|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २७ वा - अन्वयार्थ
क्रियायोगाचे वर्णन - प्रभो भवदाराघनं क्रियायोगं - भगवंता ! तुझे आराधन साध्य करण्याचा क्रियायोग - समाचक्ष्व - मला साद्यंत सांग - सात्वतर्षभ - हे यादवश्रेष्ठा - यस्मात्, यथा- कोणत्या कारणास्तव व कोणत्या प्रकारे - ये सात्त्वताः - जे तुझे अधिकारी भक्त ते - त्वा अर्चंति - तुझी पूजाअर्चा करतात - ॥१॥ नारदः, भगवान् व्यासः, अंगिरसः, सुतः आचार्यः - देवर्षी नारद, भगवान सर्वज्ञ व्यास, अंगिरस-सुत बृहस्पति आचार्य - मुनयः - हे सर्व मुनि - मुहुः वदंति - वारंवार सांगतात की - नृणां एतत् निःश्रेयसं - जीवांस हेच तुझे आराधन परमकल्याणकारक आहे - ॥२॥ भृगमुख्येभ्यः पुत्रेभ्यः - भृगुप्रमुख पुत्रांस - भगवान् अजः यत् आह - श्रीभगवान ब्रह्मदेव जे सांगता झाला - च - आणि - भगवान् भवः देव्यै (आह) - श्रेष्ठ भगवान श्रीशंकर पार्वती देवीस जे उपदेशिता झाला - (तत्) ते मुखांबुजात् निःसृतं - ते सर्व तुझ्या मुखकमलापासूनच प्रकट झाले आहे - ॥३॥ मानद - हे सज्जनवृंदमान्य देवा - सर्ववर्णानां आश्रमाणां च स्त्रीशूद्राणां च संमतं एतत् - ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य, चारी आश्रमांतील साधक व स्त्री-शूद्र या सर्वांस तुझे भक्त्यमृत सेवन - श्रेयसां उत्तमं मन्ये वै - मोक्ष देणार्या साधनांत उत्तमोत्तम साधन आहे असे मला निश्चयपूर्वक वाटते - ॥४॥ कमलपत्राक्ष - हे कमलनेत्रा - विश्वेश्वरेश्वर - सर्वविश्वनियामक देवाधिदेवा - कर्मबंधविमोचनं एतत् - कर्मबंधाचा निरास करणारे हे तुझे आराधनारूपी कर्म - भक्ताय च अनुरक्ताय ब्रूहि - तुझा निःसीम भक्त व तुजवर अनुरक्त अशा मला कृपा करून सांग - ॥५॥ उद्धव - उद्धवा - अनंतपारस्य कर्मकांडस्य च हि अंतः न - हे मत्पूजारूपी कर्मकांड अनंत व अपार आहे - अनुपूर्वशः - अनुक्रम धरून - यथावत् - यथास्थित रीतीने - संक्षिप्तं वर्णयिष्यामि - सार तेच तुला वर्णन करून सांगतो - ॥६॥ वैदिकः, - वेदमंत्रोक्त, -तांत्रिकः, मिश्रः इति - तंत्रोक्त म्हणजे आगमोक्त आणि वेद आणि तंत्र मिळून एक -मे मखः त्रिविधः - असे माझ्या पूजनरूपी यज्ञाचे तीन प्रकार आहेत - त्रयाणां ईप्सितेन विधिना एव - या तीन प्रकारांतील जो आवडेल, त्या प्रकारानेच - मां समर्चयेत् - माझी पूजा अर्चा करावी - ॥७॥ यदा स्वनिगमेन उक्तं - ज्याच्या वंशात रुढ असणार्या वैदिक संस्काराने म्हणजे विहित उपनयानाने उक्त असे - पूरुषः - पुरुषाला - द्विजत्वं - द्विजत्व - प्राप्य - मिळते त्या काळी - श्रद्धया, भक्त्या, यथा मां यजेत - श्रद्धापूर्ण भक्तीने ज्या पद्धतीने माझे अर्चन-भजन करावे - तत् - ती पद्धति - मे निबोध - मी सांगतो ऐक - ॥