श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २३ वा - अन्वयार्थ

तितिक्षुद्विजोपाख्यानम् - भिक्षुगीतम् -

भागवतमुख्येन उद्धवेन - भगवद्‌भक्तप्रमुख भागवतसंप्रदायी भक्त उद्धवाने - एवं आशंसितः सः - याप्रमाणे ज्याची प्रार्थना केली तो - दाशार्हमुख्यः श्रवणीयवीर्यः मुकुंदः - दाशार्हांचा स्वामी सर्ववंद्य व पराक्रमी अशा श्रीकृष्णाने - भृत्यवचः सभाजयन् - आपल्या दासाच्या विनंतीचा अभिनंदनपूर्वक सादर स्वीकार केला आणि - तं आबभाषे - त्याला विस्तारपूर्वक मोक्षप्रद उपदेश केला. ॥ १ ॥

बार्हस्पत्य - बृहस्पतिशिष्या - अत्र - या लोकी - दुर्जनेरितैः दुरुक्तैः वै - दुष्ट लोकांच्या दुष्टमनाने प्रेरिलेली जी दुष्ट वाक्ये त्यांनी - भिन्नं आत्मानं - भिन्न म्हणजे क्षुब्ध मनाला - समाधातुं - शांत करण्याचे - यः ईश्वरः - प्रभुत्व असणारा - सः साधुः न वै - असा साधुच प्रायः असत नाही. ॥ २ ॥

यथा - ज्याप्रमाणे - असतां - दुष्टांचे - मर्मस्थाः परुषेषवः - मर्मभेदक तीक्ष्ण वाग्बाण - तुदंतिहि - दुःसह व्यथा उत्पन्न करतात - तथा - त्याप्रमाणे - सुमर्मगैः बाणैः विद्धः - मर्मी घाव घालणार्‍या लोखंडी बाणांनी जर्जर झालेला - पुमान् - पुरुष - न तप्यते - व्यथित होत नाही. ॥ ३ ॥

उद्धव - उद्धवा - इह - यासंबंधी - महत्पुण्यं इतिहासं कथयंति - एक पवित्र, मोठा पुण्यकारी व सहनशीलता शिकविणारा असा इतिहास सांगतात - तं अहं वर्णयिष्यमि - तो इतिहास मी सविस्तर सांगतो - सुसमाहितः निबोध - तू एकनिष्ठपणे मन शांत करून ऐक. ॥ ४ ॥

दुर्जनैः परिभूतेन - दुष्टांच्या भाषणादिकांनी अपमानलेला - निजकर्मणां विपाकं स्मरता - परंतु आपल्या कर्मांचा विपाक म्हणजे परिणाम स्मरणारा - धृतियुक्तेन - व मनाचे धैर्य असणारा - केनचित् भिक्षुणा - कोणी एक भिक्षु म्हणजे संन्यासी त्याने - गीतं - ही इतिहासरूपी गाथा गायिली. ॥ ५ ॥

अवंतिषु - अवंती राज्यात - कश्चित् - कोणी एक - श्रिया आढयतमः - मोठा श्रीमंत - वार्तावृत्तिः - व्यापारी - तु कदर्यः, कामी, लुब्धः, अतिकोपनः - पण कंजूष, हावरा, लोभी व तामसी असा - द्विजः आसीत् - ब्राह्मण राहात असे. ॥ ६ ॥

तस्य ज्ञातयः - त्याचे जातभाई - अतिथयः - पाहुणे, पांथस्थ - वाङ्‌मात्रेण अपि न अर्चिताः - त्याकडे येत, त्यांस त्याने ‘या, बसा ’ असा सुखाचा एक शब्द बोलून सुद्धा पाहुणचार केला नाही - शून्यावसथे - आपल्या शून्य घरी - आत्मा अपि कामैः - आपल्या शारीरिक अथवा मानसिक गरजांची सुद्धा - काले - वेळोवेळी - अनर्चितः - विचारणा केली नाही. ॥ ७ ॥

दुःशीलस्य - त्या दुष्ट स्वभावाच्या - कदर्यस्य - कृपणाचा - पुत्रबांधवाः - त्याचे पुत्र बंधु - द्रुह्यंते - द्वेष करित असत - विषण्णाः दाराः दुहितरः भृत्याः - दुःखाने गांजलेली बायको, त्याच्या मुली, त्याचे सेवक कोणीही - प्रियं न आचरन् - त्याचे प्रिय करीत नसे. ॥ ८ ॥

