|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २९ वा - अन्वयार्थ
भागवत धर्मांचे निरूपण आणि उद्धवाचे बदरिकाश्रमाला जाणे - अनात्मनः - ज्याने मनोजय केला नाही त्याच्या हातून - इमां योगचर्यां - हे तू सांगितलेले योगाचरण - सुदुष्करां मन्ये - घडणे अत्यंत कठीण आहे, असे वाटते - अच्युत - श्रीकृष्णा - यथा अंजसा पुमान् सिद्धयेत् - ज्या प्रकाराने अथवा प्रक्रियेने कोणत्याही पुरुषाला अंजसा म्हणजे सुलभ रीतीने सिद्धी मिळेल - तत् - तो प्रकार व ती प्रक्रिया - मे अंजसा ब्रूहि - मला सहज समजेल अशा रीतीने सांग. ॥१॥ पुंडरीकाक्ष - कमलनयन श्रीकृष्णा - प्रायशः - बहुधा - मनः युंजंतः योगिनः - मनाचा निग्रह करून त्याला ज्ञानप्रवण करणारे योगी - मनोनिग्रहकर्शिताः - मनोनिग्रहाच्या श्रमाने थकले जातात - असमाधानात् विषीदन्ति - मन शांत न झाल्यामुळे असमाधानी होऊन खिन्न होतात. ॥२॥ अथ अतः - म्हणूनच - अरविंदलोचन - कमलाक्ष देवा - हंसाः - सत्याअसत्याचा विवेक करणारे, सारासार निवडणारे भक्तरूपी हंस - आनंददुधं पदांबुजं - तुझे आनंदमात्र स्रवणारे जे पदकमल त्याचा आश्रय करितात, - सुखं नु श्रयेरन् - तुझ्या पदकमलाची निश्चित्सुखाने सेवा करतात - विश्वेश्वर - विश्वपते - योगकर्मभिः - त्वद्भक्तिशून्य योगांनी व कर्मांनी - अमीमानिनः - हे उन्मत्त झालेले योगी - न - तुझ्या पादांबुजाचा आश्रय करीत नाहीत - त्वन्मायया विहताः - तुझ्या मायेने जिंकले गेल्यामुळे तिलाच वश होतात. ॥३॥ अच्युत ! अशेषबंधो - अखिल जीवांस साह्य करणार्या परमेश्वरा - अनन्यशरणेषु दासेषु - अनन्य शरण आलेले जे तुझे भक्त त्यासंबंधाने - यत् तव आत्मसात्त्वं - तुझे जे आत्मसात्त्व म्हणजे दासांचे दासपण तू स्वीकारतोस - एतत् किं चित्रं - त्यात आश्चर्य कसले ? - ईश्वराणां श्रीमत्किरीट - ब्रह्मदेव इंद्रप्रभृति देवदेवांचे जे पृथ्वीमोलाचे मुकुट, - तटपीडित - त्यांच्या तटांनी-अग्रांनी, पीडित-घासले गेले आहे, - पादपीठः स्वयं (सन्) - पादपीठ-पाय ठेवण्याची बैठक ज्याची असा सर्वेश्वर जो स्वतः श्रीमान् परमेश्वर तू त्या तुला - मृगैः सह यः अरोचयत् - सुग्रीव-हनुमंतादि वानरांशीही श्रीरामअवतारी सख्य करणे जर रुचते. ॥४॥ आश्रितानां सर्वार्थपदं - आश्रित जे भक्त त्यांचे सर्व हेतु पूर्ण करणारा - अखिलात्मदयितेश्वरं - अखिल विश्वाचा आत्मा व प्रियतम - सेवा करण्यास योग्य असणारा असा जो तू ईश्वर - तं त्वा - त्या तुझा - कः स्वकृतवित् विसृजेत नु ? - त्वदुपकार जाणणारा कोणता भक्त त्याग करील बरे ? - भूत्यै - भूत्यै म्हणजे सांसारिक उत्कर्ष प्राप्त करून घेण्यासाठी मात्र व - अनु विस्मृतये - अनु म्हणजे तो प्राप्त झाल्यानंतर विस्मृतये म्हणजे तुझे विस्मरण होण्यासाठी मात्र - कः वा किं अपि भजेत् ? - परमेश्वरा ! तुझी भक्ति कोणता बरे समंजस्य भक्त करील ? - तव पादरजोजुषां नः - तुझ्या पायाचे रज म्हणजे धूली, तिचे सेवन करणारे जे आम्ही त्या आम्हास - किं वा न भवेत् - कोणता बरे पुरुषार्थ साध्य होणार नाही ?. ॥