|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय ५ वा - अन्वयार्थ
भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन - आत्मवित्तमा: - हे आत्मवेत्ते ऋषी हो - भगवन्तं - श्रीभगवान - हरि - हरीची - प्राय: - सामान्यत: - भजन्ति न - उपासना करत नाहीत. - तेषां - त्यापैकी - अविजितात्मनां - ज्यांनी आपला देह, मन, बुद्धी प्रभृति स्वाधीन करून घेतली नाहीत - अशान्तकामानां - ज्यांच्या वासना निमाल्या नाहीत - का - कोणती - निष्ठा - स्थिती प्राप्त होते ॥५-१॥ पुरुषस्य - महापुरुष जो विराट त्याच्या - मुखबाहुरूपादेभ्य: - तोंड, हात, मांड्या आणि पाय यापासून - आश्रमै: - चार ब्रह्मचर्यादि आश्रम यांच्या - सह - सहवर्तमान - विप्रादय: - ब्राह्मणप्रभृति - चत्वार: - चार - वर्णा: - वर्ण - गुणै: - सत्वादि तीन गुणांच्या सहाय्याने - पृथक् - निरनिराळे - जज्ञिरे - उत्पन्न झाले. ॥५-२॥ एषां - यांच्यापैकी - ये - जे कोणी - आत्मप्रभवं - आपली उत्पत्ती ज्यापासून झाली त्या - ईश्वरं - सर्वसत्ताधीश - साक्षात् पुरुषं - साक्षात महापुरुषाला - भजन्ति न - भजत नाहीत. - अवजानन्ति - व त्याचा अनादर करतात. - (ते) स्थानात् - ते स्वत:च्या वर्णापासून व आश्रमापासून - भ्रष्टा: - भ्रष्ट होतात - अध: - खाली - पतन्ति - पडतात. ॥५-३॥ केचित् - पण त्यातील काही लोक - दूरेहरिकथा: - श्रीहरीच्या कथा ज्यांस ऐकावयास सापडणे अशक्य असते - च - आणि - दूरे अच्युतकीर्तना: - अच्युताच्या नामकीर्तनाचे प्रसंग ज्यांस कधी येतच नाहीत अशा - स्त्रिय: - स्त्रिया - च - आणि - शूद्रादय: - शूद्रप्रभृति अज्ञ लोक - ते भवादृशां - ते तुमच्यासारख्या पुण्यपुरुषांच्या - अनुकम्प्या: एव - दयेस पात्र असतात ॥५-४॥ अथ - परंतु - श्रौतेन - उपनयनादि श्रुत्युक्त - जन्मना - दुसरा वेदोक्त जन्म प्राप्त होऊन - अपि - ही - विप्र - ब्राह्मण - च - आणि - राजन्यवेश्यौ - क्षत्रिय, वैश्य हे - हरे: - श्रीहरीच्या - पदान्तिकं - चरणांजवळ - प्राप्ता: - प्राप्त होणारे ते - आम्नायवादिन: - वेदांच्या परोक्ष अर्थाचा मात्र स्वीकार करतात म्हणून - मुह्यन्ति - मोह पावतात, मूर्ख होतात. ॥५-५॥ कर्मणि - वेदोक्त कर्मांचे - अकोविदा: - रहस्य न समजणारे - स्तब्धा: - हट्टी - मूर्खा: - मूर्खा - पण्डितमानिन: - आपणास पंडित, सर्वज्ञ समजणारे - यया - ज्या - माध्व्या - वेदांच्या वरवर, मधुर व मोहक - गिरा - वाणीने - उत्सुका: - हुरळून जाणारे - मूढा: - मूढ - चाटुकान् - त्या वेदांचा आधार घेऊन गोड गोड वाक्यांची - वदन्ति - आवृत्ति करीत बसतात. ॥५-६॥ रजसा - रजोगुणामुळे - घोरसंकल्पा: - भयंकर व दुसर्यास अपकारक संकल्प करणारे - कामुका: - विषयांचा-कामिनीकांचनाचा अभिलाष धरणारे - अहिमन्यव: - सर्पाप्रमाणे दीर्घकाल दंश धरणारे - दांभिका: - ढोंगी - मानिन: - हट्टी असे - पापा: - पापी लोक - अच्युतप्रियान् - श्रीअच्युताला प्रिय असणार्या प्रेमळ भक्तांस - विहसन्ति - थट्टेचा विषय करतात ॥५-७॥ उपासितस्त्रिय: - उपभोग्य स्त्रियांची उपासना करणारे - ते - ते हे विषयासक्त लोक - मैथुन्यपरेषु - रतिसुखासाठी मात्र निर्माण केलेल्या - गृहेषु - मंदिरांमध्ये - अन्योन्यं - एकमेकांस - आशिष: - आशीर्वाद - वदन्ति - देतात - च असृष्टान्नविधानदक्षिणं - व अन्नसंतर्पण, वेदोक्त विधिविधान आणि ब्राह्मणांस दक्षिणा ज्यात नाही असे वेदनिषिद्ध - यजन्ति - यज्ञ करतात - वृत्यै - जीवरक्षणासाठी - परं - मात्र - पशून् घ्नन्ति - पशूंची हिंसा करतात - अतद्विद: - त्यांस वेदांचे रहस्य कळलेले नसते ॥५-८॥ श्रिया - संपत्तीने - विभूत्या - ऐश्वर्याने - अभिजनेन - कुलीनपणामुळे - विद्यया - विद्येने - त्यागेन - दानधर्माने - रूपेण - रूपसौंदर्याने - बलेन - शरीरबलाने - कर्मणा - कर्तबगारीने - जातस्मयेन - संपत्त्यादिकांमुळे अतिशय गर्व झाल्याकारणाने - अन्धधिय: - ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे असे ते - सहेश्वरान् - ब्रह्मांडनायकासह - हरिप्रियान् - हरिप्रिय हरिदास जे - सत: - साधुसंत त्यांचा - अवमन्यन्ति - तिरस्कार करतात - खला: - हे लोक दुष्ट असतात ॥५-९॥ यथा - ज्याप्रमाणे - खं - आकाश - सर्वेषु - अखिल - तनुभृत्सु - शरीरधारी जीवांमध्ये - अवस्थितं व्यापक स्वरूपाने रहाणारे - शश्वत् - नित्य - आत्मानं - आत्मतत्व - अभीष्टं - अत्यंत इष्ट असणारे - ईश्वरं - ईश्वरी स्वरूपच - च - आणि - वेदोपगीतं - वेदाने ज्याची कीर्ति गाईली त्या स्वरूपाची - अबुधा: - समंजस लोक नव्हेत ते - न शृण्वते - आत्मा व परमात्मा यांचे श्रवणच करीत नाहीत - मनोरथानां - आपल्या वासनापूर्ण संकल्पांच्या - वार्तया - वार्तारूपाने - प्रवदन्ति - वेदमंत्रांचा अर्थ करतात. ॥५-१०॥ लोके - या भूलोकी - जन्तो: - जीवाचे - व्यवायामिषमद्यसेवा: - व्यवाय म्हणजे मैथुन, आनिष म्हणजे मांसाशन आणि मद्यपान यांचा उपभोग - नित्या: तु - स्वाभाविकच असतात - तत्र - त्याकामी - चोदना न हि - वेदाज्ञेची प्रेरणा असण्याचे कारणच नाही. - तेषु विवाह-यज्ञ-सुराग्रहै: व्यवस्थिति: - त्या उपभोगांमध्ये लग्न, यज्ञ आणि सौत्रामणि विधि ह्यांनी सुंदर व्यवस्था उत्पन्न होते - आसु निवृत्ति: इष्टा - या वरील उपभोगांमध्ये पराङ्मुखता इष्ट आहे ॥५-११॥ धनं - द्रव्य - धर्मैकफलं - धर्म हेच एक ज्याचे फल आहे असे आहे - यत: - धर्माचरणापासून - अनुप्रशान्ति: - उत्तम अनुतापद्वारा शांती प्राप्त होते - च - आणि - सविज्ञानं - साक्षात्कारसहित - ज्ञानं वै - ज्ञान, आत्मज्ञान मिळतेच - गृहेषु - घरादारादिकांत - युञ्जन्ति - उपयोजितात - कलेवरस्य - या पांचभौतिक देहाचा - (ग्रासकं) दुरन्तवीर्यं - ग्रासक अकुंठपराक्रमी, सर्वविजयी - मृत्युं - कालरूपी मृत्यु - न पश्यन्ति - पहात नाहीत ॥५-१२॥ यत् - ज्याअर्थी - सुराया: - मद्याचा - घ्राणभक्ष: - वास घेणे हेच भक्षण होय - विहित: - असे श्रुतीने विहित केले आहे - तथा - त्याच अर्थी - पशो: - यज्ञपशूचा - आलभनं - स्पर्श मात्र विहित केला आहे - न हिंसा - त्याची हिंसा करणे श्रुतीला मान्य नाही - एवं - याच न्यायाने - प्रजया - पुत्रोत्पादनासाठी मात्र - न रत्या - रतिसुखसाठी नाही - व्यवाय: - संभोग विहित आहे - इमं - हा - विशुद्धं - अत्यंत निर्मळ - स्वधर्मं - वर्णाश्रमधर्म - न विदु: - या कामुक लोकांस माहीत नाही ॥५-१३॥ तु - परंतु - ये - जे - अनेवंविद: - शुद्ध धर्मसंबंधाने खरे ज्ञान नसणारे - असन्त: - हट्टी, उद्धट - सदाभिमानिन: - आपण म्हणतो तेच सत्य होय, असा वृथा अभिमान बाळगणारे - विस्रब्धा: - नि:शंक होत्साते - पशून् - यज्ञपशूंचा - द्रुह्यन्ति - द्वेष करून वध करतात - तान् - त्या अधर्माचरणी लोकांस - ते च - ते पशूच - प्रेत्य - मेल्यानंतर इतर लोकी - खादन्ति - खातात ॥५-१४॥ परकायेषु - स्वेतरांच्या शरीरात - स्वात्मानं - रहाणारा जो नित्य आत्मा - ईश्वरं - जो सर्व प्रभु - हरि - श्रीहरी साक्षात आहे त्याचा - द्विषन्त: - द्वेष करणारे हेच नास्तिक - अस्मिन् - ह्या - सानुबन्धे - पुत्रादिकांच्या देहासह - मृतके - या मर्त्य देहावरच - बद्धस्नेहा: - अत्यंत प्रेम करून देहवश होतात - अध: - खाली - पतन्ति - पडतात ॥५-१५॥ ये - ज्या लोकांस - कैवल्यं - केवळ जे आत्मस्वरूप ते - असंप्राप्ता: - मिळालेले नसतेच - च - आणि - ये मूढतां - जे मूर्खपणाच्याही - अतीता: - पलीकडे गेलेले असतात - ते - ते लोक - त्रैवर्गिका: - धर्म, अर्थ व काम या तिहींच्या पाठी मागे लागतात - च - आणि - अक्षणिका: - आपण नित्य आहो असे मानतात - आत्मानं - आपल्या स्वत:चा - घातयन्ति हि - घातच करतात ॥५-१६॥ एते - हे - आत्महन: - आत्मघातकी - अशान्ता: - अस्वस्थ - अज्ञाने - अज्ञानातच - ज्ञानमानिन: - आपण ज्ञानी आहो असे समजणारे - अकृतकृत्या: - कर्तव्य न केल्यामुळे अकृतार्थ असलेले - कालध्वस्तमनोरथा: - कालाने ज्यांचे मनोरथ उध्वस्त केले आहेत असे - सीदन्ति वै - खरोखर नाश पावतात ॥५-१७॥ अत्याऽऽयासरचिता: - पराकाष्ठेचे श्रम करून तयार केलेली - गृहाऽपत्यसुहृच्छ्रिय: - घर, मुले, स्नेही आणि संपत्ति ही विषयोपभोगाची साधने - हित्वा - टाकण्यास भाग पडलेले - वासुदेवपराङ्मुखा: - श्रीहरीला पारखे झालेले जीव - अनिच्छन्त: - इच्छा नसतांनाही - तम: - अंधकारमय नरकात - विशन्ति - प्रविष्ट होऊन दु:खे भोगीत रहातात ॥