श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ३० वा - अन्वयार्थ

यदुकुळाचा संहार -

ततः - त्यानंतर - महाभागवते उद्धवे वनं निर्गते - महाभागवत जो भक्तोत्तम उद्धव तो वनात निघून गेल्यानंतर - द्वारवत्यां - द्वारका नगरीत - भूतभावनः भगवान् किं अकरोत् - जीवांचे परम कल्याण करणार्‍या भगवंताने काय केले. ॥१॥

ब्रह्मशापोपसंसृष्टे स्वकुले - ब्रह्मशापाच्या ग्रहणाचा वेध स्वकुलाला खास ग्रासून टाकणार असे कळल्यामुळे - यादवर्षभः - यदुकुलश्रेष्ठ जो भगवान् - सः - त्याने - सर्वनेत्राणां प्रेयसीं तनुं - सर्वांच्या नेत्रांस प्रियतम असल्या कारणाने आनंद देणारा स्वतःचा देह - कथं अत्यजत् - कशा रीतीने सोडता झाला ?. ॥२॥

यत्र लग्नं - ज्या देहाची व नेत्रांची गाठ पडल्यामुळे घट्ट बसलेली मिठ्ठी सोडवायला - नयनं प्रत्याक्रष्टुं - म्हणजे नेत्राला परत घेऊन दुसरीकडे वळविण्याला - अबलाः - अबला असणार्‍या गोपी व परमभक्त्तोत्तम सर्व भागवत - न शेकुः - समर्थ झाले नाहीत - यत् कर्णाविष्टं न ततः सरति - जे वेदवर्णित देहस्वरूप कर्णांत शिरले असता तेथून निघत नाही - (यत्) सतां - साधूंच्या हृदयातील - आत्मलग्नं (न सरति) - आत्म्याशी प्रेमबद्ध झाल्यामुळे जे भगवत्स्वरूप तेथूनही हलत नाही - यच्छ्‌रीः - ज्या देहस्वरूपाची शोभा - कवीनां वाचां रतिं - कवींच्या वाणीला प्रेमाचे उल्हासपूर्ण भरते आणिते आणि - (तेषां) मानं जनयति - त्यांची मानमान्यताही वाढविते - (इति) किं नु (वक्तव्यं) - हे काय सांगायला हवे ? - युधि जिष्णोः रथगतं - आणि कौरवपांडवयुद्धसमयी अर्जुनाच्या रथावर आरूढ झालेले - यत् च दृष्ट्‌वा - जे भगवद्देहरूप पाहिले म्हणूनच - तत्साम्यं ईयुः - त्या दिव्यस्वरूपाशी समता पावून प्रेक्षक मुक्त झाले. ॥३॥

दिवि, भुवि, अंतरिक्षे च - स्वर्गलोकी, पृथ्वीवर आणि अंतरिक्षामध्ये - समुत्थितान् महोत्पातान् दृष्ट्‌वा - महाभयंकर उत्पात, अनर्थसूचक अरिष्टे पाहून - सुधर्मायां आसीनान् यदून् - सुधर्मानामक नगरसभेत बसलेल्या यादवांस - कृष्णः इदं प्राह - श्रीकृष्ण याप्रमाणे बोलता झाला. ॥४॥

द्वार्वत्यां एते घोराः महोत्पाताः - आपल्या द्वारका नगरीत होणारे हे भयंकर व मोठमोठाले उत्पात - यमकेतवः - प्रत्यक्ष मृत्युरूपी यमधर्माचे ध्वजच होत - यदुपुंगवाः अत्र मुहूर्तं अपि - हे यादवपुरुषसिंहानो ! आता यापुढे एक घटकाभर सुद्धा - नः न स्थेयं - या नगरीत आपण राहू नये. ॥५॥

स्त्रियः, बालाः च, वृद्धाः च, - स्त्रिया, लहान मुले, व वयोवृद्ध पुरुष, - इतः - तात्पर्य सर्व अनाथ म्हणजे स्वसंरक्षण करण्याला असमर्थ असणारी मंडळी, - शंखोद्धारं व्रजंतु - येथून शंखोद्धाराला लवकर पाठवून द्या - वयं - बाकीचे आपण सर्वजण - प्रभासं यास्यामः - प्रभास क्षेत्राला जाऊ - यत्र - जेथे - सरस्वती प्रत्यक् - सरस्वती नदी पश्चिमाभिमुख होऊन वाहते. ॥६॥