८॥ अचार्या, स्थंडिले, अग्नौ, वा सूर्ये, वा अप्सु हृदि, द्विजे - मूर्ति, यज्ञकुंड, अग्नि, सूर्य, जल, हृदय आणि ब्राह्मण यांचे ठिकाणी - द्रव्येण - प्राप्त द्रव्याने - स्वगुरुं मां - प्रत्येकाचा उद्धारकर्ता जो मी गुरु त्या माझे - अमायया - कोणत्याही कपट अथवा शाठय न करिता - भक्तियुक्तः अर्चेत् - भक्तिपूर्वक आराधन करावे - ॥९॥ अंगशुद्ध्ये - शरीराची शुद्धि व्हावी म्हणून - धौतदंतः पूर्वं स्नानं प्रकुर्वीत - दात घासून मग प्रथमतः भक्तीने स्नान करावे - मृद्ग्रहणादिना उभयैः अपि मंत्रैः च स्नानं - स्नानप्रसंगी मृत्तिका, भस्म इत्यादि शुद्धिकर द्रव्यांचा उपयोग करून वैदिक आणि तांत्रिक दोन्ही मंत्र म्हणावे - ॥१०॥ वेदेन आचोदितानि - वेदविहित अथवा वेदतंत्रविहित - संध्योपास्त्यादिकर्माणि - जी संध्या ब्रह्मयज्ञ इत्यादि नित्यकर्मे आहेत - तैः - त्यांच्यासह - सम्यक्संकल्पः - उत्तम संकल्प करून - कर्मपावनीं मे पूजां कल्पयेत् - कर्मबंध नष्ट करून चित्तशुद्धि करणारी माझी पूजा करावी - ॥११॥ शैली, दारुमयी, लौही, - दगडाची, लाकडाची, लोहादि धातूची, - लेप्या, लेख्या च, सैकती, मनोमयी, - मातीची, चित्ररूप, वाळूची, मनाने अंतःकरणात साठविलेली, - मणिमयी अष्टविधा प्रतिमा स्मृता - आणि रत्नाची, अशी माझी प्रतिमा आठ रूपांची असते - ॥१२॥ जीवमंदिरं - साधकाला भगवंताच्या देवालयाप्रमाणे पवित्र असणारी - प्रतिष्ठा - प्रतिमा - चला अचला इति द्विविधा - चल व अचल अशी दोन प्रकारची असते - उद्धव - उद्धवा - अर्चने - पूजाविधीमध्ये - स्थिरायां - अचल मूर्ति असेल तर - उद्वास-आवाहने - आवाहन आणि विसर्जन - न स्तः - असत नाहीत - ॥१३॥ अस्थिरायां विकल्पः स्यात् - चल मूर्ति असल्यास आवाहनादि करावे वा करू नये, असा विकल्प आहे - स्थंडिले तु द्वयं भवेत् - यज्ञकुंड असल्यास आवाहन-विसर्जन इष्ट आहे - अविलेप्यायां तु स्नपनं - मातीची मूर्ति नसेल अथवा चित्ररूप नसेल तेथे मूर्तीस स्नान घालावे - अन्यत्र परिमार्जनं - इतरत्र परिमार्जन (उदक शिंपडणे) मात्र करावे - ॥१४॥ अमायिनः भक्तस्य च - कोणत्याही प्रकारचे शाठय न करणारा माझा जो भक्त त्याने - प्रतिमादिषु - मूर्तिप्रमुख मत्स्वरूपाचे ठिकाणी - यथालब्धैः प्रसिद्धैः द्रव्यैः - यथाकाल व यथाशक्ति जी गंधपुष्पादि द्रव्यसामग्री मिळाली असेल त्या मंगलप्रद सामग्रीने - मद्यागः - माझे पूजन करावे - च - आणि - हृदि भावेन एव हि - मनोमय मूर्ति असेल, तर नुसत्या मनोमय द्रव्याने मात्र माझी पूजा करावी - ॥१५॥ उद्धव - उद्धवा - अर्चायां तु स्नानालंकरणं एव प्रेष्ठं - पाषाणमयादि मूर्तीला मात्र स्नान घालणे, अलंकार लेवविणे, मला प्रियकर असते - स्थंडिले तत्त्वविन्यासः - यज्ञकुंडात तर प्रधानादि देवतांचे समंत्रक स्थापन करावे - वन्हौ आज्यप्लुतं हविः - अग्निरूपाने मत्पूजन करणे असेल तर घृताने पूर्ण असलेले होमद्रव्य मला अर्पावे - ॥१६॥ सूर्ये च अभ्यर्हणं प्रेष्ठं - सूर्यरूप जो मी त्याची पूजा अर्ध्य-उपस्थानसहित करावी; ती मला आवडते - सलिले सलिलादिभिः - जलरूपी जो मी, त्या मला तर्पणादिकांनी प्रसन्न करावे - वारि अपि मम भक्तेन श्रद्धया उपाहृतं प्रेष्ठं - माझ्या भक्ताने श्रद्धेने मला नुसते वारि म्हणजे जल जरी अर्पिले, तरी ते मला अत्यंत प्रिय आहे - ॥१७॥ अभक्तोपहृतं भूरि अपि - ज्याला माझी भक्ति नाही, त्याने गंधपुष्पादि पुष्कळसे द्रव्य मला अर्पिले तरी ते - मे तोषाय न कल्पते - मला संतोष देत नाही - किं पुनः गंधः धूपः सुमनसः - जर मला भक्ताच्या जलानेच संतोष होतो, तर त्याने गंध, धुप, पुष्पे, दीप, - दीपः अन्नाद्यं च - गुडप्रभृति अन्न अर्पिले, तर मी संतुष्ट होतो, हे सांगावयास नकोच ! - ॥१८॥ शुचिः, संभृतसंभारः प्राग्दर्भैः कल्पितासनः - अंतर्बाह्य स्वच्छ असे पूजासाहित्य घेऊन आणि साग्र दर्भांनी आसन परिकल्पून - प्राक् उदक् वा आसीनः अर्चेत् - पूर्वेकडे वा उत्तरेकडे मुख करुन बसलेले राहून पूजा करावी - अथ अर्चायां संमुखः - जर अचल मूर्ति असेल तर मूर्तीसन्मुख बसावे - ॥१९॥ कृतन्यासः - तंत्रोक्त न्यास करून - पणिना - आपल्या हाताने - कृतन्यासां मदर्चां मृजेत् - न्यास केलेल्या माझ्या मूर्तीला स्वच्छ करावे - कलशं, प्रोक्षणीयं च यथावत् उपासाधयेत - कलश व लहान उदकपात्रे यथाविधि संस्कारावी - ॥२०॥ तदद्भिः - त्या संस्कारलेल्या जलाने - देवयजनं, द्रव्याणि, आत्मानं एव च - देवपूजेचे स्थान, पूजाद्रव्ये आणि आपले शरीरही - प्रोक्ष्य - प्रोक्षण करून - त्रीणि पात्रणि - पाद्य, अर्ध्य व आचमनीय ही तीन पात्रे - अद्भिः, तैः तैः द्रव्यैः च साधयेत् - जलाने व त्या त्या विहित द्रव्याने सिद्ध करावी - ॥२१॥ दैशिकः - पूजा करणारा जो साधक त्याने - पाद्यार्घाचमनीयार्थं त्रीणि पात्राणि - पाद्य, अर्घ्य व आचमन या कार्यांसाठी उपयोगी पडणारी तीन पात्रे - हृदा, शीर्ष्णा, अथ शिखया - हृदय शिर व शिखा यांच्या मंत्रांनी - गायत्र्या च - आणि सर्व द्रव्ये गायत्री मंत्राने - अभिमंत्रयेत् - मंत्रून सिद्ध करावी - ॥२२॥ वायु-अग्नि-संशुद्धे पिंडे - वायु व अग्नि यांनी शुद्ध केलेल्या आपल्या शरीरामध्ये - हृत्-पद्म-स्थां - हृदयकमलात राहणारी - परां अण्वीं मम जीवकलां - अत्यंत श्रेष्ठ व सूक्ष्म जी माझी चैतन्यकला तिचे - ध्यायेत् - ध्यान करावे - नादांते सिद्धभावितां - ती कला नादाच्या अंती सिद्ध पुरुषांनी ध्यान केलेली अशी आहे - ॥