श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ९ वा - अन्वयार्थ

अवधूतोपाख्यान - कुरर ते भुंगा अशा सात गुरुंची कथा -

नृणां यत् यत् प्रियतमं - मनुष्यांना जे जे प्रिय असते - परिग्रह: - संग्रह - दु:खाय हि - दु:खालाच कारण असतो - तत् विद्वान् - (सन्) - ते जाणणारा होत्साता - य: तु अकिञ्चन: - जो मुळी नि:संग्रहीच असतो, म्हणजे मुळीच संग्रह करत नाही - अनन्तं सुखमाप्नोति - अपार सुख पावतो ॥९-१॥

ये बलिन: निरामिषा: - जे बलवान व नाही मांस ज्यांच्याजवळ असे - सामिषं कुररं - ज्यांच्याजवळ मांस आहे अशा टिटव्यास - जघ्नु: - मारते झाले - स: - तो - तत् - ते - आमिषं - मांस - परित्यज्य - टाकून - सुखं समविन्दत - सुख पावला ॥९-२॥

मे मानाऽवमानौ न स्त: - मला मान व अपमान यांची क्षिती नाही - गेहपुत्रिणां चिन्ता न - गृह, दारा, पुत्र यासंबंधीची काळजी मला नाही - बालवत् आत्मक्रीड: आत्मरति: - बालकाप्रमाणे आपल्या आत्म्याशी खेळणारा व आपल्याठायीच रमणारा असा - इह विचरामि - या भूतलावर स्वेच्छेने संचार करतो ॥९-३॥

द्वावेव - दोघेच काय ते - चिन्तया मुक्तौ, परमानन्दे आप्लुतौ (च) - चिंतेने मुक्त व परमानंदामधे मग्न आहेत - (एक:) य: विमुग्ध: जड: बाल: (स:) - एक जो अज्ञानी व निरुद्योगी बाल तो - (द्वितीय:) य: गुणेभ्य: परं गत: (स:) - दुसरा, जो गुणांहून पलिकडे असणार्‍या परमेश्वराप्रत ऐक्य पावला आहे असा साधु तो ॥९-४॥

क्वचित् - एके ठिकाणी - कुमारी तु - उपवर कन्याच - बन्धुषु - आईबाप वगैरे सर्व माणसे - क्व अपि - कोठेशी बाहेर - यातेषु (सत्सु) - गेलेली असता - आत्मानं वृणानान् - आपल्याला वरणारे - गृहं आगतान् तान् - घरी आलेले असता त्याप्रत - स्वयं अर्हयामास - स्वत: सत्कार करती झाली ॥९-५॥

पार्थिव - राजा - तेषां अभ्यव्यहारार्थं - त्या पाहुण्यांच्या भोजनासाठी - रहसि - एकांती - शालीन् - भात - अवघ्नन्त्या: - कांडणार्‍या - प्रकोष्ठस्था: - मनगटातील - शंखा: - शंखाची कंकणे - महत् (यथा भवति तथा) - जसा मोठा होईल तसा - स्वनं - शब्द, आवाज - चक्रु: - करू लागली ॥९-६॥

महती - मोठी बुद्धिमान - सा - ती कन्या - तत् - ते साळी कांडणे - जुगुप्सितं - दारिद्र्यद्योतक, निंद्य - मत्वा - मानून - व्रीडिता - लाजली - तत: - नंतर - पाण्यो: - हातातील - एकैकश: - एकेक याप्रमाणे सर्व - शंखान् - बभंज - कांकणे काढती झाली - द्वौ द्वौ अशेषयत् - फक्त दोन दोनच राखती झाली ॥९-७॥

अवघ्नन्त्या: - कांडू लागली असता - उभयो: अपि शङ्खयो: - त्या दोन दोन कांकणांचा - घोष: अभवत् स्म हि - आवाज व्हायलाच लागला - तत्रापि एकं - त्यातूनही एकेक - निरभिदत् - काढून ठेवती झाली - एकस्मात् ध्वनि: न अभवत् - एकएकापासून मात्र शब्द होत नाहीसा झाला ॥९-८॥

