श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ९० वा - अन्वयार्थ

भगवान कृष्णांच्या लीलाविहाराचे वर्णन -

श्रियः पतिः - लक्ष्मीपति श्रीकृष्ण - सर्वसंपत्समृद्धायां - सर्व संपत्तीने ओतप्रोत भरलेल्या - वृष्णिपुङगवैः जुष्टायां - मोठमोठया यादवांनी सेविलेल्या - स्वपुर्यां द्वारकायां - स्वतःची नगरी जी द्वारका तीत - सुखं निवसन् (सन्) - सुखाने रहात असताना. ॥१॥

उत्तमवेषाभिः - सुंदर वेष धारण करणार्‍या - नवयौवनकान्तिभिः - नवीन तारुण्याने शोभणार्‍या - हर्म्येषु - मंदिरात - कंदुकादिभिः क्रीडन्तीभिः - चेंडू आदिकरून साधनांनी खेळणार्‍या - तडिद्‌द्युभिः - विजेप्रमाणे आहे कांति ज्यांची अशा - स्त्रीभिः (सह) - स्त्रियांसह - रेमे - रममाण झाला. ॥२॥

मदच्युद्‌भिः मतङगजैः - मद गाळणार्‍या हत्तींनी - कनकोज्वलैः स्वलंकृतैः - सुवर्णाप्रमाणे तेजस्वी व अलंकारांनी भूषविलेल्या - भटैः अश्वैः रथैः च - योद्‌ध्यांनी, घोडयांनी व रथांनी - नित्यं संकुलमार्गायां - नित्य व्यापिलेले आहेत मार्ग जीतील अशा - उद्यानोपवनाढयायां - उद्याने व क्रीडास्थाने यांनी भरलेल्या - पुष्पितद्रुमराजिषु - फुललेल्या वृक्षांच्या रांगांमध्ये - निर्विशद्‌भृङगविहगैः - प्रविष्ट झालेल्या भुंग्यांच्या व पक्ष्यांच्या समूहांनी - समन्ततः नादितायां - जिकडे तिकडे दुमदुमलेल्या - षोडशसाहस्रपत्‍नीनाम् एकवल्लभः - सोळा हजार स्त्रियांचा एक प्रिय पति असा - तावत् विचित्ररूपः असौ - तितकीच चित्रविचित्र स्वरूपे धारण करणारा हा श्रीकृष्ण - महार्धिषु तद्‌गृहेषु रेमे - मोठ्या समृद्धींनी युक्त अशा त्या स्त्रियांच्या गृहांमध्ये रममाण झाला. ॥३-५॥

प्रोत्फुल्लोत्पलकह्‌लारकुमुदाम्भोजरेणुभिः - फुललेली कमले, कहलारे, कुमुदे व अंभोजे यांच्या परागांनी - वासितामलतोयेषु - सुगंधित झाली आहेत निर्मळ उदके ज्यांतील अशा - च - आणि - कूजद्‌द्विजकुलेषु - गात आहेत पक्ष्यांचे थवे जेथे अशा - ह्लदिनीषु - सरोवरांमध्ये - महोदयः कुचकुंकुमलिप्ताङगः - मोठा आहे उदय ज्याचा असा, स्तनांवरील केशराने रंगून गेले आहे अंग ज्याचे असा - योषितां च परिरब्धः (सः) - आणि स्त्रियांनी आलिंगिलेला तो श्रीकृष्ण - अम्भः विगाह्य विजहार - पाण्यात पोहून क्रीडा करिता झाला. ॥६-७॥

मृदङगपणवानकान् वीणां (च) मुदा वादयद्‌भिः गन्धर्वैः - मृदंग, पणव, दुंदुभि व वीणा ही वाद्ये आनंदाने वाजविणार्‍या गंधर्वांनी - सूतमागधबन्दिभिः (च) - आणि सुत, मागध व स्तुतीपाठक यांनी - उपगीयमानः - गायिला जाणारा असा. ॥८॥