एवं - याप्रमाणे - उभयलोकतः च्युतस्य - ऐहिक व पारलौकिक कर्तव्याला भ्रष्ट झालेला - धर्मकामविहीनस्य - धर्मविहित वासना नसणारा - यक्षवित्तस्य तस्य - यक्षाप्रमाणे द्रव्याची राखण करणारा जो कृपण त्याच्यावर - पंचभागिनः चुक्रुधुः - पाचही यज्ञदेवता रागावल्या. ॥ ९ ॥

भूरिद - हे उदारशील उद्धवा - तदवध्यानविस्रस्तपुण्यस्कंधस्य - त्या देवतांचा अनादर केल्यामुळे नाहीसा झाला पुण्याचा संचय ज्याचा अशा त्या कृपण ब्राह्मणाचे - बह्‌वायासपरिश्रमः अर्थः अपि - अनेक कष्टकारी श्रमसाहसांनी मिळविलेले द्रव्यही - निघनं अगच्छत् - नष्ट झाले. ॥ १० ॥

उद्धव ब्रह्मबंधोः ज्ञातयः किंचित् जगृहुः - उद्धवा ! त्या ब्राह्मण म्हणविणार्‍याचे काही धन भाऊबंदांनी घेतले - दस्यवः किंचित् - काही चोरांनी लुबाडले - दैवतः कालतः नृपार्थिवात् किंचित् - काही दुर्दैवाने काही काळचक्राने व काही लोकांनी व काही राजाने हिरावून नेले. ॥ ११ ॥

एवं द्रविणे नष्टे - याप्रमाणे सर्व द्रव्य नाहीसे झाले तेव्हा - धर्मकाम विवर्जितः - धर्म म्हणजे परलोकासाठी असणारी कर्तव्ये व काम म्हणजे ऐहिक वासना यांनी त्यागिलेला - च - आणि - स्वजनैः उपेक्षितः - आप्तेष्टमित्रांनी टाकून दिलेला - सः - तो दरिद्री कृपण - दुरत्ययां चिंतां आप - दुर्लंघ्य अशा चिंतेप्रत प्राप्त झाला. ॥ १२ ॥

एवं दीर्घं ध्यायतः - याप्रमाणे पुष्कळ काळपर्यंत आपल्या स्थितीचे चिंतन करणारा - नष्टरायः - निर्धन - तपस्विनः - संतप्त - खिद्यतः बाष्पकंठस्य तस्य - व खिन्न आणि दुःखाश्रूंनी रुद्धकंठ असा जो हा ब्राह्मण त्याला - सुमहान् - मोठे - निर्वेदः - कडकडीत वैराग्य - अभूत् -प्राप्त झाले. ॥ १३ ॥

सः च इदं आह - आणि तो असे म्हणाला - अहो कष्टं - अहो मोठया दुःखाची गोष्ट की - यस्य ईदृशः अर्थायासः न धर्माय न कामाय - ज्या द्रव्यासाठी केलेला माझा आयास ना धर्मासाठी ना प्रापंचिक सुखासाठी झाला - मे आत्मा वृथा अनुतापितः - माझा देह मी व्यर्थ व्यर्थ मात्र दुःखात घातला. ॥ १४ ॥

कदर्याणां अर्थाः प्रायेण - कृपणांचे द्रव्य बहुशः - कदाचन न सुखाय - केव्हाही सुखाला कारण होत नाही - च इह आत्मोपतापाय - आणि या लोकी ताप देणारे - मृतस्य नरकाय च - आणि मेल्यावर नरकाप्रत नेणारेच असते. ॥ १५ ॥

यशस्विनां शुद्धं यशः - यशस्वी लोकांचे जे पवित्र यश - ये गुणिनां श्लाघ्याः गुणाः - गुणवंत लोकांचे जे वर्णनीय गुण - तान् - त्या सर्वांस - स्वल्पः अपि लोभः हंति - अगदी सूक्ष्मस्वरूपाचा सुद्धा लोभ नाहीसे करतो - ईप्सितं रूपं श्वित्रः इव - श्वित्र म्हणजे पांढरे कोड रूपसौंदर्याचा नाश करते तसा. ॥ १६ ॥

अर्थस्य साधने सिद्धे - अर्थसाधन म्हणजे द्रव्यसाधन सिद्ध झाल्यावर - उत्कर्षे - याची वाढ करणे - रक्षणे - त्याचे रक्षण करणे - नाशोपभोगे - आणि उपभोग घेताना अथवा इतर कारणांनी नष्ट होण्याचा प्रसंग असता - व्यये - खर्च करणे यात - नृणां आयासः, त्रासः, चिंता, भ्रमः - पुरुषांस श्रम, संताप, चिंता व भ्रम अनुक्रमे होतात. ॥ १७ ॥

