|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १० वा - अन्वयार्थ
इहलौकिक व पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरुपण - मया उदितेषु स्वधर्मेषु अवहित: - मी जे धर्माचे उपदेश अनेक वेळा केले आहेत, त्यांचे दक्षतेने सार्थ अनुसंधान ठेवणारा असून - मदाश्रय: - माझाच आश्रय करणारा - अकामात्मा - कोणतीही वासना अंत:करणात न ठेवता - वर्णाश्रमकुलाचारं - वर्णाश्रमानुरूप कुलपरंपरेने आपेल्या संप्रदायाचा आचार - समाचरेत् - चालवावा ॥१०-१॥ गुणेषु तत्वध्यानेन - गुण म्हणजे इंद्रियांचे विषय त्यांचा उपभोग हाच खरा पुरुषार्थ होय असे भलतेच चिंतन केल्यामुळे - विषयात्मनां देहिनां - विषयलोलूप शरीरी जीवांचे - सर्वारम्भविपर्ययं - सर्व उद्योगांचे फल विपरीतच होते ते - विशुद्धात्मा (सन्) अति निर्मल चित्त ज्याचे असा होत्साता अन्वीक्षेत - काळजीपूर्वक लक्ष देऊन पहावे ॥१०-२॥ सुप्तस्य विषयालोक: - निजलेल्या जीवाला स्वप्नामध्ये जे विषयांचे दर्शन होते ते - वा - अथवा - ध्यायत: मनोरथ: - विषयांचे चिंतन करणार्यांचे मनोराज्य - नानात्मकत्वात् - परस्पर विरोधी अशा अनेक उगमांपासून उत्पन्न झाल्यामुळे - विफल: - शून्यफलक, व्यर्थ होत असते - तथा - त्याचप्रमाणे - गुणै: - विषय घेणार्या नेत्रकर्णादि इंद्रियांमुळे - भेदात्मधी: - भेद हाच आहे आत्मा ज्या बुद्धीचा ती अर्थशून्य होते ॥१०-३॥ मत्पर: - मोक्षासाठी चित्त शुद्ध करणार्या साधक आणि मद्भक्तियुक्त जीवाने - निवृत्तं कर्म सेवेत - ज्याला काहीही फल सांगितले नाही असे कर्म निरभिमानपणे करावे - प्रवृत्तं त्यजेत् - सर्व सकाम कर्म टाकून द्यावे - जिज्ञासायां सम्प्रवृत्त: - आत्मस्वरूपाचे वास्तविक ज्ञान संपादण्याचा तीक्ष्ण हव्यास मुमुक्षूने - कर्मचोदनां - श्रुत्युक्त प्रेरणाही - न आद्रियेत् - आदर करू नये ॥१०-४॥ मत्पर: - माझ्या भक्ताने - यमान् - अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादि जे यम त्यांचे सादर आचरण - अभीक्ष्णं सेवेत - पुन: पुन: करावे - क्वचित नियमान् - नियमांचेही यथाशक्ति पालन करावे - मदभिज्ञं शान्तं मदात्मकं गुरुं उपासीत - माझे म्हणजे आत्म्याचे स्वरूप जाणणारा, उपशम प्राप्त झाल्यामुळे शांत वृत्तीचा जो गुरु, तो माझे म्हणजे आत्मारामाचे स्वरूप आहे असे समजून त्याची सेवारूप उपासना करावी ॥१०-५॥ अमानी - मानापमानशून्य - अमत्सर: - निर्मत्सरी - दक्ष: - दक्ष - निर्मम: - ममत्वशून्य - दृढसौहृद: - दृढस्नेही - असत्वर: - धांदल्या नव्हे - अर्थजिज्ञासु: अनसूयु: अमोघवाक्- तत्व जाणू इच्छिणारा, असूयारहित, व्यर्थ बडबड न करणारा - जायापत्यगृहक्षेत्रस्वजनद्रविणादिषु उदासीन: - भार्या, संतति, घरदार, शेतीवाडी, आप्तइष्ट, धन इत्यादि सर्वांसंबंधाने उदासीन - आत्मन: अर्थं सर्वेषु समं इव पश्यन् - सर्वांमध्येच आत्मा पूर्ण आहे अशी सर्वत्र समदृष्टी ठेवणारा असा हा शिष्य असावा ॥