. मी आपणांस नमस्कार करते. (७९-८०)

अध्याय पहिला समाप्त

GO TOP