श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ६ वा - अन्वयार्थ

भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व प्रभासक्षेत्री
जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे -

अथ - नारद मुनी गेल्यानंतर - आत्मजै: - सनकादि आपल्या मानसपुत्रांनी - देवै: - इंद्रादि देवांनी - प्रजेशै: - मनुप्रभृति प्रजापतींनी - आवृतै: - वेढलेला, तात्पर्य या सर्वांसह - ब्रह्मा - ब्रह्मदेव - अभ्यगात् - आदराने आला - भूतगणै: वृत: - नंदिप्रभृति भूतगणांसह असणारा - भूतभव्येश: - भूत व भविष्यकालाचा स्वामी - भव: - शंकर - ययौ - आला ॥६-१॥

मरुद्भि: - एकोणपन्नास मरुद्गणांसह - भगवान् - ऐश्वर्यवान - इंद्र: - इंद्र - आदित्या: - बारा आदित्य - वसव: - आठ वसु - अश्विनौ - दोन अश्विनीकुमार - ऋभव: - ऋभु - अङ्गिरस: - अंगिरस - रुद्रा: - आठ रुद्र - विश्वे - विश्वेदेव - साध्या: च - आणि साध्य - देवता: - ह्या व इतर देवता ॥६-२॥

गन्धर्वा: - गंधर्व - अप्सरस: - अप्सरा - नागा: - नागलोक - सिद्धचारणगुह्यका: - सिद्ध, चारण व गुह्यक - सविद्याधरकिन्नरा: - विद्याधर व किन्नर - ऋषय: - सर्व ऋषी - पितर: - पितर - एव च - ह्या सर्वांसह सर्व स्वर्गवासी ॥६-३॥

सर्वे - हे सर्व - कृष्णदिदृक्षव: - श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची इच्छा करणारे - द्वारकां - द्वारकेस - उपसङ्जग्मु: - मोठ्या भक्तीने आले - येन वपुषा - जे सुंदर शरीर धारण करून - लोकेषु - चतुर्दश भुवनांमधे - नरलोकमनोरम: - मनुष्यांच्या नेत्रास मनोहर असणारा - भगवान् - ऐश्वर्यवान् जो श्रीकृष्ण त्याने - यश: - पवित्र यश, पापहारक कीर्ति - वितेने - पसरली - सर्वलोकमलापहं - सर्व लोकांची पापे नाहीशी करणारे ॥६-४॥

महर्द्धिभि: - सर्व ऋद्धिसिद्धींनी - समृद्धायां - संपन्न असल्यामुळे - विभ्राजमानायां - अत्यंत दैदीप्यमान असणार्‍या - तस्यां - त्या द्वारका नगरीत - अद्भुतदर्शनं - अपूर्व स्वरूप आणि अपूर्व यश आहे ज्याचे अशा - कृष्णं - श्रीकृष्णाला - अवितृप्राक्षा: - कितीही पाहिले तरी तृप्त न होणार्‍या नेत्रांनी - व्यचक्षत - देवांनी नखशिखांत अवलोकन केले ॥६-५॥

स्वर्गोद्यानोपगै: - स्वर्गातील नंदनादि उपवनात मात्र मिळणार्‍या - माल्यै: - सुवासिक पुष्पांनी - यदूत्तमं छादयन्त:- यादवेश्वर श्रीकृष्णाला मढवून टाकणार्‍या देवांनी - चित्रपदार्थाभि: - मनोहर आहेत शब्द व मनोहर आहेत अर्थ ज्यांच्या अशा - गीर्भि: - वाणींनी - जगदीश्वरं - त्या त्रैलोक्यनाथ श्रीकृष्णाची - तुष्टवु: - उत्तम संतोष देणारी स्तुती केली ॥६-६॥