२३॥ आत्मभूतया तया पिंडे व्याप्ते - जीवात्मस्वरूप झालेल्या त्या चित्कलेने संपूर्ण देह व्यापिल्यानंतर - तन्मयः आवाह्य संपूज्य - चिन्मय झालेल्या पूजकाने तिची आमंत्रणपूर्वक पूजा करून - (नंतर) - अर्चादिषु स्थाप्य - बाहेरील मूर्तीमध्ये तिची स्थापना करावी - न्यस्तांगं मां प्रपूजयेत् - अंगोपांग न्यास करून माझी पूजा करावी - ॥२४॥ धर्मादिभिः च नवभिः मम आसनं कल्पयित्वा - ‘धर्मादि ’ नव मंत्रांनी माझे आसन सिद्ध करून - पाद्य-उपस्पर्श-अर्हण-आदीन् उपचारान् प्रकल्पयेत् - पाद्य, आचमन, अर्ध्य इत्यादि उपचारांनी माझे समंत्रक पूजन करावे - ॥२५॥ अष्टदलं पद्मं - आठ पाकळ्यांचे कमल - तत्र कर्णिका-केसर-उज्वलं - जे कर्णिका व केसर यांनी प्रकाशित आहे ते त्या आसनावर काढावे - उभयसिद्धये तु - अभ्युदय व निःश्रेयस यांच्या सिद्धीसाठी - उभाभ्यां वेदतंत्राभ्यां - वेद व तंत्र यांनी विहित असलेल्या मंत्रांनी - मह्यं - मला पूजा अर्पण करावी - ॥२६॥ सुदर्शनं, पांचजन्यं, - सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, - गदा-असि-इषु-धनुः-हलान् मुसलं, - गदा, खड्ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसल - कौस्तुभं, मालां, श्रीवत्सं च अनुपूजयेत् - ही माझी आयुधे आणि कौस्तुभमणि, वनमाला, व श्रीवत्स हे अलंकार यांची पूजा मग करावी-॥२७॥ नंदं, सुनंदं, गरुडं, प्रचंडं, चंडं, एव च महाबलं, बलं च एव, कुमुदं, कुमुदेक्षणं - ह्या माझ्या नंदसुनंदादि पार्षदांची - ॥२८॥ दुर्गां, विनायकं, व्यासं, विष्वक्सेनं, गुरून्, सुरान् तु - दुर्गाप्रभृतींची - स्वे स्वे स्थाने - त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या स्थानी - प्रोक्षणादिभिः - अर्घ्यादिकांनी - पूजयेत् - पूजा करावी - अभिमुखान् - या सर्वांच्या सन्मुख पूजकाने असावे - ॥२९॥ चंदन-उशीर-कर्पूर-कुंकुम-अगुरु-वासितैः सलिलैः - चंदन, वाळा, कापूर, केशर, उद यांनी सुवासित केलेल्या जलांनी - मंत्रैः - मंत्रपूर्वक - नित्यदा - प्रतिदिवशी - विभवे सति - द्रव्यादि सामर्थ्य असेल तर - स्नापयेत् - मला व मत्पार्षदादिकांस स्नान घालावे - ॥३०॥ स्वर्णधर्मानुवाकेन - ‘सुवर्णं धर्मं परिवेदवेनं ’ या नावाच्या अनुवाकाचे मंत्रांनी - महापुरुषविद्यया - ‘जितं ते पुंडरीकाक्ष ’ इत्यादी महापुरुषविद्यात्मक श्लोकांनी - पौरुषेण अपि सूक्तेन - सुप्रसिद्ध पुरुषसूक्तांनीही - राजनादिभिः सामभिः - ‘राजनादि ’ सामवेद मंत्रांनी - ॥३१॥ वस्त्रोपवीताभरणपत्रस्रग्गंधलेपनैः - वस्त्र, यज्ञोपवीत, आभरणे, अनेक प्रकारच्या पत्री किंवा मुद्रा, माळा, गंधलेपन या प्रकारांनी - मद्भक्तः - माझा जो भक्त त्याने - मां सप्रेम - मला मोठया प्रेमाने - यथा उचितं - यथायोग्य - अलंकुर्वीत - अलंकृत करावे - ॥