हसन्तीभिः ताभिः - हास्य करणार्‍या त्या स्त्रियांनी - रेचकैः सिच्यमानः अच्युतः - पिचकार्‍यांनी भिजविलेला श्रीकृष्ण - (ताः) प्रतिसिञ्चन् - त्या स्त्रियांना उलट भिजवीत - यक्षीभिः यक्षराट् इव - यक्षस्त्रियांसह जसा यक्षाधिपति खेळतो त्याप्रमाणे - विचिक्रीडे स्म - क्रीडा करिता झाला. ॥९॥

क्लिन्नवस्त्रविवृतोरुकुचप्रदेशाः - भिजलेल्या वस्त्रामुळे स्पष्ट दिसत आहेत मांडया व स्तनभाग ज्यांचे अशा - सिञ्चन्त्यः - उदक सिंचिणार्‍या - उद्‌धृतबृहत्कबरप्रसूनाः - धारण केली आहेत मोठया वेण्यांवर फुले ज्यांनी अशा - ताः - त्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया - रेचकजिहीरषया - पिचकारी ओढून घेण्याच्या इच्छेने - कान्तं उपगुह्य - श्रीकृष्णाला दृढ आलिंगन देऊन - जातस्मरोत्सवलसद्वदनाः - उत्पन्न झालेल्या कामानंदामुळे टवटवीत झाली मुखे ज्यांची अशा - विरेजुः स्म - शोभल्या. ॥१०॥

तत्स्तनविषज्जितकुंकुमस्रक् - त्या स्त्रियांच्या स्तनांमुळे लागले आहे केशर माळेला ज्याच्या असा - क्रीडाभिषङगधुतकुन्तलवृन्दबन्धः - क्रीडेच्या नादाने हलली आहे केसांच्या झुबक्याची गाठ ज्याच्या असा - कृष्णः तु - श्रीकृष्ण तर - मुहुः सिञ्चन् - वारंवार पाणी फेकणारा - करेणुभिः इभपतिः इव - हत्तिणींकडून जसा गजेंद्र त्याप्रमाणे - युवतिभिः परीतः प्रतिषिच्यमानः - स्त्रियांकडून सर्व बाजूंनी उलट भिजविला जाणारा - रेमे - क्रीडा करिता झाला. ॥११॥

कृष्णः तस्य स्त्रियः च - श्रीकृष्ण व त्याच्या स्त्रिया - गीतवाद्योपजीविनाम् नटानां नर्तकीनां च - गायनवादनावर उपजीविका करणारे नट व नाचणार्‍या स्त्रिया ह्यांना - क्रीडालंकारवासांसि अदात् - क्रीडेसाठी उपयुक्त असे अलंकार व वस्त्रे देता झाला. ॥१२॥

एवं विहरतः कृष्णस्य - याप्रमाणे क्रीडा करणार्‍या श्रीकृष्णाच्या - गत्यालापेक्षितस्मितैः - गति, भाषण, अवलोकन व मंदहास्य यांनी - नर्मक्ष्वेलिपरिष्वङगैः - विनोद, क्रीडा व आलिंगन यांनी - स्त्रीणां धियः हृताः किल - स्त्रियांची मने खरोखर हरण केली गेली. ॥१३॥

मुकुन्दैकधियः - एका मुकुंदावरच आहे बुद्धि ज्यांची अशा त्या स्त्रिया - अरविन्दाक्षं चिन्तयन्त्यः - कमलनेत्र श्रीकृष्णाचे चिंतन करीत - अगिरः - न बोलणार्‍या - उन्मत्तवत् जडम् - उन्मत्ताप्रमाणे अडखळत - ऊचुः - बोलत्या झाल्या - तानि (वाक्यानि) गदतः मे शृणु - ती भाषणे सांगणार्‍या माझ्याकडून श्रवण कर. ॥१४॥

कुररि - हे टिटव्ये - गुप्तबोधः ईश्वरः - झाकले आहे ज्ञान ज्याने असा श्रीकृष्ण - जगति रात्र्यां स्वपिति - या लोकी रात्रौ झोप घेतो - त्वं - तू - वीतनिद्रा - गेली आहे झोप जीची अशी - विलपसि - विलाप करितेस - न शेषे - झोप घेत नाहीस - सखि - हे मैत्रिणी - वयम् इव - जशा आम्ही तशी - नलिननयनहासोदारलीलेक्षितेन - कमलनेत्र श्रीकृष्णाच्या हसण्यामुळे सुंदर दिसणार्‍या लीलायुक्त कटाक्षाने - गाढनिर्भिन्नचेताः कच्चित् - पूर्णपणे विद्ध झाले आहे चित्त जीचे अशी आहेस काय ? ॥१५॥

