|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २८ वा - अन्वयार्थ
परमार्थनिरूपण - प्रकृत्या पुरुषेण च - प्रकृति एकच व पुरुषही एकच त्यांतून कोणीही - विश्वं एकात्मकं पश्यन् - हे दृश्य विश्व एकस्वरूपात्मकच आहे, असे जाणणार्या विद्वानाने - परस्वभावकर्माणि - दुसर्याचे शांत, घोर इत्यादि असणारे स्वभाव - नः प्रशंसेत न गर्हयेत् - व तज्जन्य कर्मे यांचा स्तुति किंवा निंदा करू नये. ॥१॥ परस्वभावकर्माणि यः प्रशंसति, निंदति - दुसर्याच्या स्वभावाची व कर्माची जो स्तुति वा निंदा करतो - सः - तो - असति अभिनिवेशतः - असत=विद्यमान नसणार्या वस्तूच्या अभिमानामुळे - स्वार्थात् आशु भ्रश्यते - स्वार्थ म्हणजे ज्ञाननिष्ठा किंवा मोक्ष, यापासून च्युत होतो. ॥२॥ तैजसे निद्रयापन्ने - तैजस म्हणजे राजस अहंकाराची कार्ये करणारा जो इंद्रियांचा समुदाय तो निद्रावश झाला असताना - नष्टचेतनः पिंडस्थः - त्या देहात राहणारा पण जागृति नष्ट झालेला अचेतन जीव - मायां वा - म्हणजे गाढ निद्रेला अथवा मृत्युला प्राप्त करून घेतो - मृत्युं प्राप्नोति - मनोद्वारे स्वप्नसृष्टीत तरी जातो किंवा मनही लीन झाले - तद्वत् - त्याचप्रमाणे - नानार्थदृक् पुमान् - नानात्व अनेकत्व, द्वैत पाहणारा पुरुष जे नाही ते पाहतो. ॥३॥ अवस्तुनः द्वैतस्य - अवस्तु म्हणजे परमार्थतः अविद्यमान असणारे जे द्वैत त्याचे - किं कियत् भद्रं वा किं अभद्रं - कसले व कितीसे भद्र म्हणजे शुभ अथवा अभद्र म्हणजे अशुभ असणार ? - वाचा उदितं च मनसा ध्यातं एव तत् अनृतं - वाणीने मात्र उच्चारलेले आणि मनाने मात्र चिंतिलेले ते सर्व अवस्तु म्हणून अनृत म्हणजे मिथ्याच असते. ॥४॥ असंतः अपि छाया-प्रत्याव्हय-आभासाः - असत् असणारी छाया म्हणजे प्रतिबिंब, प्रत्याव्हय=प्रतिध्वनि, आभास=मृगजलादि भ्रांति हे सर्व - अर्थकारिणः हि - कार्ये उत्पन्न करितात - एवं - याप्रमाणेच - देहादयः भावाः - देहप्रभृति मिथ्या वस्तू - आमृत्युतः - मृत्युकालपर्यंत - भयं यच्छंति - भयप्रद होतात. ॥५॥ प्रभुः आत्मा एव - सर्वशक्ति असणारा जो ईश्वररूपी आत्मा तोच - तत् इदं विश्वं सृज्यते सृजति - हे सर्व विश्व आपणच होऊन आपणच उत्पन्न करितो - विश्वात्मा त्रायते त्राति, - आपणच तारवितो व तारतो; - ईश्वरः ह्रियते हरति - आपणच आपल्याला अदृश्य करवितो व करतो, असा तो विश्वात्मा आहे. ॥६॥ तस्मात् - म्हणून - आत्मनः अन्यस्मात् - आत्म्यावरच भासलेले पण आत्मरूपच असणारे जे विश्वादि त्याहून - अन्यः भावः न हि निरूपिताः - दुसरा कोणीही भाव निरूपिता, सांगता किंवा दाखविता येतच नाही - निरूपिता आत्मनि - आत्म्यामध्ये निरूपण केलेच तर - इयं - हा अन्यभाव हे अस्तित्व - निर्मूला त्रिविधा भातिः - निर्मूळ असणारी तीन प्रकारची भ्रांति होय - इदं गुणमयं त्रिविधं - हे त्रिगुणात्मक विश्व - मायया कृतं विद्धि - मायेने उत्पन्न केले आहे असे जाण. ॥७॥ एतत् मदिदुतं ज्ञानविज्ञाननैपुणं विद्वान् - हे मी सांगितलेले ज्ञानविज्ञानाचे नैपुण जाणणारा साधक - न निंदति, न च स्तौति - कशाचीही निंदा किंवा स्तुति करित नाही - लोके सूर्यवत् चरति - ह्या दृश्य विश्वामध्ये तो सूर्यासारखा तटस्थत्वाने अथवा समबुद्धीने वागतो. ॥८॥ प्रत्यक्षेण, अनुमानेन, निगमेन, आत्मसंविदा - प्रत्यक्ष प्रमाणाने, अनुमानाने, शब्दप्रमाणाने, व आत्मानुभावाने - आद्यंतवत्, असत् ज्ञात्वा - जन्ममरणात्मक म्हणून असत् असे जाणून - इह - येथे - निःसंगः विचरेत् - ज्ञानी साधक भक्ताने निःसंगत्वाने वागावे. ॥९॥ न एव आत्मनः संसृतिः - आत्म्याला संसार नाहीच नाही - न देहस्य - देहालाही संसार नाही - द्रष्ट्टदृश्ययोः - आत्मा द्रष्टा म्हणजे केवळ ज्ञानरूप आहे व देह दृश्य, ज्ञानाचा विषय म्हणजे जड आहे - ईश - देवा - अनात्मस्वदृशोः कस्य स्यात् - अनात्मा म्हणजे जड व स्वदृश म्हणजे स्वयंप्रकाश यांपैकी कोणाला हा संसार असू शकणार ? - उपलभ्यते - संसार आहेसे दिसते. ॥१०॥ आत्मा - आत्मा हा - अग्निवत् अव्ययः, अगुणः, शुद्धः, - अग्नीप्रमाणे अव्यय म्हणजे अक्षर=विकारशून्य, निर्गुण, निर्मळ, - स्वयंज्योतिः, अनावृतः - स्वयंप्रकाश, व आच्छादन नसलेला असतो - दारुवत् - निर्जीव लाकडाप्रमाणे असणारा - अचित् देहः - देह अचित्=जड असतो - इह संसृतिः कस्य - येथे संसार असतो तो कोणाला ?. ॥११॥ यावत् - जोपर्यंत - देहेंद्रिय-प्राणैः आत्मनः संनिकर्षणं - देह, इंद्रिये आणि प्राण यांच्याशी आत्म्याचा संबंध असतो - तावत् - तोपर्यंत - अविवेकिनः - अज्ञानी जीवाला - अपार्थः अपि संसारः फलवान् - परमार्थतः अविद्यमान असणाराही संसार सुखदुःख देण्यास कारण होतो. ॥१२॥ स्वप्ने यथा अनर्थागमः - स्वप्नामध्ये जसे अविद्यमान पदार्थांचे आगमन दिसते - हि विषयान् ध्यायतः अस्य - विषयांचे चिंतन करणार्याचा - संसृतिः - संसार - अविद्यमाने अपि अर्थे - अर्थ म्हणजे विषय नसताना सुद्धा - न निवर्तते - निवृत्त होत नाही. ॥१३॥ यथा हि - हे प्रसिद्धच आहे की - अप्रतिबुद्धस्य - जागे नसणार्या अज्ञान्याला - प्रस्वापः बव्हनर्थभृत - स्वप्न हे अनेक अनर्थांचे स्थान होते - सः एव - तेच स्वप्न - प्रतिबुद्धस्य - जागा असलेल्याला, ज्ञानी पुरुषाला - मोहाय न वै कल्पते - मोह उत्पन्न करण्याला समर्थ होत नाही. ॥