कर्ममयोरुपाशात् - कर्माकर्माच्या बळकट पाशांतून - मुमुक्षुभि - सुटका करून घेण्याची इच्छा करणार्‍या तुझ्या भक्तांनी - भावयुक्तै: - अनन्य भावाने व श्रद्धेने - अन्तहृदि - अंत:करणाच्या आत - यत् - जे तुझे चरणकमल - चिन्त्यते - चिंतन केले जाते - ते - त्या तुझ्या - पदारविन्दं - चरणकमलाला - नाथ - हे श्रीकृष्णा - बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभि: - आमची बुद्धी, इंद्रिये, पंचप्राण, मन, वाणी यासह - नता: स्म - प्रणिपात केला आहे ॥६-७॥

त्वं - तू - त्रिगुणया - त्रिगुणात्मक - मायया - मायेच्या सहाय्याने - आत्मनि - स्वस्वरूपातच - दुर्विभाव्यं - समजण्याला अत्यंत कठिण - व्यक्तं - स्पष्ट झालेले हे विश्व - सृजसि - उत्पन्न करतोस - अवसि - संसक्षितोस - लुम्पसि - संहार करतोस, गुप्त करतोस - तद्गुणस्थ: - त्या मायेच्या सत्वादि गुणांमध्ये नियमकत्वाने रहाणारा आहेस - अजित - ज्याचा कोणालाही पराभव करता येत नाही अशा अजिंक्य देवा - भवान् - आपणास - एतै: - ह्या - कर्मभि: - उत्पत्ति स्थितिप्रभृति कर्मांनी - न अज्यते - कसल्याही प्रकारचा लेप होत नाही - वै - खरोखर - यत् - कारण - अनवद्य: - मनोविकारांनी मलीन होणारा निर्लेप असा तू - अव्याहिते - अखंड व साक्षात अपरोक्ष असणार्‍या - स्वे सुखे - स्वानंदात - अभिरत: - रममाण झालेला असतोस ॥६-८॥

ईड्य - हे सर्ववंद्य व सर्वस्तुत्य परमेशा - ऋषभ - पुरुषोत्तमा - श्रवणसम्भृतया - वारंवार तुझ्या यशाचे श्रवण झाल्यामुळे - ते यशसि - तुझ्या पवित्र यशाचे ठिकाणी - प्रवृद्धसच्छ्रद्धया - प्रतिक्षणी पुष्टतर होत जाणार्‍या सात्विक श्रद्धेच्या सहायाने - यथा - ज्या प्रकारे जशी - सत्त्वात्मनां - तुझ्या सात्विक भक्तांच्या मनादिकांची - शुद्धि: - शुद्धी - स्यात् - होते - तथा - तशी - विद्याश्रुताध्ययनदानतप:क्रियाभि: - वेदांतज्ञान, श्रवण, वेदाध्ययन, दान, तप, वेदोक्त कर्मे यांच्याही सहाय्याने - दुराशयानां - दूषित आहेत अंत:करणे ज्यांची अशा - नृणां - लोकांची, लोकमनाची - शुद्धि: - शुद्धी - न - होत नाही ॥६-९॥

य: - जो - क्षेमाय - स्वकल्याणासाठी - मुनिभि: - मुनींनी - आर्दहृदा - प्रेमाने भिजलेल्या अंत:करणाने - ऊह्यमान: - चित्तात धारण केलेला असा - स्वरतिक्रमाय - स्वर्गसुखाचेही अतिक्रमण करण्यासाठी - समविभूतये - सायुज्यतेचे ऐश्वर्य मिळवण्यासाठी - आत्मवद्भि: - मनोजय करून आत्मस्वरूप जाणणार्‍या - सात्वतै: - भागवतसंप्रदायी भक्तांनी - व्यूहे - वासुदेव संकर्षणादि चार स्वरूपांमधे - सवनाश: - प्रात:कालादि तिन्ही काळी - य: अर्चित: - जो पूजिला - (स:) तव अङ्घ्रि: - तो तुझा पाय - न: अशुभाशय धूमकेतु: स्यात् - आमच्या अमंगल वासनांचा नाशक असा होवो ॥६-१०॥