अरिंदम - शत्रूंचा नायनाट करणार्‍या शूर राजा - लोकतत्वविवित्सया - या चराचर विश्वाचे रहस्य समजून घेण्याच्या इच्छॆने - एतान् लोकान् अनुचरन् - या सर्व लोकात संचार करणारा असा - तस्या: - त्या कुमारिकेपासून - इमं उपदेशं - हा धडा - अन्वशिक्षम् - शिकता झालो म्हणजे ग्र्हण करता झालो ॥९-९॥

बहूनां वासे कलह: - अनेक लोक एकत्र आले म्हणजे भांडण ठेवलेले - द्वयो: अपि वार्ता भवेत् - दोघेच असले तरी मोठमोठ्यांदा गप्पागोष्टी चालतातच - तस्मात् - म्हणून - कुमार्या: कङ्कण इव - त्या कुमारीच्या कंकणाप्रमाणे - एक: एव चरेत् - मुमुक्षूने एकाकी मात्र संचार करावा ॥९-१०॥

अतन्द्रित: - निरलसपणे - जितासन: जितश्वास: (च सन्) - जिंकले म्हणजे स्वाधीन करून घेतले आहे आसन म्हणजे आसनविद्या ज्याने आणि जिंकला आहे म्हणजे साध्य करून घेतला आहे प्राणायाम ज्याने असा होत्साता - वैराग्याभ्यासयोगेन - वैराग्य व अभ्यास यांच्या योगाने - ध्रियमाणं - स्थिर केले जाणारे - मन: - मन - एकत्र - एके ठिकाणीच - संयुज्यात् - जोडावे ॥९-११॥

यस्मिन् लब्धपदं - ज्या त्या लक्ष्यावर म्हणजे परमात्मपदी प्रविष्ट झालेले यत् एतत् मन: - जे हे एकाग्र मन - शनै: शनै: कर्मरेणून् मुञ्चति - क्रमश: हळू हळू कर्मरूपी रेणूंचा म्हणजे वासनाधूलीचा त्याग करण्याला समर्थ होते - वृद्धेन सत्वेन रज: तम: च विधूय - सत्व गुणाचा उदय व उत्कर्ष होतो म्हणून रजोगुण व तमोगुण अस्ताला लोटून - अनिन्धनं - विषयशून्य, खाद्यरहित होऊन - निर्वाणं उपैति - शून्य रूपाला उन्मनी अवस्थेला प्राप्त होतो ॥९-१२॥

तदा - त्यावेळी - एवं - आताच सांगितल्याप्रमाणे - आत्मनि अवरुद्धचित्त: - चित्ताचा चित्तपणा नाहीसा झाल्यामुळे आत्मस्वरूपातच समरस झालेला योगी - बहि: अन्तरं वा - आतील किंवा बाहेरील - किञ्चित् - यत्किंचितही - न वेद - जाणले जात नाही - यथा - ज्याप्रमाणे - इषौ गतात्मा इषुकार: - बाण तयार करण्यात गढलेला जो बाण बनवणारा, त्याने - पार्श्वे व्रजन्तं नृपतिं - जवळून त्याच्या बाजूने जाणार्‍या राजाला - न ददर्श - पाहिले नाही ॥९-१३॥

मुनि: - साधक मुनि जो त्याने - एकचारी - एकाकी संचार करणारा - अप्रमत्त: - दक्ष - अनिकेत: - कोणत्याही आश्रमाच्या लक्षणाची उपाधी नसणारा - गुहाशय: - गुहेतच रहाणारा - आचारै: अलक्ष्यमाण: - कोणाच्याही लक्षात न येणारे आचार असणारा - अल्पभषण: - थोडेच बोलणारा - एक: - एकटा - स्यात् - असे असावे ॥९-१४॥

अध्रुवात्मन: गृहारम्भ: - अनित्य असणार्‍या देहासाठी घरादारांचा उद्योग - अतिदु:खाय विफल: च - अति ताप देणारा होऊन पुन: व्यर्थ होतो - परकृतं वेश्म प्रविश्य - दुसर्‍यांनी केलेल्या घरात प्रवेश करून - सर्प: सुखं एधते - सर्प सुखी असतो ॥९-१५॥