१४॥ शोक-हर्ष-भय-क्रोध-मोह-स्पृहादयः - शोक, हर्ष, भय, संताप, लोभ, मोह, मत्सरप्रभृति सर्व विकार - जन्म मृत्युः च - जन्म व मरण या अवस्था - अहंकारस्य दृश्यंते - अहंकारवृत्तीलाच प्राप्त होतात हा अनुभव येतो - न आत्मानः - आत्म्याला हे विकार व या अवस्था नसतातच. ॥१५॥ देहेंद्रिय-प्राण-मनः-अभिमानः - शरीर, ज्ञानकर्मेंद्रिये, प्राण आणि मन यांच्या ठिकाणी अभिमान धरणारा - अंतरात्मा जीवः - व या देहादिकांनी आच्छादित झालेला आत्मा जीवदशेला प्राप्त होऊन - गुणकर्ममूर्तिः - गुण आणि कर्म यांनी घटीत झालेली मूर्ति बनतो - सूत्रं, महान् इति उरुधा इव गीतः - त्या जीवस्वरूपी आत्म्यालाच ‘सूत्र ’ ‘महान् ’ इत्यादि शब्दांनी शास्त्रादि संबोधितात - कालतंत्रः संसारे आधावति - आणि या संसारारण्यात कालाच्या ओघाला वश होऊन जीव भ्रमण करीत फिरतो. ॥१६॥ एतत् बहुरूपरूपितं - परंतु हे अनेक रूपांनी प्रकट होणारे - मनोवचःप्राणशरीरकर्म अमूलं - अहंकाराचे, मानसिक, वाचिक, प्राणसंबंधी आणि कायिक कर्म वस्तुतः निर्मूळच असते - शितेन ज्ञानासिना उपासनया छित्त्वा - तीक्ष्ण ज्ञानशस्त्राने व दृढ उपासनेने छेदून - अतृष्णः मुनिः - विरक्त ज्ञानी भक्त - गा विचरति - पुनरपि पृथ्वीभर संचार करतो. ॥१७॥ विवेकः ज्ञानं - नित्यानित्यविवेक हे स्वरूपतः आत्मज्ञान - निगमः, तपः च - वेदाभ्यास व तपश्चर्याहि - प्रत्यक्षं ऐतिह्यं अथ अनुमानं - प्रत्यक्ष, ऐतिहासिक व अनुमान ही साधने - अस्य आद्यंतयोः यत् एव केवलं - या दृश्याच्या आदी व अंती जे एकच मात्र - कालः च हेतुः च - कालरूपाने व कारणरूपाने असते - तत् एव मध्ये - तेच एक मध्येही असते. ॥१८॥ यथा स्वकृतं हिरण्यं - ज्याप्रमाणे सुंदर आकाराने घडविलेले सुवर्ण - सर्वस्य हिरण्मयस्य पुरस्तात्, पश्चात्- च - जे सुंदर सोन्याचे अलंकारांपूर्वी व मागाहूनही - तत् नानापदेशैः व्यवहार्यमाणं - ते नानाप्रकारच्या नावांनी संबोधिले जाणारे - एव मध्ये - मध्येही - तद्वत् - त्याप्रमाणे - अस्य अहं - या दृश्याचे अधिष्ठान मी आहे. ॥१९॥ अंग - हे उद्धवा - समन्वयेन व्यतिरेकतः च - समन्वयाच्या व व्यतिरेकाच्या पद्धतीने पाहिले असता - येन एव तुर्येण - जे तुरीय, शब्द-ब्रह्म मात्र - त्रियवस्थं एतत् विज्ञानं (मनः) - हे जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीन अवस्थांत असणारे व अनुभवज्ञान देणारे मन - गुणत्रयं - या अवस्था-त्रयाला कारण होणारे सत्त्व-रज-तम हे गुणत्रय - कारण-कार्य-कर्तृ - कारणभूत, कार्यभूत, व कर्तृभूत असणारे हे दृश्य जगत् - तत् एव सत्यं - ते ब्रह्म मात्र सत्य आहे. ॥