५॥ ईश - विश्वस्वामिन - ब्रह्मायुषा अपि - ब्रह्मदेवाचे अति दीर्घ आयुष्य प्राप्त झालेले असले तरी - तव कृतं स्मरंतः ऋद्धमुदः कवयः - तुझे अनंत उपकार स्मरणारे व वृद्धींगत झालेल्या आनंदाचा उपभोग घेणारे जे उत्तमोत्तम ज्ञानी त्यांस - अपचितिं न एव उपयंती - तुझ्या उपकारांची फेड झाली, असे अनृणतव कधीच प्राप्त होत नाही - तनुभृतां - शरीरी जे तुझे भक्त त्यांची - अंतर्बहिः आचार्यचैत्यवपुषा - आचार्य म्हणजे गुरुरूपाने बाहेरील, आणि चैत्य म्हणजे अंतर्यामी रूपाने आतील, सारांश अंतर्बाह्य, - अशुभं विधुन्वन् - अशुभे-विषयवासना निरसून - यः स्वगतिं व्यनक्ति - त्याच अंतर्बाह्य गुरुचैत्यरूपाने आत्मरुप साक्षात्कृत करणारा जो तू - त्या तुझे उपकार फिटतच नाहीत. म्हणून भक्तांनी आत्मसर्वस्व तुलाच अर्पिले पाहिजे. ॥६॥ अत्यनुरक्तचेतसा उद्धवेन इति पृष्टः - ईश्वरावर निरतिशय प्रेम करणारे ज्याचे चित्त त्या उद्धवाने ज्याला प्रश्नरूपी वरील विनंती केली - जगत्क्रीडनकः, - जो जगताची उत्पत्यादी कर्में करून लीला करणारा, - स्वशक्तिभिः - स्वतःच्या शक्तींनी म्हणजे सत्त्वदि गुणत्रयानेच - गृहीतमूर्तित्रयः, ईश्वरेश्वरः सः - जो ब्रह्मा, विष्णु, शंकर यांची स्वरूपे धारण करणारा तो ईश्वरेश्वर, देवांचाही देव श्रीकृष्ण - प्रेम-मनोहरस्मितः - प्रेमपूर्ण असल्यामुळे रमणीय असणारे हास्य करून - जगाद - बोलता झाला. ॥७॥ हंत मम सुमंगलान् धर्मान् ते कथयिष्यामि - शाबास उद्धवा ! माझे मंगलकारी भागवतधर्म मी तुला सांगतो ऐक - यान् श्रद्धया आचरन् - ज्यांचे श्रद्धेने आचरण केले असता - दुर्जयं मृत्युं - दुर्जय जो मृत्यु त्याच्यावर - मर्त्यः जयति - मनुष्यास जय मिळतो. ॥८॥ शनैकेः (मां) स्मरन् - दक्षतेने व सावधान मनाने माझे स्मरण ठेऊन - सर्वाणि कर्माणि मदर्थं कुर्यात् - यच्चयावत् सर्व कर्में मत्प्रीत्यर्थ करावी - मयि अर्पितमनश्चित्तः - माझ्या ठिकाणी मात्र संकल्पविकल्पात्मक मन व अनुसंधान ठेवणारे चित्त ही अर्पावी - मद्धर्मात्ममनोरतिः - मत्संबंधी धर्मामध्येच स्वतःचे मन रंगवावे. ॥९॥ साधुभिः मद्भक्तैः श्रितान् - पुण्यकारी जे माझे भक्त त्यांनी अलंकृत झालेली - पुण्यान् देशान् आश्रयेत - जी पुण्यक्षेत्रे त्यांचे दर्शन घ्यावे, तेथे वास्तव्य करावे - देव-असुर-मनुष्येषु - देवांमध्ये, राक्षसांमध्ये, मनुष्यांमध्ये - मद्भक्ताचरितानि च (आश्रयेत) - जे माझे महाभक्त झाले, त्यांनी केलेल्या कर्मांचाही आश्रय करावा. ॥१०॥ पृथक्, सत्रेणा वा - प्रत्येकाने किंवा अनेकजण मिळून - गीतनृत्याद्यैः महाराजविभूतिभिः कारयेत् - मत्प्राप्त्यर्थ गीतनृत्यप्रभृति महाराजोपचारांनी - पर्वयात्रामहोत्सवान् - पर्वे, यात्रा व महोत्साहप्रसंगी - मह्यं - मला - (महापूजा बांधाव्या). ॥११॥ सर्वभूतेषु बहिः अंतः - सर्व चराचरांस आत व बाहेर व्यापून - अपावृतं अमलाशयः मां एव ईक्षेत - मीच उघड एक स्पष्ट आहे असे चित्त शुद्ध झालेल्या भक्ताने पाहावे - च - आणि - आत्मनि आत्मानं - अंतरंगीही आत्मा मीच आहे, असे त्याने पाहावे - यथा खं - ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापी असते. ॥१२॥ महाद्युते - श्रेष्ठ ज्ञानी उद्धवा - इति - याप्रकारे - केवलं ज्ञानं आश्रितः - त्याची केवल ज्ञानदृष्टीच ज्ञानाचा आश्रय असल्यामुळे झाली म्हणून - मद्भावेन सर्वांणि भूतानि मन्यमानः - सर्व भूतांच्या ठिकाणी मला पाहणारा मद्भक्त - सभाजयन् - सर्व भूतांचा सत्कार करतो. ॥१३॥ ब्राह्मणे पुल्कसे, स्तेने ब्रह्मण्ये, अर्के - ब्राह्मण व अंत्यज, धनदाता व धनहर्ता, सूर्याप्रमाणे तेजस्वी दीर्घजीवी - स्फुलिंगके अक्रुरे क्रूरके च - व अग्निस्फुलिंगाप्रमाणे क्षणभंगुर, अक्रूर व क्रूर - एव समदृक् पंडितः मतः - या विषम असणार्यांस जो समतेने वागवितो तोच खरा पंडित म्हणजे आत्मवेत्ता होय. ॥१४॥ अभीक्ष्णं नरेषु मद्भावं भावयतः पुंसः - वारंवार किंवा नित्य जो पुरुष इतरांमध्ये माझे स्वरूप पाहतो त्याचे - साहंकाराः स्पर्धा-असूया-तिरस्काराः - स्पर्धा, मत्सर, तिरस्कार इत्यादि सर्व दुष्ट विकार अहंकारसुद्धा - अचिरात् वियंति हि - वियंति म्हणजे लवकरच नष्ट होतात. ॥१५॥ स्मयमानान् स्वान् - उपहासक स्वकीय - च - आणि - दैहिकीं दृशं व्रीडां - देहदृष्टीने उत्पन्न होणारी लज्जा - विसृज्य - सोडून देऊन - भूमौ दंडवत् आश्वचांडालगोखरं प्रणमेत - कुत्रा, चांडाल, गाय, गाढव यांस म्हणजे सर्वांस साष्टांग नमस्कार घालावा. ॥१६॥ यावत् सर्वेषु भूतेषु मद्भावः न उपजायते - जोपर्यंत भूतमात्राचे ठायी माझे ईश्वररूपच आहे, अशी भावना उत्पन्न होत नाही - तावत् - तोपर्यंत - वाङ्मनःकायवृत्तिभिः एवं उपासीत - मद्भक्ताने आताच सांगितल्याप्रकारे वाणीने, मनाने व शरीराने उपासना चालू ठेवावी. ॥१७॥ तस्य आत्ममनीषया विद्यया - याप्रमाणे उपासना करणार्या भक्ताला सर्वत्र ईश्वर पाहण्याची जी विद्या प्राप्त होते, - सर्वं ब्रह्मात्मकं परिपश्यन् - त्या विद्येने सर्व ब्रह्ममय असे तो पाहू लागतो - मुक्तसंशयः सर्वतः उपमरेत् - निःसंदेह झाल्यानंतर त्याने उपरमावे म्हणजे कर्म संन्यास करावा. ॥१८॥ सर्वभूतेषु मनो-वाक्-कायनिवृत्तिभिः मद्भावः - सर्व भूतांचे ठिकाणी मानसिक, वाचिक, व कायिक वृत्तींनी माझे स्वरूप पाहणे - अयं (कल्पः) - हा उपाय - सर्व कल्पांना - सर्व उपायांत - सध्रीचीनः हि - श्रेष्ठतर होय - मम मतः - असा माझा सिद्धांत आहे. ॥