ईश - परमेश्वरा - अध्वराग्नौ - यज्ञाग्नीसमक्ष - त्रय्या - वेदत्रयीने - निरुक्तविधिना - आज्ञापिलेल्या विधीने - हवि: - हवि, आहुति - गृहीत्वा - हातात धारण केल्यामुळे - प्रयतपाणिभि: - नियंत्रित व शुद्ध आहेत ज्यांचे हात अशा याज्ञिकांनी - य: - जो - चिन्त्यते - चिंतिला जातो, ज्याचे ध्यान याज्ञिक करतात - उत - आणखी - अध्यात्मयोगं - आत्म्याचे ज्ञान देणार्‍या ज्ञानयोगामध्ये - आत्ममायां - परमेश्वरी माया - जिज्ञासुभि: - जाणण्याची इच्छा करणार्‍या - योगिभि: - ज्ञानयोग्यांनी - परमभागवतै: - श्रेष्ठ भागवत भक्तांनी - परीष्ट: - भक्तिपूर्वक असा ॥६-११॥

विभो - हे प्रभो - इयं - ही - भगवती - ऐश्वर्यसंपन्न - श्री: - लक्ष्मी देवी - प्रतिपत्निवत् - सवतीप्रमाणे - संस्पर्धिनी - जिचा मत्सर करते त्या - पर्युष्टया - शिळ्या झालेल्या - अमुया - ह्या - वनमालया - वनमालेने, तुळशीमालेने - सुप्रणीतं - यथासांग - अर्हणं - पूजन झाले असे समजून - आददन् - त्या वनमालेचा प्रीतीने स्वीकार करणारा - य: - जो - तव - तुझा - अङ्घ्रि: - चरण - सदा - सदैव - न: - आमच्या - अशुभाशयधूमकेतु: - अशुभवासनादिकांचा नाशकर्ता - स्यात् - होवो ॥६-१२॥

भूमन् - विश्वव्यापक देवा - त्रिविक्रमायुत: - तीन पावलातच सर्व त्रैलोक्य व्यापणारा - त्रिपतत्पताक - तिन्ही लोकांत संचार करणारी गंगा ही ज्याची पताका आहे असा - असुरदेवचम्वो: - दैत्य व देव यांच्या उभय सैन्यास - भयाभयकर: केतु: - भय व अभय अनुक्रमे देणारा केतूच असा - साधुषु - चांगल्या सज्जनांस म्हणजे देवास - स्वर्गाय - स्वर्गाकडे नेणारा - खलेषु - दुष्ट राक्षसांस - इतराय - दुसर्‍या म्हणजे नरकाकडे नेणारा - य: - जो - ते - तुझा - पाद: - चरण - भगवन् - हे भगवंता - भजतां - तुझे भजन करणारे अशा - न: - आमचे - अघं - पाप - पुनातु - शुद्ध करो, नाहीसे करो ॥६-१३॥

नस्योतगाव: इव - नाकामधे वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे - मिथु: - परस्परांस - अर्द्यमाना: - युद्धादिकांनी त्रास देणारे, घेणारे - तनुभृत: - देहधारी - ब्रह्मादय: - ब्रह्मादिक देव - यस्य - ज्याच्या - वशे - स्वाधीन - भवन्ति - असतात - प्रकृतिपूरुषयो: - प्रकृति व पुरुष यांच्या, चराचरांच्या - परस्य - पलीकडे असणारा - कालस्य - कालरूपात्मक असा - पुरुषोत्तमस्य ते - पुरुषोत्तम जो तू त्या तुझा - चरण: - पाय - न: - आमचे - शं - कल्याण - तनोतु - करो, वाढवो ॥६-१४॥ अस्य - या विश्वाचा - उदयस्थितिसंयमानां - उत्पत्ति, स्थिति व लय यांचा - हेतु: - परम कारण - असि - आहेस - अव्यक्तजीवमहताम् अपि - प्रकृति, पुरुष व महत्तत्व यांचाही - कालं - नियंता व संहारकर्ता तू आहेस असे - आहु: - म्हणतात - स: - तो - अयं - हा तू - त्रिणाभि: - चातुर्मास्याच्या रूपाने तीन नाभि असणारा संवत्सरच असून - गभीररय: - प्रचंड आहे ज्याचा वेग असा - काल: - काळच असणारा आहेस - अखिलापचये प्रवृत्त: - सर्व ब्रह्मांडाचा संहार करण्यास प्रवृत्त झाला आहेस - पुरुषोत्तम: त्वं - तूच खरा क्षराक्षरापलीकडे असणारा पुरुषोत्तम आहेस ॥६-१५॥