चक्रवाकि - हे चक्रवाकी - नक्तं - रात्रौ - अदृष्टबन्धुः त्वं - अदृश्य आहे पति जीचा अशी तू - नेत्रे निमीलयसि - डोळे मिटतेस - बत करुणं रोरवीषि - आणि दीनपणे रुदन करितेस - किंवा - अथवा - वयम् इव दास्यं गता (त्वं) - आमच्याप्रमाणे दासीपणाला पावलेली तू - अच्युतपादजुष्टां स्रजं - श्रीकृष्णाच्या पायांवर लोळणार्‍या गळ्यातील माळेला - कबरेण वोढुं स्पृहयसे - वेणीवर धारण करण्यास इच्छितेस काय ? ॥१६॥

भो भो उदन्वन् - हे समुद्रा - अलब्धनिद्रः अधिगतप्रजागरः - मिळालेली नाही झोप ज्याला व प्राप्त झाले आहे जाग्रण ज्याला असा त्वं सदा निष्टनसे - तू नित्य गर्जना करितोस - मुकुन्दापहृतात्मलांछनः - श्रीकृष्णाने हरण केले आहे स्वतःचे कौस्तुभादि चिन्ह ज्यापासून असा - किं वा (असि) - आहेस काय - च (अस्माभिः) प्राप्तां दुरत्ययां दशां गतः - व आम्हाला प्राप्त झालेल्या अपरिहार्य अवस्थेला प्राप्त झालेला आहेस काय ? ॥१७॥

इंदो - हे चंद्रा - त्वं बलवता यक्ष्मणा गृहीतः क्षीणः असि - तू बलवान क्षयरोगाने घेरलेला क्षीण असा आहेस - निजदीधितिभिः तमः न क्षिणोषि - आपल्या किरणांनी अंधकार नष्ट करीत नाहीस - भोः यथा वयं - अरे जशा आम्ही तसा - त्वं - तू - मुकुन्दगदितानि विस्मृत्य - श्रीकृष्णाची भाषणे विसरून - स्थगितगीः कच्चित् - कुंठित आहे शब्द ज्याचा असा आहेस काय ? - नः (तथा) उपलक्ष्यसे - आम्हाला तसा दिसतोस. ॥१८॥

मलयानिल - हे मलयवायो - अस्माभिः ते किम् अप्रियं आचरितं - आम्हांकडून तुझे काय बरे वाईट केले गेले आहे - गोविंदापाङगनिर्भिन्ने नः हृदि - श्रीकृष्णाच्या कटाक्षांनी विदीर्ण झालेल्या आमच्या हृदयामध्ये - स्मरं ईरयसि - कामवासना जागृत करितोस ? ॥१९॥

श्रीमन् मेघ - हे सुंदर मेघा - त्वं नूनं यादवेन्द्रस्य दयितः असि - तू खरोखर यादवाधिपति श्रीकृष्णाचा आवडता आहेस - भवान् - तू - वयम् इव - आम्हांप्रमाणे - प्रेमबद्धः - प्रेमाने बांधला असा - श्रीवत्साङकं ध्यायति - श्रीवत्सलांछन धारण करणार्‍या श्रीकृष्णाचे ध्यान करितोस - अत्युकण्ठः - अत्यंत उत्कंठित झालेला - शबलहृदयः - गहिवरलेले आहे हृदय ज्याचे असा - अस्मद्विधः - आमच्या सारखा - स्मृत्वा स्मृत्वा - पुनः पुनः स्मरण करून - मुहुः बाष्पधाराः विसृजसि - वारंवार अश्रुधारा सोडितोस - तत्प्रसङगः दुःखदः - त्या श्रीकृष्णाचा विशेष संग दुःखदायक असतो. ॥२०॥