१०-६, ७॥ स्थूलसूक्ष्मात् देहात् आत्मा विलक्षण: - स्थूल म्हणजे अदृश्य असणारे हे दृश्य शरीर आणि सूक्ष्म म्हणजे अदृश्य असणारे लिंगशरीर या उभय शरीरांहून आत्मा विलक्षण आहे - ईक्षिता - द्रष्टा - स्वदृक् - स्वयंप्रकाश आहे - यथा - जसा - दाह्यात् दारुण: - दहन होण्याला पात्र अशा लाकडांकडून - दाहक: प्रकाशक: अग्नि: अन्य: - जाळणारा आणि प्रकाश देणारा अग्नि निराळा असतो ॥१०-८॥ अन्त: प्रविष्ट: (अग्नि:) तत्कृतान् गुणान् - लाकडाच्या आत शिरून रहाणारा अग्नि आपणच उत्पादिलेले गुण - निरोधोत्पत्त्यणुबृहन्नानात्वं आधत्ते - लाकडाचे नाश, उत्पत्ति, त्यांचा लहानपणा, मोठेपणा, त्यांचे नानात्व इत्यादि गुण घेतल्यासारखे करतो - एवं - याचप्रमाणे - पर: - परमात्मा देहगुणान् आधत्ते - देहाचे गुण अंगीकृत करतो ॥१०-९॥ हि - कारण पहा की - य: असौ देह: (स:) अयं - तो जो देह आहे तो हा - पुरुषस्य गुणै: विरचित: - पुरुषाच्या अथवा पुरुषोत्तमाच्या मायागुणांनी तयार केला आहे - तन्निबन्ध: अयं पुंस: संसार: - त्या देहाच्या दृढ संबंधामुळे हा दृश्य प्रपंच पुरुषाच्या मागे लागला आहे - आत्मन: विद्याछित् - आत्म्याच्या विद्येचा नाश करणारा होय ॥१०-१०॥ तस्मात् - अशी ही वस्तुस्थिती आहे म्हणून - आत्मस्थं आत्मानं - शरीरात प्रवेशून नियामकत्वाने रहाणारा परमात्मा - केवलं परं - केवल म्हणजे शुद्ध व पर म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे असे - जिज्ञासया सङ्गम्य - आपल्या ज्ञानेच्छेच्या दृढ तपश्चर्येने तत्वत: जाणून - एतद्वस्तुबुद्धिं - ह्या दृश्य जगातच काय ते सत्य आहे ही अयथार्थ बुद्धी - यथाक्रमं निरसेत् - क्रमाक्रमाने नाहीशी करावी ॥१०-११॥ आचार्य: आद्य: अरणि: स्यात् - गुरुजी म्हणजे आधार देणारे खालचे आधारकाष्ठ होय - अन्तेवासी उत्तरारणि: - अंतेवासी म्हणजे शिष्य, हा आश्रय घेणारे वरचे लाकुड होय - प्रवचनं - गुरुजींचे प्रवचन - तत्सन्धानं - या दोन अरणींचा म्हणजे काष्ठांचा संगम करविणारे संधान होय - विद्या सुखावह: सन्धि: - या प्रवचनामुळे शिष्याच्या अंत:करणात उत्पन्न झालेली विद्या हा संधि म्हणजे संधीतून उत्पन्न झालेले सुखकारक कार्य होय ॥१०-१२॥ सा वैशारदी अतिविशुद्धबुद्धि: - ती सद्गुरुपासून सच्छिष्याला प्राप्त झालेली अति निर्मळ व अति स्वच्छ बुद्धि - गुणसम्प्रसूतां मायां धुनोति - इंद्रियादिद्वारांनी निर्माण झालेली जी अविद्या तिला धुडकावून देते - गुणान् यत् आत्म एतत् च सन्दह्य - विषय, इंद्रिये हे गुण आणि त्या गुणांमध्ये उत्पन्न झालेले हे विश्व या उभयतांस स्वतेजाने जाळून टाकून - स्वयं च शाम्यति - आपण स्वत:ही शांत होतो ॥१०-१३॥ अथ एषां कर्मकर्तृणां - आता हे कर्मकर्ते - सुखदु:खयो: भोक्तृणां नानात्वं - व सुखदु:खाचे उपभोक्ते अनेक असलेच पाहिजेत - अथ लोककालागमात्मानां नित्यत्वं - तसेच हे विश्व अनंत काल व वेद आणि जीव या सर्व वस्तू नित्य व स्वतंत्र असे - मन्यसे - तू म्हणशील - सर्वभावानां संस्था हि औत्पत्तिकी यथा - तसेच या विश्वात दृगोचर होणार्या सर्व पदार्थांची स्थिती प्रवाहरूपाने नित्य आणि यथार्थ - आभास नव्हे - असाही म्हणशील आणि - तत्तदाकृतिभेदेन धी: जायते भिद्यते च - त्या त्या पदार्थाच्या आकारभेदामुळेच बुद्धि उत्पन्न होऊन भिन्न होते. म्हणून आत्मबुद्धि अनित्य व अनेकत्वात्मक असली पाहिजे असे म्हणशील, हा पूर्वपक्ष करशील, तर उत्तर असे आहे ॥१०-१४, १५॥ एवं अपि - हे तुझे म्हणणे खरे आहे असे घटकाभर समजले तरी - अङ्ग - हे उद्धवा - असकृत् देहयोगत: कालावयवत: - वारंवार कालाचे अवयव जे संवत्सरादी त्यामुळेच - सर्वेषं देहिनां जन्मादय: भावा: सन्ति - जे जे म्हणून शरीरवंत आहेत, त्या सर्वांस अनेक योनिस्वरूपांचा व अनेक जन्मादि अवस्थांचा अनुभव घ्यावा लागतो ॥१०-१६॥ अत्र अपि - येथे कर्म करण्यात सुद्धा - कर्मणां कर्तु: - कर्म करणारे जीव - अस्वातन्त्र्यं च - अस्वातंत्र्य म्हणजे परतंत्र आहेत आणि - दु:खसुखयो: भोक्तु: (अस्वातन्त्र्यं) च लक्ष्यते - सुखदु:ख भोगणारेही परतंत्र आहेत असे स्पष्ट दिसते - विवशं - परतंत्र जो आहे त्याला - क: नु अर्थ: भजेत् - कोणता सुखात्मक अर्थ प्राप्त होईल ? ॥१०-१७॥ विदुषां अपि देहिनां किञ्चित् सुखं न विद्यते - जे मोठे जाडे विद्वान आहेत, कार्यकारणभाव ज्यांना समजतात, त्यांना सुद्धा इवलेसेही शुद्ध सुख प्राप्त होत नाही - तथा च - आणि त्याच प्रमाणे - मूढानां दु:खं - महामूर्खासही सारे दु:खच दु:ख मिळत नाही - अहंकरणं परं वृथा - मी ज्ञानी स्वतंत्र कर्ता आहे हा अभिमान अर्थशून्य आहे ॥१०-१८॥ यदि सुखदु:खयो: प्राप्तिं विघातं च जानन्ति - जरी कित्येकांस सुखाची प्राप्ती होणार व दु:खाचा नाश होणार असे कार्यकारणांच्या विवेचनाने कळत असले - ते अपि - त्यांना सुद्धा - यथा मृत्यु: न प्रभवेत् - मृत्युसत्ता कशी चुकवता येईल - अद्धा योगं न विदु: - त्याचे साधन कोणते या संबंधाने निश्चित ज्ञान नसतेच ना ? ॥१०-१९॥ मृत्यु: अन्तिके - साक्षात मृत्यु जवळ आला असता आपण खास मरणार हे कळले असता - एनं - ह्या जीवाला - क: नु अर्थ: काम: वा सुखयति - कोणताही अर्थ म्हणजे पदार्थ प्राप्त झाला असता अथवा कोणताही मनोरथ पूर्ण होणार अशी आशा असता सुख होईल काय ? नाही - आघातं नीयमानस्य वध्यस्य इव - वधस्थानाकडे नेत असलेल्या वध्याला म्हणजे फाशी जाणार्याला जसा - न तुष्टिद: - कोणताही पदार्थ किंवा मनोरथ आनंद देत नाही ॥१०-२०॥ श्रुतं च - श्रुतीने सांगितलेले स्वर्गसुखही - दृष्टवत् - येथील प्रत्यक्ष दु:खाप्रमाणेच - स्पर्धासूयात्ययव्ययै: - स्पर्धा, असूया नष्ट होण्याची अथवा कमी होण्याची भीती यांनी ग्रस्त झाल्यामुळे दूषित असते - बह्वन्तरायकामत्वात् - त्या स्वर्गसुखाच्या प्राप्तीमध्येही अनेक विघ्ने येत असतात, म्हणून ते सुख दूषित असते - कृषिवत् च अपि - शेतीच्या कामातही अनेक अडचणी येतात हे आपण पहातोच. कृषिफलासारखेच स्वर्गसुखही - निष्फलं - व्यर्थ होय ॥