त्वत्त: - तुझ्याच पासून - वीर्यं - शक्ति, सामर्थ्य - समधिगम्य - प्राप्त करून घेऊन - अमोघवीर्य: - सदैव सफल होणारे आहे वीर्य ज्याचे असा - पुमान् - पुरुष, ईश्वर - यया - ज्या मायेसह - महान्तं - महत्तत्त्वास - अस्य गर्भं इव - ह्या विश्वाच्या गर्भाप्रमाणे - धत्ते - धारण करतो - तया - त्याच मायेने - अनुगत: - अनुसरलेला - स: - तो - अयं - हा सगुण परमेश्वर - आत्मन: - आपल्यापासून - हैमं - सुवर्णमय - आण्डकोशं - ब्रह्मांडकोश - ससर्ज - उत्पन्न करता झाला - बहि: - बाहेरून - आवरणै: - नऊ आवरणांनी, कवचांनी - उपेतं - युक्त असा ॥६-१६॥

यत् - ज्याअर्थी - उत्थगुणविक्रियया - जागृत झाल्यामुळे विवृत झाले आहेत, विषम झाले आहेत गुण जिचे अशा - मायया - तुझ्याच मायेने - उपनीतान् - जवळ आलेले - अर्थान् - विषय - जुषन् अपि - सेवन करीत असताही - न लिप्त: - लिप्त झाला नाहीस - हृषीकपते - हृषीकेशा - तत् - त्याअर्थी - तस्थुष: - स्थावर पदार्थांचा - च - आणि - जगत: च - संचार करणार्‍या जीवांचाही - भवान् - तू - अधीश: - स्वामी आहेस - ये अन्ये - जे त्वदितर सर्व - स्वत: परिहृतात् अपि - आपल्यापासून दुसरीकडे नेलेल्याही विषयांस - बिभ्यति स्म - भीत असत, भितात व भितील ॥६-१७॥

स्मायावलोकलवदर्शितभावहारिभ्रूमण्डलप्रहितसारैतमंत्रशौण्डै: - कामोद्दीपक मधुर हास्यांनी युक्त असणारे जे नेत्रकटाक्ष त्यांनी प्रगट केलेल्या इंगितांनी मनोहर झालेल्या भ्रूमंडलद्वयाने सुरतसंबंधी मंत्र प्रेषित करण्यामधे निपुण असलेल्या - अनङ्गबाणै: - मदनाच्या बाणांच्या - करणै: - साधनांनी सुद्धा - यस्य - ज्या श्रीकृष्णाचे - इंद्रियं - इंद्रिय - विमथितुं - विकृत करण्याला, जिंकण्याला - षोडशसहस्रं - सोळा हजार - पत्न्य: तु - पत्न्या सुद्धा - न विभ्व्य: - समर्थ झाल्या नाहीत ॥६-१८॥

तव - तुझ्या - अमितकथोदवहा: - अमृतासारख्या मधुर असणार्‍या ह्याच कोणी नद्या - पादावनेजसरित: - पायांच्या तीर्थापासून उत्पन्न झालेल्या गंगाप्रभृति नद्या - त्रिलोक्या: - त्रिभुवनात असणारी - शमलानि - पापे - हन्तुं - नाहीशी करण्याला - विभ्व्य: - समर्थ आहेत - आनुश्रवं - वेदात गायलेली भगवकीर्ती - श्रुतिभि: - कर्णेंद्रियांच्या द्वारे - अङ्घ्रिजं (च) - व पायापासून निघालेली गंगा - अङ्गसङै: - सर्वांगाच्या मार्जनसाह्याने - (एवं) ते तीर्थद्वयं - याप्रमाणे कीर्ती व गंगा या दोन्ही तुझ्या तीर्थांचे - उपस्पृशन्ति - सेवन करतात - शुचिषद: - वर्णाश्रमाने चालणारे तुझे निर्मळ अंत:करणाचे भक्त ॥६-१९॥