स्मयः, मदः, भेदः, वैरं, अविश्वासः, - चोरी, हिंसा, असत्य, दंभ, काम, - स्तेयं, हिंसा, अनृतं, दंभः, कामः, क्रोधः, - क्रोध, आश्चर्य, उन्माद, भेदवृत्ति, शत्रुत्व, अविश्वास, - संस्पर्धा, व्यसनानि च - स्पर्धायुक्त मत्सर आणि स्त्री, मद्य, द्यूत ही तीन व्यसने. ॥ १८ ॥

एते अर्थमूलाः पंचदश अनर्थाः हि - मिळून १५ अनर्थ द्रव्यापासून उत्पन्न होतात - नृणां मताः - असे जनमत आहे - तस्मात् - म्हणून - श्रेयोर्थी - कल्याणेच्छु जो त्याने - अर्थाख्यं अनर्थं - द्रव्यनामक अनर्थ - दूरतः त्यजेत् - दुरूनच टाकून द्यावा. ॥ १९ ॥

भ्रातरः, दाराः, पितरः, तथा सुहृदः भिद्यंते - बंधु, बायको, मातापितरे व त्याचप्रमाणे स्नेही यांत द्रव्यामुळेच फूट पडते - सर्वे एकास्निग्धाः - एकजीव असलेले हे सर्व लोक - काकिणिना -एका दीडदमडीमुळे - सद्यः अरयः कृताः - तत्काळ वैरी होतात. ॥ २० ॥

अल्पीयसा हि अर्थेन - थोडयासुद्धा द्रव्यामुळे - एते - हे कलत्र, पुत्र, मित्रादि - संरब्धाः दीप्तमन्यवः आशु त्यजंति - क्षुब्ध होऊन क्रोधावशात द्रव्यवंताला तात्काळ टाकतात - सौहृदं सहसा उत्सृज्य - मित्रभाव एकदम सोडून देऊन - स्पृधः ध्नंति - ते मत्सरी त्याचा घात करितात. ॥ २१ ॥

अमरप्रार्थ्यं मानुष्यं जन्म - देवांनीही प्रार्थिलेला मनुष्यजन्म - तत् द्विजाग्रयतां लब्ध्वा - त्यातही ब्राह्मणत्व प्राप्त झाले असता - तत् अनादृत्य -त्या ब्राह्मणत्वाचा धिःकार करून - ये स्वार्थं घ्नंति - जे आपल्या स्वार्थाचा घात करतात - अशुभां गतिं यांति - अमंगल स्थितीत जाऊन पडतात. ॥ २२ ॥

स्वर्गापवर्गयोः द्वारं - स्वर्ग आणि मुक्ति या उभयतांमध्ये प्रवेश करून देणारे द्वार म्हणजेच - इमं लोकं प्राप्य - हा मानवी देह प्राप्त झाला असता - मर्त्यः कः पुमान् - कोणता विचारी पण मर्त्यदेहधारी पुरुष - अनर्थस्य धामनि द्रविणे - अनर्थाचे माहेरघर जे जन्ममरणात्मक द्रव्य, विषय त्यात - अनुषज्जेत - आसक्तीने रममाण होईल ? ॥ २३ ॥

देवर्षिपितृभूतानि - देव, ऋषि, पितर व सर्व भूते - ज्ञातीन् - गोत्रज - बंधून् च - भाऊ - भागिनः - मनुष्याच्या संपत्तीमध्ये वाटेकरी असतात - आत्मानं च - आणि आपणही वाटेकरी असतो - असंविभज्य - ज्यांचे त्यांचे वाटे त्यांस देऊन त्यांचे संतर्पण केले नाही तर - यक्षवित्तः अधः पतति - द्रव्यसंरक्षक कंजूष अधोगतीला जातो. ॥ २४ ॥

व्यर्थया अर्थेहया प्रमत्तस्य - द्रव्य मिळविण्याच्या व्यर्थ उद्योगाने उन्मत्त झालेल्या माझे - वित्तं वयः बलं - द्रव्य, आयुष्य आणि शक्ति व्यर्थ गेल्या - येन- ज्या वित्ताच्या वयाच्या व बलाच्या साह्याने - कुशलाः सिद्‌ध्‌यंति - शहाणे पुरुष स्वर्गमोक्षादि साधतात - जरठः किं नु साधये - मी म्हातारा आता काय साधू शकणार ? ॥ २५ ॥