३२॥ पाद्यं, आचमनीयं च, गंधं, सुमनसः अक्षतान् - पाद्यादिकांसह - धूपदीपोपहार्याणि - धूप, दीप, नैवेद्य हे उपचार - अर्चकः - पूजकाने - मे - मला - श्रद्धा दद्यात् - श्रद्धापुरःसर अर्पावे - ॥३३॥ गुड-पायस-सर्पींषि शष्कुल्यापूपमोदकान् - गुळ, क्षीर, घृत, करंज्या, अपूप, मोदक - संयाव-दधि-सूपान्-च - सांजा, दही, वरणासारखे व्यंजक पदार्थ - नैवेद्यं - अशा प्रकारचा नैवेद्य - सति - सामर्थ्य असेल त्याप्रमाणे - कल्पयेत् - सिद्ध करावा - ॥३४॥ अभ्यंग उन्मर्दन - सुवासिक तेले लावणे, अंग घासणे, - आदर्श-दंतघाव-अभिषेचनं - आरसा दाखविणे, दांत घासणे, अभिषेकासह स्नान घालणे - अन्नाद्यं - भोजनीय व भक्ष्य अर्पिणे - गीतनृत्यादि - माझ्या सन्मुख गाणे व नाचणे इत्यादि उपचार - पर्वणि - पवित्र दिवशी - उत - अथवा - अन्वहं - प्रतिदिवशी - स्युः - करावे - ॥३५॥ मेखला-गर्त - मेखला म्हणजे दर्भाच्या दोर्या व गर्त म्हणजे खळगा - वेदिभिः विधिना विहिते कुंडे - आणि वेदि म्हणजे बैठक वगैरे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या यज्ञकुंडात - अग्निं आधाय - अग्नीची स्थापना करावी - उदितं - त्या पेटलेल्या अग्नीला - पाणिना - हाताने - परितः समूहेत - गोळा करून एक ठिकाणी करावे - ॥३६॥ परिस्तीर्य अथ पर्युक्षेत् - नंतर अग्नीभोवती दर्भ पसरून मग कुंडासभोवार उदक शिंपडावे - यथाविधि अन्वाधाय - नंतर शास्त्रविहित मंत्रांनी अन्वाधान करून, सर्पण घालून - द्रव्याणि आसाद्य - होमद्रव्ये स्वस्थानी ठेऊन - प्रोक्षण्या प्रोक्ष्य - प्रोक्षणीपात्रोदकाने त्या द्रव्यांचे प्रोक्षण करून - अग्नौ मां भावयेत - अग्नीत मत्स्वरूपाचे ध्यान करावे - ॥३७॥ तप्त-जांबूनद-प्रख्यं - तापविलेल्या सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल - शंखं-चक्र-गदा-अंबुजैः लसत् - शंख, चक्र, गदा व कमल या आयुधांनी शोभिवंत झालेले - चतुर्भुजं, शांतं - चतुर्भुज व शांत - पद्म-किंजल्क-वाससं - कमलकेसरसदृश्य पीतांबरधारी - ॥३८॥ स्फुरत्-किरीट-कटक-कटिसूत्र-वरांगदं - झळकणारे मुकुट, कडीतोडे, कटदोरा व श्रेष्ठ बाहुभूषणे असलेले - श्रीवत्सवक्षसं - श्रीवत्स आहे वक्षःस्थळी ज्याच्या असे - (च) भ्राजत्कौ कौस्तुभं - आणि कंठात झळकणारा कौस्तुभ - वनमालिनं - व आपाद मस्तक लांब असणारी वनमाला यांनी शृंगारलेले जे माझे स्वरूप त्याची यज्ञकुंडातील अग्नीत ध्यानपूर्वक भावना करावी - ॥३९॥ ध्यायन् - याप्रमाणे ध्यान करून - अभ्यर्च्य - अग्नीचे अष्टादिशांस अक्षता पेरून अर्चन करावे - च - आणि - हविषा अभिघृतानि दारूणि प्रास्य - घृताने पूर्ण भिजलेला दारु म्हणजे शुष्क समिधा अग्नीत प्रक्षेपून - आज्यभागौ च आघारौ दत्वा - आज्यभाग नामक व आघार नामक दोन दोन आहुति देऊन - आज्यप्लुतं हविः - घृतसिंचित होमद्रव्य - ॥