इति - याप्रकारे - विबुधै: - देवांसह - सेश: - शंकरासह - शतधृति: - शंभर यज्ञयाग करणारा जो ब्रह्मदेव त्याने - हरि - हरीला - अभिष्टूय - उत्तम प्रकारे स्तवून - अम्बरं - आकाशाचा - आश्रित: - आश्रय केला - प्रणम्य - नमस्कार करून - गोविन्दम् अभ्यभाषत - गोविंदाला विनंती करता झाला ॥६-२०॥

विभो - हे जगदीशा - अशेषात्मन् - सर्वांचा आत्मा असणार्‍या जगन्नियंत्या देवा - पुरा - पूर्वी - अस्माभि: - आम्हीच - भूमे: - भूमीचा - भारावताराय - भार नाहीसा करण्यासाठी - त्वं - तुला - विज्ञापित: - विनंती केली होती - तत् - ते सर्व - तथा एव - भूभारहरणाचे कार्य यथास्थित रीतीने, आम्ही म्हटले त्याप्रमाणे - उपपादितं - सिद्ध झाले आहे ॥६-२१॥

च - आणि - सत्यसन्धेषु - सत्यप्रतिज्ञ - सत्सु - सज्जन लोकात - त्वया - त्वा - धर्म: - वेदोक्त धर्म - स्थापित: - स्थापन केला - सर्वलोकमलापहा - सर्व लोकांची पापे धुवून काढणारी - कीर्ति: च - कीर्ती सुद्धा - दिक्षु - दाही दिशात - विक्षिप्ता - पसरून ठेवली - वै - हे सर्व खरे आहे ॥६-२२॥

अनुत्तमं - निरतिशय सुंदर - रूपं - स्वरूप - बिभ्रत् - धारण करणारा - यदो: - यदूच्या - वंशे - वंशात - अवतीर्य - अवतार घेऊन - जगत: - जगातील जीवांच्या - हिताय - हितासाठी - उद्दामवृत्तानि - उदार व अलौकिक स्वरूप आहे ज्यांचे अशी - कर्माणि - पराक्रमाची अनंत कामे - अकृथा: - केली आहेस ॥६-२३॥

ईश - देवदेवा - कलौ - कलियुगामध्ये - यानि - जी - ते चरितानि - त्वा द्वापरात आचरलेली कर्मे - (तानि) शृण्वन्त: - ती ऐकणारे - कीर्तयन्त: च - आणि गाणारे - साधव: - संत - मनुष्या: - लोक - तम: - कलियुगात असणारा अज्ञानसागर - अञ्जसा - लीलेने - तरिष्यन्ति - तरून जाण्यास समर्थ होतील ॥६-२४॥

पुरुषोत्तम प्रभो - पुरुषोत्तज्म प्रभो - यदुवंशे - यदुवंशात - अवतीर्णस्य - अवतार घेतलेल्या - भवत: - आपली - पञ्चविंशाधिकं शरच्छतं - सव्वाशे वर्षे - व्यतीयाय - होऊन गेली ॥६-२५॥

अखिलाधाऽऽर - सर्व वस्तुजाताचा आधार असणार्‍या प्रभो - अधुना - आता - देवकार्यावशेषितं - देवकार्यापैकी शिल्लक असे काही - ते - तुला - न - नाही - च - आणि - इदं कुलं - हे यादवकुळ - विप्रशापेन - ब्राह्मणांच्या शापाने - नष्टप्रायं - बहुतेक नाश पावल्यासारखे - अभूत् - झाले आहे ॥६-२६॥

तत: - म्हणून, त्यानंतर - यदि - जर - मन्यसे - तुला मानवलेच - परमं - अतिश्रेष्ठ - स्वधाम - तुझे वसतिस्थान जे वैकुंठ - विशस्व - त्वा जाऊन रहावे - सलोकान् - १४ भुवनांसह - लोकपालान् - त्या त्या लोकांचे अधिपति असे - वैकुंठकिङ्करान् - वैकुंठाचे, तुझे दास अशा - न: - आम्हास - पाहि - संरक्षित कर ॥६-२७॥

