|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २६ वा - अन्वयार्थ
पुरूरव्याची वैराग्योक्ती - मल्लक्षणं इमं कायं लब्ध्वा - माझे स्वरूप ज्यायोगे लक्षिता येते असा हा मानव देह प्राप्त करून घेऊन - मद्धर्मे आस्थितः - माझ्या भक्तीमध्ये जो एकनिष्ठ असतो - आत्मस्थं परं आनंदं - पराकाष्ठेचा आनंदरूप असा जीवाच्या अंतर्यामी असणारा - आत्मानं मां समुपैति - जो मी परमात्मा त्या माझी प्राप्ति होते - ॥१॥ ज्ञाननिष्ठया - ज्ञानाभ्यासाने - गुणमय्या जीवयोन्या विमुक्तः - त्रिगुणपूर्ण जी जीवावस्था तिच्यापासून विमुक्त होऊन - अवस्तुतः दृश्यमानेषु मायामात्रेषु गुणेषु - मिथ्या असणारे जे मायिक म्हणजे दृश्य गुण - वर्तमानः अपि - त्यात वागत असताही - अवस्तुभिः गुणैः - अवास्तविक-मिथ्या असणार्या गुणांशी - पुमान् न युज्यते - तो ज्ञाननिष्ठ पुरुष संगतीच ठेवीत नाही - ॥२॥ शिश्र्नोदरतृपां असतां - शिश्र्नोदरपरायणं नास्तिकांशी - संगं क्वचित् न कुर्यात् - केव्हाही समागम करू नये - अंधानुगांधवत् - आंधळ्याचा हात धरून चालणार्या आंधळ्याप्रमाणे - तस्य अनुगः - नास्तिकानुयायी - अंधे तमसि पतति - अंधतमात पडतो - ॥३॥ बृहच्छ्रवाः ऐलः सम्राट - मोठी कीर्ति असलेला ऐलनामक चक्रवर्ती राजा - उर्वशीविरहात् मुह्यन् - उर्वशीच्या विरहाने वेडा होऊन पुनः भानावर आल्यानंतर - शोकसंयमेनिर्विण्णः - व शोक नष्ट करून विषयविरक्त झाल्यानंतर - इमां गाथां अगायत - ही पुढील गाथा त्याने गाइली - ॥४॥ उन्मत्तवत् नग्नः नृपः - उन्मत्ताप्रमाणे दिगंबर असलेला तो ऐल राजा - आत्मानं त्यक्त्वा - आपल्याला टाकून - व्रजंतीं तां - निघून जाणार्या उर्वशीला - ‘जाये घोरे तिष्ठ ’ इति विलपन् - ‘हे कठोर भार्ये ! ऊभी रहा, उभी रहा ’ असा विलाप करीत - विक्लवः अन्वगात् - व्याकुलतेने तिच्या मागे चालू लागला - ॥५॥ क्षुल्लकान् कामान् अनुजुषन् - क्षुल्लक म्हणजे मोक्षाला निरुपयोगी असणार्या वासना पूर्ण झाल्या नाहीत म्हणून - अतृप्तः - अतृप्तच राहिलेला - उर्वश्याकृष्टचेतनः - उर्वशीने आकर्षून घेतले चित्त व जीवित ज्याचे असा - यांतीः वर्षयामिनीः - वर्षांतील किती रात्री गेल्या व किती आल्या, - न आयांतीः न (वेद) - हे त्याला काही समजले नव्हते. त्याला कालाचे भानच नव्हते - ॥६॥ देव्या गृहीतकंठस्य - माझ्या उर्वशी भार्येने माझा कंठ, माझे सर्वस्व हरण केला गेलेला मी, तिच्या गळ्यातला ताईत झाल्यामुळे - कामकश्मल चेतसः मे - कामाने मलीन झाले आहे मन ज्याचे, अशा अशुद्ध मनाचा जो मी त्या माझा - अहो मोहविस्तारः - केवढातरी हा मोहाचा विस्तार पहा - इमे आयुःखंडाः न स्मृताः - माझ्या आयुष्याची ही इतकी वर्षे कशी गेली त्याचे मला भानच राहिले नाही - ॥७॥ अमुया मुषितः अहं - उर्वशीच्या संगतीने नष्टज्ञान झालेला मी - अभिनिर्मुक्तः अभ्युदितः वा सूर्यः - सूर्य मावळला किंवा उगवला हे - न वेद - जाणण्यास असमर्थ झालो - बत - अरेरे ! - वर्षपूगानां अहानि गतानि उत - अनेक वर्षांचे दिवससुद्धा या मोहातच नाहीसे व्हावे ना ? - ॥८॥ नरदेवशिखामणिः चक्रवर्ती - अनेक मांडलिक राजांचा चूडामणि, चक्रवर्ती मी ! - मे - माझा - अहो आत्मसंमोहः - केवढा मोठा आत्मघातकी मूढपणा हा ! - येन आत्मा - या मूढपणाने माझा, चक्रवर्तीचा आत्मा - योषितां - बायकांचे - क्रीडाःमृगः कृतः - खेळणे की हो झाला - ॥९॥ सपरिच्छदं ईश्वरं आत्मा नं - सकल ऐश्वर्यसंपन्न, सर्व प्रभु जो मी चक्रवर्ती त्या मला - तृणं इव - तृणासारखा, कस्पटापरी - हित्वा - टाकून देऊन - यांतीं स्त्रियं च - जाणार्या त्या उर्वशीच्या पाठी मागून - उन्मत्तवत् - उन्मत्त वेडयासारखा - नग्नः रुदन् अन्वगमं - नग्न आणि रडत ओरडत मी गेलो ! - ॥१०॥ कुतः - कोठे ? - तस्य - त्या माझ्या - अनुभवः स्यात्, तेजः, ईशत्वं एव वा ? - सामर्थ्याची, तेजाची किंवा प्रभुत्वाची काय किंमत राहिली ? - खरवत् पादताडितः यः - लाथाडल्या जाणार्या गर्दभाप्रमाणे जो मी - यांतीं स्त्रियं अन्वगच्छं - त्या निष्ठुर स्त्रीच्या मागे मागे गेलो - ॥११॥ यस्य स्त्रीभिः मनः हृतं - ज्याचे मन स्त्रियांनी चोरून नेले - किं विद्यया, किं तपसा, - त्याची विद्या, त्याचे तप, - किं त्यागेन, श्रुतेनवा किं - वैराग्य, त्याचे श्रवण - विविक्तेन, मौनन - किंवा त्याचे एकांतवास्तव्य, अथवा मूकव्रत ही सर्व व्यर्थ होत - ॥१२॥ यः अहं ईश्वरतां प्राप्य - ज्या मला सकल ऐश्वर्य प्राप्त झाले असून - स्त्रीभिः गो-खर-वत् जितः - स्त्रीयांकडून बैल व गर्दभ यांच्यासारखा वश केला गेलो - तं स्वार्थस्य अकोविदं - त्या स्वतःचा उत्तम पुरुषार्थ न जाणणार्या - मूर्खं पंडितमानिनं मां - मूर्ख आणि पंडितमन्य मला - धिक् - धिःकार असो - ॥१३॥ उर्वश्याः अधरासवं वर्षपूगान् सेवतः - उर्वशीचे अधरामृत मी अनेक वर्षे आसोशीने प्यालो - मे आत्मभूः - माझ्या मनातील विषयवासनेची - न तृप्यति - तृप्ति झालीच नाही ! - यथा आहुतिभिः वह्निः - आहुति देऊन अग्नीची कधीही शांति होत नाही तशी - ॥१४॥ आत्मरामेश्वरं भगवंतं अधोक्षजं ऋते - श्रीपुरुषोत्तम भगवान जो अधोक्षज विष्णु त्याच्यावाचून - पुंश्चल्या अपहृतं चित्तं - उर्वशी वेश्येने पिंजर्यात कोंडलेले माझे चित्त - मोचितुं - बंधमुक्त करण्याला - कः नु अन्यः प्रभुः - दुसरा कोण समर्थ आहे ? - ॥१५॥ देव्या सूक्तवाक्येन बोधितस्य अपि - त्या देवीने सदुपदेश करून मला बोधिले तरी - अजितात्मनः दुर्मतेः मे - इंद्रियवश असलेला हीनमति जो मी त्या माझ्या - मनोगतः - प्रबल मनात वाढलेला - महामोहः - बळकट मोह - न अपयाति - नष्ट होतच नव्हता ना ! - ॥१६॥ किं एतया नः अपकृतं - या उर्वशीने माझा काय बरे अपराध केला ? - रज्जुस्वरूपाऽविदुषः सर्पचेतसः रज्ज्वा वा - दोरीचे स्वरूप ठाऊक नसल्यामुळे दोरीला सर्प मानणार्याचा दोरी काय अपराध करिते ? - यत् - ज्याअर्थी - यः अहं अजितेंद्रियः - इंद्रिये मन इत्यादि ताब्यात नसणारा जो मी त्या माझाच हा सर्व अपराध आहे - ॥१७॥ क्व अयं मलीमसः दौंर्गध्याद्यात्मकः अशुचिः कायः - कोणीकडे हा अति मलीन, दुर्गंध पदार्थांनी भरलेला अशुद्ध देह - सौमनस्याद्याः क्व गुणाः - निर्मळ, सुगंधी, नाजूक पुष्पाप्रमाणे सात्त्विक गुण ? - अविद्यया कृतः अध्यासः हि - मलीनत्वादि दुर्गुण असणार्या देहाचे ठिकाणी निर्मलता प्रभृति चांगल्या गुणांचा आरोप जीव करतो, ते अविद्येचे फल होय़ - ॥