तत्र अभिषिच्य शुचयः, - तेथे सरस्वतीवर स्नाने करून शुद्ध होऊ - उपोष्य सुसमाहिताः - आणि तीर्थोपवास करून आपली मने शांत करू (आणि) - स्नपन-आलेपन-अर्हणैः - देवतांस अभिषेक करून, गंधादिकांचे लेपन करू - देवताः पूजयिष्यामः - आणि पुष्पफलादि अर्पून देवतांची पूजा करू - कृतस्वस्त्ययनाः वयं - ब्राह्मणसाह्याने अरिष्टनिवारक शांत्यादि करून आपण - महाभागान् ब्राह्मणान् तु - महातपस्वी व भाग्यशाली ब्राह्मणांस - गो-भू-हिरण्य-वासोभिः - गायी, भूमि, सुवर्ण, वस्त्रे - गज-अश्व-रथ-वेश्मभिः - हत्ती, घोडे, रथ, गृहे इत्यादि दक्षिणेसह देऊन - च पूजयिष्यामः - देवांप्रमाणेच या भूदेवांची पूजा करू -॥७-८॥

हि - कारण - एषः विधिः - हा मी सांगितलेला विधि - अरिष्टघ्नः - अरिष्टांचा नाश करणारा - (व) - उत्तमं मंगलायनं - सर्व मंगल प्राप्त करून देणारा उत्तम उपाय आहे - देवद्विजगवां पूजा - देवांची, ब्राह्मणांची व गायींची पूजा - भूतेषु - प्राणिमात्रांस - परमः भवः - भावी परम उत्कर्षाचे स्वर्गलोकी उत्तम सुख भोगण्याचे फल देणारे साधन होय. ॥९॥

इति मधुद्विषः समाकर्ण्य - या प्रकारे झालेले मधुहा जो श्रीकृष्ण त्याचे भाषण सावधपणे ऐकून - सर्वे यदुवृद्धाः ‘तथा ’ इति - सर्व पोक्त व ज्ञानवृद्ध यादवांनी ‘ठीक आहे ’ असे म्हटले - नौभिः उत्तीर्य - नावांत बसून ते समुद्रपार गेले (व) - प्रभासं रथैः प्रययुः - पुढे रथांत बसून प्रभास क्षेत्राला गेले. ॥१०॥

तस्मिन्- त्या क्षेत्रामध्ये - भगवता यदुदेवेन आदिष्टं - भगवान् यदुपति जो श्रीकृष्ण त्याने आज्ञापिलेले - यादवाः - ते यादव - परमया भक्त्या - मोठया भक्तीने - सर्वश्रेयोपबृंहितं - सर्व श्रेय उत्पन्न करणारे, शांति, ब्राह्मणपूजा - चक्रुः - इत्यादि कर्म यथासांग संपादिते झाले. ॥११॥

ततः तस्मिन् - नंतर त्याच क्षेत्रामध्ये - यद्‌द्रवैः मतिः भ्रश्यते - ज्याच्या रसाने जीवांची बुद्धि भ्रष्ट होते - महापानं मधु मैरयेकं - पेयद्रव्यांतील महोन्मादक, महाग व गोड मैरेयक नावाचे मद्य - दिष्टविभ्रंशितधियः - दुर्दैवाने बुद्धिभ्रष्ट झालेले यादव - पपुः - प्याले. ॥१२॥

महापानाभिमत्तानां - अति मद्यप्राशनाने मत्त झालेले - दृप्तचेतनसां - स्वाभाविक असणार्‍य़ा गर्वाने फुगलेले - कृष्णमायाविमूढानां - आणि कृष्णाच्या मायेने मोहित झालेले - वीराणां - वीरांचा - सुमहान् संघर्षः अभूत् - आपसातच मोठा कलह होऊन वाढला व त्याचा परिणाम घनघोर युद्धात झाला. ॥१३॥