एक: देव: नारायण: - नारायण हा एकरस सर्वेश्वर मात्र नित्य आहे - स्वमायया पूर्वसृष्टं - आपल्या स्वाधीन असणार्‍या मायेच्या द्वारे पूर्वी उत्पन्न केलेले - इदं - हे विश्व - कल्पान्ते कालकलया - प्रलयकाली आपल्या कालनामक शक्तीने - संहृत्य - आवरून, स्वस्वरूपात लीन करून - ईश्वर: - प्रभु एकच एक अद्वितीय असतो ॥९-१६॥

एक: एव अद्वितीय: - तो एकच एक अद्वितीय परमात्मा - आत्माऽऽधार: - आपणच स्वत:स आधार असणारा, स्वयंभू - अखिलाश्रय: अभूत् - आणि सर्व कार्यकारणात्मक ब्रह्मांडाचा आश्रय होता झाला - आत्मानुभावेन कालेन - निजसामर्थ्याचा अवतार असणार्‍या कालसाह्याने - सत्वादिषु शक्तिषु साम्यं नीतासु - सत्वादि त्रिगुणात्मक सर्व शक्ति साम्य अवस्थेला गेल्यानंतर - आदिपुरुष: प्रधानपुरुषेश्वर: - साम्य पावलेले गुण म्हणजे प्रधान आणि पुरुष म्हणजे हिरण्यगर्भापासून तो जीवाणुपर्यंतचे सर्व जीव या प्रधानपुरुषाचा ईश्वर व आदिपुरुष म्हणजे नियंता एकच एक अद्वितीय परमात्मा आहे ॥९-१७॥

परावराणां परम: - हा नित्य परमात्मा परांचे म्हणजे श्रेष्ठांचे व अवरांचे म्हणजे कनिष्ठांचे मुख्य प्राप्तव्य म्हणून सर्वश्रेष्ठ आहे - कैवल्यसंज्ञित: - श्रुतीने ह्या परमात्म्याला ‘केवळ’ ह्या नावाने संबोधले आहे - केवलानुभवानन्दसन्दोह: - तो स्वानुभवापासून उत्पन्न होणार्‍या आनंदाचा अथांग डोह, महासागर आहे - निरुपाधिक: आस्ते - तो उपाधिशून्य म्हणजे केवल आहे ॥९-१८॥

अरिन्दम - शत्रुंजय - केवलात्मानुभावेन - स्वसामर्थ्यरूपच असणार्‍या एकट्या काल शक्तीने - त्रिगुणाऽऽत्मिकां स्वमायां संक्षोभयन् - सत्वादि गुणवती मायेमधे क्षोभ उत्पन्न करणार्‍या महामायी परमेश्वराने - तया - त्या मायेच्या सहायाने - आदौ - सृष्टीच्या आरंभी - सूत्रं सृजति - हिरण्यगर्भ नामक सूत्रात्मा उत्पन्न केला ॥९-११९॥

यस्मिन् - ज्या समष्टिरूपी सूत्रात्म्यात - इदं विश्वं प्रोतं - हे दृश्य विश्व ग्रथित झाले आहे - येन पुमान् संसरते - ज्या सूत्रात्म्याच्या प्रेरणेने अहंकाराभिमानी जीव कर्म करतो व जन्ममरण भोगतो - विश्वतोमुखं सृजन्तीं - अनेक मुखांनी हे त्रिगुणात्मक विश्व अहंकारद्वार उत्पन्न करणार्‍या - तां त्रिगुणव्यक्तिं आहु: - त्या सूत्रात्मशक्तीला गुणत्रयाचे प्रत्यक्ष कार्य असे म्हणतात तीच शक्ति अनेक प्रकारची सृष्टी उत्पन्न करते ॥९-२०॥

यथा - ज्याप्रमाणे - हृदयात् ऊर्णां - हृदयापासून निघालेली लोकर - वक्त्र: संतत्य - तोंडानेच पसरून व जाळे करून - तया विहृत्य - त्या लोकरीशीच काही वेळ खेळून - ऊर्णनाभि: - कोळी - भूय: तां ग्रसति - ती लोकर पुन्हा गिळतो - एवं महेश्वर: - त्याचप्रमाणे परमेश्वर स्वत:च सृष्टी उत्पन्न करून काही वेळ विलासाकरता ठेऊन पुन्हा ती स्वस्वरूपातच लीन करतो ॥९-२१॥