१८॥ पित्रोः स्वं किं नु - मातापितरांचा हा स्व म्हणजे देह आहे - भार्यायाः - किंवा पत्नीचा आहे - स्वामिनः - किंवा आपल्या यजमानाचा, - अग्नेः - का अग्नीचा, - श्वगृध्रयोः - का कुत्रे-गिधाडांचा, - किं आत्मनः - का आपलाच, - किं सुहृदां ? - का मित्रांचा ? - इति यः न अवसीयते - हा देह तो कोणचा हे काहीच ठरविता येत नाही - ॥१९॥ तस्मिन् अमेध्ये तुच्छनिष्ठे कलेवरे - त्या ह्या अपवित्र व शेवटी अत्यंत तुच्छ स्वरूप घेणार्या जड देहावरच - सुभद्रं सुनसं सुस्मितं च स्त्रियः मुखं - या स्त्रीचे मुख, उत्तम नाक, सरळ व मनोहर हास्य यांमुळे कितीतरी सुंदर आहे असा आरोप करुन - अहो विषज्जते - वेडया आषकपणाने लुब्ध होतो - ॥२०॥ त्वङ्मांसरुधिरस्नायु - त्वचा, मांस, रक्त, स्नायु, - मेदोमज्जास्थिसंहतौ - चरबी, मगज, हाडके, या सात अमंगल पदार्थांच्या मेळवण्याने सिद्ध झालेल्या या देहसंघाताचे ठिकाणी - रमतां (मादृशानां) - रममाण होणार्या माझ्यासारख्यात - विण्मूत्रपूये (रमतां) कृमीणां - विष्ठा, मूत्र, पू यांच्या कर्दमात लोळण्याचा आनंद मानणार्या किडयात - कियत् अंतरं - काय फरक आहे ? - ॥२१॥ अथ अपि - असे ज्याअर्थी आहे त्याअर्थी - स्त्रीषु स्त्रैणैषु च अर्थवित् न उपसज्जेत - स्त्रियांची व स्त्रीलोलुपांची संगति पुरुषार्थ जाणणार्या विद्वानांनी करूच नये - विषयेंद्रियसंयोगात् मनः क्षुभ्यति - विषयांचा इंद्रियांशी संयोग झाला की मन भोगासाठी क्षुब्ध होतेच होते - न अन्यथा - त्याला क्षुब्ध करण्याला दुसरे काही समर्थ नाही - ॥२२॥ अदृष्टात्, अश्रुतात् भावात् - न पाहिलेल्या व न ऐकलेल्या पदार्थांपासून - भावः न उपजायते - दृश्यादृश्य कार्य उत्पन्न होत नाही - प्राणान् असंप्रयुंजतः - इंद्रियांस, मनास व प्राणास प्रेरणा न करणार्या पुरुषाचे - स्तिमितं मनः शाम्यति - स्तब्धता प्राप्त झालेले मन शांत, क्षोभशून्य होते - ॥२३॥ तस्मात् स्त्रीषु स्त्रैणेषु च इंद्रियैः संगः न कर्तव्यः - म्हणून स्त्रिया आणि स्त्रीसंगी पुरुष यांच्या ठायी इंद्रियांचा संयोग केव्हाही करू नये- च - कारण - विदुषां अपि षड्वर्गः अविश्रब्धः - मोठया ज्ञानी पुरुषांचे सुद्धा कामक्रोधादि सहा विकार विश्वास ठेवण्याला योग्य नसतात - किमु मादृशां - मग माझ्यासारख्यांची गोष्टच कशाला ? - ॥२४॥ एवं प्रगायन् सः नृपदेवदेवः - याप्रमाणे तो जो चक्रवर्ती ऐल राजा त्याने हे गीत गाउन - अथो - नंतर - उर्वशीलोकं विहाय - उर्वशी वास्तव्य करीत होती तो लोक सोडून दिला - मां आत्मानं आत्मनि अवगम्य - मी जो परमात्मा त्याला आपल्या आत्मस्वरूपातच जाणले - ज्ञान विधूतमोहः उपारमत् वै - आत्मज्ञानाने सर्व मायामोह नाहीसा करून विषयापराङ्मुख झाला - ॥२५॥ ततः - याकरिता - दुःसंगं उत्सृज्य - दुष्टांची संगति सोडून देऊन - बुद्धिमान् - शहाणा जो त्याने - सत्सु सज्जेत - संतांची संगति धरावी - उक्तिभिः संतः - साधुलोक उपदेशी भाषणांनी - एतस्य - शहाण्याच्या - मनोव्यासङ्गं - मनात असणार्या विषयासक्तिचा - छिंदंति - उच्छेदच करतात - ॥