वल्गितकण्ठ कोकिल - मधुर आहे कंठ ज्याचा अशा हे कोकिला - अमृतसंजीविकया अनया गिरा - अमृताप्रमाणे जीवन देणार्‍या ह्या वाणीने - प्रियरावपदानि भाषसे - प्रेमळ ध्वनियुक्त असे शब्द तू बोलतोस - अद्य ते किं प्रियं करवाणि - आज तुझे कोणते प्रिय करावे - मे वद - मला सांग. ॥२१॥

उदारबुद्धे क्षितिधर - हे उदार अंतःकरणाच्या पर्वता - न चलसि न वदसि - तू चालत नाहीस, बोलत नाहीस - महान्तम् अर्थम् चिन्तयसे - मोठया गोष्टीचा विचार करितोस - बत - काय - वसुदेवनन्दनाङ्‌घ्रिं वयम् इव - श्रीकृष्णाचे पाय जसे आम्ही धरतो तसे - स्तनैः विधर्तुं कामयसे अपि - आपल्या शिरावर धारण करण्याची इच्छा करितोस काय ? ॥२२॥

सिंधुपत्‍न्यः - हे नद्यांनो - शुष्यद्‌ध्रदाः - सुकून गेले आहेत डोह ज्यांतील अशा - करशिताः - वाळलेल्या - संप्रति अपास्तकमलश्रियः बत - सांप्रत गेली आहे कमळाची शोभा ज्यांच्या अशा खरोखर झाल्या आहात - यद्वत् वयं (तद्वत्) - ज्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे - इष्टभर्तुः मधुपतेः - प्रियपति जो श्रीकृष्ण त्याचे - प्रणयावलोकं अप्राप्य - प्रेमळ अवलोकन न मिळाल्यामुळे - मुष्टहृदयाः पुरुकर्शिताः स्म - चोरलेले आहे हृदय ज्यांचे अशा अत्यंत कृश झाल्या आहात. ॥२३॥

अङग हंस - हे हंसा - (ते) स्वागतं - तुझे स्वागत असो - आस्यतां - बसावे - पयः पिब - दूध पी - शौरेः कथां ब्रूहि - श्रीकृष्णाच्या कथा सांग - त्वां नु दूतं विदाम - आम्ही तुला खरोखर दूत समजतो - अजितः स्वस्ति आस्ते कच्चित् - श्रीकृष्ण खुशाल आहेत - चलसौहृदः (सः) - ज्याची मैत्री क्षणिक आहे असा तो श्रीकृष्ण - नः पुरा उक्तम् स्मरति किं वा - आमचे पूर्वीचे भाषण स्मरतो काय - वयं कस्मात् तं भजामः - आम्ही काय म्हणून त्याच्या भजनी लागावे - क्षौद्र - हे क्षुद्रदूता - कामदं (तं) श्रियं ऋते आलापय - मनोरथ पुरविणार्‍या त्या श्रीकृष्णाला लक्ष्मीशिवाय हाक मार - स्त्रियां सा एव - स्त्रियांमध्ये तीच - एकनिष्ठा (किम्) - एकनिष्ठ भक्त आहे काय ? ॥२४॥

इति - याप्रमाणे - माधव्यः - श्रीकृष्णाच्या स्त्रिया - योगेश्वरेश्वरे कृष्णे - योगाधिपति श्रीकृष्णाच्या ठिकाणी - ईदृशेन क्रियमाणेन भावेन - अशा तर्‍हेच्या केलेल्या भक्तीने - परमां गतिं लेभिरे - श्रेष्ठ गतीला प्राप्त झाल्या. ॥२५॥

यः - जो श्रीकृष्ण - उरुगायोरुगीतः - ज्याची श्रेष्ठ कीर्ति पुष्कळ प्रकारे गायिली जाते असा - श्रुतमात्रः अपि - केवळ ऐकिला गेला असताच - स्त्रीणां मनः प्रसह्य आकर्षते - स्त्रियांचे मन बलात्काराने आकर्षितो - (तं) पश्यन्तीनां पुनः कुतः वा - मग त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेणार्‍या स्त्रियांचे कसे बरे मन आकर्षण करणार नाही ? ॥२६॥

याः - ज्या - भर्तृबुद्‌ध्या - पतिबुद्धीने - प्रेम्णा पादसंवाहनादिभिः - प्रेमाने पाय चेपणे इत्यादि प्रकारांनी - जगद्‌गुरुं पर्यचरन् - जगद्‌गुरु श्रीकृष्णाची सेवा करित्या झाल्या - तासां तपः किं वर्ण्यते - त्यांची तपश्चर्या किती वर्णावी ? ॥२७॥