व्यर्थया अर्थेहया - निष्फल व दुष्फल अर्थसंचयाच्या इच्छा धरून - असकृत् - वारंवार - विद्वान् कस्मात् संक्लिश्यते - शहाणा पंडितसुद्धा संकटात का उडी टाकतो बरे ? - नूनं कस्यचित् मायया - कोणाच्या तरी मायेनेच खरोखर - अयं लोकः सुविमोहितः - हे सर्व लोक वेडे होत असले पाहिजेत. ॥ २६ ॥

मृत्युना ग्रस्यमानस्य - मृत्यु ज्याला नित्य गिळतो त्याला - किं धनैः धनदैः - धनाचा किंवा धन देणार्‍य़ांचा, - वा किं कामैः कामदैः उत वा - वासनांचा किंवा वासना पुरविणार्‍य़ांचा, किंवा जन्मदैः कर्मभिः उत वा - जन्ममृत्यूच उत्पन्न करणार्‍या कर्मांचा काय उपयोग आहे बरे ? ॥ २७ ॥

सर्वदेवमयः हरिः भगवान् - सर्व देवतांचा आत्मा जो षड्‌गुणैश्वर्यसंपन्न भगवान तो श्रीहरीच - मे - मजवर - तुष्टः नूनं - संतुष्ट झाला आहेसे दिसते - येन एतां दशां नीतः - त्यानेच मला ही स्थिती दिली - आत्मनः प्लवः निर्वेदः च - जीवाच्या तारणाला नौकारूपी वैराग्य प्राप्त करून दिले. ॥ २८ ॥

सः अहं कालावशेषेण - यापुढे शिल्लक राहिलेल्या आयुष्यात वैराग्यसंपन्न मी - आत्मनः अंगं - आपल्या देहसंघात - अप्रमत्तः - सावध राहून - शोषयिष्ये - तपादिकांना शुष्क करीन - अखिलस्वार्थे आत्मनि यदि सिद्धः स्यात् - मात्र सर्व पुरुषार्थांचा निधि जो आत्मस्वरूपप्राप्ति त्यात सिद्ध म्हणजे सज्ज, संतुष्ट असलो पाहिजे. ॥ २९ ॥

तत्र - या माझ्या तपश्चर्येच्या कामी - त्रिभुवनेश्वराः देवाः मां अनुमोदेरन् - त्रिभुवनेश्वर देवांचे मला अनुमोदन असावे - मुहूर्तेन - एका घटकेतच - खट्‌वांगः ब्रह्मलोकं समसाधयत् - खट्‌वांगराजाने ब्रह्मलोकाची प्राप्ति करून घेतली होती. ॥ ३० ॥

इति मनसा हि अभिप्रेत्य - याप्रमाणेच मनाचा निश्चित संकल्प करून - आवंत्यः द्विजसत्तमः - तो अवंतीचा ब्राह्मणश्रेष्ठ - हृदयग्रंथीन् उन्मुच्य - अंतःकरणाच्या अहंकारादि गाठी सोडविता झाला - शांतः भिक्षुः - कामक्रोधादि नष्ट झाल्यामुळे शांतचित्त संन्यासी होऊन - मुनिः अभूत् - सतत ध्यानमग्न असा आत्मवेत्ता मुनि झाला. ॥ ३१ ॥

संयतात्मेंद्रियानिलः सः - अंतःकरण, इंद्रिये व प्राण यांचे संयमन करणारा तो मुनि - एतां महीं चचार - पृथ्वीवर संचार करू लागला - भिक्षार्थं असंगः अलक्षितः - भिक्षेसाठी तो निःसंग व अनिकेत-कोणत्याही आश्रमाची चिन्हे धारण न करणारा होऊन - नगरग्रामान् अविशत् - नगरात व गावात प्रवेश करू लागला. ॥ ३२ ॥

भद्र - कल्याणस्वरूपी उद्धवा - तं प्रवयसं अवधूतं भिक्षुं दृष्ट्‌वा - त्या वृद्ध, मलीन संन्याशाला पाहून - ते असज्जनाः - त्या नगरातील जे दुष्ट पुरुष त्यांनी - बह्‌वीभिः परिभूतिभिः पर्यभवन् वै - त्या भिक्षूचा अनेक तिरस्कारमूलक कृतींनी भारी अपमान करण्यास प्रारंभ केला. ॥ ३३ ॥

केचित् त्रिवेणुं जगृहुः - काहींनी त्याचा त्रिदंड हिसकावून घेतला - एके पात्रं कमण्डलुम् - कित्येकांनी पात्र व कमंडलु पळविला - एके पीठं च, केचन अक्षसूत्रं कंथां चीराणि च - कोणी आसन, कोणी जपमाला व कोणी कंथा-वाकळ-वल्कले लुबाडली. ॥ ३४ ॥