२६॥ संतः अनपेक्षाः, - संत निस्पृह, - मच्चिताः, प्रशांताः, समदर्शिनः, - सर्वदा माझे ध्यान मनोभावे करणारे, विनयशील, राजारंकांस एकाच दृष्टीने पाहणारे, - निर्ममाः, निरहंकाराः, - ममत्वशून्य, अहंकारशून्य, - निर्द्वंद्वाः निष्परिग्रहाः - द्वैतातीत, कसलाही पाश न असणारे असतात -॥२७॥ महाभाग - भाग्यशाली उद्धवा ! - तेषु महाभागेषु - त्या पुण्यशील संतांच्या वृंदात - नित्यं - नित्य - मत्कथाः संभवंति हि - माझ्या अवतारकथांचे श्रवणमननादि चालत असते - ताः जुषतां नृणां - त्या कथासेवन करणार्या पुरुषाचे सर्व पातक - अघं प्रपुनंति - त्या ह्या कथा धुवून टाकतात व जीवास शुद्ध करतात - ॥२८॥ ये आदृताः ताः - त्या आदरणीय कथांचे - श्रृण्वंति गायंति अनुमोदंति हि च - जे आदरपूर्वक श्रवण व गायन व अनुमोदन करतात - मत्पराः श्रद्दधानाः च - मत्पर व श्रद्धालु असतात - ते मयि भक्तिं विंदंति - त्या श्रद्धालूस माझ्या ठिकाणी प्रेमभक्ति उत्पन्न होते - ॥२९॥ मयि अनंतगुणे - अनंत गुण असणारा मी सगुण - आनंदानुभवात्मनि - आनंदस्वरूप असणारा निर्गुण परमात्मा जो मी त्या माझ्या - ब्रह्मणि - ब्रह्मस्वरुपाची - भक्तिं लब्धवतः साधोः - भक्ति दृढ झालेल्या साधूला - किं अन्यत् अवशिष्यते - आणखी काय मिळवण्यासाठी कर्म अवश्य असते ? तात्पर्य तो कृतकृत्य होतो - ॥३०॥ भगवंतं विभावसुं उपाश्रयमाणस्य - भगवान अग्नीचा आश्रय करणार्याला - शीतं, भयं, तमः, यथा अप्येति - थंडी, भीति, अंधकार यांची पीडा होत नाही - तथा साधून संसेवतः - त्याप्रमाणे साधूंची उत्तम सेवा करणार्या साधकाला कसली भीति किंवा कर्तव्य उरत नाही - ॥३१॥ घोरे भवाब्धौ निमज्ज्य उन्मज्जतां - घोर भवसागरात गटांगळ्या खाणार्यास - परं आयनं - उत्तम तारक - ब्रह्मविदः शांताः संतः - शांत व ब्रह्मज्ञ संतच होत - अप्सु मज्जतां दृढा नौः इव - पाण्यात बुडणार्याला जशी बळकट नौका तारते, त्याप्रमाणे - ॥३२॥ अन्नं हि प्राणिनां प्राणः - अन्न हे प्राण्यांचे जीवन आहे - आर्तानां शरणं तु अहं - दुःखित दीनांचा आधाररक्षक मी आहे - प्रेत्य नृणां धर्मः वित्तं - मेल्यावर प्राण्यांची दौलत म्हणजे त्यांचे धर्माचरण - संतः अर्वाक् बिभ्यतः अरणं - आगामी जन्ममरणाला भ्यालेल्या जीवास साधूच निर्भय करतात - ॥३३॥ संतः चक्षूंषि दिशंति - संतमंडळ अनेक अंतर्बाह्य ज्ञानोपकारक साधने अस्तित्वात आणतात - समुत्थितः अर्कः बहिः - उगवलेला सूर्य बाहेरचे मात्र पाहणार्या नेत्राला उपकारक होतो - संतः देवताः, बांधवाः, - संतच सर्व देवता, सर्व आप्तेष्ट, - संतः आत्मा, - फार काय संत म्हणजे, प्रत्यक्ष आत्मा - अहं एव च - आणि संत म्हणजे परमात्मा ! तात्पर्य, संत सर्वश्रेष्ठ होत - ॥३४॥ ततः - नंतर - एवं - याप्रमाणे - उर्वश्या लोकनिस्पृहः वैतसेनः अपि - उर्वशीभुवनाला अथवा तिचे अवलोकन, स्पर्श, प्रेम इत्यादिकाला वैतागलेला - मुक्तसंगः - व मुक्तसंग म्हणजे निःसंग झालेला - आत्मारामः - आत्मस्वरूपात रममाण होऊन - एतां महीं - या भूलोकावर - चचार ह - यथेष्ट संचार करीत राहिला - ॥३५॥ अध्याय सव्विसावा समाप्त |