२०॥ यत् पुरस्तात् न - जे उत्पत्तीपूर्वी नसते - च यत् पश्चात् न - आणि जे स्वनाशानंतर नसते - उत मध्ये - पण मध्ये मात्र असते - तत् न - ते कारणस्वरूपाहून भिन्न नाही - व्यपदेशमात्रं - तर केवळ नावाला मात्र आधार झालेले असते - यत् यत् परेण भूतं प्रसिद्धं च - जे जे अन्यसाह्याने मात्र उत्पन्न, विनष्ट व प्रकाशित होते - तत् तत् एव स्यात् - ते ते अन्यात्मकच कारणात्मकच असते - इति मे मनिषा - असा माझा निश्चित सिद्धांत आहे. ॥२१॥ यः अविद्यमानः अपि अवभासते - जो वस्तुतः नसताही प्रतीत मात्र होतो - एषः वैकारिकः राजससर्गः - तो सर्ग=सृष्टि रजोगुणोत्पन्न, कार्यभूत आणि प्रकाश्य असतो - ब्रह्म स्वयं, ज्योतिः - ब्रह्म हे स्वयंसिद्ध आणि प्रकाशक आहे - अतः - म्हणून - इंद्रिय-अर्थ-आत्म-विकार-चित्रं विभाति - इंद्रिये, विषय आणि मन या विचित्र कार्यरूपांनी ब्रह्मच प्रकाशते. ॥२२॥ एवं - याप्रमाणे - स्फुटं ब्रह्मविवेकहेतुभिः - स्पष्ट निश्चय होईल अशा रीतीने ब्रह्मज्ञान देणार्या प्रत्यक्ष-तर्कप्रभृति प्रमाणांनी - विशारदेन परापवादेन - निपुण अशा अनात्मक देहादिकांच्या निरासाने - आत्मसंदेहं छित्वा - आत्मविषयक सर्व संशयांचा उच्छेद करून - अखिलकामुकेभ्यः स्वानंदतुष्टः उपारमेत - सर्व विषयासक्त इंद्रियादिकांपासून आत्मरत साधक भक्ताने विरक्त व्हावे. ॥२३॥ पार्थिवं वपुः - शरीर पार्थिव म्हणून - इंद्रियाणि, देवाः हि - इंद्रिये व त्यांचे अधिष्ठाते इंद्रचंद्रादि देव ही कारणे म्हणून - खं, वायुः, जलं, हुताशः, क्षितिः - आकाश, वायु, जल, अग्नि व पृथ्वी व त्यांचे शब्दादि गुण आधिभौतिक म्हणून - असुः, मनः, धिषणा, च सत्त्वं, अहंकृतिः अन्नमात्रं - प्राण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार ही अन्नश्रित असतात म्हणून - अर्थसाम्यं - अर्थ=विषय व साम्य=प्रकृति ही जड म्हणून - आत्मा न - आत्मा नव्हते. ॥२४॥ मत्सुविविक्तधाम्नः - माझे म्हणजे आत्म्याचे स्वरूप उत्तम प्रकारच्या विवेकाने निश्चित केले ज्याने अशा ज्ञानी भक्ताला - गुणात्मभिः समाहितैः करणैः कः गुणः भवेत् ? - गुणोत्पन्न जी इंद्रिये ती समाहित झाली तरी लाभ काय होणार ? - उत - अथवा - विक्षिप्यमाणैः किं नु दूषणं - भ्रष्ट झाल्यामुळे चंचल झाली, तरी त्याची हानी काय होणार ? - उपेतैः विगतैः घनैः रवेः किं ? - मेघ आले किंवा गेले म्हणून सूर्याच्या स्वरूपात कधी फरक झाला आहे का ?. ॥