यत्र यत्र - जेथे जेथे किंवा ज्या ज्या पदार्थावर - देही - देहधारी जीव - स्नेहात् द्वेषात् भयात् वा अपि - प्रेमाने, द्वेषाने, किंआ भयानेही - धिया सकलं मन: धारयत् - बुद्धिद्वारा आपले मन:सर्वस्व एकाग्र करतो - तत्स्वरूपतां याति - त्या त्या पदार्थाशी तो जीव सरूपता पावतो ॥९-२२॥

राजन् - राजा - कुड्या तेन प्रवेशित: कीट: - आपल्या घरकुलात जबरदस्तीने आणलेला कीटक - पेशस्कृतं ध्यायन् - कुंभारीण माशीच (भीतीने ध्यान करीत होत्साता - तत्सात्मतां याति - त्या कुंभारणीच्या स्वरूपाला प्राप्त होतो - पूर्वरूपं असन्त्यजन् - आपले मूळरूप न सोडता ॥९-२३॥

एवं - याप्रकारे - एतेभ्य: गुरुभ्य: - ह्या ह्या गुरूंपासून - एषा मति: मे शिक्षिता - हा निरनिराळा धडा मी शिकलो - प्रभो - राजेश्वरा - स्वात्मोपशिक्षितां बुद्धिं - माझ्या स्वत:पासून मी कोणता धडा घेतला ते - वदत: मे श्रृणु - मी सांगतो ते ऐक ॥९-२४॥

विरक्तिविवेकहेतु: - विरक्तीचा व वैराग्याचा कारक असणारा - देह: मम गुरु: - हा माझा देहच माझा गुरु आहे असे जाण - सततार्त्युदर्कं सत्वनिधनं बिभ्रत् स्म - नित्य वृद्ध होत जाणारे दु:ख हेच फल ज्याचे आहे असा उत्पत्ति व विनाश पावणारा असा हा देह वैराग्याचा हेतु होतो - अनेन तत्वानि यथा विमृशामि - याच्याच साह्याने मला ह्या विश्वातील तत्वे यथार्थ जाणता येतात - तथाऽपि - तरी सुद्धा - पारक्यं इति अवसित: - हा परक्याचा असा माझा निश्चय झाल्यामुळे - असङ्ग: विचरामि - नि:संगवृत्तीने वागतो ॥९-२५॥

जायाऽऽत्मजाऽर्थपशुभृत्यगृहाऽऽप्तवर्गान् - दारा, पुत्र, धन, पशु, सेवक, गृह, आप्तेष्ट या सर्वजणांस - यत्प्रियचिकीर्षया - ज्या देहाचे प्रिय करण्याच्या इच्छेने - सकृच्छूरं - मोठ्या कष्टांनी - अवरुद्धधन: - ज्याने धन जपून ठेवले असते - स: देह: स्वान्ते अवसीदति - तोच देह मृत्युसमयी नाहीसा होतो - वृक्षधर्मा अस्य बीजं सृष्ट्वा - वृक्षाप्रमाणे पुढील जन्माचे बीज निर्माण करतो ॥९-२६॥

अमुं जिह्वा एकत: अपकर्षति - ह्या देहधारी जीवाला जीभ एकीकडे ओढते - कर्हि तर्षा - केव्हा तहान ओढते - शिश्न: अन्यत: - तर उपस्थ भलतीकडे ओढते - त्वक् उदरं श्रवणं कुतश्चित् - त्वचा, उदर, कर्ण, आपापल्या विषयांकडे ओढतात - घ्राण: अन्यत: - नाक तिसरीकडे - चपलदृक् कर्मशक्ति: क्व च - नेत्र व कर्मेंद्रिये आपल्या विषयासाठी कोणीकडे तरी - लुनन्ति - तोडतात व ओढीत असतात - बह्व्य: सपत्न्य: गेहपतिं लुनन्ति इव - अनेक सवती गृहपतीला, यजमानाला तोडतात व ओढतात त्याप्रमाणे इंद्रिये जीवाला खेचतात ॥९-२७॥