च - आणि - मुनेः दर्शितानि तानि प्रदाय पुनः आददुः - ती दंडवस्त्रादि त्याला थट्टेने दाखवून, त्याच्या हातांतही देऊन पुनः ती सर्व हिसकावून घेतली ! - सरित्तटे - नदीतीरी - अन्नं च भैक्ष्यसंपन्नं भुंजानस्य - भिक्षेत मिळालेले अन्न तो बिचारा खात बसला असता. ॥ ३५ ॥

पापिष्ठाः अस्य मूर्घनि मूत्रयंति च ष्ठीवंति च - ते अतिनीच व महापापी तेथे जाऊन त्याच्या मस्तकावर लघुशंका करीत आणि थुंकीच्या पिचकार्‍या सोडीत - यतवाचं - त्या मौनवृत्ति भिक्षूला - वाचयंति - ते पापी बोलावयास लावीत - न वक्ति चेत् - नच बोलला तर - ताडयंति - त्याला ताडण करीत. ॥ ३६ ॥

अपरे ‘स्तेनः अयं ’ इति वादिनः वाग्भिः तर्जयंति - दुसरे काही ‘हा चोर आहे ’ असे बोलत आणि त्याला शिव्या देत - ‘बध्यतां बध्यतां ’ इति केचित् रज्ज्वा तं बध्नंति - ‘बांधा, बांधा ’ असे ओरडून काहीजण त्याला दोर्‍यांनी बांधीत. ॥ ३७ ॥

एके अवजानंतः ‘एषः धर्मध्वजः शठः ’(इति) क्षिपंति - हा दांभिक लुच्चा आहे अशी अवज्ञापूर्वक काही त्याची निंदा करीत - क्षीणवित्तः स्वजनोझ्जितः - अहो हा धनशून्य झाला म्हणून याच्या माणसांनी याला टाकून दिले आहे - इमांवृत्तिं अग्रहीत् - याने हा बकसंन्यास घेतला आहे. ॥ ३८ ॥

अहो एषः महासारः गिरिराट् इव धृतिमान् - अहो हा दणगट, झोंड आणि धिटाई करणारा हिमालयासारखा अढळ आहे - बकवत् - हा बगळ्यासारखा आतल्या गाठीचा - दृढनिश्चयः मौनेन - हट्टाने मौन धरून - अर्थं साधयति - मतलब साधणारा आहे. ॥ ३९ ॥

एके दुवार्तयंति च - आणि काही निर्लज्ज त्याच्यावर अपानवायु सोडीत - यथा क्रीडनकं तथा - शुक, सारिका, माकडे वगैरेस बांधून पिंजर्‍यात घालतात त्याप्रमाणे - द्विजं - त्या ब्राह्मणाला - बबंधुः - बांधले - निरुरुधुः - व पिंजर्‍यात ही कोंडले. ॥ ४० ॥

एवं भौतिकं, दैविकं, दैहिकं, यत् दुःखं तत् - याप्रमाणे माणसांनी दिलेले, दैवाने-देवांनी पाठविलेले, शरीराला होणारे जे दुःख ते - आत्मनः दिष्टं - दैवाने कपाळी लिहिले आहे, ते प्रारब्धच होय - प्राप्तं प्राप्तं भोक्तव्यं - ते भोगलेच पाहिजे - इति - असे - सः अबुध्यत - त्याचा विवेक त्याला सांगे. ॥ ४१ ॥

पातयद्‌भिः नराधमैः परिभूतः - त्याला धर्मभ्रष्ट करू इच्छिणार्‍या नराधमांनी त्याचा असा भयंकर छळ केला तरी - स्वधर्मस्थः - स्वधर्मच्युत न होता - सात्त्विकीं धृतिं आस्थाय - उत्तम प्रकारचे सात्त्विक धैर्य धरून - इमां गाथां अगायत - ही पुढील-मी अनुवदणार आहे ती-गाथा गायिली. ॥ ४२ ॥

अयं जनः सुखदुःखहेतुः न - हे लोक माझ्या सुखदुःखाचे कारण नव्हेत - न देवताः आत्मा, ग्रहाः, - तसेच सर्व देव-देवता किंवा आत्मा=शरीर किंवा शनिमंडळ वगैरे ग्रह, - कर्मकालाः - किंवा माझी पूर्वसंचित वा प्रारब्धकर्में किंवा सर्वभक्षक काल हे माझ्या सुखादिकांचे कारक नव्हेत - यत् संसारचक्रं परिवर्तयेत् - संसाराचे सुखदुःखात्मक जन्म मरणांचे चक्र जे फिरविते - मनः परं कारणं आमनंति - मनच सर्वश्रेष्ठ व मूळ कारण होय, असे जाणते लोक म्हणतात आणि तेच खरे आहे. ॥ ४३ ॥