२५॥ यथा गत-आगतैः - ज्याप्रमाणे उत्पन्न विनष्ट होणार्या - ऋततुगुणैः - वसंतग्रीष्मादि ऋतूंच्या शीतोष्णादि गुणांनी - (व) वायु-अनल-अंबु-भूगुणैः - वायु, अग्नि, जल व पृथ्वी यांच्या नित्य गुणांनी - नभः न सज्जते - आकाश लिप्त होत नाही - तथा - त्याप्रमाणेच - अहंमतेः परं अक्षरं - अहंवृत्तीच्या फार पलीकडे असणारे जे अक्षर म्हणजे निर्विकार्य अव्यय ब्रह्म आहे ते - संसृतिहेतुभिः - संसाराला कारण होणार्या - सत्त्वरजस्तमोमलैः - सत्त्वादि तीन गुणांच्या दोषांनी. ॥२६॥ तथा अपि - अशी वस्तुस्थिती आहे तरी - दृढेन मद्भक्तियोगेन - माझ्या एकनिष्ठ दृढ भक्तियोगाने - यावत् - जोपर्यंत - मनःकषायः रजः - मनाला मलीन व दूषित करणारी रजोगुणोत्पन्न विषयासक्ति - निरस्येत - निरसावयाची आहे - तावत् - तोपर्यंत - मायारचितेषु गुणेषु - मायेने उत्पन्न केलेल्या गुणांसंबंधी विषयांसंबंधी - संगः परिवर्जनीयः - हरेक प्रकारची आसक्ति टाकून द्यावी. ॥२७॥ असाधुचिकित्सितः - चांगल्या रीतीने ज्याची परिक्षा झाली नाही - नृणां आमयः - असा पुरुषास जडलेला आमय म्हणजे रोग - यथा पुनः पुनः प्ररोहन् संतुदति - जसा पुनः पुनः वाढत जाऊन जीवांस त्रास देतो - एवं - याप्रमाणे - अपक्वकषायकर्म, - ज्यातील मलीनता व कर्म करण्याची आसक्ति नाहीशी झालेली नाही - सर्वसंगं मनः - म्हणून सर्व प्रकारच्या विषयांशी आसक्त असलेले मन - कुयोगिनं विध्यति - अर्धवट योग्याला भ्रष्ट करिते. ॥२८॥ त्रिदशोपसृष्टैः मनुष्यभूतैः - देवांनी, मनुष्यांनी व भूतांनी उत्पन्न केलेल्या - अंतरायैः - अंतराय म्हणजे अडचणींमुळे - विहताः ये कुयोगिनः - जे कच्चे योगी पराभूत होतात - ते - ते - प्राक्तनाभ्यासबलेन - पूर्वजन्मी केलेल्या अभ्यासबलाने - भूयः - पुनः - योगं युंजंति - योगाचा शास्त्रोक्त अभ्यास करतात - न तु कर्मतंत्रं - ते कर्मतंत्राच्या खटपटीत पडत नाहीत. ॥२९॥ केन अपि चोदितः - कोणत्या तरी कारणाने प्रेरित झालेला - असौ जंतुः - तो तो अविद्वान जीव - आनिपातात् - देह पडेपर्यंत - कर्म करोति - कर्म करतो - क्रियते च - आणि विकार पावतो - प्रकृतौ स्थितः अपि - देहात, मायेच्या राज्यात राहूनही - तत्र - तेथे - विद्वान् न - विद्वान् विकृत होत नाही - निवृत्ततृष्णः - आशाशून्य असतो - स्वसुखानुभूत्या - आत्मसुखाचा अनुभव घेत असतो म्हणून. ॥३०॥ तिष्ठंतं, आसीनं, उत व्रजंतं, - उभा असलेला, बसलेला, जाणे येणे करणारा, - शयानं, उक्षंतं, अन्नं अदंतं, - निजलेला, मलोत्सर्ग करणारा, अन्नसेवन करणारा, - स्वभावं अन्यत् किं अपि - आणि स्वभावप्राप्त अन्य गोष्टी करणारा व चिंतणारा - ईहमानं आत्मानं आत्मस्थमतिः न वेद - जो आपला आत्मा म्हणजे देह त्या देहाचीही आत्मचिंतनाच्या समाधीत असणार्या विद्वानाला खबर नसते. ॥३१॥ यदि असदिंद्रियार्थं - यद्यपि मिथ्या असणार्या इंद्रियांचे रूपस्पर्शादि विषय - पश्यति स्म - तो विद्वान् पाहतो - नाना - ते अनेक म्हणूनच मिथ्या असे - अनुमानेन - अनुमान करून - विरुद्धं - आत्मविलक्षण, बधित होत असे ठरवितो - अन्यत् - ते अनात्मक विषय - मनीषी - तो विद्वान् - वस्तुतया न मन्यते - सत्य आहेत, असे मानीत नाही - यथा - ज्याप्रमाणे - उत्थाय - स्वप्नातून जागृत झाल्यावर - स्वाप्नं तिरोदधानं - स्वप्नातील विषय तो खोटे मानतो म्हणून आपोआप अदृश्य होत जातात. ॥३२॥ गुणकर्माचित्रं अज्ञानं - गुणांनी व कर्मांनी चित्रविचित्र भासणारे अज्ञान - आत्मनि - आत्मस्वरूपावरच - अंग - हे उद्धवा - पूर्वं - प्रथमच्या अज्ञानस्थितीत - अविविक्तं - विवेकाच्या अभावामुळे - गृहीतं - घेतलेले असते - तत् - ते अज्ञान - पुनः ईक्षया एव निवर्तते - पुनः पुनः विचार केला असता मात्र निवृत्त होते - आत्मा न गृह्यते - आत्मा हा कोणत्याही रीतीने स्वरूपतः घेतला जात नाही - न विसृज्यः अपि - किंवा तो टाकून देण्यासारखाही स्वरूपतः नाही. ॥३३॥ हि यथा भानोः उदयः - जसा सूर्याचा उदय - नृचक्षुषः तमः निहन्यात् - मनुष्याच्या डोळ्यावरील अंधकाराचे निरसन करतो - तु - परंतु - सत् न विधत्ते - तो उदय घटादि पदार्थांची उत्पत्ति करीत नाही - एवं - तशी - मे निपुणा समीक्षा सती - परमात्मा जो मी त्यासंबंधी पूर्ण व निःशंक श्रुतिसिद्ध ज्ञान झाले असता - पुरुषस्य बुद्धेः तमिस्रं हन्यात् - जीवबुद्धीत असणारे अज्ञान-त्या-ज्ञानाने नाहीसे होते. ॥३४॥ एषः स्वयंज्योतिः - हा आत्मा स्वयंप्रकाश आहे - अजः, अप्रमेयः, - व अजन्मा, अज्ञेय, निर्विकार, - महानुभूतिः, सकलानुभूतिः, एकः, अद्वितीयः - अनुभवस्वरूप आणि एकच असून अद्वितीय आहे - वचसां विरामे - तो वाणीचा अवधि व अवर्णनीय असून - येन इषिता वाक् असवः (च) चरंति - त्याच्या प्रेरणेने वाणी आणि प्राण यांचे व्यापार चालतात. ॥३५॥ यत् तु केवले आत्मन् विकल्पः - स्वगतादि तिन्ही भेद नसणार्या आत्मरूपात विकल्प=भेद कल्पणे - एतावान् आत्मसंमोहः - हाच मनाचा मोह, हीच भ्रांति होय - हि - कारण - स्वं आत्मानं ऋते यस्य अवलंबः न - त्या मोहाला आत्म्याशिवाय दुसरा आधारच नाही. ॥३६॥ नाम-आकृतिभिः ग्राह्यं - नाम आणि रूप यांच्यायोगे ग्रहण करण्यास योग्य असलेले - पंचवर्णं - पंचभूतात्मक - अबाधितं - निराबाध - यत् - जे हे विश्व - पंडितमानिनां द्वयं - पंडितमन्य अभिमान्यांचे द्वैत - (वेदांतेषु) अयं अर्थवादः - वेदांतग्रंथातील हे सर्व बोल, अद्वैत बोल केवळ अर्थवादरूप आहेत असे हे पंडित म्हणतात - व्यर्थेन अपि - हे दृश्य केवळ अर्थ-शून्य प्रतीति आहे. ॥३७॥ अपक्वयोगस्य योगिनः - पूर्णतः योग साध्य झाला नाही त्या योग्याचा - युंजतः कायः - योगाभ्यास चालला असता त्याचे शरीर - उत्थितैः उपसर्गैः विहन्येत - उत्पन्न झालेल्या रोगादि उपद्रवांनी क्षीण होते - तत्र - त्यावेळी - अयं विधिः विहितः - रोगादिकांचा प्रतिकार पुढील विधीने करावा. ॥३८॥ योगधारणया - योगाची धारणा करून - धारणान्वितैः आसनैः कांश्चित् - व धारणादि मार्गांनी आसन स्थिर करून काही - तपोमंत्रौषधैः कांश्चित् - त्याचप्रमाणे तप, मंत्र व औषधीच्या साह्याने काही - उपसर्गान् विनिर्दहेत् - आड येणारी विघ्ने जाळून टाकावी. ॥३९॥ मम अनुध्यानेन, नामसंकीर्तनादिभिः - माझ्या ध्यानाने आणि नामसंकीर्तनाने - योगेश्वरानुवृत्त्या वा कांश्चित् - अथवा योगस्वामी जो मी त्याच्या सेवेने - अशुभदान् शनैः हन्यात् - कित्येक अमंगल विघ्नांचा नाश करावा. ॥४०॥ केचित् धीराः इमं देहं - परंतु कित्येक ज्ञानी हा पार्थिव देह - विविध-उपायैः - अनेक उपायांनी - वयसि सुकल्पं स्थिरं विधाय - रोगरहित व दीर्घजीवी करून - अथ - मग - सिद्धये युंजंति - सिद्धीची प्राप्ति करून घेतात. ॥४१॥ न हि तत् कुशलादृत्यं - हे उघड आहे की हा देहसाधक योगसिद्धींचा मार्ग शहाण्या व विवेकी मनुष्याने आदरूच नये - हि - कारण - तदायासः अपार्थकः - त्यासाठी होणारे श्रम पुरुषार्थसाधक नाहीत - शरीरस्य अंतवत्त्वात् - हा देहच मर्त्य आहे - वनस्पतेः फलस्य इव - वृक्षाचे फल जसे सुकते व कुजते. ॥४२॥ नित्यं योगं निषेवतः कायः - नित्य योगाभ्यास करणार्याचा देह - कल्पतां इयात् चेत् - कल्पापर्यंत यद्यपि कदाचित् सुदृढ व तारुण्यात राहिला - मत्परः मतिमान् - माझ्या ज्ञानी एकनिष्ठ भक्ताने - तत् न श्रद्दध्यात् - त्या देहावर विश्वास ठेऊ नये - योगं उत्सृज्य - ज्ञानयोग सोडू नये. ॥४३॥ मद्व्यपाश्रयः - याप्रमाणे माझा आश्रय करून - योगी इमां योगचर्यां विचरन् - ज्ञानयोगाचा अभ्यास करणारा मद्भक्त योगी - निःस्पृहः स्वसुखानुभूः - विषयानिवृत्त होऊन आत्मानंदाचा साक्षात्कारी अनुभव घेतो - अंतरायैः न विहन्येत - त्याला विघ्नांची बाधा होत नाही. ॥४४॥ अध्याय अठ्ठाविसावा समाप्त |