सतां गतिः - साधूंचा आश्रय असा श्रीकृष्ण - एवं वेदोदितं धर्मं अनुतिष्ठन् - याप्रमाणे वेदोक्त धर्म आचरीत - मुहुः च - आणि वारंवार - गृहम् - घर - धर्मार्थकामानां पदं (अस्ति) - धर्म, अर्थ व काम ह्यांचे स्थान आहे - (इति) अदर्शयत् - असे दाखविता झाला. ॥२८॥

गृहमेधिनां परं धर्मं आस्थितस्य कृष्णस्य - गृहस्थाश्रम्यांच्या श्रेष्ठ धर्माचे आचरण करणार्‍या श्रीकृष्णाला - षोडशसाहस्रं शताधिकं च महिष्यः आसन् - सोळा हजार एकशे स्त्रिया होत्या. ॥२९॥

राजन् - हे परीक्षित राजा - स्त्रीरत्‍न भूतानां तासां - स्त्रियांमध्ये श्रेष्ठपणा पावलेल्या त्या श्रीकृष्णाच्या स्त्रियांपैकी - याः रुक्मिणीप्रमुखाः अष्टौ - ज्या रुक्मिणीप्रमुख अशा आठ स्त्रिया - (ताः) तत्पुत्राः च - त्या आणि त्यांचे पुत्र - अनुपूर्वशः प्राक् उदाहृताः - अनुक्रमाने पूर्वीच वर्णिले आहेत. ॥३०॥

अमोघगतिः ईश्वरः कृष्णः - व्यर्थ न जाणारे आहे कार्य ज्याचे असा श्रीकृष्ण - यावन्त्यः आत्मनः भार्याः - जितक्या स्वतःच्या भार्या - (तासां) एकैकस्यां दश दश आत्मजान् अजीजनत् - त्यांतील प्रत्येकीच्या ठिकाणी दहा दहा पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥३१॥

उद्दामवीर्याणां तेषां - अत्यंत पराक्रमी अशा त्या पुत्रांपैकी - अष्टादश - अठरा - महारथाः उदारयशसः (च) - महारथी व मोठे कीर्तिमान - आसन् - होते - तेषां नामानि मे शृणु - त्यांची नावे माझ्या तोंडून ऐक. ॥३२॥

प्रद्युम्नः च अनिरुद्धः (च) दीप्तिमान् च भानु एव च साम्बः (च) - प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानु व सांब - मधुः बृहद्‌भानुः चित्रभानुः वृकः अरुणः (च) - मधु, बृहद्‌भानु, चित्रभानु, वृक व अरुण. ॥३३॥

पुष्करः वेदबाहुः श्रुतदेवः सुनंदनः च - पुष्कर, वेदबाहु, श्रुतदेव आणि सुनंदन - चित्रबाहुः विरूपः च कविः न्यग्रोधः एव च - चित्रबाहु, विरूप, कवि तसाच न्यग्रोध. ॥३४॥

राजेंद्र - हे परीक्षिता - मधुद्विषः एतेषाम् अपि तनुजानां - श्रीकृष्णाच्या ह्याहि पुत्रांमध्ये - प्रथम रुक्मिणीसुतः प्रद्युम्नः - पहिला रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न - पितृवत् (श्रेष्ठ) आसीत् - पित्याप्रमाणे श्रेष्ठ होता. ॥३५॥

सः महारथः - तो महारथी प्रद्युम्न - रुक्मिणः दुहितरं उपयेमे - रुक्मीच्या मुलीशी विवाह लाविता झाला - तस्मात् नागायुतबलान्वितः अनिरुद्धः सुतः अभूत् - त्यापासून दहा हजार हत्तींचे सामर्थ्य असलेला अनिरुद्ध हा पुत्र झाला ॥३६॥

सः दोहित्रः च अपि - आणि तो कन्यापुत्र अनिरुद्धहि - रुक्मिणः पौत्रीं जगृहे - रुक्मीच्या नातीला वरिता झाला - ततः तस्य वज्रः अभवत् - तीपासून त्या अनिरुद्धाला वज्र झाला - यः तु मौसलात् अविशेषितः - जो तर मुसलयुद्धांतून जिवंत राहिला ॥३७॥

तस्मात् प्रतिबाहुः अभूत् - त्या वज्रापासून प्रतिबाहु झाला - तस्य च आत्मजः सुबाहुः - आणि त्या प्रतिबाहूचा पुत्र सुबाहू - सुबाहोः शान्तसेनः अभूत् - सुबाहूला शांतसेन हा पुत्र झाला - तत्सुतः तु शतसेनः - व त्याचा पुत्र शतसेन होय ॥३८॥

एतस्मिन् कुले - ह्या यदुवंशामध्ये - अधना अबहुप्रजाः - दरिद्री व थोडी आहे संतति ज्यांना असे - अल्पायुषः अल्पवीर्याः च - थोडे आयुष्य असलेले व थोडा पराक्रम असलेले - न हि जाताः - खरोखर उत्पन्न झाले नाहीत - अब्रह्मण्याः च (न) जज्ञिरे - आणि ब्राह्मणांचे अकल्याण करणारेहि उत्पन्न झाले नाहीत ॥३९॥

नृप - हे राजा - यदुवंशप्रसूतानां विख्यातकर्मणां पुंसां - यदुवंशात उत्पन्न झालेल्या व ज्यांचा पराक्रम प्रसिद्ध आहे अशा पुरुषांची - संख्या - गणती - वर्षायुतैः अपि कर्तुं न शक्यते - लक्षावधि वर्षांनी सुद्धा करिता येणे शक्य नाही ॥४०॥

सहस्राणां कुमाराणां यदुकुलाचार्याः - अपरिमित यदुकुमाराचे कुलपरंपरागत शिक्षक - तिस्रः कोट्यः अष्टाशीति शतानि च - तीन कोटी आठ हजार आठशे - आसन् - होते - इति श्रुतं - असे ऐकिले आहे ॥४१॥

कः महात्मनां यादवानां संख्यानं करिष्यति - कोण बरे मोठमोठ्या यादवांची गणती करील - यत्र - जेथे - सः आहुकः - तो उग्रसेन - अयुतानां अयुतलक्षेण (सह) आस्ते - दशसहस्रांच्या दशसहस्रांना लक्षाने गुणून येतील इतक्या बांधवांसह रहात असे ॥४२॥

ये - जे - सुदारुणाः दैतेयाः - अत्यंत भयंकर दैत्य - देवासुराहवहताः - देवदैत्यांच्या युद्धात मृत झाले होते - ते च मनुष्येषु उत्पन्नाः - तेच मनुष्ययोनीत जन्मास आलेले असे - दृप्ताः (सन्तः) प्रजाः बबाधिरे - गर्विष्ठ होत्साते लोकांना पीडा देते झाले ॥४३॥

नृप - हे राजा - हरिणा तन्निग्रहाय प्रोक्ताः देवाः - श्रीविष्णूने त्या दैत्यांच्या नाशासाठी आज्ञापिलेले देव - यदोः कुले अवतीर्णाः - यदुवंशात उत्पन्न झाले - तेषाम् एकाधिकं कुलशतं (अभवत्) - त्यांची एकशे एक कुले होती ॥४४॥

तेषां (सर्वेषाम्) - त्या सर्वांना - भगवान् हरिः - भगवान श्रीविष्णु - प्रभुत्वेन - सामर्थ्यामुळे - प्रमाणं अभवत् - नियामक होता - च - व - ये - जे यादव - तस्य अनुवर्तिनः (आसन्) - त्याच्या आज्ञेत रहाणारे होते - (ते) सर्वयादवाः - ते सर्व यादव - ववृधुः - उत्कर्ष पावले ॥४५॥

कृष्णचेतसः वृष्णयः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी होते अन्तःकरण ज्यांचे असे ते यादव - शय्यासनाटनालापक्रीडास्नानादिकर्मसु - निजणे, बसणे, हिंडणे, बोलणे, खेळणे, स्नान करणे इत्यादि कर्मांमध्ये - सन्तं आत्मानं न विदुः - असलेल्या स्वतःला न जाणते झाले ॥४६॥