बलीयः मनः गुणान् सृजते वै - सर्वशक्ति मनच गुण म्हणजे सात्त्विकादि गुणवृत्ति उत्पन्न करते - ततः च - त्या गुणांपासून - शुक्लानि, कृष्णानि, अथ लोहितानि विलक्षणानि कर्माणि - सात्त्विक, तामस, आणि राजस अशी निरनिराळ्या प्रकारची कर्मे उद्भवतात - तेभ्यः सवर्णाः सृतयः - आणि त्या त्या कर्मांपासून सवर्ण म्हणजे कर्मानुरूप सृति म्हणजे जन्म होतात. ॥ ४४ ॥

समीहता मनसा - उत्तम प्रकारची इच्छा करणार्‍या मनासहवर्तमान - हिरण्मयः - स्वयंप्रकाश ज्ञानाने पूर्ण - मत्सखा - अहंवृत्तीच्या जीवाचा सखा जो आत्मा - अनीहः - जो अनीह म्हणजे कर्मासक्तिशून्य असून - उद्विचष्टे - केवळ साक्षी असतो - असौ - तोच जीवरूप आत्मा - स्वलिंगं मनः परिगृह्य - संसारात्मक चिन्ह असणारे जे मन त्याचा स्वीकार करतो - कामान् जुषन् - वासनासक्त होतो. ॥ ४५ ॥

दानं स्वधर्मः नियमः यमः च - दान देणे, स्वधर्मानुरूप आचरण करणे, यम, नियम, - श्रुतं च कर्माणि च सद्‌व्रतानि - श्रुतिविहित कर्म करणे आणि व्रते करणे - सर्वे मनोनिग्रहलक्षणांताः - सर्व उपाय मनोनिग्रह हेच फल उत्पन्न करणारे आहेत - हि - प्रसिद्ध आहे की - मनसः समाधिः परः योगः - मनोनिग्रह करून मन स्थिर करणे हा अत्यंत श्रेष्ठ योग म्हणजे ज्ञानात्मक उपाय आहे. ॥ ४६ ॥

यस्य मनः समाहितं प्रशांतं - ज्याचे मन समाधानी व शांत झाले आहे - तस्य दानादिभिः किं कृत्यं वद - त्याला दानादिकांचा काय उपयोग आहे ते सांग बरे - यस्य असंयतं मनः - ज्याचे अनिगृहीत मन - विनश्यत् चेत् - नष्ट होत असेल तर - एभिः दानादिभिः - या दानादिकांनी - अपरं किं - दुसरे काय साध्य होणार. ॥ ४७ ॥

मनः वशे - मन जर स्वाधीन झाले तर - अन्ये देवाः अभवन् स्म - दुसरे देव म्हणजे इंद्रिये वा इंद्रियांच्या देवता वश झाल्याच समजा - च - आणि - मनः अन्यस्य वशं न समेति - मन तर दुसर्‍याच्या स्वाधीन कधीही असत नाही - हि - म्हणून - सहसः सहीयान् देवः भीष्मः - बलवंतांचाही बलवंत असणारा हा मनोरूपी देव, फार भयंकर आहे - तं वशे युंज्यात् - त्या मनोदेवाला जो वश करील - सः हि देवदेवः - तो पुरुष अर्थात् देवांचा देव म्हणजे सर्वनियंता होतो. ॥ ४८ ॥

तं दुर्जयं असह्यवेगं - त्या अशा जिंकण्यास कठीण, असह्य वेगाच्या आणि - अरुंतुदं - मर्मावर घाव घालणार्‍या - शत्रुं - शत्रूला - तत् - म्हणजे त्या मनाला - न विजित्य - न जिंकता - केचित् विमूढाः - काही मूर्ख लोक - अत्र - ह्या लोकी - मर्त्त्यैः - इतर मर्त्यांबरोबरच - असद्विग्रहं कुर्वंति - दुष्ट रीतीने कलह करतात - मित्राणि, उदासीनरिपून् (कुर्वंति) - आणि आपल्या विरुद्ध असतील त्या उदासीन शत्रूंस मित्रत्वाने वागवितात. ॥ ४९ ॥