विबुधेश्वर - हे सुरपते, देवा - यत् एतत् - जे हे - मे - मला - आत्थ - सांगितलेस की - व: - तुमचे - अखिलं कार्यं - सर्व कार्य - कृतं - मी केले - भूमे: भार: - भूमीचा भार - अवतारित: - हलका, नाहीसा केला - अवधारितं - ऐकले ॥६-२८॥

तत् इदं - ते हे - वीर्यश्रौर्यश्रिया - वीर्य, शौर्य आणि संपत्ति यांच्या संपन्नतेने - उद्धतं - उन्मत्त झालेले - यादवकुलं - यादवांचे कुल - लोकं - सर्व पृथ्वी - जिघृक्षत् - काबिज करू इच्छिणारे आहे - मे - मी - रुद्धं - त्याला आवरून धरले आहे - वलया महार्णव: इव - समुद्राची मर्यादा महासागराला अडवते तसे ॥६-२९॥

दृप्तानां - उन्मत्त झालेल्या - यदूनां - यादवांच्या - विपुलं - विस्तारलेल्या मोठ्या - कुलं - कुळाला - असंहृत्य - नष्ट केल्यावाचून - यदि गन्ता अस्मि - जर मी प्रयाण करीन - अनेन - ह्या - उद्वेलेन - कुलाच्या अन्याय्य अतिक्रमणामुळे - लोक: अयं - ही पृथ्वी - विनङ्क्ष्यति - सर्वथा नाश पावेल ॥६-३०॥

इदानीं - आताच - कुलस्य - यादवकुलाचा - द्विजशापत: नाश: - विप्रांच्या शापामुळे होणारा नाश - आरब्ध: - आरंभित झाला आहे - अनघ-ब्रह्मन् - निष्पाप ब्रह्मदेवा - एतदन्ते - हा संपूर्ण नाश झाल्यानंतर - तव - तुझ्या - भवनं - भुवनाला - यास्यामि - येईन ॥३१॥

लोकनाथेन - त्रैलोक्यनाथाने - इति उक्त: - याप्रमाणे वर्तमान सांगितलेला - स्वयंभू: देव: - ब्रह्मदेव - तं प्रणिपत्य - त्या श्रीकृष्णाला वंदन करून - सह देवगणै: - सर्व देवांसह - स्वधाम - आपल्या लोकास - समपद्यत - जाता झाला ॥६-३२॥

अथ - त्यानंतर - तस्यां द्वारवत्यां - त्या द्वारकेमधेच - समुत्थितान् - उत्पन्न झालेले - महोत्पातान् - अशुभसूचक व विनाशक भूकंपादि उत्पात - विलोक्य - पाहून - भगवान् - श्रीकृष्ण - समागतान् - एकत्र मिळालेल्या - यदुवृद्धान् - यादवकुळातील पोक्त पुरुषांस - आह - म्हणाला ॥६-३३॥

इह सर्वत: - येथे सर्व बाजूंनी - एते सुमहोत्पाता; - हे भयंकर उत्पात - व्युतिष्ठन्ति वै - खरोखर उत्पन्न होत आहेत - च - आणि - ब्राह्मणेभ्य: - ब्राह्मणांनी - दुरत्यय: - दुर्धर - शाप: - शाप - न: कुलस्य - आपल्या यदुकुलाला - आसीत् - दिलेला आहे, त्याचाही हा परिणाम असेल ॥६-३४॥

आर्यका: - हे वृद्ध व पोक्त यादवांनो - जिजिविषुभि: अस्माभि: - जगण्याची इच्छा असणार्‍या आम्ही - इह - येथे - वस्तव्यं न - रहाणे ठीक नाही - मा चिरं - अर्थात उशीर न करता - अद्य एव सुमहत्पुण्यं प्रभासं यास्याम: - आजच पुण्यकारक प्रभास क्षेत्रास जाऊ ॥६-३५॥