नृप - हे राजा - यत् यदुषु अजनि - जे यदुकुळात उत्पन्न झाले - (तत्) तीर्थम् - ते कृष्णरुपी तीर्थ - स्वःसरित्पादशौचं - स्वर्गातील गंगारुपी पाय धुण्याच्या तीर्थाला - ऊनं चक्रे - गौण करिते झाले - विद्विट्‌स्निग्धाः - शत्रू व मित्र - स्वरुपं ययुः - श्रीकृष्णाच्या स्वरुपाला प्राप्त झाले - यदर्थे - ज्या लक्ष्मीसाठी - अन्ययत्‍नः - इतरांचा प्रयत्‍न चालला असतो - (सा) श्रीः - ती लक्ष्मी - अजितपरा - श्रीकृष्णच सर्वस्व जीचे अशी - यन्नाम - ज्या श्रीकृष्णाचे नाव - श्रुतम् अथ गदितं (सत्) - ऐकिले व उच्चारिले असता - अमङ्गलन्घम् - अशुभांचा नाश करणारे आहे - गोत्रधर्मः यत्कृतः - कुलधर्महि ज्या श्रीकृष्णानेच निर्माण केलेला आहे - (तस्य) कालचक्रायुधस्य कृष्णस्य - त्या कालचक्र हेच आयुध धारण करणार्‍या श्रीकृष्णाचे - एतत् क्षितिभरहरणं - पृथ्वीचा भार दूर करण्याचे कार्य - चित्रं न - आश्चर्यकारक नव्हे ॥४७॥

जननिवासः - लोकांमध्ये वास करणारा - देवकीजन्मवादः - देवकीपासून जन्म झाला असे ज्या संबंधाने म्हणणे आहे असा - यदुवरपर्षत् - यादवांतील श्रेष्ठ पुरुष ज्याचे सेवक आहेत असा श्रीकृष्ण - स्वैः दोर्भिः - आपल्या बाहूंनी - अधर्मम् अस्यन् - अधर्माचा नाश करणारा - स्थिरचरवृजिनन्घः - स्थावर जंगम प्राण्यांचे पाप नष्ट करणारा श्रीकृष्ण - सुस्मितश्रीमुखेन - स्मित हास्याने शोभणार्‍या सुंदर मुखाने - व्रजपुरवनितानां कामदेवं वर्धयन् - गोकुळातील गोपींची कामवासना वाढवित श्रीकृष्ण - जयति - विजयी होतो ॥४८॥

अमुष्य पदयोः अनुवृत्तिं इच्छन् - ह्या श्रीकृष्णाच्या चरणांचे अनुकरण करण्यास इच्छिणारा पुरुष - इत्थं - याप्रमाणे - निजवर्त्मरिरक्षया - स्वतःच्या धर्ममार्गांचे रक्षण करण्याच्या इच्छेने - आत्तलीलातनोः - घेतले आहे क्रीडेसाठी शरीर ज्याने अशा - परस्य यदूत्तमस्य - श्रेष्ठ अशा श्रीकृष्णाची - तदनुरूप विडम्बनानि - त्या शरीराला अनुरुप अशा आचरणाची - कर्मकषणानि कर्माणि - कर्मांनी प्राप्त होणार्‍या दोषांचा नाश करणारी कर्मे - श्रूयात् - श्रवण करो ॥४९॥

मर्त्यः - मनुष्य - अनुसवं एधितया - वेळोवेळी वाढलेल्या - तया - त्या - मुकुन्दश्रीमत्कथाश्रवणकीर्तनचिन्तया - श्रीकृष्णाच्या सुंदर कथांच्या श्रवणांच्या व कीर्तनाच्या चिंतनाने - दुस्तरकृतान्तजवापवर्गं तद्धाम - तरून जाण्यास कठीण अशा कालाच्या वेगातून सोडविणार्‍या त्या श्रीकृष्णाच्या स्थानाला - एति - प्राप्त होतो - यदर्थाः क्षितिभुजः अपि - ज्या स्थानाची इच्छा करणारे राजेहि - ग्रामात् वनं ययुः - गावातून अरण्यात गेले ॥५०॥

नव्वदावा अध्याय समाप्त

GO TOP