५-१८॥ कस्मिन् - कोणत्या - काले - काळी, युगात - स: - तो - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीहरी - कीदृश: - कोणत्या स्वरूपाचा - किंवर्ण: - कोणत्या वर्णाचा असतो - वा - अथवा - केन - कोणत्या - नाम्ना - नावाने - विधिना - वेदोक्त विधीने - नृभि - मानवांकडून - इह - या लोकी - पूज्यते - पूजिला जातो - तत् - ते - उच्यतां - कृपाकरून सांगावे ॥५-१९॥ कृतं - कृतयुग - त्रेता - त्रेतायुग - द्वापरं - द्वापरयुग - च: - आणि - कलि: - कलियुग - इति - या नावाच्या - एषु - ह्या ह्या युगात - केशव: - श्रीकेशव - नानावर्णाभिधाकार: - अनेक पण प्रत्येक युगाला योग्य असा विशेष वर्ण, विशेष नाव आणि विशेष आकार म्हणजे स्वस्वरूप धारण करणारा जो श्री केशव त्याची - नाना एव विधिना - निरनिराळ्या विधींनी म्हणजे प्रकारांनी - इज्यते - उपासना करतात ॥५-२०॥ कृते - कृतयुगात - शुक्ल: - शुभ्रवर्ण - चतुर्बाहु: - चार हातांचा - जटिल: - जटा धारण करणारा - वल्कलाम्बर: - झाडाच्या सालींची वस्त्रे परिधान करणारा - कृष्णाजिनोपवीताक्षान् - कृष्णमृगचर्म, यज्ञोपवित आणि रुद्राक्षमाला ही - बिभ्रत् - धारण करणारा - दण्डकमण्डलू - दंड आणि कमंडलू ॥५-२१॥ तदा - त्या युगात - मनुष्या: - मनुष्यप्राणी - तु - खरोखर - शान्ता; - शांतवृत्तीचे - निर्वैरा: - कोणाशीही शत्रुभाव न धरणारे - सुहृद: - सर्वांशी मैत्रीने वागणारे - समा: - उच्चनीच भाव न धरणारे - देवम् - श्रीहरीचे - तपसा - तपश्चर्या करून शमेन च - आणि शांत मनाने - दमेन च - आणि इंद्रियास आपल्या ताब्यात ठेऊन - यजन्ति - आराधना करतात ॥५-२२॥ हंस: - हंस - सुपर्ण: - सुपर्ण - वैकुण्ठ: - वैकुंठ - धर्म: - धर्म - योगेश्वर: - योगेश्वर - अमल: - पवित्र - ईश्वर: - ईश्वर - पुरुष: - पुरुषोत्तम - अव्यक्त: - इंद्रियांस अगोचर असणारा - परमात्मा - परमात्मा - इति - या नावांनी - गीयते - परमेश्वराचे संकीर्तन होत असते, कृतयुगात परमेश्वराची ही नावे प्रसिद्ध असतात. ॥५-२३॥ त्रेतायां - त्रेतायुगात - असौ - हा परमेश्वर - रक्तवर्ण: - तांबड्या रंगाचा - चतुर्बाहु: - चार हातांचा - त्रिमेखल: - तीन रज्जूंचा कमरपट्टा धारण करणारा - हिरण्यकेश: - पिंगट वर्णाचे केस असणारा - त्रय्यात्मा - तीनही वेदांचा आत्मा असणारा - स्रुक्स्रुवाद्युपलक्षण: - स्रुक्स्रुवादि यज्ञपात्रे धारण करणारा ॥५-२४॥ तदा - त्या त्रेतायुगात - सर्वदेवमयं - सर्व देवांस स्वस्वरूपात अंतर्भूत करणारा - हरि - हरि - तं - त्या - देवं - परमेश्वराला - धर्मिष्ठा: - वेदधर्मानुरूप चालणारे - ब्रह्मवादिन: - वेदवेदांतवेत्ते - मनुजा: - मानव - त्रय्या विद्यया - तीनही वेदविद्यांनी - यजन्ति - आराधना करतात ॥५-२५॥ विष्णु: - विष्णु - यज्ञ: - यज्ञ - पृश्निगर्भ: - पृश्नीचा सुत - सर्वदेव: - परमेश्वर - उरुक्रम: - महापराक्रमी, त्रिविक्रम - वृषकपि: - वृषाकपि - जयन्त: - जयंत - च - आणि - उरुगाय: - सर्ववंद्य, अलौकिक कीर्तीचा - इति - या प्रकारांनी - ईर्यते - आळवतात ॥५-२६॥ द्वापरे - द्वापर युगात - भगवान् - श्रीपरमेश्वर - श्याम: - काळसर वर्णाचा - पीतवासा: - पिवळा पितांबरधारी - निजायुध: - शंका, चक्र, गदा, पद्म ही आयुधे धारण करणारा - श्रीवत्सादिभि: - श्रीवत्सप्रभृति - अङ्कै: - चिन्हांनी - च - आणि - लक्षितै: उपलक्षित: - कौस्तुभादि अलंकारांनी सुशोभित असा हा देव ओळखता येतो. ॥५-२७॥ नृप - राजा - तदा - द्वापर युगात - महाराजोपलक्षणं - छत्र चामरादि सार्वभौम राजाची चिन्हे धारण करणार्या - तं - त्या - पुरुषं - पुरुषोत्तमाला - परं जिज्ञासव: - अति श्रेष्ठ जे परमात्मतत्व ते जाणण्याची तीव्र इच्छा करणारे - मर्त्या: - मर्त्य मानव - वेदतन्त्राभ्यां - वेद म्हणजे निगम व तंत्र म्हणजे आगम, आगमनिगमांच्या सहाय्याने - यजन्ति - आराधन करतात ॥५-२८॥ वासुदेवाय - वासुदेव अशा - ते नम: - तुला नमस्कार असो - च - आणि - सङ्कर्षणाय नम: - संकर्षण नामक तुला नमस्कार असो - प्रद्युम्नाय - प्रद्युम्ननामक - अनिरुद्धाय - अनिरुद्ध नामक - तुभ्यं - तुला - भगवते - भगवंताला - नम: - नमस्कार असो ॥५-२९॥ नारायणाय - नारायणनामक - ऋषये - ऋषीश्वराला - पुरुषाय - पुरुषोत्तमाला - महात्मने - महानुभावाला - विश्वेश्वराय - ब्रह्मांडाच्या प्रभूला - विश्वाय - ब्रह्मांडस्वरूप जो त्याला - सर्वभूतात्मने - सर्व चराचराचा आत्मा जो परमेश्वर त्याला - नम: - नमस्कार असो ॥५-३०॥ उर्वीश - हे पृथिवीपते - इति - या पूर्वोक्त नावांनी - द्वापरे - द्वापर युगात - जगदीश्वरं - ब्रह्मांडनायक जो प्रभु त्याला - स्तुवन्ति - स्तवितात, परमेश्वराची स्तुती करतात - कलौ अपि - कलियुगात सुद्धा - नानातन्त्रविधानेन - अनेक आगमोक्त विधानांनी - यथा - ज्याप्रकारे आराधतात - श्रृणु - ऐक ॥५-३१॥ हि - कारण - कृष्णवर्ण - काळ्या वर्णाचा - त्विषा - तेजाने - अकृष्णं - शुभ्र असणारा - साङ्गोपाङ्गास्त्रपार्षद: - सर्व प्रधान व गौण शस्त्रास्त्रे धारण करून सुनंदादि पार्षद म्हणजे परिपार्श्विकांसह असणारा जो भगवान त्याची - सुमेधस: - सुबद्ध भक्त - सङ्कीर्तनप्रायै: - नामसंकीर्तनादिकांनीच व्यापलेल्या - यज्ञै: - यज्ञांनी - यजन्ति - आराधना करतात ॥५-३२॥ प्रणतपाल - दीन आश्रितांचे रक्षण करणार्या - महापुरुष - पुरुषोत्तमा - ते - तुझे - चरणारविंद - चरणकमल जे त्याला - वन्दे - वंदन करतो - सदा - सदैव - ध्येयं - ध्यान करण्यास योग्य - परिभवघ्नं - सर्व आधिव्याधींचा नाश करणारे - अभीष्टदोहं - सर्व इष्ट मनोरथांची कामधेनु - तीर्थास्पदं - पवित्र तीर्थांचे आश्रयस्थान - शिवविरचिनुतं - शंकर व ब्रह्मदेव यांनी स्तविलेले - शरण्यं - शरणागतास आश्रय देणारे - भृत्यार्तिहं - दासांची, भक्तांची संकटे निवारण करणारे - च - आणि - भवाब्धिपोतं - भवसागरातून सुरक्षित नेणारी नौकाच होय ॥५-३३॥ धर्मिष्ठ - हे धर्मपालका - महापुरुष - पुरुषोत्तम - ते चरणारविन्दं वन्दे - तुझे चरणकमळ मी शिरी धारण करतो - सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं त्यक्त्वा - देवांसही हवे असणार्या म्हणून त्याग करण्याला अत्यंत कष्टप्रद अशा राज्यवैभवाचाही त्याग करून - यत् - ज्याअर्थी - अरण्यं - अरण्यवासासाठी - आर्यवर्चसा - पित्याची आज्ञा झाली म्हणून - अगात् - गेलास - दयितया - आपली प्राणप्रिया सीतामाऊली त्यांस - ईप्सितं - हौसेने हवा असलेल्या - मायामृगं - कपटी कांचनमृगाचा अन्वधावत् - पाठलाग केला ॥५-३४॥ एवं - याप्रमाणे - राजन् - जनक राजा - युगवर्तिभि: - युगविशेषात असणार्या - मनुजै: - नरनारींकडून - श्रेयसां ईश्वर: - पुरुषार्थाचा प्रभु असणारा - हरि: - जो श्रीहरी तो - युगानुरूपाभ्यां - त्या त्या विशेष अनुरूप युगाला असणार्या पूजादिकांनी व नामादि संकीर्तनांनी - इज्यते - पूजिला जात असतो ॥५-३५॥ यत्र - ज्या कलियुगात - संकीर्तनेन एव - केवळ नामसंकीर्तनाने मात्र - सर्व: स्वार्थ: - सर्व प्रकारचे इष्ट पुरुषार्थ - अभिलभ्यते - पूर्णतेने प्राप्त होतात - कलिं - त्या कलियुगाला - सारभागिन: - उत्तमाचा अंगिकार करणारे - आर्या: - श्रेष्ठ साधु - सभाजयन्ति - आदरपूर्वक वंदन प्रसिद्धपणे करतात ॥५-३६॥ हि - कारण - यत: - ज्यापासून - परमां शान्तिं - श्रेष्ठ प्रकारची शांती - विन्देत - मिळवता येते - च - आणि - संसृति: - संसार - नश्यति - नाहीसा होतो - अत: - त्या हरिनामसंकीर्तनापेक्षा - भ्राम्यतां देहिन: - जन्ममरणाच्या चक्रात भ्रमण करणार्या जीवास - परम: लाभ: - श्रेष्ठतर लाभ - इह - या मृत्युलोकी - न - नाहीच ॥५-३७॥ राजन् - जनका - कृतादिषु - कृत, त्रेता, द्वापर, या युगातील - प्रजा: - लोक - कलौ - कलियुगात - सम्भवं - जन्म व्हावा असे - इच्छन्ति - इच्छितात - कलौ - कलियुगात - खलु - खरोखर - नारायणपरायणा: - नारायणनिष्ठ - भविष्यन्ति - होणार असा संभव आहे ॥५-३८॥ महाराज - सार्वभौम राजा - क्वचित् क्वचित् - कोठे कोठे - च - आणि - द्रविडेषु - द्रविड देशात - भूरिश: - पुष्कळ होतील - यत्र - ज्या द्रविड देशात - ताम्रपर्णी - ताम्रपर्णी - नदी - नदी आहे - कृतमाला पयस्विनी - कृतमाला पयस्विनी - च - आणि - महापुण्या कावेरी - अत्यंत पवित्र व पुण्यप्रद कावेरी - प्रतीची च महानदी - प्रतीची व महानदी या नद्या आहेत ॥५-३९॥ मनुजेश्वर - नरपते - तासां जलं - त्या नद्यांचे पाणी - ये - जे - मनुजा: - मानव - पिबन्ति - पितात - अमलाशया: - अमल म्हणजे शुद्ध आशयाचे म्हणजे अंत:करणाचे होऊन - भगवति वासुदेवे - भगवान वासुदेवाचे ठिकाणी - प्राय: - बदुधा - भक्ता: - भक्ति धारण करतात ॥५-४०॥ कर्तं - इतर सर्व प्रकारची कर्मे - परिहृत्य - टाकून देऊन - शरण्यं मुकुन्दं - सर्वांना आश्रय देणार्या मुकुंदाला - सर्वात्मना - अंत:करणपूर्वक सर्वथा - य: - जो - शरणं गत: - अनन्य भावाने शरण जातो - अयं - तो हा - देवर्षिभूताप्तनृणां - देव, ऋषी, भूते, आप्त व लोक यांचा - पितृणां - आणि पितरांचा - न किङ्कर: - दास असत नाही - च - आणि - ऋणी न - ऋणीही नसतो ॥५-४१॥ स्वपादमूलं - आपले जे चरणकमल त्याचे - भजत: - आराधना करणार्या - त्यक्ताऽन्यभावस्य - इतर सर्व भावना टाकून देणार्या - प्रियस्य - प्रिय भक्तांचे - यत् विकर्म - जे काही वाईट कर्म - कथंचित् - कसे तरी यदृच्छेने, प्रारब्धाने - उत्पातितं - उत्पन्न झालेले असते - सर्व - ते सर्व - हृदि सन्निविष्ट: - हृदयात स्थिर असलेला - परेश: हरि: - श्रीपरमेश्वर, श्रीहरी - धुनोति - हलवून टाकतो, नाहीसे करतो ॥५-४२॥ इत्थं - याप्रकारे - भागवतान् धर्मान् - भागवत संप्रदायात रूढ झालेले धर्म - श्रुत्वा - ऐकून - अथ - नंतर - सोपाध्याय - उपाध्यायासह - प्रीत: - आनंदित झालेला - मिथिलेश्वर: - मिथिलेचा राजा जनक - जायन्ते यान् मुनीन् - जयंतीचे पुत्र जे नऊ मुनी, त्याची - अपूजयत् हि - मोठ्या भक्तिभावाने पूजा करता झाला ॥५-४३॥ तत: - त्यानंतर - सर्वलोकस्य पश्यत: - सर्व लोक पहात असताच सिद्धा: - ते नऊ सिद्ध मुनी - अन्तर्दधिरे - अंतर्धान पावले, अदृश्य झाले - धर्मान् उपातिष्ठन् - नुमिप्रणीत भागवत धर्माप्रमाणे वागणारा राजा, एकनिष्ठ जनक राजा - परमां गतिं - अतिश्रेष्ठ गती- मोक्ष - अवाप - मिळवता झाला ॥५-४४॥ महाभाग - महाभग्यशाली वसुदेवा - श्रुतान् एतान् - त्वा ऐकलेले हे - भागवतान् धर्मान् - सर्व भागवत धर्म - आस्थित: - जर पाळलेस - श्रद्धया युक्त: - आणि पूर्ण श्रद्धेने युक्त होऊन - नि:सङ्ग: - विषयांची संगती सोडून अनासक्त झालास तर - त्वं अपि - तूही - परं यास्यसे - सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ प्राप्त करून घेऊ शकशील ॥५-४५॥ यत् - ज्याअर्थी भगवान् ईश्वर: हरि: - श्रीभगवान् परमेश्वर हरि - वां - तुम्हा उभयतांच्या - पुत्रतां अगमत् - पुत्रत्वाप्रत प्राप्त झाला - युवयो: दम्पत्यो: - तुम्हा वसुदेव-देवकी नामक दांपत्याचे - यशसा - यशाने - जगत् - पृथ्वी - पूरितं खलु - खरोखर भरून राहिली आहे ॥५-४६॥ दर्शनालिङ्गनालापै: - त्या हरीचे दर्शन, त्याला आलिंगन, त्याच्याशी बोलेणे इत्यादींनी - शयनासनभोजनै: - आणि निजवणे, बसवणे, खाऊ घालणे या प्रकारांनी - कृष्णे पुत्रस्नेहं - कृष्णाचे ठिकाणी अंत:करणातील पुत्रप्रेम - प्रकुर्वतो: त्वां - प्रकट करणार्या तुम्हा उभायतांचा - आत्मा पावित: - आत्मा निर्मल झाला आहे ॥५-४७॥ शिशुपालपौंड्रशाल्वादय: नृपतय: - शिशुपाल, पौंड्र, शाल्व प्रभृति राजे - शयनासनादौ - निजताना, बसताना वगैरे प्रसंगी - वैरेण - विरोध भक्तीने - यं ध्यायन्त: - ज्याचे ध्यान अखंड करत होते - गतिविलासविलोकनादयै: - चालणे, विलास करणे, पाहाणे वगैरेंच्या साह्याने - आकृतधिय: - ज्यांची बुद्धी कृष्णाकार झाली आहे असे - तत्साम्यं - श्रीकृष्णाची समानता - आपु: - प्राप्त करून घेते झाले - अनुरक्तधियां - ज्यांची बुद्धी प्रेमाने कृष्णाचे ठिकाणी अनुरक्त झाली आहे असे त्यांचे - पुन: किं - अंत:करण श्रीकृष्णमय झाले हे काय सांगावयास पाहिजे ? ॥५-४८॥ सर्वात्मनि - सर्वांचा आत्मा असणार्या - मायामानुष्यभावेन - मायेने मनुष्यभाव प्राप्त झाल्यामुळे - गूढेश्वर्ये - अत्यंत गहन ऐश्वर्यवंत - परे - सर्वश्रेष्ठ - अव्यये - शाश्वत अक्षर - ईश्वरे कृष्णे - परमेश्वर जो श्रीकृष्ण त्याच्या ठिकाणी - अपत्यबुधिं मा अकृथा: - हा आपला पुत्र आहे अशी बुद्धी करू नका ॥५-४९॥ भूभारासुरराजन्यहन्तवे - भूमीला भारभूत झालेले हे क्षत्रियरूपी राक्षस त्यांना ठार मारण्यासाठी - सतां गुप्तये निवृत्यै - आणि साधूंचे परित्राण करण्यासाठी व त्यांना मोक्ष देण्यासाठी - अवतीर्णस्य - ज्याने अवतार घेतला आहे त्याचे - यश: - माहात्म्य - लोके - या ब्रह्मांडात - वितन्यते - ओतप्रोत भरलेले आहे. ॥५-५०॥ एतत् - हे सर्व - श्रुत्वा - ऐकून - महाभाग: वासुदेव: - अत्यंत दैववान वसुदेव - अतिविस्मित: - अत्यंत आश्चर्यचकित झाला - महाभागा देवकी च - आणि भाग्यसंपन्न देवकीही आश्चर्यचकित झाली - आत्मन: - आपल्या अंत:करणात असलेला - मोहं - मायामोह - जहतु: - उभयतां वसुदेव देवकी नाहीसे करती झाली ॥५-५१॥ इमं - हा - पुण्यं - पुण्यदायक - इतिहासं - इतिहास - य: - जो - समाहित: - समाधान वृत्तीने - धारयेत् - अथिर ध्य्नाचा विषय करील - स: - तो - इह - येथील संसारात - शमलं - अहंकार, वासना. अज्ञान या मलांचा - विधूय - निरास करून - ब्रह्मभूयाय कल्पते - ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी होतो. पाचवा अध्याय समाप्त |