वेलायां - समुद्रकाठी - क्रोधसंरब्धाः - क्रोधाच्या वेगाने खवळून गेल्यामुळे - आततायिनः - अघोर कर्म करण्याला सिद्ध झालेले यादव - धनुभिः, असिभिः, - धनुष्यबाण, असि=खड्‌ग, - भल्लैः गदाभिः तोमरष्टिभिः - भाले, गदा, तोमर, ऋष्टि इत्यादि आयुधे घेऊन - युयुधुः - युद्ध करते झाले. ॥१४॥

पतत्पताकैः रथकुंजरादिभिः, - ज्यांच्यावरील निशाणे सारखी हालत होती अशा रथांच्या, - खर-उष्ट्र-गोभिः, महिषैः, - हत्तींच्या, त्याचप्रमाणे खर, उंट, बैल, रेडे, - नरैः अपि, अश्वतरैः - नरही (वेठीचे दास ?) यांच्यावर बसून आणि खेचरांच्या साह्याने - सुदुर्मदाः - ते मदोन्मत्त यादव - मिथः समेत्य - परस्परांस गाठून - शरैः न्यहन् - बाणांनी ताडन करिते झाले - वने द्विपाः दद्भिः इव - वनातील हत्ती जसे वनात आपल्या दंतसाह्याने लढतात, तसे हे लोक अविचाराने लढले. ॥१५॥

युधि रूढ-मत्सरौ प्रद्युम्नसांबौ, - युद्धारंभ झाल्यानंतर स्पर्धेला जोर चढून शीघ्रच प्रद्युम्न व सांब, - अक्रूरभोजौ, अनिरुद्धसात्यकी, - अक्रूर आणि भोज, अनिरुद्ध आणि सात्यकी, - सुभद्रसंग्रामजितौ, सुदारुणौ गदौ, - सुभद्र आणि संग्रामजित, महाभयंकर असणारे दोघे गदनामक यादव, - सुमित्रासुरथौ समीयतुः - सुमित्र व असुरथ यांच्यामध्ये भयंकर द्वंद्वयुद्धे झाली. ॥१६॥

ये वै अन्ये च - तसेच आणखी दुसरे - निशठ-उल्मुकादयः - निशठ‌उल्मुकप्रभृति - सहस्त्रजित्-शतजित्-भानुमुख्याः - सहस्त्रजित्, शतजित्, भानु हे ज्याचे अधिपति होते असे - मदांधकारिताः - मदाच्या अज्ञानाने आंधळे झालेल्या क्रुद्ध एडक्यांप्रमाणे - अन्योन्यं आसाद्य - एकमेकांस हटकून युद्ध करू लागले - मुकुंदेन विमोहिताः - कृष्णमोहामुळे अविचाराने वारंवार एकमेकांस - भृशं जघ्नुः - दृढ प्रहार करून. ॥१७॥

ते दाशार्ह-वृष्णि-अंधक-भोजसात्वताः, - दाशार्ह, वृष्णिक, अंधक, भोज, सात्वत, - मधु-अर्बुदाः, माथुरशूरसेनाः, - मधु, अर्बुद, माथुर, शूरसेन ह्या नऊ यादववंशातील लोक - विसर्जनाः, कुकुराः, कुंतयःच ततः - व विसर्जन कुकुर, कुंति या देशांतील यादव हे सर्व - अथ सौहृदं विसृज्य - पूर्व स्नेहाचा त्याग करून - मिथः - परस्परांशी. ॥१८॥

मूढाः एव - केवळ मूढच बनलेले - पुत्राः तु पितृभिः - मुलगे बापाशी - भ्रातृभिः च स्व यदौहित्रपितृव्यमातुलैः - बंधु-बंधुशी, मामा-भाच्याशी, आजे-नातवाशी, पुतणे-चुलत्याशी, भाचा-मामाशी - मित्राणि मित्रैः - मित्र मित्राशी - सुहृदः सुहृद्भिः - स्नेही स्नेह्याशी - अयुध्यन् - लढते झाले - ज्ञातयः ज्ञातीन् अहन् - ज्ञातींनीच ज्ञातींचा संहार चालविला. ॥१९॥