१९॥ अंग उद्धव ! - कारण, उद्धवा ! - अनाशिषः मद्धर्मस्य - मी स्थापिलेल्या निष्काम धर्मामध्ये - उपक्रमे अणु अपि ध्वंसः न हि - उपक्रमादि कसलेही ध्वंसात्मक वैगुण्य नाही - निर्गुणत्वात् मया सम्यक् व्यवसितः - निर्गुण जो मी त्यानेच हा धर्म उत्तम प्रतीच्या व्यवस्थेने निश्चित करून ठेवला आहे. ॥२०॥ सत्तम ! भयादेः इव निरर्थः यः यः आयासः - भक्तश्रेष्ठ उद्धवा ! भयशोकासारखा जो जो निष्फल आयास - मयि परे निष्फलाय कल्प्यते चेत् - माझ्या ठिकाणी निष्काम बुद्धीने अर्पण केला तर - सः तदा - तो त्या वेळी - धर्मः स्यात् - धर्मस्वरूपच होतो. ॥२१॥ इह - ह्या जगामध्ये - अनृतेन मर्त्येन - मिथ्या व विनाशी अशा मनुष्यशरीराच्या योगे - सत्यं अमृतं मा - सत्य व अविनाशी सुखरूप अशा माझी - यत् आप्नोति - जी प्राप्ती करून घेणे - एषा बुद्धिमतां बुद्धिं - हेच विवेकवंतांच्या विवेकाचे - मनीषिणां च मनीषा - व कुशलांच्या कौशल्याचे स्वरूप होय. ॥२२॥ एषः कृत्स्र्नः ब्रह्मवादस्य संग्रहः - हा कृत्स्र्नः =सर्व ब्रह्मवादाचा संग्रह - समासव्यासविधिना - संक्षेपतः व विस्तारशः या दोन्ही पद्धतीनी - ते अभिहितः - तुला सांगितला - देवानां अपि दुर्गमः - हा संग्रह देवांसही दुर्लभ आहे. ॥२३॥ विस्पष्टयुक्त्तिमत् - स्पष्ट व निःसंदिग्ध युक्तींनी परिपूर्ण असे - ज्ञानं ते अभीक्ष्णशः गदितं - लौकिक ज्ञान तुला वारंवार उपदेशिले आहे - एतत् विज्ञाय - याचे विज्ञान झाल्यावर - नष्टसंशयः पुरुषः मुच्येत - पुरुष निःसंदेह होऊन मुक्त होतो. ॥२४॥ मया तव प्रश्नं सुविविक्तं - मी तुझ्या प्रश्नाचे जे सविस्तर उत्तर दिले - एतत् अपि धारयेत् - त्या या उत्तराचेच जो अनुसंधान ठेवील - सनातनं ब्रह्मगुह्यं - वेदांमध्येही रहस्यरूपाने असणार्या सनातन - परं ब्रह्म अधिगच्छति - परब्रह्माची प्राप्ति करून घेईल. ॥२५॥ यः मम भक्तेषु - जो कोणी माझ्या भक्ताला - एतत् सुपुष्कलं संप्रदद्यात् - हे ज्ञानाचे प्रकरण उत्तम रीतीने समजून सांगेल - तस्य ब्रह्मदायस्य - त्या ब्रह्मज्ञानदात्याला - अहं - मी - आत्मानं आत्मना ददामि - स्वतःचा आत्मा देतो, मत्स्वरूप करतो. ॥२६॥ यः एतत् पवित्रं, परमं शुचि समधीयीत - जो कोणी या पवित्र आणि परम शुद्ध ज्ञानाचे मोठमोठयाने अध्ययन करील - सः अहः अहः ज्ञानदीपेन - तो प्रतिदिवशी ज्ञानरूप दीपाने - मां दर्शयन् पूयेत - माझे दर्शन घेणारा व इतरांसही त्या दर्शनाचा लाभ देणारा स्वतः परमशुद्ध होतो. ॥२७॥ यः नरः एतत् श्रद्धया - जो कोणी या ज्ञानाख्यानाचे श्रद्धेने - नित्यं अव्यग्रः शृणुयात् - नित्य स्थिर चित्ताने श्रवण करील - मयि परा भक्तिं कुर्वन् - माझ्या ठायी परमभक्ति ठेवणारा होऊन - सः कर्मभिः न बध्यते - त्याला कर्माचे बंधन मुळीच असत नाही. ॥