|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १ ला - अन्वयार्थ
यदुवंशाला ऋषींचा शाप - दैत्यवधं कृत्वा - अनेक दैत्यांचा वध केल्यानंतर - यदुभिः वृतः - यादव बंधुबांधवांनी घेरलेले असे - सरामः कृष्णः - बलराम आणि श्रीकृणाने - जविष्ठं कलिं जनयन् - अगदी ताबडतोब घात करेल अशा प्रकारचा यादवांमध्येच आपापसात कलह उत्पन्न करून - भुवः भारं अवतारयत् - पृथ्वीचा उरला सुरलेलाही भार उतरवला. (कां केले असे ? यासाठी पहा ३ रा श्लोक) ॥ १ ॥ दुर्द्यूत-हेलनकच-ग्रहणादिभिः - खोटारडापणा करीत द्यूत खेळून, अपमान, तिरस्कार आणि शेवटी द्रौपदीचे केशाकर्षण इत्यादि प्रकारांनी - सपत्नैः बहु कोपिताः - दुर्योधनादि बंधूंकडून अनेक वेळा प्रकुपित केले गेले असे - ये पाण्डुसुताः - पंडुपुत्र पांच पांडवांना - तान् निमित्तं कृत्वा - निमित्त करून - समेतान् नृपान् इतरेतरतः हत्वा - भारत युद्धासाठी एकत्र झालेल्या राजांना एकमेकांच्या हस्ते मारवून - ईशः क्षितिभारं निरहरत् - परमेश्वर श्रीकृणाने पृथ्वीचा भार नाहीसा केला. ॥ २ ॥ स्वबाहुभिः गुप्तैः यदुभिः - आपल्या बाहुबलाने संरक्षित अशा यादवांकडून - भूभारराजपृतना निरस्य - भूमीस भार बनलेल्या क्षत्रिय राजांच्या सेनांचा संहार करून - अप्रमेयः अचिन्तयत् - ज्याचे स्वरूप व ज्याचा हेतु याचा अंदाजच येऊ शकणार नाही असा परमात्मा श्रीकृष्ण विचार करू लागला - अवनेः भार गतः अपि - पृथ्वीचा बराचसा भार नाहीसा झाला तरी - ननु अगतं हि भारं मन्ये - जणूं काही हा भार निश्चयपूर्वक कमी झाला असे अजून तरी वाटत नाही - अहो यादवकुलं अविषह्यं आस्ते - कारण इतर कोणासही आटोपणार नाहीत असे हे असह्य यादवकुल अजून पृथ्वीवरच आहे. ॥ ३ ॥ नित्यं विभव उन्नहनस्य - उत्कर्षाच्या संपन्नतेने सदैव उच्छृंखल झालेल्या - मत्संश्रयस्य अस्य - आणि वर ज्यांना माझा आश्र आहे अशा या यादवकुलाचा - अन्यतः कथंचित् - अन्य कोणत्याही मार्गाने - परिभवः न एव भवेत् - पराजय होणे शक्यच नाही - वेणुस्तम्बस्य वह्निम् इव - म्हणून बांबूंच्या बेटांतील बांबू जसे एकमेकांच्या घर्षणाने होणार्या अग्निप्रमाणे - यदुकुलस्य अन्तः कलिं विधाय - यदुकुलातच आपापसात कलह उत्पन्न करून - शान्तिम् उपैमि - मी उपशम पावेन (असा विचार केला) ॥ ४ ॥ राजन् ! एवं व्यवसितः - हे परिक्षित राजा ! याप्रमाणे निश्चय करून - सत्यसंकल्पः ईश्वरः - सत्याचाच संकल्प करणारा तो श्रीकृष्ण - विप्राणां शापव्याजेन - ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून - विभुः स्वकुलं संजह्रे - सर्वशक्तिमान प्रभूने स्वकुलाचा संहार करविला. ॥ ५ ॥ नृणां लोचनं - सर्व जनांचे नेत्र - लोकलावण्यनिर्मुक्त्या - निसर्गातील कोणतेही सौंदर्य ज्याच्यापुढे नीरस, फिके वाटावे - स्वमूर्त्या आच्छिद्य - अशा आपल्या सर्वांगसुंदर सगुण मूर्तीत साठवून - ताः स्मरतां गीर्भिः आच्छिद्य - सुंदर सुंदर उपदेशांनी भरलेल्या गीतांनी भक्तांचे चित्त सदा त्या उपदेशांमध्येच निरत राहील अशी व्यवस्था करून - पदैः तानि ईक्षतां क्रियाः आच्छिद्य - जेथे जेथे आपला संचार झाला (जी जी कर्मे केली) तेथे तेथे उमटलेल्या पडसादांनी सर्वांच्या क्रिया स्तब्ध करीत - कौ सुश्लोकां वितत्य - या पृथ्वीवर आपली कीर्ति प्रसृत करून - अनया हि - आपल्या कीर्तीनेच - तमः अंजसा नु तरिष्यन्ति इति - आपले भक्त अज्ञानरूपी अंध्काराचा सागर सहज तरून जातील असा विचार करून - ईश्वरः स्वं पदं अगात् - श्रीकृष्ण आपल्या वैकुंठाला निघून गेला. ॥ ६-७ ॥ ब्रह्मण्यानां वदान्यानां - ब्राह्मणांचा मान राखणारे व दानधर्मात उदार वृत्तिचे असणारे - नित्यं वृद्धोपसेविनां - वृद्ध अनुभवी जनांची मनोभावे सेवा करणारे - कृष्णचेतसां वृष्णिनां - आणि कृष्णाचे भक्त असलेले सर्व वृष्णीकुलांतील यादव यांना - विप्रशापः कथं अभूत् - ब्राह्मणांचा शाप कसा काय झाला ? ॥ ८ ॥ द्विजसत्तम ! यन्निमित्तः स वै शापः - हे ब्राह्मणश्रेष्ठ शुक महाराज ! खरेच, कोणत्या निमित्ताने बरं हा शाप - यादृशः कथं एकात्मनां भेदः - त्याचे स्वरूप कशा प्रकारचे होते की बंधुत्वभावाने नांदणार्या यादम्=वांमध्ये मतभेद झाले - एतत् सर्वं मे वदस्व - हे सर्व आपण मला सांगा. ॥ ९ ॥ सकलसुंदरसंनिवेशं वपुः बिभ्रत् - सर्वच सुंदर वस्तू जिथे एकवटल्या आहेत असे रूप धारण करणारा - भुविः सुमंगलं कर्म आचरन् - या पृथ्वीतलावर मंगलमय कर्मे करणारा - आप्तकामः - कृतकार्य असलेला धाम आस्थाय रममाणः - कर्तव्यकर्मे चोखपणे बजावून इतरांस तसे करावयास लावणारा - उदारकीर्तिः - उद्धारक म्हणून ज्याची कीर्ति झाली आहे अशा त्या श्रीक्ष्ष्णाने - स्थितकृत्यशेषः - अवतारकार्य किंचित उरले म्हणून - कुलं संहर्तुम् ऐच्छत - यादवकुलाचा संहार करण्याची इच्छा केली. ॥ १० ॥ गायत् जगत् कलिमल अपहराणि - भजनादि सेवेत रत असणार्या सर्वांचे दोष हरण करणारी - सुमंगलानि - शुभ असलेली - पुण्यनिवहानि कर्माणि - पुण्य संचय करविणारी कृत्ये - यदुदेवगेहे कृता - यदुनाथाच्या घरी करून झाल्यानंतर - कालात्मना निवसता - कालस्वरूप परमेश्वराने (श्रीकृष्णाने) - विसृष्टाः मुनयः - अनुज्ञा दिलेले ऋषि - पिण्डारकं समगमन् - पिण्डारक क्षेत्राला गेले. ॥ ११ ॥ पिण्डारक क्षेत्रास गेलेल्यांची नावे - विश्वामित्रः असितः कण्वः दुर्वासाः भृगुः अंगिराः कश्यपः वामदेवः अत्रिः वसिष्ठः नारदादयः मुनयः पिण्डारकं समगमन् - विश्वामित्र, असित, कणव, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्रि, वसिष्ठ आणि नारदादि ऋषि पिण्डारकास गेले. ॥ १२ ॥ ते यदुनंदनाः कुमाराः क्रीडन्तः - क्रीडा करणारे यादवपुत्र कुमार एकदा खेळत खेळत - जाम्बवतीसुतं साम्बं स्त्रीवेषैः वेषयित्वा - कृष्णपत्नी जांबवतीचा साम्ब पुत्राला स्त्रीवेष घालून - तान् उपव्रज्य - त्या ऋषिवर्यांकडे जाऊन - अविनीताः विनीतवत् उपसंगृह्य प्रपच्छुः - अजिबात विनय भाव नसतांही नम्रतेचा आव आणून, ऋषींच्या पाया पडून त्यांना विचारले - हे अमोघदर्शनाः विप्राः - कशाचेही अचूक ज्ञान असणार्या हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो ! - एषा असितेक्षणा अन्तर्वत्नीः - ही काळेभोर नेत्र असणारी स्त्री गरोदर आहे, - पुत्रकामा अस्ति - आपल्याला पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे, - प्रसोष्यन्ती - आणि तिचा प्रसूत्काळ जवळ आला आहे, अशी ती - साक्षात् प्रष्टुं विलज्जति - स्वतः प्रत्यक्ष विचारण्यास लाजत असल्यामुळे - वः पृच्छति - आम्हाला पुढें करून विचारत आहे - कृपया प्रब्रूत, किंस्वित् संजनयिष्यति - कृपा करून सांगा बरे, हिच्या उदरी कोणते संतान होणार आहे ? ॥ १३-१५ ॥ हे नृप ! एवं प्रलब्धाः - हे राजा ! याप्रमाणे वंचना (टिंगल) केल्यामुळे - कुपिताः मुनयः तान् ऊचुः - क्रुद्ध झालेले ते मुनि त्या यदुकुमारांस म्हणाले - मन्दाः, वः कुलनाशनं मुसलं जनयिष्यति - हे मंदबुद्धि कुमारांनो, ऐका तर, हिच्या उदरी तुमच्या कुलाचा सर्वनाश करनारे मुसळ जन्मास येईल. ॥ १६ ॥ तत् श्रुत्वा - तो भयंकर असा शाप ऐकून - अतिसंत्रस्ताः ते - अत्यंत भीतीग्रस्त झालेले ते यदुकुमार - सांबस्य उदरं सहसा विमुच्य - स्त्रीवेष घेतलेल्या सांबाच्या उदराला गुंडाळलेले वस्त्र सोडले - तस्मिन् खलु - आणि त्यात खरोखरच - अयस्मयं मुसलं ददृशुः - त्यांना एक लोखंडाचे मुसळ दिसले. ॥ १७ ॥ मंदभाग्यैः वयं किं कृतः ? - आम्ही अभागी हे काय करून बसलो - नः जनाः नः किं वदिष्यंति - आमचेच यादव गण आता आम्हाला काय म्हणतील ? - इति विह्वलिताः ऊचुः - व्याकुळ झालेले ते अशा प्रकारे आपसात बोलत बोलत - मुसलं आदाय गेहान् ययुः - ते मुसळ भेऊन द्वारकेस आले. ॥ १८ ॥ तत् च सदसि उपनीय - नंतर ते मुसळ राजसभेत आणून - परिम्लानमुखश्रियः - मुखें म्लान झालेल्या अशा त्या यदुकुमारांनी - सर्वयादवसन्निधौ - सर्व यादवांसमक्ष - राज्ञे आवेदयांचक्रुः - उग्रसेन राजाला घडलेली सर्व हकीकत सांगितली. ॥ १९ ॥ नृप ! अमोघं विप्रशापं श्रुत्वा - हे राजा ! कधीही खोटा होऊ शकत नाही असा ऋषीचा शाप ऐकून - मुसलं दृष्ट्वा च - आणि ते मुसळ पाहून - द्वारकौकसः विस्मिताः - सर्व द्वारकावासी अतिशय आश्चर्यचकित झाले - भयसंत्रस्ताः बभूवुः - आणि भयाने संत्रस्त झाले. ॥ २० ॥ सः आहुकः यदुराजः - त्या उग्रसेन राजाने - तत् मुसलं चूर्णयित्वा - त्या मुसळाचे पीठ करविले आणि ते चूर्ण व - तत् अस्य अवशेषितं लोहं च - अवशिष्ट (उरलेल्या) लोकंड्याच्या तुकड्यासकट - समुद्रसलिले प्रास्यत् - सर्व समुद्रांत फेकून दिले. ॥ २१ ॥ कश्चित् मत्स्य लोहं अग्रसीत् - कोण्या एका माशाने तो लोखंडाचा तुकडा गिळला - ततः तरलैः उह्यमानानि चूर्णानि - व ते चूर्ण समुद्राच्या लाटांनी सरकत सरकत - वेलायां लग्नानि - समुद्र किनार्यावर लागले, आणि - एरकाः किल आसन् - त्या चूर्णाला तीक्ष्ण टोके असणार्या गवताचे स्वरूप प्राप्त झाले. ॥ २२ ॥ मत्स्यघ्नैः अन्य मत्स्यः सहितः - मासे पकडण्यार्या कोळ्यांनी इतर माशांबरोबर लोखंडाचा तुकडा गिळलेला मासही पकडला - तस्य उदरगतं लोहं - त्या माशाच्या उदरात सांपडलेला लोखंड्याचा तुकडा - सः लुब्धकः शल्ये अकरोत् - एका पारध्याने आपल्या बाणाच्या टोकाला लावला. ॥ २३ ॥ भगवान् ज्ञात सर्वार्थः - श्रीकृष्ण भगवंताला हे सर्व समजले होतेच पण - ईश्वरः अपि सन् - स्वतः सर्वसमर्थ असूनही - विप्रशापं अन्यथा कर्तुं न ऐच्छत् - त्याने विप्रांचा शाप अन्यथा व्हावा अशी इच्छा केली नाही. - कालरूपी तत् अनुमोदत - तो शाप संहाररूपी काळ झाला असल्यामुळे त्याने त्याला अनुमोदनच दिले. ॥ २४ ॥ अध्याय पहिला समाप्त |