शरेषु क्षीयमाणेषु - बाण संपले - धन्वसु भज्यमानेषु - धनुष्ये मोडली - शस्त्रेषु क्षीयमाणेषु - शस्त्रे खलास झाली तेव्हा - मुष्टिभिः एरकाः जह्नुः - मुठीमध्ये एरका-लवाळ्याच्या काडयाच घेतल्या. ॥२०॥

मुष्टिना भृताः ताः (एरकाः) - मुठीमध्ये धारण केलेल्या त्या एरका - वज्रकल्पाः परिघाः - वज्रासारखे अभेद्य परिघ, लोहदंड - अभवन् हि - झाले - तैः द्विषः जघ्नुः - त्या लोहदंडांनी ते परस्परांवर चढाई करून परस्परांस मारू लागले - कृष्णेन वार्यमाणाः - कृष्ण निवारण करू लागला, असे करू नका म्हणून म्हणू लागला - ते तं च तु - ते यादव त्यालाच मारू लागले !. ॥२१॥

राजन् - राजा - मोहिताः (ते) - मुग्ध झालेल्या यादवांस - (तं) बलभद्रं च प्रत्यनिकं मन्यमानाः - कृष्ण व बलराम हेही प्रत्यनीक म्हणजे शत्रूसारखे वाटू लागले - हंतुं कृतधियः - त्या कृष्णबलरामास मारण्याचा निश्चय करून - आततायिनः आपन्नाः - ते आतताई त्या बंधूंवर चढाई करून गेले. ॥२२॥

अथ - नंतर - तौ अपि संक्रुद्धौ - ते रामकृष्ण सुद्धा संतापले, आणि - कुरुनंदन - राजा परीक्षिते ! - एरकामुष्टिपरिघौ उद्यम्य - एरकापूर्ण ज्या मुठी त्याचा लोहदंड करून त्या उभयांनी उचलल्या - युधि चरं तौ जघ्नतुः - रणांगणात संचार करून अनेक यादवांस ठार करते झाले. ॥२३॥

ब्रह्मशापोपसृष्टानां - ब्रह्मशापाने युक्त व घेरलेले - कृष्णमायाऽऽवृतात्मनां - कृष्णमायेने बुद्धिभ्रष्ट झालेल्या त्या यादवांचा - स्पर्धाक्रोधः - स्पर्धाजन्य क्रोध - क्षयं निन्ये - नष्ट करिता झाला - यथा वैणवः - वेणुघर्षणाने उत्पन्न झालेला - अग्निः वनं - अग्नि सर्व वेळुवन दग्ध करतो, त्याप्रमाणे. ॥२४॥

एवं - याप्रकारे - स्वेषु सर्वेषु कुलेषु नष्टेषु - आपले सर्व यादवकुल नष्ट झाले तेव्हा - अवशेषितः भुवः भारः अवतारितः - भारतीयुद्धानंतर अवशिष्ट राहिलेला भूमीचा भार उतरला - इति - असे - केशवः मेने - केशवाला, कृष्णाला वाटले. ॥२५॥

(नंतर) समुद्रवेलायां पौरुषं योगं आस्थाय - समुद्राचे तीरी पौरुष योगाची धारणा करून - आत्मानं आत्मनि संयाज्य - शुद्ध अंतःकरणात राहणारा आपला आत्मा परमात्मास्वरूपी मिळवून-परमात्मरूप होऊन - रामः मानुष्यं लोकं तत्याज - श्रीबलरामाने मनुष्यदेहासकट मनुष्यलोकाचा त्याग केला. ॥२६॥

रामनिर्याणं आलोक्य - बलराम निजधामास गेला असे पाहून - भगवान् देवकीसुतः - देवकीनंदन श्रीकृष्ण भगवान् - घरोपस्थे पिप्पलं आसाद्य - तेथीलच एक अश्वत्थ वृक्ष गाठून त्याच्या खाली जमिनीवर - तूष्णीं निषसाद - स्वस्थ, निष्क्रिय, समाधि लावून बसला. ॥२७॥

