|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८८ वा - अन्वयार्थ
शिवांचे संकटमोचन - देवासुरमनुष्येषु - देव, दैत्य व मनुष्य ह्यांमधील - ये - जे कोणी - अशिवं शिवं भजन्ति - अमंगळ शंकराला भजतात - ते प्रायः धनिनः भोजाः (भवन्ति) - ते बहुधा श्रीमंत व विषयभोग भोगणारेच होतात - (ये) तु लक्ष्म्याः पतिं हरिम् (भजन्ति ते) न - पण जे लक्ष्मीपति श्रीहरीला भजतात ते तसे होत नाहीत. ॥१॥ विरुद्धशीलयोः प्रभ्वोः - विरुद्ध स्वभावांच्या समर्थ अशा देवतांचे - भजतां गतिः - सेवन करणार्यांची गति - विरुद्धा - विरुद्ध असते - हि - म्हणून - अत्र - ह्या बाबतीत - नः महान् संदेहः (अस्ति) - आम्हाला मोठा संशय आहे - एतत् वेदितुं इच्छामः - हे आम्हाला जाणण्याची इच्छा आहे ॥२॥ शिवः - शंकर - शश्वत् शक्तियुक्तः - प्रकृतिरूपी शक्तीने युक्त - त्रिलिङ्गः - तीन लिंगांनी युक्त - गुणसंवृतः - गुणांनी वेष्टिलेला - वैकारिकः तैजसः च तामसः च इति त्रिधा अहं (अस्ति) - सात्त्विक व राजस आणि तामस असा जो तीन प्रकारचा अहंकार त्या अहंकारस्वरुपाचा आहे ॥३॥ ततः षोडश विकारा अभवन् - त्या अहंकारापासून सोळा कार्यरूपी विकार झाले - अमीषु कंचन उपधावन् - या विकारांतील कोणा एकाची उपासना करणारा - सर्वासा विभूतीना गतिं अश्नुते - सर्व ऐश्वर्याचे स्थान भोगतो ॥४॥ हरिः हि निर्गुणः - श्रीकृष्ण तर निर्गुण - साक्षात् प्रकृतेः परः पुरुषः - प्रत्यक्ष मायेच्याहि पलीकडे असणारा पुरुष होय - सः सर्वदृक् उपद्रष्टा - तो सर्वांकडे पहाणारा व उपदेश करणारा आहे - तं भजन् निर्गुणः भवेत् - त्या श्रीकृष्णाचे भजन करणारा पुरुष निर्गुण होतो ॥५॥ युष्मत्पितामहः राजा - तुमचा आजोबा धर्मराजा - अश्वमेधेषु निवृत्तेषु - अश्वमेध यज्ञ समाप्त झाले असता - भगवतः धर्मान् श्रृण्वन् - श्रीकृष्णापासून धर्म श्रवण करण्याकरिता - इदं अच्युतं अपृच्छत् - हे श्रीकृष्णाला विचारता झाला ॥६॥ यः - जो - नृणां निःश्रेयसार्थाय - मनुष्यांच्या कल्याणासाठी - यदोः कुले अवतीर्णः - यदुवंशात उत्पन्न झाला - सः भगवान् प्रभुः - तो भगवान श्रीकृष्ण - प्रीतः - प्रसन्न झालेला - शुश्रूषवे तस्मै आह - ऐकू इच्छिणार्या त्या धर्मराजाला म्हणाला ॥७॥ अहं यस्य अनुगृह्णामि - मी ज्याच्यावर अनुग्रह करितो - तद्धनं शनैः हरिष्ये - त्याचे द्रव्य हळूहळू हरण करितो - ततः - नंतर - अस्य स्वजनाः - त्याचेच आप्तेष्ट लोक - दुःखदुःखितं अधनं (तं) - अत्यंत दुःखाने संतप्त झालेल्या त्या दरिद्री पुरुषाला - त्यजन्ति - सोडून देतात ॥८॥ यदा - ज्यावेळी - धनेहया - द्रव्याच्या इच्छेने - वितथोद्योगः - व्यर्थ गेले आहेत उद्योग ज्याचे असा - सः - तो - निर्विण्णः स्यात् - दुःखी होईल - (तदा) मत्परैः कृतमैत्रस्य (तस्य) - त्या वेळी माझी उपासना करणार्या वैष्णवांशी मैत्री केलेल्या भक्तावर - मदनुग्रहं करिष्ये - मी आपला अनुग्रह करितो ॥