मनोमात्रं इमं देहं ‘मम, अहं ’ इति गृहीत्वा - हा मनोमात्र असणारा-स्वरूपतः नसणारा देहच ‘माझा देह व मी देह ’असे समजून - अंधधियः मनुष्याः - बुद्धिशून्य लोक - ‘एषः अहं ’- ’हा मी’ ‘-अयं अन्यः ’ - हा ममेतर - इति भ्रमेण - असल्या भ्रमाने - दुरंतपारे तमसि भ्रमंति - अनंतपार जो अंधकारपूर्व भवसागर, त्यात भ्रमण करतात. ॥ ५० ॥

जनः तु सुखदुःखयोःहेतुःचेत् - लोकच जीवाच्या सुखदुःखाचे कारक असतील तर - अत्र च - हा पक्ष घेतला म्हणजे - किं आत्मनः - अकर्मा व अकर्ता व अभोक्ता अशा आत्म्याला काय त्यांचे - ह - निश्चयाने - भौ‌मयोः तत् - ही कर्तृत्वे भोक्तृत्वे त्या त्या कर्त्या व भोक्त्या देहांस असणार आणि हे देह तर भूमीचे विकार होत - क्वचित् स्वदद्‍‌भिः जिव्हां संदशति - कोणी एखादा आपल्याच दातांनी जिव्हेला चावला तर - तद्वेदनायां कतमाय कुप्येत् - दुःख झाले म्हणून कोणावर रागाववायाचे ? ॥ ५१ ॥

तु - पण - यदि देवताः - देवताच जर - दुःखस्य हेतुः - दुःखकारक आहेत असे समजले तर - तत्र - ह्या पक्षीही - किं आत्मनः - आत्म्याशी संबंध काय - तत् विकारयोः - आत्म्याशी त्या जड सुखदुःखांचा संबंधच नसतो - स्वदेहे - आपल्या शरीरातील - यत् - जर - अंगेन अंगं क्वचित् निहन्यते - एखादेवेळी एका अवयवाने दुसर्‍या अवयवाला इजा केली - पुरुषः कस्मै क्रुद्धेत - पुरुष कोणावर रागावेल ? ॥ ५२ ॥

यदि आत्मा सुखदुःखहेतुः स्यात् - आत्मा हाच सुखादिकांचा कारक असेल तर - किं अन्यतः तत्र - त्या पक्षात दुसर्‍याकडे काय ? त्याकडे काही बोलच नाही - निजस्वभावः - सुखदुःख देणे हा आत्मस्वभावच होय असे या पक्षाचे म्हणणे ना - आत्मनः अन्यत् नहि - आत्म्याशिवाय दुसरे काहीच नसते - यदि स्यात् - दिसते म्हणाल तर - तत् मृषा - ते मिथ्या असते - क्रुध्येत कस्मात् - काय म्हणून कोणावर रागावणार - न सुखं न दुःखं - वस्तुतः सुख नाही, दुःख नाही, देणारा कोणी नाही, भोगणारा कोणी नाही. ॥ ५३ ॥

सुखदुःखयो निमित्तं ग्रहाः चेत् - सुखदुःखांचे कारक ग्रह आहेत असे समजू - अजस्य आत्मनः किं - जन्मच प्राप्त न होणार्‍या आत्म्याच्या ग्रहनिमित्त सुखादिकांशी संबंधच नसतो - ते वै जनस्य - ते ग्रह जन्म पावणार्‍या देहाच्या सुखादिकांचे कारक असतात - ग्रहैः ग्रहस्य एव पीडां वदंति - ग्रहालाच ग्रह पीडा करतात असे तज्ञ म्हणतात - ततः अन्यः पुरुषः ग्रह कस्मै क्रुद्‌ध्‌येत् - तेव्हा या देह इत्यादि जडांहून निराळा असणारा चिद्रूपी आत्मा रागावेल कोणावर - ॥ ५४ ॥

सुखदुःखयोः हेतुः कर्म अस्तु चेत् - सुखादिकारक कर्म समजले तरी - आत्मनः किं - आत्म्याला काय त्याचे - हि तत् जडाजडत्वे - कारण जडाजड असणारा पदार्थच सुखदुःख भोगण्यास योग्य असतो - तु - पण - देहः अचित् - देह जड, सुखदि जाणण्यास असमर्थ असतो - अयं पुरुषः सुपर्णः - आणि पुरुष तर अजड आहे - कस्मै क्रुद्‌ध्‌येत् - तो संतापणार कोणावर ? - हि - कारण - कर्ममूलं न - सुखदुःखमूलक कर्म अस्तित्वात नाही. ॥ ५५ ॥