१०-२१॥ अन्तरायै: विहित: - कोणतेही विघ्न न आल्यामुळे - यदि धर्म: स्वनुष्ठित: - यथाशास्त्र आणि सांगोपांग धर्मानुष्ठान जर झालेच तर - तेन अपि निर्जितं स्थानं यथा गच्छति - त्या धर्मानुष्ठानाने जिंकून हस्तगत झालेल्या स्थानाकडे अनुष्ठान कर्ता कसा जातो, तेथे त्याची स्थिती काय असते - तत् शृणु - त्याची वार्ता ऐक ॥१०-२२॥ इह - ह्या लोकी - यज्ञै: देवता: इष्ट्वा - अनेक यज्ञ करून इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य प्रभृति देवतांस प्रसन्न केल्यावर - याज्ञिक: स्वर्लोकं याति - यज्ञकर्ता स्वर्गलोकास जातो - तत्र निजार्जितान् दिव्यान् भोगान् देववत् भुञ्जीत - तेथे यज्ञकर्मांमुळे प्राप्त झालेल्या दिव्य विषयांचा उपभोग देवांप्रमाणे त्याला घ्यावयास सापडतो ॥१०-२३॥ स्वपुण्योपचितेशुभ्रे विमाने हृद्यवेषधृक् - आपल्या पुण्याईने संपादलेल्या शुभ्र विमानात सुंदर वेष धारण केलेला हा यज्ञकर्मसुखभोक्ता - देवींनां मध्ये विहरन् - अप्सरांबरोबर विहार करीत होत्साता - गन्धर्वै: उपगीयते - गंधर्वांचे गायनही ऐकतो ॥१०-२४॥ किङ्किणीजालमालिना कामगयानेन - हजारो क्षुद्र घंटा किणकिण आवाज करीत आहेत ज्याच्या सभोवार अशा इच्छानुवर्ती वाहनावर आरुढ होऊन तो - स्त्रीभि: क्रीडन् - दिव्यांगनांसह हास्यविनोदादि क्रीडा करतो - सुराक्रीडेषु निर्वृत्त: आत्मपातं न वेद - सुरांच्या म्हणजे देवांच्या किंवा सुरा म्हणजे मद्य क्रीडांमध्येच रममाण होऊन गेल्यामुळे व तेच खरे सुख असे तो समजत असल्यामुळे त्या मूढाला आपला अध:पात आहे हे कळत नाही ॥१०-२५॥ यावत्पुण्यं समाप्यते तावत् - पुण्य संपेतोपर्यंत - स्वर्गे प्रमोदते - तो स्वर्गामधे आनंदाचा उपभोग घेतो - क्षीणपुण्य: - पुण्य संपले की - कालचालित: अनिच्छन् (अपि, अर्वाक् पतति) - त्याची इच्छा नसतांनाही कालचक्राने लोटून दिलेला तो याज्ञिक खाली पडतो ॥१०-२६॥ यदि असतां सङ्गात् - जर दुष्टांच्या संगतीने - अधर्मरत: अजितेन्द्रिय: वा - कोणी निषिद्धाचरणी झाला किंवा इंद्रियांच्या स्वाधीन असल्यामुळे - कामात्मा - वासना पूर्ण म्हणून - कृपण: - कृपण म्हणून - लुब्ध: - भोगलोलूप असता - स्रैण: - तो स्त्रीलंपट होतो - भूतिविहिंसक: - भूतांस ताप देणारा होतो ॥१०-२७॥ अविधिना पशून् आलभ्य प्रेतभूतगणान् यजन् - विधि वगैरे टाकून भलत्याच मार्गाने पशुहिंसा करणारा आणि भूत-प्रेत-संमंधादिकांची पूजा करणारा - जन्तु: अवश: नरकान् गत्वा उल्बणं तम: याति - प्राणी परतंत्र होत्साता दु:खद नरकलोकांस जाऊन पुढे तो तम म्हणजे दगडधोंड्यांची स्थावरावस्था प्राप्त करून घेतो ॥१०-२८॥ देहेन दु:खोदर्कानि कर्माणि कुर्वन् - दु:ख हेच ज्याचे अंतिम फल आहे, अशी कर्मे या वर्तमान देहाने करून - तै: - त्या कर्मांनीच - पुन: देहं आभजते - जीव पुन्हा देह प्राप्त करून घेतो - तत्र - तेथे, असे करण्यामधे - मर्त्यधर्मिण: किं सुखं - मर्त्य देह धारण करणार्या जीवाला कसले तरी सुख आहे काय ? ॥१०-२९॥ कल्पजीवानां लोकानां लोकपालानां मद्भयं - ४ अब्ज, ३२ कोटी मानुषी वर्षे आयुष्य आहे असे लोक व इंद्रादि लोकपाल यांस जसे माझे भय बाळगावे लागते, त्याप्रमाणे - द्विपरार्धपरायुष: ब्रह्मण: अपि मत्त: भयं - दोन परार्ध आयुष्य असणार्या ब्रह्मदेवालाही माझ्या सत्तेखाली वागावे लागते ॥१०-३०॥ गुणा: कर्माणि सृजन्ति - गुण म्हणजे इंद्रिये हीच कर्माची कारक आहेत - गुण: गुणान् अनुसृजते - मायेचे सत्वादि गुण इंद्रियांस कर्मप्रेरक होतात - असौ जीव: तु - हा जीव तर - गुणसंयुक्त: - इंद्रियांनी युक्त होत्साता - कर्मफलानि भुङ्क्ते - कर्मफलाचा उपभोग घेतो ॥१०-३१॥ यावत् गुणवैषम्यं स्यात् - जोपर्यंत गुणांची विषमता आहे - तावत् आत्मन: नानात्वं - तावत् काल अनेक आत्मे आहेत असे भान असावयाचे - यावत् आत्मन: नानात्वं - जोपर्यंत अनेक आत्मे आहेत असे भान आहे - तदा एव हि पारतंत्र्यं स्यात् - तोपर्यंत पारतंत्र्य असणारच ॥१०-३२॥ यावत् अस्य अस्वतन्त्रत्वं - जोपर्यंत जीवाला अस्वतंत्रता आहे - तावत् ईश्वरत: भयं - तोपर्यंत परमेश्वराचे भय व त्याची सत्ता ओघप्राप्तच - ये एतत् समुपासीरन् - जगत् सत्य, जीव नाना, जीव कर्ता-भोक्ता इत्यादि मतांची जे आराधना करतात - ते शुचा अर्पिता: मुह्यन्ति - त्यांस अनित्यत्वामुळे होणारा शोक मोहामध्ये परिणत होतो. ते शोकाचे दास पुढे मोहात पडतात ॥१०-३३॥ गुणव्यतिकरे सति - मायेमुळे गुणवैषम्य प्रादुर्भूत झाल्यामुळे - काल: आत्मा, आगम:, लोक:, स्वभाव:, धर्म: एव च - काल, आत्मा, वेद, लोक, स्वभाव, धर्म अशा प्रकारची नावे - इति मां बहुधा प्राहु: - अज्ञानी लोक मला देतात ॥१०-३४॥ विभो - परमेश्वरा - देहजेषु गुणेषु - शरीरजन्य गुणांमध्ये, कर्मांमध्ये - वर्तमान: अपि अनपावृत: देही - सदैव राहाणारा कोणी स्वतंत्र देही - गुणै: कथं न बध्यते - गुणांनी का बांधला जात नाही ? - वा कथं बध्यते - आणि तो स्वतंत्र आहे म्हटले तर बद्ध कसा होतो ? ॥१०-३५॥ कथं वर्तेत विहरेत् - जीवाने वागावे कसे ? विहार कोणते करावेत ? - कै: लक्षणै: ज्ञायेत वा - कोणत्या चिन्हांनी बद्ध व मुक्त ओळखावे ? - किं भुञ्जीत - ते काय खातात ? - उत विसृजेत् - व काय टाकतात - शयीत आसीत याति वा - निजतात, बसतात, जातात, कसे बरे ? ॥१०-३६॥ अच्युत - हे भ्रमशून्य देवा - एतत् - हाच विषय आहे ज्याचा असा - प्रश्नं - प्रश्न - प्रश्नविदां वर: - प्रश्नवेत्त्यांमध्ये व प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यामध्ये श्रेष्ठ व निपुण असणार्या देवदेवा - मे ब्रूहि - मला समजावून हा प्रश्न सोडव - नित्यमुक्त: नित्यबद्ध: एक: एव - एकच आत्मा नित्यमुक्त व नित्य बद्ध कसा ? - इति मे भ्रम: - याविषयी मला भ्रम आहे ॥१०-३७॥ दहावा अध्याय समाप्त |