२८॥ उद्धव सखे - परममित्रा उद्धवा - अपि त्वया ब्रह्म समवधारितं - तुला हे ब्रह्म व ब्रह्मज्ञान चांगले समजले आहे ना - अपि ते मनोभवः मोहः विगतः - तुझा मनोजन्य मोह सर्वस्वी गेला ना - असौ शोकः च - आणि तो शोकही नाहीसा झाला ना. ॥२९॥ त्वया एतत् - तू हे - दांभिकाय, नास्तिकाय, शठाय - दांभिक, नास्तिक, शठ=लबाड - अशुश्रूषोः अभक्ताय - ऐकण्याची इच्छा नसणारे अभक्त व - दुर्विनीताय च न दीयताम् - उन्मत्त अशा लोकांस ज्ञानाचे आख्यान कधीही सांगू नये. ॥३०॥ एतैः दोषैः विहीनाय - हे दोष ज्यात नाहीत अशा - ब्रह्मण्याय प्रियाय च - वेदाभिमानी व मला प्रिय असणार्या - साधवे, शुचये ब्रूयात् - साधु व शुद्धवर्तनी पुरुषाला हे ज्ञानदान करावे - शूद्रेयोषितां भक्तिः स्यात् - तसेच शूद्र व स्त्रिया मजवर प्रेम करीत असतील तर त्यांसही हे ज्ञानदान करावे. ॥३१॥ एतत् विज्ञाय - हे ज्ञानाचे आख्यान समजल्यानंतर - जिज्ञासोः - ज्ञानेच्छु पुरुषाला - ज्ञातव्यं - जाणावयाचे असे - न अवशिष्यते - दुसरे काही शिल्लकच उरत नाही - पीयूषं अमृतं पीत्वा - गोड अमृताचे पान केल्यावर - पातव्यं न अवशिष्यते - पिण्याचे दुसरे काहीच उरत नाही. ॥३२॥ ज्ञाने, कर्मणि, योगे च, वार्तायां, दंडधारणे - ज्ञान, कर्म, योग वार्ता म्हणजे शेतकीव्यापारप्रभृति वृत्ति, दंडधारण=राजकारण, या सर्वांमध्ये - नृणां - पुरुषांस - यावान् अर्थः - जो जो अर्थ म्हणजे प्राप्तव्य असते - तात - उद्धवा - तावान् चतुर्विधः ते अहं - तो तो चारी प्रकारचा अर्थ मीच प्रत्यक्ष तुजजवळ आहे. ॥३३॥ यदा त्यक्तसमस्तकर्मा - सर्व कर्माचा संन्यास करून - निवेदितात्मा - मला ज्याने आत्मसर्वस्व अर्पिले आहे अशा - मर्त्यः - मनुष्याला - मे - मी - विचिकीर्षितः - सर्वोत्कृष्ट स्थान प्राप्त करून देण्याचे त्याचे इच्छेनुरूप योजितो - तदा - तेव्हा - अमृतत्वं प्रतिपद्यमानः - मोक्षप्रवण असलेल्या त्या भक्ताला - मया आत्मभूयाय च वै कल्पते - मीच आपले स्वरूप, सायुज्यता, मुक्ति मिळविण्यास त्याला निश्चित रूपाने योग्य करतो. ॥३४॥ एवं आदर्शितयोगमार्गः - या प्रमाणे दाखविला आहे योगमार्ग ज्याला असा - सः - तो उद्धव - तदा - त्यावेळी - उत्तमश्लोक कवचः निशम्य - उत्तम म्हणजे पुण्यकारक आहे श्लोक म्हणजे कीर्ती ज्याची अशा श्रीकृष्णाचे ते आत्मयोगसाधक भाषण ऐकून - बद्धांजलिः - बद्धांजलि होऊन - प्रीत्युपरुद्धकंठः - प्रेमाने भरून आला आहे कंठ ज्याचा असा - अश्रुपरिप्लुताक्षः - अश्रूंनी ओले चिंब झाले नेत्र ज्याचे असा - न किंचित् ऊचे - काही वेळ स्तब्ध झाला. ॥३५॥ राजन् - हे राजा - धैर्येण प्रणयावघूर्णं चित्तं विष्टभ्य - प्रेमातिशयाने क्षुब्ध झालेल्या चित्ताला धैर्याने विष्टभ्य म्हणजे शांत करून - बहुमन्यमानः - आपणाला कृतार्थ मानणारा उद्धव - शीर्ष्णा तच्चरणारविंदं स्पृशन् - मस्तकाने भगवंताच्या चरणाला स्पर्श करून - कृतांजलिः - हात जोडून - यदुप्रवीरं प्राह - यदुराणा जो कृष्ण त्याला म्हणाला. ॥३६॥ अजाद्य - अज जो ब्रह्मदेव त्याच्याही आद्या म्हणजे जनका - यः मे मोहमहांधकारः आश्रितः - ज्या मोहोत्पन्न महाअंधकाराला मी आश्रय दिला होता - तव सन्निधानात् विद्रावितः - तुझ्या स्वयंप्रकाशी समागमानेच पार नाहीसा झाला आहे - विभावसोः समीपगस्य शीतं, तमः, भीः, प्रभवंति किं नु ? - तेजःपूर्ण अग्नि सन्निध असणार्यास थंडी, अंधेर, भीति ह्या कशाने ?॥३७॥ अनुकंपिना भवता - दयाघन जो तू त्या तू - भृत्याय मे - तुझ्या दासाला, मला - विज्ञानमयः प्रदीपः प्रत्यर्पितः - ज्ञानविज्ञानपूर्ण असा तेजस्वी दीप पुनः अर्पण केला - तव कृतज्ञः कः - तुझ्या उपकाराची जाणीव असणारा मी - त्वदीयं पादमूलं हित्वा - तुझे चरण सोडून - अन्यत् शरणं समीयात् - दुसर्याला शरण जाईन काय ?. ॥३८॥ सृष्टिविवृद्धये - सृष्टीच्या वाढीसाठी - त्वया स्वमायया - तू आपल्या मायेला पुढे करून - दाशार्ह-वृष्णि-अंधक-सात्त्वतेषु - दाशार्ह, वृष्णि, अंधक, सात्त्वत या यादवकुलांसंबंधाने - सुदृढः प्रसारितः मे स्नेहपाशः - सुटण्यास कठीण आणि फार पसरलेला माझ्या अंतःकरणात मायापाश होता तो - आत्मसुबोधहेतिना हि वृक्णः च - तुझ्या उत्तम व तीक्ष्ण आत्मज्ञानरूपी खड्गाने छिन्नविच्छिन्न केला आहे. ॥३९॥ ते नमः अस्तु - तुला प्रणिपात करतो - महायोगिन् - योगेश्वरा - यथा त्वच्चरणांभोजे अनपायिनी (मे) रतिः स्यात् - तुझ्या चरणकमलाचे ठिकाणी माझे प्रेम अखंड राहील असा - प्रपन्नं मां अनुशाधि - शरण आलेल्या मला बोध कर. ॥४०॥ उद्धव - उद्धवा - मया आदिष्टः मम बदर्याख्यं आश्रमं गच्छ - माझ्या आज्ञेने माझा बद्रिकाश्रम आहे तेथे जा - तत्र - तेथे - मत्पादतीर्थोदि - माझ्या चरणापासून उत्पन्न झालेल्या पवित्र गंगोदकात - स्नान-उपस्पर्शनैः शुचि - स्नान व आचमने करून शुद्ध हो. ॥४१॥ अलकनंदायाः ईक्षया - अलकनंदा नामक जी गंगा तिच्या दर्शनाने - विधूत अशेष-कल्मषः - धुवून गेले आहे सर्व अज्ञानरूपी पाप असा - वल्कलानि वसानः - वल्कले नेसणारा - अंग - उद्धवा - वन्यभुक् - वनातील फळे, मुळे मात्र खाणारा - सुखनिःस्पृहः - विषयसुखाविषयी विरक्त होऊन स्वस्थ ऐस. ॥४२॥ द्वंद्वमात्राणां तितिक्षुः - शीतोष्णादिकांसंबंधी सहनशील - सुशीलः संयतेंद्रियः - सात्त्विक स्वभावाचा, इंद्रियसंयमी, - समाहितधिया शांतः ज्ञानविज्ञानसंयुतः - समस्वरूप झालेल्या बुद्धीमुळे शांत आणि शास्त्रीय ज्ञानाचा अपरोक्ष साक्षात्कार झालेला. ॥४३॥ मत्तः यत् ते अनुशिक्षितं - मी जो उपदेश केला आहे त्याला - विविक्तं अनुभावयन् - सुविचाराने मननपूर्वक निदिध्यासून व अनुभवून - मयि आवेशितवाक्चित्तः - माझ्या ठायी अर्पित केली आहेत वाणी व चित्त असा - मद्धर्मनिरतः भव - माझ्या भागवतधर्मांमध्ये रममाण हो - तिस्रः गतीः आतव्रज्य - तीन गुणांच्या अतीत होऊन - ततः परं मां एष्यसि - मायेपलीकडील माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. ॥४४॥ हरिमेधसा एवं उक्तः - ज्याचे ठिकाणी जडलेली बुद्धि संसाराचे हरण करिते त्या कृष्णाने असे सांगितल्यावर - सः उद्धवः - तो उद्धव - तं प्रदक्षिणं परिसृत्य - त्याला प्रदक्षिणापूर्वक - पादयोः शिरः निधाय - पायावर मस्तक ठेऊन - अश्रुकलाभिः न्यषिंचत् - अश्रुधारांनी कृष्णचरण भिजविता झाला - अद्वंद्वपरः अपि - तो द्वंद्वातीत, अद्वैतपूर्ण झाला होता तरी - अपक्रमे आर्द्रधीः - निघताना त्याला प्रेमळ हरीचा वियोग होणार म्हणून भडभडून आले. ॥४५॥ सुदुस्त्यजस्नेहवियोग-कातरः - सोडण्यास कठीण अशा परमोत्कृष्ट स्नेहाला अंतरणार, हे मनात येऊन भ्यालेला उद्धव - आतुरः तं परिहातुं न शकुवन् - विव्हल झाल्यामुळे कृष्णापासून दूर जाण्याला समर्थ झाला नाही - कृच्छरं ययौ - कष्टी झालेला - भर्तृपादुके मूर्धनि बिभ्रत् - श्रीकृष्णाच्या पादुका मस्तकी घेऊन - पुनः पुनः नमस्कृत्य - पुनः पुनः नमस्कार करून - ययौ - जाता झाला. ॥४६॥ ततः तं अंतर्हृदि संनिवेश्य - मग त्या कृष्णाच्या मूर्तीची अंतःकरणात स्थापना करून - महाभागवतः विशालां गतः - तो महाभगवद्भक्त उद्धव विशालानामक बदरिकाश्रमाला गेला - ततः - तदनंतर - जगदेकबंधुना यथोपदिष्टां - लोकबंधु जो कृष्ण त्याने उपदेश केल्याप्रमाणे - (गतिं) समास्थाय - गति म्हणजे कृष्णपद्धति उत्तम रीतीने पाळून - हरेः गतिं अगात् - हरीच्या स्वरूपाला गेला, मुक्त झाला. ॥४७॥ योगेश्वरसेवितांघ्रिणा कृष्णेन - योगेश्वर जे ब्रह्मदेवादि त्यांनी सेविले जातात चरण ज्या कृष्णाचे त्याने - भागवताय - भागवताला म्हणजे उद्धवाला - भाषितं - सांगितलेले - आनंदसमुद्रसंभृतं - आनंदसागराने तुडुंब भरलेले - एतत् ज्ञानामृतं - हे ज्ञानरूपी अमृत - सच्छ्रद्धया - पूर्ण श्रद्धेने - आसेव्य - सेवन करणारा - यः - जो भक्त - (सः) विमुच्यते - तो मुक्त होतो - जगत् - त्या भागवताच्या समागमाने विश्व सुद्धा मुक्त होते. ॥४८॥ भवभयं अपहंतुं - भवाचे भय नष्ट करण्यासाठी - निगमकृत् - वेदकर्ता जो भगवान् त्याने - भृंगवत् - भ्रमराच्या कौशल्याने - वेदसारं ज्ञानविज्ञानसारं - वेदाचे सार असे ज्ञानासह विज्ञान - उपजह्रे - उद्धृत केले - उदधितः अमृतं - समुद्रातून अमृत काढले - च - आणि - भृत्यवर्गान् अपाययत् - सेवकवर्गास पाजिले - पुरुषं आद्यं ऋषभं कृष्णसंज्ञं - त्या आद्य कृष्णनामक पुरुषोत्तमाला - नतः अस्मि - मी नमस्कार करतो. ॥४९॥ अध्याय एकोणतिसावा समाप्त |