यत्र - ज्या पुण्यक्षेत्री - स्नात्वा - स्नान करून - दक्षशापात् - दक्ष प्रजापतीच्या शापामुळे - यक्ष्मणा गृहीत: - क्षय रोगाने पीडलेला - उडुराट् - तारानाथ चंद्र - किल्बिशात् - त्या रोगापासून - सद्य: - तात्काळ - विमुक्त: - मुक्त झाला - भूय: - पुन्हा - कलोदयं - आपल्या षोडश कलांचा उदय - भेजे - प्राप्त करून घेता झाला ॥६-३६॥

वयं च - आणि आपणही - तस्मिन् - त्या प्रभास तीर्थात - आप्लुत्य - स्नानादि करून - पितॄन - पितरांना - सुरान च - आणि देवांना - तर्पयित्वा - तर्पणोदकाने संतुष्ट करून - नानागुणवता अन्धसा - माधुर्यादि अनेक गुणांनी युक्त अशा अन्नाने - उशिज: विप्रान् - पवित्र पांच ब्राह्मणांना भोजयित्वा - भोजन घालून ॥६-३७॥

तेषु पात्रेषु - त्या सत्पात्र ब्राह्मणांचे ठिकाणी - महान्ति - मोठमोठाली - दानानि - दाने - श्रद्धया - श्रद्धापुर:सर - उप्त्वा - अर्पण करून, पेरून - वै - खरोखर - दानै: - या दानसाह्याने - (महान्ति) वृजिनानि - ही सर्व भयंकर विघ्नशते - तरिष्याम - तरून जाण्यास समर्थ होऊ - नौभि: - नौकासहाय्याने - अर्णवम् इव - सागर तरता येतो त्याप्रमाणे ॥६-३८॥

कुलनन्दन - कुलभूषणा परीक्षिति राजा - एवं - याप्रमाणे - भगवता - भगवंताने - आदिष्टा: - आज्ञापिलेले - यादवा: - सर्व यादव - तीर्थं - तीर्थाला - गन्तुं - जाण्याचा - कृतधिय: - निश्चय करून - स्यन्दनान् - रथ - समयूजन् - सज्ज करून तयार झाले ॥६-३९॥

राजन् - राजा - तत् - ते सर्व - निरीक्ष्य - पाहून - भगवता उदितं - (च) श्रुत्वा - व भगवंताचे भषण ऐकून - घोराणि अरिष्टानि - महाभयंकर उत्पात - दृष्ट्वा - पाहून - नित्यं - सदैव - कृष्णं अनुव्रत: - कृष्णाचा अनन्य भक्त - उद्धव: - उद्धव ॥६-४०॥

विविक्ते - एकांतस्थळी - जगतां ईश्वरेश्वरं उपसङ्गम्य - जगन्नायक श्रीकृष्णाला गाठून - पादौ - दोन्ही पायांवर - शिरसा प्रणम्य - शिरसांष्टांग नमस्कार घालून - प्राञ्जलि: तं अभाषत - हात जोडून विनयपूर्वक म्हणाला ॥६-४१॥

देव - देवा - देवेश - देवाधिदेवा - योगेश - योगेश्वरा - पुण्यश्रवनकीर्तन - पवित्रकर आहे ज्याच्या कीर्तीचे श्रवण व गान अशा पुण्यश्लोका - नूनं - बहुतेक, लवकरच - एतत् कुलं - संहृत्य - भवान् - तू - लोकं - हा पृथ्वीलोक - संत्यक्ष्यते - सोडून जाणार - यत् - कारण - ईश्वर: समर्थ: अपि - कर्तुमकर्तुं समर्थ असूनही - विप्रशापं - ब्राह्मणांनी दिलेला शाप - न प्रत्यहन् - निराकृत केला नाहीस ॥६-४२॥

केशव - देवा - तव - तुझे - अङ्घ्रिकमलं - चरणकमल - क्षणार्धमपि - एक अर्ध क्षण सुद्धा - त्यक्तुं - सोडण्यास - अहं न समुत्सहे - मला इच्छा, शक्ति व उत्साह नाहीत - नाथ - स्वामिन् - मा अपि - मलाही - स्वधाम नय - तुझ्या वैकुंठलोकी घेऊन चल ॥६-४३॥