भ्राजिष्णु चतुर्भुजं रूपं बिभ्रत् - दैदीप्यमान असे चतुर्भुजरूप धारण करणारा - स्वया प्रभया - आपल्या स्वतःच्या तेजाने - दिशः वितिमिराः कुर्वन् - दाही दिशांतील अंधकार नष्ट करून - विधूमः पावकः इव - धूर नाहीसा केलेल्या अग्नीप्रमाणे. ॥२८॥

श्रीवत्सांकं, - श्रीवत्साने सुशोभित, - घनश्यामं, - सजल मेघश्याम, - तप्तहाटकवर्चसं, - तापविलेल्या सुवर्णासारखे तेजस्वी, - कौशेयांबरयुग्मेन, परिवीतं, सुमंगलं - पीतांबर द्वय धारण करणारे, अत्यंत मंगलकारी. ॥२९॥

सुंदरस्मितवक्‌त्राब्जं, - फुललेल्या कमलासारखे सुहास्यवदन, - नीलकुंतलमंडितं, - निळ्या कुरळ केशांनी अलंकृत, - पुंडरीकाभिरामाक्षं, - पुंडरीकनामक कमलाप्रमाणे सुंदर नेत्र असणारे, - स्फुरन्मकरकुंडलं - कर्णांत मकरकुंडले तळपत असलेले. ॥३०॥

कटिसूत्र-ब्रह्मसूत्र-किरीट-कटक-अंगदैः, - कटिसूत्र=कटिदोरा, यज्ञोपवीत, मुकुट, कडी, तोडे, पोची, - हारनूपुर-मुद्राभिः, - हार-तोरडया, मुद्रिका, - कौस्तुभेन विराजितं - कौस्तुभमणि इत्यादि भूषणांनी विराजीत. ॥३१॥

वनमालापरीतांगं, - तुळशीच्या माळांनी - मूर्तिमद्भिः निजायुधैः (परीतागं), - व तेजस्वी मूर्त धरणार्‍या आयुधांनी आपाद सुशोभित असणारे - पंकजारुणं पादं दक्षिणे - आणि दक्षिण मांडीवर आरक्त वर्ण वामपाद ठेवलेले - ऊरौ कृत्वा आसीनं - असे सर्वांगसुंदर ध्यान, कृष्ण निजधामास जाणार तेव्हा प्रकट झाले. ॥३२॥

मृग-आस्य-आकारं - मृगाच्या तोंडाच्या आकाराचा - चरणं मृगशंकया - तो चरण मृगच होय अशा शंकेने - मुसलावशेषायः - दुसर्‍या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मुसळाचा - खंडकृतेषुः - न पीठ होणारा जो लोखंडाचा भाग त्याचाच केला आहे बाण ज्याने अशा - ‘जरा’ लुब्धकः - जरा नावाच्या लुब्धकाने - तत् विव्याध - त्या मृगतुल्य चरणावर नेम धरून तोच बाण मारला. ॥३३॥

(परंतु) चतुर्भुजं तं पुरुषं दृष्ट्‌वा - चतुर्भुज मनुष्यपुंगव कृष्ण आहे असे पाहून - कृतकिल्बिषः सः भीतः - मनुष्यवधाचे पातक करणारा तो व्याध भ्याला - असुरद्विषः - असुरशत्रु जो कृष्ण - पादयोः शिरसा पपात - त्याच्या पायावर त्याने शिरसाष्टांग नमस्कार घातला. ॥३४॥

मधुसूदन - हे मधुसूदना - पापेन अजानता इदं कृतं - मज पाप्याकडून न जाणता हे पातक घडले आहे - उत्तमश्लोक अनघ - हे पुण्यश्लोक निष्पाप देवा - पापस्य मे क्षंतुं अर्हसि - मज पाप्याला क्षमा करण्यास आपण समर्थ आहा. ॥३५॥

प्रभो - देवा - यस्य अनुस्मरणं नृणां - ज्याचे नुसते स्मरण करणार्‍या पुरुषांची - अज्ञानध्वांतनाशनं वदंति - पातके व अज्ञानरुपी अंधकार ही नष्ट होतात असे म्हणतात - तस्य ते - त्या तुझा - विष्णो - हे कृष्णा - मया असाधु कृतं - मी फार मोठा अपराध केला आहे. ॥३६॥

तत् - म्हणून - वैकुंठ - हे वैकुंठवासी देवा - मृगलुब्धकं पाप्मानं मा आशु जहि - मृगहत्या करणारा जो मी पापी त्या माझा तू लवकर वध कर - यथा - म्हणजे - पुनः तु एवं सदतिक्रमं अहं न कुर्यां - पुनः अशा प्रकारचा अन्याय माझ्या हातून होणार नाही. ॥३७॥

यस्य आत्मयोगरचितं - ज्या त्वद्वश असणार्‍या तुझ्या मायेने विरचित जो हा अद्‌भुत दृश्यादृश्य प्रपंच - विरिंच - ब्रह्मदेवाला - अस्य तनयाः - ब्रह्मदेवाच्या पुत्रांना - रुद्रादयः - रुद्रदि देवतांना - ये गिरां पतयः - आणि ज्यांस वाणी वश असते, अशा वेदद्रष्ट्यांसही - न विदुः - समजला नाही - त्वन्मायया पिहितदृष्टयः - तुझ्या मायेमुळे मूढ झाली आहे बुद्धदृष्टि ज्यांची असे - असद्‌गतयः वयं - पापयोनीत जन्मून पापगतीलाच जाणारे आम्ही - तस्य ते एतत् - त्या तुज प्रभूचे हे - अंजः गृणीमः किं - ब्राह्मणशापादि कृत्य सहज समजेल किंवा वर्णन करिता येईल काय ?॥३८॥

जरे ! त्वं मा भैः - जरानामक व्याधा ! तू भिऊ नकोस - उत्तिष्ठ - उठ - एष मे कामः कृतः हि - कारण मला जे अभिष्ट तेच तू केले आहेस - मदनुज्ञातः - मी आज्ञा करितो की - त्वं सुकृतिनां पदं स्वर्गं याहि - देह टाकून पुण्यवंतांचे स्थान अशा स्वर्गाप्रत तू जा. ॥३९॥

भगवता इच्छाशरीरिणा - इच्छामात्रे करून शरीर धारण करणार्‍या - कृष्णेन इति आदिष्टः - किंवा इच्छा हेच शरीर ज्याचे अशा भगवान् कृष्णाची आज्ञा मान्य करणारा तो व्याध - त्रिः परिक्रम्य - तीन प्रदक्षिणा करून - तं नत्वा - कृष्णाला नमस्कार करून - विमानेन दिवं ययौ - विमानात बसून स्वर्गाला गेला. ॥४०॥

कृष्णपदवीं अन्विच्छन् - श्रीकृष्णचरणांचा शोध करणार्‍या - दारुकः - दारुक सारथ्याला - तुलसिकामोदं वायुं आघ्राय - तुलसीपत्रांच्या सुगंधवाहक वायूच्या अवघ्राणावरून - तां अधिगम्य - ती जागा सापडली - अभिमुखं ययौ - तो सन्मुख येऊन उभा राहिला. ॥४१॥

तत्र हि अश्वत्थमूले - तेथे त्या अश्वत्थवृक्षाखाली - कृतकेतनं - ज्याने आपली बैठक घातली आहे - तं तिग्मद्युभिः आयुधैः - व ज्याची सर्व लखलखीत सुदर्शनादि तीक्ष्ण आयुधे - वृतं पतिं - जवळ आहेत असा तो आपला धनी पाहून - बाष्पलोचनः - अश्रूंनी ज्याचे नेत्र डबडबले आहेत असा - सः - तो दारुक - रथात् अवप्लुत्य - रथातून खाली उडी घेऊन - स्नेहप्लुतात्मा - स्नेहाने भिजून गेले आहे अंतःकरण ज्याचे अशा त्या दारुकाने - पादयोः निपपात - कृष्णाच्या पायांवर लोटांगण घातले. ॥४२॥