४०॥ मूलमंत्रेण, अवदानतः षोडशर्चा - ‘ॐ नमो वासुदेवाय ’ या मूलमंत्राने व प्रत्येक ऋचेस एक एक अवदान याप्रमाणे सोळा ऋचांनी - जहुयात् - अग्नीला अर्पण करावे-हवन करावे - मंत्रैः धर्मादिभ्यः यथान्यायं - त्याप्रमाणे धर्मांदिकांस यथाशास्त्र समंत्रक आहुति द्याव्या - स्विष्टकृतं - स्विकृत होम समंत्रक करावा - बुधः - साधक ज्ञात्याने - ॥४१॥ अभ्यर्च्य - नंतर पूजाद्रव्याने ईश्वराची पूजा करावी - अथ नमस्कृत्य - नंतर ईश्वराला म्हणजे मला नमस्कार करावा - पार्षदेभ्यः बलिं हरेत् - पार्षदांस बली अर्पावा - नारायणात्मकं ब्रह्मस्मरन् - नारायणस्वरूप ब्रह्माचे स्मरण मनात जागृत ठेऊन - मूलमंत्रं जपेत् - वरील मूलमंत्र जपावा - ॥४२॥ आचमनं दत्वा (च) - आणि देवाप्रत आचमन अर्पून - विष्वक्सेनाय उच्छेषं कल्पयेत् - विष्वक्सेन नामक पार्षदाला नैवेद्याचा शेष असो, असे संकल्पावे - अथ - नंतर - तांबूलाद्यं सुरभिमत् मुखवासं अर्हयेत् - तांबूलादि सुवासिक मुखवास म्हणजे मुखशुद्धिरूपी खाद्य देऊन मंत्रपुष्पांजली भक्तिपूर्वक अर्पावी - ॥४३॥ उपगायन्, गृणन्, नृत्यन्, - नंतर पूजकाने मल्लीला गाणारा, वर्णन करणारा, नाचणारा, - मम कर्माणि अभिनयन्, मत्कथाः श्रावयन्, शृण्वन् - अभिनयून दाखविणारा, माझ्या कथा सांगणारा व ऐकणारा व्हावे - मुहूर्तं क्षणिकः भवेत् - एक घटकाभर स्वस्थ व शांत चित्ताने माझ्या ठिकाणी एकनिष्ठ होऊन बसावे - ॥४४॥ पौराणेः, प्राकृतैः अपि स्तोत्रैः, उच्चावचैः स्तवैः स्तुत्वा - संस्कृत व प्राकृत स्तोत्रांनी सुद्धा व त्याचप्रमाणे लहान मोठया स्तुतिपाठांनी माझे स्तवन करून - प्रसीद भगवन् - ‘हे भगवन् ! प्रसन्न व्हावे ’- इति - अशी प्रार्थना करावी - दंडवत् वंदेत - साष्टांग नमस्कार घालावे - ॥४५॥ बाहुभ्यां परस्परं मत्पादयोः शिरं च कृत्वा - नंतर दोन्ही हातांनी माझ्या पायांचा अवलंब करून, पायांवर मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार करावा - ईश ! - परमेश्वरा ! - मृत्यु-ग्रहार्णवात् भीतं - मृत्युनामक नक्र असलेल्या भवसागराला भ्यालेल्या - प्रपन्नं मां पाहि (इति) - व म्हणून तुला शरण आलेल्या अशा माझे रक्षण कर, अशी प्रार्थना करावी - ॥४६॥ इति - ‘इति ’ पदाचा संबंध मागच्या श्लोकाशी आहे - मया दत्तां शेषां सादरं शिरसी आधाय - नंतर उरलेला शेष, निर्माल्य, मी भगवंतानेच दिला आहे असे समजून तो मस्तकावर भक्तिपूर्वक धारण करावा - उद्वास्यं चेत् - विसर्जन करणे अगत्यच असेल तर - ज्योतिषी तत् ज्योतिः पुनः उद्वासयेत् - हृदयातील चिज्जोतीमध्येच त्या मूर्तीतील ज्योतीचे विसर्जन करावे - ॥