कृष्ण तव विक्रीडितं - कृष्णा तुझ्या लीला - नॄणां - लोकांचे, तुझ्या भक्ताचे - परममङ्गलं - अत्यंत कल्याण करणार्‍या असतात. - कर्णपीयूषं - तुझ्या लीलांचे परम मधुर कर्णामृत - आस्वाद्य - सेवन केल्यानंतर - जन: - प्रत्येक मनुष्य - अन्यस्पृहां - इतर इच्छा - त्यजति - टाकूनच देतो ॥६-४४॥

शय्यासनाटनस्थानस्नानक्रीडाशनादिषु - शय्येवर असता, आसनावर बसतांना, फिरतांना, स्नान, विहार, आहार इत्यादिकांचे वेळी - वयं भक्ता: - आम्ही तुझी सेवा करणारे तुझे भक्त - प्रियं आत्मानं त्वां - आमचा प्रियकर आत्माच असणारा जो तू त्या तुला - कथं - कसे - त्यजेमहि - एकट्यालाच जाऊ देऊ ॥६-४५॥ त्वया - तुवा - उपभुक्तस्रग्गन्धवासोलङ्कारचर्चिता: - उपभोगलेल्या पुष्पमाळांनी व गंध, वस्त्रे, अलंकार यांनी शृंगारलेले - उच्छिष्टभोजिन: - तुला अर्पण केलेल्या प्रसादातून अवशिष्ट राहिलेला प्रसाद खाणारे - तव दासा: - तुझे दास असे आम्ही - मायां - मायेला - जयेमहि - जिंकण्यास नि:संसय समर्थ होतो ॥६-४६॥

वातरशना: - वायु भक्षण करणारे - ऋषय: - तप करणारे - श्रमणा: - व्रतस्थ - ऊर्ध्वमन्थिन: - ऊर्ध्वरेते, नैष्ठिक ब्रह्मचारी - संन्यासिन: - परमहंस - शान्ता: अमला: (ते)- शांत व निर्मळ असतात ते - ते - तुझ्या - ब्रह्माखं धाम - वैकुंठ नावाचा जो सर्वश्रेष्ठ लोक त्या प्रत - यान्ति - जातात ॥६-४७॥

तु - परंतु - महायोगिन् - योगेश्वरा - इह - ह्या लोकी - कर्मवर्त्मसु - कर्ममार्गात, संसारात - भ्रमन्त: - भ्रमण करीत असूनही - तावकै: - तुझ्या भक्तांसह - वयं - आम्ही - त्वद्वार्तया - तुझ्या चरित्रसंकीर्तनानेच - दुस्तरं तम: - दुर्लंघ्य असा अज्ञानसागर, संसार - तरिष्याम: - तरण्यास समर्थ होतो ॥६-४८॥

ते कृतानि - तुझ्या लीला - गदितानि - तुझा उपदेश - गत्युत्स्मितेक्षणक्ष्वेलि - तुझे गमनागमन, हसणे, पहाणे, विनोद करणे यांना - स्मरन्त: कीर्तयन्त: च - स्मरणारे व प्रेमाने तुझे यश गाणारे आम्ही मायासागर लीलेने ओलांडतो - यत् - ज्या तुझ्या लीला - नृलोकविडम्बनं - मनुष्याप्रमाणेच वरवर दिसतात, पण मोक्षोपयोगी वस्तुत: असतात ॥६-४९॥

राजन् - राजा - एवं - येणेप्रमाणे - विज्ञापित: - विनवलेला - भगवान् देवकीनन्दन: - देवकी मातेला परमानंद देणारा षड्गुणैश्वर्य भगवान - एकान्तिनं - अत्यंत एकनिष्ठ - प्रियं - आवडता - भक्तं - उपासक अशा - उद्धवं - उद्धवाला - समभाषत - प्रेमाने सांगू लागला ॥६-५०॥

सहावा अध्याय समाप्त

GO TOP