तु - जरी - सुखदुःखयोः कालः हेतुः चेत् - कालच सुखादिकारक मानला तरी - तत्र किं आत्मनः - तेथेही आत्मा निःसंबद्धच - तदात्मकः असौ - कालच स्वतः आत्मस्वरूप आहे - हि अग्नेः तापः न, हिमस्य तत् न स्यात् - कारण असे कधी होत नाही की, अग्नीलाच ताप आला किंवा शीताला थंडी वाजली - क्रुद्‌ध्‌येत कस्मै - मग तो रागावणार कोणावर ? - परस्य द्वंद्वं न - परमश्रेष्ठ अद्वितीय आत्मस्वरूपात द्वंद्वाला अवकाशच नाही. ॥ ५६ ॥

अस्य परस्य - ह्या परमश्रेष्ठ चिद्रूप आत्म्याला - परतः - तदन्य जड प्रकृतीपासून - केनचित् - कोणत्याही निमित्ताने - कथंचन - कसाही - द्वंद्वोपरागः न - द्वंद्वस्पर्श होईल, असा संभव नाही - यथा संसृतिरूपिणः अहमः स्यात् - जन्ममरणात्मक संसृतिरूप अहंवृत्तीला द्वंद्वस्पर्श होतो तसा आत्म्याला होणे शक्य नाही - एवं - याप्रमाणे - प्रबुद्धः भूतैः न बिभेति - विचार करणारा विवेकी जड भूतांस भीत नाही, त्याला भिण्याचे कारणही नाही. ॥ ५७ ॥

पूर्वतमैः महर्षिभिः अध्यासितां - पुराणकालीन सर्वज्ञकल्प महर्षींनी अभ्यासून आपलीशी केलेली - एतां - ही जी - परात्मनिष्ठां - परमात्मस्वरूपाची मोक्षदायी निष्ठा - समास्थाय - उत्तम अभ्यासपूर्वक आपलीशी करून - अहं - मी भिक्षु - मुकुंदांघ्निनिषेवया एव - श्री मुकुंदाच्या चरणाच्या सेवेच्या साधनाने - दुरंतपारं तमः तरिष्यामि - दुस्तर असणारा अनंतपार व अज्ञानांधःकाररूपी भवसागर तरून जाईनच जाईन. ॥ ५८ ॥

नष्टद्रविणः इत्थं निर्विद्य गतक्लमः - नष्टधन झालेल्या त्या ब्राह्मणाला वैराग्य प्राप्त झाल्यामुळे तो चिंताशून्य झाला - प्रवज्य - सर्वसंगपरित्याग करून - गां पर्यटमानः - पृथ्वीवर संचार करीत असता - असद्भिः निराकृतः अपि - दुष्टांनी लाथाडून त्याचा छळ केला असताही - स्वधर्मात् अकंपित - स्वधर्म=भिक्षुधर्म, एका अंशानेही त्या भिक्षुधर्मापासून भ्रष्ट न होता - मुनिः अमूं गाथां आह - त्या मुनीने ही मी सांगितलेली गाथा गाइली. ॥ ५९ ॥

पुरुषस्य सुखदुःखप्रदः न अन्यः - पुरुषाला सुखदुःख देणारा दुसरा कोणी नाही व नसतोही - मित्रोदासीनरिपवः संसारः - हा मित्र तटस्थ शत्रू प्रभृतींनी मंडित केलेला संसार - तमसः कृतः आत्मविभ्रमः - अज्ञानाने केलेली पुरुषाची आत्मभ्रांति होय. ॥ ६० ॥

तस्मात् - म्हणून - तात - हे उद्धवा - मयि आवेशितया धिया - माझ्या ठिकाणी प्रविष्ट करून तेथे स्थिरावलेल्या एकनिष्ठ बुद्धीने - सर्वात्मना युक्तः - सर्व प्रकारे युक्त राहून - मनः निगृहाण - मनाला सर्वतोपरी स्वाधीन करून घे - एतावान् योगसंग्रहः - हे सर्व योगविधींच्या संग्रहाचे सार आहे. ॥ ६१ ॥

यः समाहितः - जो एकाग्रचित्तपूर्वक - एतां भिक्षुणा गीतां ब्रह्मनिष्ठां - ही भिक्षूने गायिलेली ब्रह्मनिष्ठारूप गाथा - धारयन् - धारण करील - श्रावयन् - इतरांस ऐकवील - शृण्वन् - व स्वतः ऐकेल - द्वंद्वैः न एव अभिभूयते - द्वैतरूपी सुखदुःखात्मक संसाराचा केव्हाही त्रास होत नाही. ॥ ६२ ॥

अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP