श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८९ वा - अन्वयार्थ

भृगूकडून तीन देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मणबालकांना भगवंतांनी परत आणणे -

राजन् - हे परीक्षित राजा - ऋषयः - ऋषि - सरस्वत्याः तटे - सरस्वती नदीच्या काठी - सत्त्रम् आसत - दीर्घ अवधीचा यज्ञ करिते झाले - त्रिषु अधीशेषु कः महान् (इति) - ब्रह्मा, विष्णु, महेश या तीन देवांमध्ये कोण मोठा असा - तेषां वितर्कः समभूत् - त्यांमध्ये वाद उत्पन्न झाला. ॥१॥

नृप - हे राजा - ते वै - ते ऋषि - तस्य जिज्ञासया - ते जाणण्याच्या इच्छेने - ब्रह्मसुतं भृगुं - ब्रह्मदेवाचा पुत्र जो भृगु ऋषि त्याला - तज्ज्ञप्त्यै प्रेषयामासुः - ते जाणण्यासाठी पाठविते झाले - सः ब्रह्मणः सभाम् अभ्यगात् - तो भृगु ब्रह्मदेवाच्या सभेत गेला. ॥२॥

सः - तो भृगु - सत्त्वपरीक्षया - सद्‌गुणांची कसोटी पहाण्यासाठी - तस्मै प्रह्वणं स्तोत्रं न चक्रे - त्या ब्रह्मदेवाला नमस्कार करिता झाला नाही व त्याची स्तुतिही करिता झाला नाही - भगवान् - ब्रह्मदेव - स्वेन तेजसा प्रज्वलन् - आपल्या तेजाने तळपणारा - तस्मै चुक्रोध - त्या भृगुच्यावर रागावला. ॥३॥

सः प्रभुः आत्मभूः - तो समर्थ ब्रह्मदेव - आत्मजाय - पुत्राला उद्देशून - आत्मना आत्मनि उत्थितं मन्युं - स्वतःच स्वतःच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या क्रोधाला - यथा स्वयोन्या वारिणा वह्निं (तथा) - जसे स्वतः अग्नीपासून उत्पन्न झालेल्या उदकाने अग्नीला विझवावे त्याप्रमाणे - अशीशमत् - शांत करिता झाला. ॥४॥

ततः सः कैलासम् अगमत् - नंतर तो भृगुऋषि कैलासास गेला - देवः महेश्वरः - देव शंकर - उत्थाय - उठून - मुदा - आनंदाने - तं भ्रातरं परिरब्धुं - तो भाऊ जो भृगुऋषि त्याला आलिंगन देण्याला - समारेभे - उद्युक्त झाला. ॥५॥

(सः परिभ्रमणं) न ऐच्छत् तो भृगु आलिंगनाला इच्छिता झाला नाही - त्वं उत्पथगः असि - तू वाईट मार्गाने जाणारा आहेस - इति (अब्रवीत्) - असे म्हणाला - देवः (तं) चुकोप ह - शंकर भृगुवर रागावला - तिग्मलोचनः - तीक्ष्ण आहेत डोळे ज्याचे असा तो - शूलं उद्यम्य - शूळ उगारून - तं हन्तुं आरेभे - त्या भृगुला मारू लागला. ॥६॥

देवी पादयोः पतित्वा - पार्वती शंकराच्या पाया पडून - (मधुरया) गिरा तं सान्त्वयामास - मधुर शब्दांनी शंकराला शांतविती झाली - अथ - नंतर - यत्र जनार्दनः देवः (आस्ते) - जेथे लोकरक्षक विष्णु असतो - (तं) वैकुण्ठं जगाम - त्या वैकुंठाला गेला. ॥७॥

श्रियः उत्सङगे शयानं (तं) - लक्ष्मीच्या मांडीवर निजलेल्या त्या विष्णूला - (सः) पदा वक्षसि अताडयत् - तो भृगु पायाने छातीवर ताडिता झाला - ततः - नंतर - सतांगतिः - साधूंचा आश्रय असा - भगवान् - श्रीविष्णु - लक्ष्म्या सह उत्थाय - लक्ष्मीसह उठून - स्वतल्पात् अवरुह्य - आपल्या शय्येवरून उतरून - अथ शिरसा मुनिं ननाम - नंतर मस्तकाने भृगुऋषीला नमस्कार करिता झाला. ॥८॥

आह (च) - आणि म्हणाला - ब्रह्मन् - हे भृगो - ते स्वागतं - तुझे स्वागत असो - अत्र आसने क्षणं निषीद - ह्या आसनावर क्षणभर बस - प्रभो - हे समर्थ ब्राह्मणा - आगतान् वः अजानतां नः - आलेल्या तुम्हाला न जाणणार्‍या आम्हाला - क्षन्तुम् अर्हथ - क्षमा करण्यास समर्थ आहा. ॥९॥

तात - अहो - महामुने - महर्षे भृगो - ते चरणौ अतीव कोमलौ - तुझे पाय अत्यंत कोमल आहेत - इति उक्त्वा - असे बोलून - स्वेन पाणिना - आपल्या हाताने - विप्रचरणौ मर्दयन् (स्थितः) - त्या भृगुचे पाय चेपीत राहिला. ॥१०॥

भवतः - तुझ्या - तीर्थानां तीर्थकारिणा - तीर्थानाहि पवित्र करणार्‍या - पादोदकेन - पाय धुतलेल्या पाण्याने - सहलोकं मां - चतुर्दश भुवनांसह मला - च मद्‌गतान् लोकपालान् - आणि माझ्या ठिकाणी असणार्‍या लोकपालांना - पुनीहि - पवित्र कर. ॥११॥

भगवन् - हे भृगो - अद्य अहं - आज मी - लक्ष्म्याः एकान्तभाजनम् आसम् - लक्ष्मीचे एकच एक असे निवासस्थान झालो आहे - भवत्पादहतांहसः मे उरसि - तुझ्या पायाच्या ताडनाने नष्ट झाले आहे पाप ज्याचे अशा माझ्या वक्षस्थलावर - भूतिः - लक्ष्मी - वत्स्यति - राहील. ॥१२॥

वैकुंठे मन्द्रया गिरा एवं ब्रुवाणे - श्रीविष्णु गंभीर वाणीने याप्रमाणे बोलत असता - भृगुः - भृगुमुनि - भक्त्युत्कंठः - भक्तीने उत्कंठित झालेला - अश्रुलोचनः - अश्रु वहात आहेत नेत्रातून ज्याच्या असा - तर्पितः - तृप्त झालेला - निर्वृतः - सुखी होत्साता - तूष्णीम् (आसीत्) - स्वस्थ राहिला. ॥१३॥

राजन् - हे परीक्षित राजा - भृगुः - भृगुऋषी - पुनः - पुनः - ब्रह्मवादिनां मुनीनां सत्त्रं आव्रज्य - ब्रह्मवेत्त्या ऋषींच्या यज्ञात येऊन - च - आणि - स्वानुभूतं अशेषेण अवर्णयत् - आपण अनुभविलेले सविस्तर सांगता झाला. ॥१४॥

अथ - मग - मुनयः - ऋषि - तत् निशम्य - ते ऐकून - विस्मिताः मुक्तसंशयाः - विस्मय पावलेले, संशयरहित झालेले - विष्णुं भूयांसं श्रद्दधुः - विष्णूला अत्यंत थोर मानू लागले - यतः शान्तिः यतः (च) अभयं (भवति) - ज्या विष्णूपासून शांति व ज्यापासून निर्भयता प्राप्त होते. ॥१५॥

यतः - ज्या ठिकाणी - साक्षात् धर्मः - प्रत्यक्ष धर्म - ज्ञानं - ज्ञान - तदन्वितं वैराग्यं च - व त्यामुळे येणारे वैराग्य - अष्टधा ऐश्वर्यं - आठ प्रकारचे ऐश्वर्य - यस्मात् - ज्यापासून - आत्ममलापहं यशः - चित्तावरील वासनारूप मळ दूर करणारी कीर्ती. ॥१६॥

न्यस्तदंडानां शान्तानां - टाकिले आहेत कायिक, वाचिक इत्यादि दंड ज्यांनी अशा शांत चित्ताच्या - समचेतसां - सम बुद्धीच्या - अकिंचनानां साधूनां मुनीनां - सर्वसंगपरित्यागी अशा सदाचारसंपन्न ऋषींचा - परमां गतिम् - उत्तम आश्रय - (इति) यं आहुः - असे ज्याला म्हणतात. ॥१७॥

सत्त्वं यस्य प्रिया मूर्तिः (अस्ति) - सत्त्वगुण हाच ज्याची आवडीची मूर्ति आहे - ब्राह्मणाः तु इष्टदेवताः (सन्ति) - व ब्राह्मण हे पूज्य देवता होत - अनाशिषः शान्ताः निपुणबुद्धयः - निरिच्छ, शांत व कुशल बुद्धीचे सत्पुरुष - यं वा भजन्ति - ज्याचे भजन करितात. ॥१८॥

गुणिन्या मायया सृष्टाः - त्रिगुणात्मक अशा मायेने उत्पन्न केलेल्या - राक्षसाः असुराः सुराः (इति) - राक्षस, दैत्य व देव अशा - तस्य त्रिविधा आकृतयः (भवन्ति) - त्या श्रीविष्णुच्या तीन प्रकारच्या आकृति आहेत - सत्त्वं तत्तीर्थसाधनम् - सत्त्वगुण हाच त्या पवित्र वस्तूची प्राप्ति करून देण्याचे साधन होय. ॥१९॥

एवं - याप्रमाणे - नृणां संशयन????????????? - मनुष्यांचे संशय दूर करण्यासाठी - सारस्वताः विप्राः - सरस्वती नदीच्या काठी यज्ञ करीत बसलेले ब्राह्मण - पुरुषस्य पदाम्भोजसेवया - श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या सेवेने - तद्‌गतिं गताः - त्याच्या स्थानाला गेले. ॥२०॥

इति एतत् - याप्रमाणे हे - मुनितनयास्यपद्मगन्धपीयूषं - शुकाचार्याच्या मुखकमलापासून निघालेले पुष्परसामृताप्रमाणे मधुर असे - भवभयभित् - संसाराची भीति दूर करणारे - परस्य पुंसः सुश्‍लोकं - श्रेष्ठ पुरुष अशा श्रीकृष्णाचे श्रेष्ठ यशोरुपी माहात्म्य - श्रवणपुटैः अभीक्ष्णं पिबति - कर्णद्वारा एकसारखे प्राशन करितो - (सः) पान्थः अध्वभ्रमणपरिश्रमं जहाति - तो वाटसरु संसार मार्गांत भ्रमण केल्यामुळे उत्पन्न होणार्‍या श्रमाला दूर करितो ॥२१॥

भारत - हे परीक्षिता - एकदा - एके दिवशी - द्वारवत्यां - द्वारकेत - विप्रपत्‍न्याः कुमारकः तु - ब्राह्मण स्त्रीचा पुत्र तर - जातमात्रः - नुकताच जन्मलेला असा - भुवं स्पृष्ट्वा किल ममार - पृथ्वीला स्पर्श करून खरोखर मेला ॥२२॥

सः विप्रः - तो ब्राह्मण - मृतकं (सुतं) गृहीत्वा - मेलेल्या पुत्राला घेऊन - राजद्वारि उपधाय - राजसभेच्या द्वाराजवळ ठेवून - आतुरः दीनमानसः - दुःखी व दीन आहे मन ज्याचे असा - विलपन् - रडत - इदं प्रोवाच - हे म्हणाला ॥२३॥

ब्रह्मद्विषः शठधियः - ब्राह्मणांचा द्वेष करणार्‍या, लबाडी करणार्‍या - लुब्धस्य विषयात्मनः - लोभिष्ट व विषयासक्त झालेल्या - क्षत्रबन्धोः कर्मदोषात् - दुष्ट क्षत्रिय राजाच्या दुष्कृत्यांमुळे - मे अर्भकः पञ्चत्वां गतः - माझा पुत्र मृत झाला ॥२४॥

हिंसाविहारं - लोकांचा प्राण घेऊन क्रीडा करणार्‍या - दुःशीलं अजितेन्द्रियं - दुष्ट स्वभावाच्या व जिंकिली नाहीत इंद्रिये ज्याने अशा - नृपतिं - राजाला - भजन्त्यः प्रजाः - भजणार्‍या प्रजा - दरिद्राः नित्यदुःखिताः (भूत्वा) - दरिद्री व नित्यदुःखित होऊन - सीदन्ति - खेद पावतात ॥२५॥

एवं - याप्रमाणे - सः विप्रर्षिः - तो ब्राह्मण - द्वितीयं - दुसर्‍या - एवमेवच तृतीयं तु - त्याचप्रमाणे तिसर्‍या मुलालाहि - नृपद्वारि विसृज्य - राजद्वाराजवळ ठेवून - तां गाथां समगायत - तेच वाक्य बोलला. ॥२६॥

कर्हिचित् - एका प्रसंगी - नवमे बाले परेते - नववा बालक मृत झाला असता - अर्जुनः - अर्जुन - केशवान्तिके - श्रीकृष्णासमीप - तां उपश्रुत्य - ते वाक्य ऐकून - ब्राह्मणं समभाषत - ब्राह्मणाला म्हणाला. ॥२७॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - इह त्वन्निवासे - ह्या तुझ्या रहाण्याच्या ठिकाणी - किंस्वित् राजन्यबन्धुः धनुर्धरः न अस्ति - कोणीहि धनुर्धारी क्षत्रिय नाही - वै - खरोखर - एते (सर्वे क्षत्रियाः) - हे सर्व क्षत्रिय - ब्राह्मणाः - ब्राह्मण होत - सत्त्रं आसते - यज्ञ करीत बसले होते. ॥२८॥

यत्र धनदारात्मजापृक्ताः ब्राह्मणाः शोचंति - ज्या राज्यात द्रव्य, स्त्री, पुत्र यांनी विरहित झालेले ब्राह्मण दुःखी होतात - वै - खरोखर - ते असुंभराः नटाः राजन्यवेषेण जीवन्ति - ते प्राणांचे पोषण करणारे नटच राजवेष घेऊन रहात आहेत. ॥२९॥

भगवन् - हे ब्राह्मणा - अहं - मी - इह - येथे - दीनयोः वाम् - दीन अशा तुमच्या - प्रजां रक्षिष्ये - संततीचे रक्षण करीन - अनिस्तीर्णप्रतिज्ञः - सिद्धीला गेलेली नाही प्रतिज्ञा ज्याची असा मी - अग्निं प्रवेक्ष्ये - अग्निप्रवेश करीन - हतकल्मषः (भविष्यामि) - नष्ट झाले आहे पाप ज्याचे असा होईन. ॥३०॥

संकर्षणः वासुदेवः धन्विनां वरः प्रद्युम्नः अप्रतिरथः अनिरुद्धः (च) - बलराम, श्रीकृष्ण, धनुर्धार्‍यांत श्रेष्ठ असा प्रद्युम्न व ज्याच्यासमोर कोणीहि युद्धासाठी उभा राहू शकत नाही असा अनिरुद्ध हे - यत् त्रातुं न शक्नुवन्ति - ज्या बालकाचे रक्षण करण्यास समर्थ नाहीत. ॥३१॥

तत् - ते - भवान् कथं नु (शक्नोति) - तू कसे करू शकशील - बालिश्यात् - मूर्खपणाने - जगदीश्वरैः दुष्करं कर्म - त्रैलोक्याधिपतींनाहि करिता न येणारे कार्य - त्वं चिकीर्षसि - तू करण्याची इच्छा करितोस - वयं तत् न श्रद्दध्महे - आम्ही ते खरे मानीत नाही. ॥३२॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - अहं संकर्षणः न - मी बलराम नव्हे - कृष्णः कार्ष्णिः च एव न - कृष्ण व प्रद्युम्नहि नव्हे - अहं वा अर्जुनः - मी तर अर्जुन आहे - यस्य वै गाण्डीवं नाम धनुः - ज्याच्या जवळ गांडीव धनुष्य आहे. ॥३३॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - मम त्र्यंबकतोषणम् वीर्यम् - शंकरालाहि संतुष्ट करणारा माझा पराक्रम - मा अवमंस्थाः - अवमानू नको - प्रभो - हे समर्थ ब्राह्मणा - प्रघने मृत्यूं विजित्य - युद्धात मृत्यूला जिंकून - ते प्रजाम् आनेष्ये - तुझ्या संततीला मी परत आणीन. ॥३४॥

परंतप - हे शत्रुतापना परीक्षिता - एवं फाल्गुनेन विश्रम्भितः विप्रः - याप्रमाणे अर्जुनाने विश्वास दाखविलेला ब्राह्मण - प्रीतः पार्थवीर्यं निशामयन् - प्रसन्न अंतःकरणाने अर्जुनाचा पराक्रम सर्वांना ऐकवीत - स्वगृहं जगाम - आपल्या घरी गेला. ॥३५॥

भार्यायाः प्रसूतिकाले आसन्ने - स्त्रीचा प्रसूत होण्याचा काळ जवळ आला असता - आतुरः द्विजसत्तमः - भीतीने व्याकुळ झालेला तो श्रेष्ठ ब्राह्मण - प्रजां मृत्योः पाहि पाहि - संततीचे मृत्यूपासून रक्षण कर, रक्षण कर - इति अर्जुनं आह - असे अर्जुनाला म्हणाला. ॥३६॥

सः - तो अर्जुन - शुचि अम्भः उपस्पृश्य - निर्मळ पवित्र उदकाचे आचमन करून - महेश्वरं नमस्कृत्य - शंकराला नमस्कार करून - दिव्यानि अस्त्राणि संस्मृत्य - तेजस्वी अस्त्रांचे स्मरण करून - सज्यं गाण्डीवं आददे - दोरी चढविलेले गाण्डीव धनुष्य घेता झाला. ॥३७॥

पार्थः - अर्जुन - नानस्त्रयोजितैः शरैः - अनेक प्रकारच्या अस्त्रांची योजना केलेल्या बाणांनी - तिर्यक् ऊर्ध्वं अधः - तिरके, वरती, खालती - सूतिकागारं न्यरुणत् - बाळंतिणीची खोली वेढिता झाला - शरपञ्जरं चकार - बाणांचा पिंजरा करिता झाला. ॥३८॥

ततः - नंतर - विप्रपत्‍न्याः - ब्राह्मणस्त्रीला - कुमारः संजातः - पुत्र झाला - सद्यः - तत्काळ - मुहुः रुदन् - वारंवार रडणारा - सशरीरः (सः) - शरीरासह तो पुत्र - विहायसा अदर्शनम् आपेदे - आकाशमार्गाने दिसत नाहीसा झाला. ॥३९॥

तदा - त्यावेळी - विप्रः - तो ब्राह्मण - कृष्णसन्निधौ विजयं विनिन्दन् आह - श्रीकृष्णाजवळ अर्जुनाची निंदा करीत म्हणाला - मे मौढ्यं पश्यत - माझा मूर्खपणा पहा - यः अहं - जो मी - क्लीबकत्थनं श्रद्दधे - नपुंसकाच्या बडबडीवर विश्वास ठेवला. ॥४०॥

यस्य परित्रातुं - ज्याचे रक्षण करण्यास - प्रद्युम्नः न अनिरुद्धः न रामः न केशवः च न शेकुः - प्रद्युम्न, अनिरुद्ध, बलराम आणि श्रीकृष्ण हे समर्थ झाले नाहीत - अन्यः कः ईश्वरः तत् अविता - दुसरा कोणता समर्थ राजपुरुष त्या बालकांचे रक्षण करील ? ॥४१॥

मृषावादं अर्जुनं धिक् - खोटे बोलणार्‍या अर्जुनाचा धिक्कार असो - आत्मश्‍लाघिनः (तस्य) धनुः धिक् - स्वतःची प्रौढी मिरविणार्‍या अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचाहि धिक्कार असो - यः दुर्मतिः - जो कोत्या बुद्धीचा अर्जुन - मौढयात् - वेडगळपणाने - दैवोपसृष्टं आनिनीषति - दैवाने ग्रासिलेल्याला परत आणण्याची इच्छा करितो. ॥४२॥

विप्रर्षौ एवं शपति - तो ब्राह्मण याप्रमाणे दोष देत असता - फाल्गुनः विद्यां आस्थाय - अर्जुन योगविद्येचा अवलंब करून - आशु संयमनीं ययौ - लवकर यमाच्या संयमनी नगरीला गेला - यत्र भगवान् यमः आस्ते - जेथे भगवान यम रहातो. ॥४३॥

उदायुधः (सः) - आयुध धारण केलेला तो अर्जुन - (तत्र) विप्रापत्यं अचक्षाणः - तेथे ब्राह्मणाच्या पुत्राला न पहाणारा - ततः ऐन्द्रीं पुरीं अगात् - तेथून इंद्राच्या अमरावती नगरीला गेला - अथ - नंतर - आग्नेयीं नैऋतीं सौ‌म्यां वायव्यां वारुणीं (च) - अग्नीच्या नगरीला, राक्षसांच्या नगरीला, सोमलोकाला, वायुलोकाला आणि वरुणाच्या नगरीला - रसातलं नाकपृष्ठं अन्यानि धिष्ण्यानि (च ययौ) - पाताळात, स्वर्गात व दुसर्‍याहि अनेक ठिकाणी गेला. ॥४४॥

ततः अलब्धद्विजसुतः - तेथेहि मिळाला नाही ब्राह्मण पुत्र ज्याला असा - अनिस्तीर्णप्रतिश्रुतः - पूर्ण झाले नाही वचन ज्याचे असा अर्जुन - अग्निं विविक्षुः - अग्निप्रवेश करण्यास इच्छिणारा - प्रतिषेधता कृष्णेन प्रत्युक्तः हि - निषेध करण्याच्या श्रीकृष्णाकडून खरोखर बोलला गेला. ॥४५॥

ते द्विजसूनून् दर्शये - तुला ब्राह्मणाचे मुलगे दाखवितो - आत्मना आत्मानं मा अवज्ञ - स्वतः स्वतःचा अपमान करू नको - ये (अधुना निन्दंति) ते मनुष्याः - जे आता निंदीत आहेत ते मनुष्य - नः विमलां कीर्तिं स्थापयिष्यन्ति - आमच्या पवित्र कीर्तीला स्थापित करितील. ॥४६॥

भगवान् ईश्वरः - भगवान श्रीकृष्ण - इति संभाष्य - असे भाषण करून - अर्जुनेन सह - अर्जुनासह - दिव्यं स्वरथम् आस्थाय - तेजस्वी अशा आपल्या रथात बसून - प्रतीचीं दिशम् आविशत् - पश्चिम दिशेत प्रवेश करिता झाला. ॥४७॥

अथ - नंतर - सप्त सप्त गिरीन् सप्तद्वीपान् सप्तसिन्धून् - सात सात पर्वत असलेली सात द्वीपे, सात समुद्र यांना - तथा लोकालोकं - त्याचप्रमाणे लोकालोक पर्वताला - अतीत्य - उल्लंघून - सुमहत् तमः विवेश - अत्यंत मोठया अंधारात शिरला. ॥४८॥

भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षिता - तत्र - तेथे - शैब्यसुग्रीवमेघपुष्पबलाहकाः अश्वाः - सुग्रीव, मेघपुष्प व बलाहक या नावांचे चार घोडे - तमसि भ्रष्टगतयः बभूवुः - काळोखात चुकला आहे मार्ग ज्यांचा असे झाले. ॥४९॥

महायोगेश्वरश्वरा भगवान् कृष्णः - मोठमोठया योगाधिपतींचा चालक असा भगवान श्रीकृष्ण - तान् (तथा) दृष्टवा - त्यांना तशा स्थितीत पाहून - सहस्रादित्यसंकाशं स्वचक्रं पुरः प्राहिणोत् - हजार सूर्याप्रमाणे प्रकाशणारे आपले सुदर्शन चक्र पुढे सोडिता झाला. ॥५०॥

मनोजवं सुदर्शनं - मनाच्या वेगाप्रमाणे वेग असणारे सुदर्शन चक्र - यथा गुणच्युतः रामशरः चमूः (तथा) - ज्याप्रमाणे धनुष्याच्या दोरीपासून सुटलेला रामचंद्राचा बाण सैन्यात घुसतो त्याप्रमाणे - भूरितरेण रोचिषा - अत्यंत तेजाने - सुघोरं गहनं कृतं महत् तमः विदारयत् - अत्यंत भयंकर व दाट प्रकृतीचे परिणत स्वरूप अशा मोठया अंधकाराला दूर करीत - निर्विविशे - पुढे घुसले. ॥५१॥

फाल्गुनः - अर्जुन - चक्रानुपथेन द्वारेण (गच्छन्) - सुदर्शन चक्राने प्रकाशित केलेल्या मार्गाच्या द्वाराने जात - तत् तमः परं - त्या अंधाराच्या पलीकडे - समश्‍नुवन् अनन्तपारं परं ज्योतिः प्रसमीक्ष्य - व्यापक व ज्याचा पार लागत नाही असे श्रेष्ठ तेज पाहून - प्राताडिताक्षः - ज्याचे डोळे दिपून गेले आहेत असा - उभे अक्षिणी पिदधे - दोन्ही डोळे मिटून घेता झाला. ॥५२॥

ततः - नंतर - बलीयसा नभस्वता - बलवान वाय़ूने - एजद्‌बृहदूर्मिभूषणं - कापणार्‍या मोठमोठया लाटा आहेत भूषण ज्याचे अशा - सलिलं - उदकात - प्रविष्टः - शिरला - तत्र वै - तेथे खरोखर - द्युमत्तमं - अत्यंत तेजस्वी - भ्राजन्मणिस्तम्भसहस्रशोभितम् - चकाकणार्‍या हजारो मण्यांच्या खांबांनी शोभणारे - अद्‌भुतं भवनं - आश्चर्यजनक मंदिर पहाता झाला. ॥५३॥

तस्मिन् - तेथे - अद्‌भुतं - आश्चर्यजनक - सहस्रमूर्धन्यफणामणिद्युभिः - हजारो मस्तके व त्या फण्यांवरील हजारो रत्‍ने ह्यांच्या कांतींनी - विभ्राजमानं - प्रकाशणार्‍या - द्विगुणोल्बणेक्षणं - दुप्पट प्रखर आहेत डोळे ज्याचे अशा - सिताचलाभं - हिमालय पर्वताप्रमाणे कांति आहे ज्याची अशा - शितिकण्ठजिह्वम् - काळी आहेत कंठ जिह्वा ज्याची अशा - महाभीमम् अनन्तम् - मोठया भयंकर अशा शेषाला - तद्‌भोगसुखासनं (च) - व त्या शेषाचे अंग हेच आहे मऊ आसन ज्याचे अशा - महानुभावं - मोठया पराक्रमी - पुरुषोत्तमोत्तमं - मोठमोठया श्रेष्ठ पुरुषांमध्येहि श्रेष्ठ अशा - सान्द्राम्बुदाभं - उदकाने भरलेल्या काळ्याकुटट मेघांप्रमाणे तेज आहे ज्याचे अशा - सुपिशङगवाससं - उत्तम पीतांबर आहे वस्त्र ज्याचे अशा - प्रसन्नवक्त्रं - प्रसन्न आहे मुख ज्याचे अशा - रुचिरायतेक्षणम् - सुंदर व लांब आहेत डोळे ज्याचे अशा - महामणिव्रातकिरीटकुण्डलप्रभापरिक्षिप्तसहस्रकुन्तलम् - मोठमोठया मण्यांच्या समूहांनी युक्त असा जो किरीट त्याच्या व कुंडलांच्या कांतीने तिरस्कृत केली आहे हजारो कुंतलांची कांती ज्याने अशा - प्रलम्बचार्वष्टभुजं - लांब व सुंदर आहेत आठ बाहु ज्याला अशा - सकौस्तुभं - कौस्तुभ मणि धारण करणार्‍या - श्रीवत्सलक्ष्मं - श्रीवत्सलांछनाने युक्त अशा - वनमालयावृतं - वनमाळेने आच्छादिलेल्या - सुनन्दनन्दप्रमुखैः स्वपार्षदैः - सुनंद व नंद आहेत मुख्य ज्यांत अशा सेवकांनी - मूर्तिधरैः चक्रादिभिः निजायुधैः - मूर्तिमान अशा आपल्या चक्रादिक आयुधांनी - पुष्टया श्रिया - पुष्टि व लक्ष्मी यांनी - कीर्त्यजया अखिलर्द्धिभिः निषेव्यमाणं - कीर्तिरूपी मायेने व सर्व ऐश्वर्यांनी सेविलेल्या - विभुं परमेष्ठिनां पतिं ददर्श - सर्वव्यापी व सर्व अधिपतींचा स्वामी अशा श्रीविष्णूला पाहता झाला. ॥५४-५७॥

अच्युतः - श्रीकृष्ण - तद्दर्शनजातसाध्वसः जिष्णुः च - आणि त्या शेषशायी भगवंताच्या दर्शनाने उत्पन्न झाले आहे भय ज्याला असा अर्जुन - आत्मानम् अनन्तं ववन्दे - आत्मस्वरूपी अंतरहित परमेश्वराला वंदन करिता झाला - भूमा परमेष्ठिनां प्रभुः - सर्वाहून श्रेष्ठ व ब्रह्मादि लोकपालांचा अधिपति असा भगवान - ऊर्जया गिरा - गंभीर वाणीने - बद्धाञ्जली तौ सस्मितं आह - हात जोडून उभे राहिलेल्या त्या दोघा कृष्णार्जुनांना मंद हास्य करीत म्हणाला. ॥५८॥

युवयोः दिदृक्षुणा मया - तुम्हाला पाहू इच्छिणार्‍या माझ्याकडून - द्विजात्मजाः उपनीताः - ब्राह्मणाचे मुलगे आणिले गेले - भुवि धर्मगुप्तये - पृथ्वीवर धर्म रक्षणासाठी - मे कलावतीर्णौ (युवां) - माझ्या अंशापासून उत्पन्न झालेले तुम्ही दोघे - अवनेः भरासुरान् हत्वा - पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांना मारून - भूयः इह मे अन्ति त्वरया इतम् - पुनः येथे माझ्याजवळ लवकर या. ॥५९॥

युवाम् पूर्णकामौ नरनारायणौ ऋषी अपि - तुम्ही पूर्ण आहेत मनोरथ ज्यांचे असे नर व नारायण ऋषि असतांहि - ऋषभौ - श्रेष्ठ असल्यामुळे - (जगतः) स्थित्यै - जगाच्या रक्षणासाठी - लोकसंग्रहं धर्मं आचरतां - लोकांना सन्मार्गदर्शक अशा धर्माचे आचरण करा. ॥६०॥

इति भगवता परमेष्ठिना आदिष्टौ तौ कृष्णौ - याप्रमाणे भगवान शेषशायीने आज्ञापिलेले ते कृष्णार्जुन - ओम् इति (उक्त्वा) भूमानं आनम्य - बरे आहे असे म्हणून, सर्वव्यापी भगवंताला वंदन करून - द्विजदारकान् आदाय - ब्राह्मणपुत्रांना घेऊन - संप्रहृष्टौ - आनंदित झालेले - यथागतं स्वकं धाम न्यवर्तताम् - आलेल्या मार्गानेच परत आपल्या ठिकाणी गेले - यथारुपं यथावयः विप्राय पुत्रान् ददतुः - रूप व वय ही यथायोग्य असलेले पुत्र ब्राह्मणाला देता झाला. ॥६१-६२॥

परमविस्मितः पार्थः - अत्यंत आश्चर्यचकित झालेला अर्जुन - वैष्णवं धाम निशाम्य - विष्णूचे तेज पाहून - पुंसां यत्किंचित् पौरुषं - पुरुषांचे जे काही सामर्थ्य - कृष्णानुकम्पितं मेने - श्रीकृष्णाची कृपाच होय असे मानिता झाला. ॥६३॥

इति ईदृशानि अनेकानि वीर्याणि इह प्रदर्शयन् - येणेप्रमाणे अशी अनेक पराक्रमाची कृत्ये या लोकी दाखविणारा श्रीकृष्ण - ग्राम्यान् विषयान् बुभुजे - इंद्रियांचे विषय सेविता झाला - अत्यूर्जितैः मखैः च ईजे - आणि अत्यंत तेजस्वी अशा मोठमोठ्या यज्ञांनी हवन करिता झाला. ॥६४॥

श्रैष्ठयम् आस्थितः भगवान् - श्रेष्ठपणाला प्राप्त झालेला भगवान श्रीकृष्ण - यथाकालं - योग्य काळी - यथा इंद्रः एव - इंद्राप्रमाणेच - ब्राह्मणादिषु प्रजासु अखिलान् कामान् प्रववर्ष - ब्राह्मणादि लोकांमध्ये असणारे सर्व मनोरथ पुरविता झाला. ॥६५॥

अधर्मिष्ठान् नृपान् (स्वयं) हत्वा - अधर्माचे आचरण करणार्‍या राजांना स्वतः मारून - अर्जुनादिभिः (च) घातयित्वा - व अर्जुनादिकांकडून मारवून - धर्मसुतादिभिः (सह) - यमधर्माचा पुत्र युधिष्ठिर इत्यादिकांसह - अञ्जसा धर्मं वर्तयामास - तत्काळ धर्माची घडी बसविता झाला. ॥६६॥

एकूणनव्वदावा अध्याय समाप्त

GO TOP