अजया आत्मशक्त्या - अनादि ब्रह्मशक्ति जी माया तिच्या सहाय्याने - वृक्षान् सरीसृपान् खगदंशमत्स्यान् - वृक्ष, सरपटणारे सर्प, पशु, पक्षी, डांस, मत्स्य अशा - विविधानि पुराणि सृष्ट्वा - अनेक जीवांची अनेक प्रकारची शरीरे उत्पन्न करूनही - तै: तै: अतुष्टहृदय: - त्या त्या उत्पत्तीने संतोष झाला नाही ज्याचा असा - देव: - ईश्वर जो त्याने - ब्रह्मावलोकधिषणं पुरुषं विधाय - ब्रह्माचे अपरोक्ष दर्शन घेण्याला समर्थ आहे बुद्धी ज्याची असा मनुष्य देह उत्पन्न केला तेव्हा - मुदं आप - त्याला संतोष झाला ॥९-२८॥

बहुसम्भावन्ते - अनेक योनींच्या शेवटी - इदं सुदुर्लभं - हे दुष्प्राप्य - अनित्यं अपि अर्थदं - अशाश्वत असूनही मोक्ष हा पुरुषार्थ देण्याला असमर्थ असणारे - मानुष्यं - मनुष्यपण - लब्ध्वा - लाभले आहे य़ास्तव - यावत् मृत्यु अनु न पतेत् - जोपर्यंत मृत्यूच्या मुखात पूर्णपणे गेले नाहीत तोवर - तूर्णं - लवकर लवकर - धीर: नि:श्रेयसाय इह यतेत - शहाणा जो पुरुष त्याने मोक्षासाठी येथेच दीर्घ प्रयत्न करावा - विषय: खलु सर्वत: स्यात् - नश्वर विषयांचा उपभोग वाटेल त्या योनीत मिळतोच ॥९-२९॥

एवं - अशाप्रकारे - सञ्जातवैराग्य: - वैराग्य उत्पन्न झालेला - आत्मनि विज्ञानाऽऽलोक: - आत्मस्वरूपातच ब्रह्मात्मैक्याचा प्रकाश प्रगट झालेला मी - मुक्तसङ्ग: अनहंकृति: - नि:संग व निरभिमानी होत्साता - एतां महीं विचरामि - आत्मस्वरूपात राहून ह्या पृथ्वीवर संचार करतो आहे ॥९-३०॥

एकस्मात् गुरो: - एकाच गुरुपासून - सुस्थिरं सुपुष्कलं ज्ञानं न हि स्यात् - चिरस्थायी व मोक्षफल देणारे ज्ञान प्राप्त होत नाही. ऋषिभि: - अनेक मंत्रदृष्ट्या ऋषींनी - एतत् अद्वितीयं ब्रह्म - हे अद्वितीय ब्रह्म म्हणजे त्याचे स्वरूप - बहुधा गीयते वै - अनेक प्रकारांनी गायिले आहे ॥९-३१॥

इति उक्त्वा - असे भाषण करून - स: गभीरधी: विप्र: - तो अगाध बुद्धीचा विप्र म्हणजे श्री दत्त - तं यदुं आमन्त्र्य - त्या यदुराजाचा निरोप घेता झाला - राज्ञा वन्दित: अभ्यर्थित: - यदुराजाने सत्कारून नम्रतापूर्वक वंदिले होते ज्याला असा श्री दत्त - प्रीत: - प्रसन्न मनाने - यथागतं ययौ - यदृच्छेने आला तसाच जाता झाला ॥९-३२॥

अवधूतवच: श्रुत्वा - श्री दत्त अवधूताचे भाषण ऐकल्यानंतर - न: पूर्वेषां पूर्वज: स: - आमच्या पूर्वजांचा पूर्वज तो यदु राजा - सर्वसङ्गविनिर्मुक्त: - सर्व संगांचा परित्याग करून - समचित्त: बभूव ह - समबुद्धीने पहाणारा झाला ॥९-३३॥

नववा अध्याय समाप्त

GO TOP