४७॥ अर्चादिषु यदा यत्र श्रद्धा - मूर्त्यादि अष्टाधिष्ठानातून जेव्हा जेथे श्रद्धा असेल - तत्र च मां अर्चयेत् - त्यावेळी तेथेच माझे सांगोपांग पूजन करावे - अहं सर्वात्मा सर्वभूतेषु आत्मनि च अवस्थितः - मी सर्व चराचरांचा आत्मा सर्वदा सर्व भूतांत आणि जीवांतही विद्यमान असतो॥४८॥ एवं - या प्रकारे - वैदिकतांत्रिकैः क्रियायोगपथैः - वेदोक्त व तंत्रशास्त्रोक्त पूजाविधायक कर्मपंथाने - अर्चन् पुमान् - पूजा करणारा मानवी जीव - मत्तः - मजपासूनच - उभयतः - इहपरलोकात - अभीप्सितां सिद्धिं विंदाति - इष्ट असणार्या मनोरथांची सिद्धि प्राप्त करून घेतो - ॥४९॥ मदर्चां संप्रतिष्ठाप्य दृढं मंदिरं कारयेत् - माझ्या मूर्तीची शास्त्रविधिपूर्वक स्थापना करून तिच्यासाठी टिकाऊ देवालय बांधावे - रम्याणि पुष्पोद्यानानि - सुंदर पुष्पांची रमणीय उपवने सिद्ध करावी - पूजा-यात्रा-उत्सव-आश्रितान् क्षेत्र-आपण पुर-ग्रामान् - पूजा, यात्रा, उत्सवप्रसंगी उपयोग व्हावा म्हणून भूमी, बाजार, नगरे गावेही - महापर्वसु अथ अन्वहं पूजादीनां प्रवाहार्थं दत्त्वा - महापर्वकाळी व प्रतिदिवशी पूजाअर्चाप्रभृति अखंड चालवण्यासाठी देवाला अर्पण केल्याने - मत्सर्ष्टितां इयात् - त्या दात्याला माझे ऐश्वर्य प्राप्त होते - ॥५०-५१॥ प्रतिष्ठया सार्वभौमं, - मूर्तिप्रतिष्ठापनेचे फल सार्वभौमत्व, - सद्मना भुवनत्रयं, - मंदिर बांधण्याचे फल त्रिभुवनाचे राज्य, - पूजादिना ब्रह्मलोकं, - पूजादिकांचे फल ब्रह्मदेवाचा लोक - त्रिभिः च मत्साम्यतां इयात् - आणि ही तिन्हीही करणार्याला माझी समानता नामक मुक्ति मिळते - ॥५२॥ नैरपेक्ष्येण भक्तियोगेन मां एव विंदति - निष्काम भक्तियोगाने पूजकाला स्रायुज्यत्वच मिळते - यः मां एवं पूजयेत - जो माझी अशी निष्काम सेवा, पूजा करतो - सः भक्तियोगं लभते - त्यालाच निष्काम भक्तियोग साध्य होतो - ॥५३॥ स्वदत्तां, परैः दत्तां सुरविप्रयोः वृत्तिं यः हरेत - आपण स्वतः किंवा दुसर्यांनी देवाब्राह्मणास दान दिलेल्या वृत्तीचा जो अपहार करतो किंवा ती वृत्ति बंद करतो - सः वर्षाणां अयुतायुतं विड्भुक् जायते - तो दहा कोट वर्षे नरकलोकांतील मल खाणारा कृमि होतो - ॥५४॥ कर्तुः यत्फलं - प्रत्यक्ष कर्त्याला जे फल मिळते - तत् फलं सारथेः च, हेतोः अनुमोदितुः एव च - तेच फल साह्यकार्याला, तत्प्रवर्तकाला व अनुमोदन देणार्याला मिळते - कर्मणां भागिनः - हे सर्व कार्यभागीच होतात - प्रेत्य - आणि ते परलोकी गेल्यावर - भूयसि भूयः - त्यांचा सहभाग जितका अधिक तितके अधिक फल त्यास मिळते - ॥५५॥ अध्याय सत्ताविसावा समाप्त |