प्रभो - हे जगन्नाथा - त्वच्चरणांबुजं अपश्यतः (मे) दृष्टिः - तुझी चरणकमले दिसेनाशी झाली तेव्हापासून माझी ज्ञानदृष्टि - तमसि प्रविष्टा प्रनष्टा - अज्ञानात शिरली व नाहीशी झाली आहे - दिशः न जाने - मला कर्तव्याअकर्तव्याची दिशा समजत नाही - शांतिं च न लभे - माझी शांतीही या अज्ञानाने नाहीशी झाली आहे - यथा निशायां उडुपे प्रनष्टे - रात्रौ उडुप=चंद्र त्याचा अस्त झाल्यावर दृष्टि नाहीशी होते. ॥४३॥

इति सूते ब्रुवति वै - अशी दारुक आपली हकीकत सांगत आहे तोच - राजेंद्र - नृपनाथा - साश्वध्वजः गरुडलांछनः रथः - तो गरुडांकित रथ घोडे व ध्वज यांसकट - उदीक्षतः खमुत्पपात - त्या दारुकाच्या देखत देखत उडून स्वर्गास गेला. ॥४४॥

तं दिव्यानि विष्णुप्रहरणानि च अन्वगच्छन् - त्या रथाच्या मागोमाग विष्णूची दिव्य शस्त्रास्त्रेही स्वर्गी गेली - तेन अतिविस्मितात्मानं - ते पाहून अत्यंत विस्मय पावलेल्या - सूतं - दारुक सारथ्याला - जनार्दनः आह - जनार्दन म्हणाला. ॥४५॥

सूत - हे दारुका - द्वारवतीं गच्छ - द्वारकेस जा - ज्ञातीनां मिथः निधनं - यादवांनी केलेल्या यादवीत झालेला सर्वांचा संहार - संकर्षणस्य निर्याणं - बलरामाचे महाप्रयाण - मद्दशां - माझी ही दशा म्हणजे माझ्या स्थूलशरीराची मुमूर्षता - बंधुभ्यः ब्रूहि - राहिलेल्या यादव बंधूंना सांग. ॥४६॥

स्वबंधुभिः च - आणि आपल्या बंधूंसहित - भवद्भिः द्वारकायां च न स्थेयं - द्वारकेत कोणीही राहू नये; त्यास घेऊन बाहेर पडावे - मया त्यक्तां - मी सोडून दिलेल्या - यदुपुरीं समुद्रः प्लावयिष्यति - द्वारकेला समुद्र लवकरच बुडविणार आहे. ॥४७॥

(म्हणून) स्वं स्वं परिग्रहं - आपआपल्या कुटुंबांना - नः पितरौ च - आमच्या वडिलांनाही - आदाय - बरोबर घेऊन - सर्वे इंद्रप्रस्थं गमिष्यथ - तुम्ही सर्व यादव इंद्रप्रस्थाला जा - अर्जुनेन अविताः सर्वे - मार्गामध्ये अर्जुन तुम्हा सर्वांचे सर्वकाळ रक्षण करील. ॥४८॥

त्वं तु - पण दारुका ! तू स्वतः - मद्धर्मं आस्थाय - मी सांगितलेल्या धर्माचा आश्रय करून तेथे स्थित झालास म्हणजे - ज्ञाननिष्ठः, उपेक्षकः - ज्ञानयोगाने ज्ञानी आणि सुखदुःखांची उपेक्षा करणारा होशील - एतां मन्मायारचनां विज्ञाय - ही सर्व माझ्या मायेची रचना आहे, लीला आहे असे जाणून - उपशमं व्रज - समाधानस्थिति प्राप्त करून घेशील. ॥४९॥

इति उक्तः - अशी आज्ञा झालेला तो दारुक - तं परिक्रम्य, पुनः पुनः नमस्कृत्य - कृष्णाला प्रदक्षिणा घालून व वारंवार नमस्कार करून - तत्पादौ शीर्ष्णि उपाधाय - त्याचे पाय आपल्या मस्तकावर ठेऊन - दुर्मनाः पुरीं प्रययौ - विमनस्क होऊन द्वारकेला गेला. ॥५०॥

अध्याय तिसावा समाप्त

GO TOP