९॥ तत् परमं सूक्ष्मं चिन्मात्रं सत् अनन्तकम् ब्रह्म - ते श्रेष्ठ, सूक्ष्म, चैतन्यरूप, सत्स्वरूप अविनाशी असे ब्रह्म आहे - अतः - म्हणून - सुदुराराध्यं मां हित्वा - प्रसन्न करून घेण्यास कठीण अशा मला सोडून - जनः अन्यान् भजते - लोक दुसर्या देवतांची उपासना करितात - ततः - नंतर - ते - ते लोक - आशुतोषेभ्यः लब्धराज्याश्रियोद्धताः - लवकर संतुष्ट होणार्या देवतांकडून मिळालेल्या राज्यैश्वर्याने उन्मत्त झालेले असे - मत्ताः प्रमत्ताः (भूत्वा) - मदोन्मत्त व असावध होऊन - वरदान् विस्मरन्ति अवजानते (च) - वर देणार्या देवतांना विसरतात व त्यांचा अपमान करितात ॥१०-११॥ अङ्ग - हे परीक्षित राजा - ब्रह्मविष्णुशिवादयः - ब्रह्मदेव, विष्णु व शंकर इत्यादि देव - शापप्रसादयोः ईशाः (सन्ति) - शाप देण्यास व अनुग्रह करण्यास समर्थ आहेत - शिवः - शंकर - सद्यःशापप्रसादः (अस्ति) - शाप देणे किंवा अनुग्रह करणे ह्या दोन्ही क्रिया तत्काल करणारा आहे - ब्रह्मा च (तथा एव) - ब्रह्मदेव पण तसाच होय - अच्युतः न (तथा) - विष्णु तसा नाही ॥१२॥ अत्र च - ह्याविषयीहि - पुरातनं इमं इतिहासं - प्राचीनकाळचा हा इतिहास - उदाहरन्ति - सांगतात - गिरिशः - शंकर - वृकासुराय वरं दत्त्वा - वृकासुराला वर देऊन - संकटं आप - संकटात सापडाला ॥१३॥ शकुनेः पुत्रः दुर्मतिः वृकः नाम असुरः - शकुनीचा पुत्र दुष्टबुद्धि वृक नामक दैत्य - पथि नारदं दृष्ट्वा - मार्गामध्ये नारदाला पाहून - त्रिषु देवेषु आशुतोषं पप्रच्छ - तिन्ही देवांमध्ये लवकर प्रसन्न होणारा देव कोण असे विचारिता झाला ॥१४॥ सः आह - नारद म्हणाला - गिरिशं देवं उपाधाव - शंकराची आराधना कर - आशु सिद्ध्यसि - लवकर सिद्धीला प्राप्त होशील - यः - जो - अल्पाभ्यां गुणदोषाभ्यां - थोड्याशा गुणाने व दोषाने - आशु तुष्यति कुप्यति (च) - लवकर संतुष्ट होतो व लवकर क्रुद्धहि होतो ॥१५॥ बन्दिनोः इव स्तुवतोः - स्तुतिपाठकाप्रमाणे स्तुति करणार्या - दशास्यबाणयोः तुष्टः - रावण व बाणासुर ह्यांवर संतुष्ट झालेला - अतुलं ऐश्वर्यं (तौ) दत्त्वा - अलोट ऐश्वर्य रावण व बाणासुर ह्यांना देऊन - ततः सुसंकट आप - त्यामुळे अत्यंत संकटात पडला ॥१६॥ इति आदिष्टः असुरः - याप्रमाणे उपदेशिलेला वृकासुर - केदारे - क्षेत्रात - स्वगात्रतः आत्मक्रव्येण - आपल्या शरीरातून काढिलेल्या स्वतःच्या मांसाने - अग्निमुखं हरं जुह्वानः - अग्नि आहे मुख ज्याचे अशा शंकराला उद्देशून हवन करीत - तम् उपाधावत् - त्या शंकराची उपासना करिता झाला ॥१७॥ देवोपलब्धिम् अप्राप्य - श्रीशंकराची प्राप्ति न झाल्याने - निर्वेदात् - निराशेने - सप्तमे अहनि - सातव्या दिवशी - तत्तीर्थक्लिन्नमूर्धजं शिरः - त्या तीर्थातील उदकाने ज्यावरील केस ओले झाले आहेत अशा मस्तकाला - स्वधितिना अवृश्चत् - आपल्या शस्त्राने तोडू लागला ॥१८॥ तदा - त्यावेळी - महाकारुणिकः - अत्यंत दयाळु - च - आणि - अग्निः इव - अग्नीसारख्या तेजस्वी - सः धूर्जटिः - तो शंकर - अनलात् उत्थितः - अग्नीतून बाहेर आलेला असा - दोर्भ्यां भुजयोः निगृह्य - आपल्या बाहूंनी त्या असुराचे बाहु धरून - यथा वयं तथा - जसे आपण निवारण करितो तसे - न्यवारयत् - निवारता झाला - वृकः - वृकासुर - तत्स्पर्शनात् - त्या शंकराच्या स्पर्शाने - भूयः - पुनः - उपस्कृताकृतिः (अभवत्) - व्यवस्थित झाले आहे शरीर ज्याचे असा झाला ॥१९॥ (शंकरः) तं च आह - आणि शंकर त्या असुराला म्हणाला - अंग - हे असुरा - अलं अलं - पुरे कर, पुरे कर - मे यथाभिकामं वरं वृणीष्व - माझ्यापासून जो तुला पाहिजे असेल तो वर माग - ते वितरामि - तुला देतो - यत् - ज्याअर्थी - प्रपद्यतांन नृणां - शरण येणार्या मनुष्यांच्या - तोयेन प्रीयेय - पाण्यानेहि संतुष्ट होतो - अहो - अरे - त्वया आत्मा वृथा भृशं अर्द्यते - तुझ्याकडून शरीर विनाकारण अत्यंत पीडिले जाते आहे. ॥२०॥ पापीयान् सः - पापी वृकासुर - यस्य यस्य शीर्ष्णि - ज्याच्या ज्याच्या मस्तकावर - करं धास्ये - मी हात ठेवीन - सः म्रियताम् - तो मरावा - इति भूतभयावहं वरं - असा सर्व प्राण्यांना भीती उत्पन्न करणारा वर - देवं वव्रे - देवाजवळ मागता झाला. ॥२१॥ भारत - हे परीक्षित राजा - तत् श्रुत्वा - ते ऐकून - भगवान् रुद्रः - भगवान शंकर - दुर्मनाः इव (भूत्वा) - खिन्न झाल्याप्रमाणे होऊन - प्रहसन् - हसत हसत - यथा अहेः अमृतं - जसे सर्पाला अमृत तसे - ॐ इति तस्मै (वरं) ददे - बरे आहे असे म्हणून त्याला वर देता झाला. ॥२२॥ इति उक्तः सः असुरः - याप्रमाणे बोलला गेलेला तो वृकासुर - नूनं गौरीहरणलालसः (अभवत्) - खरोखर पार्वतीचे हरण करण्याविषयी उत्कंठित झाला - सः असुरः किल - तो वृकासुर खरोखर - तद्वरपरीक्षार्थं - त्या वराची परीक्षा पहाण्यासाठी - शंभोः मूर्ध्नि - शंकराच्या मस्तकावर - स्वहस्तं धातुम् आरेभे - आपला हात ठेवावयास लागला - सः शिवः स्वकृतात् अबिभ्यत् - तो शंकर आपल्या स्वतःच्या कृत्यामुळे भिऊन गेला. ॥२३॥ तेन उपसृष्टः (सः) - त्याने पीडिलेला तो शंकर - संत्रस्तः - त्रास पावलेला असा - सवेपथुः - कापत कापत - पराधावत् - धावू लागला - यावत् दिवः भूमेः काष्ठानां अन्तं - स्वर्ग, पृथ्वी, दिशा ह्यांचा शेवट होईपर्यंत - उदक् उदगात् - उत्तर दिशेकडे धावत सुटला. ॥२४॥ सुरेश्वराः - मोठमोठे देव - प्रतिविधिं अजानन्तः - प्रतिकार जाणत नसल्यामुळे - तूष्णीम् आसन् - स्वस्थ बसले - ततः - नंतर - तमसः परं भास्वरं वैकुण्ठं अगमत् - अंधकाराच्या पलीकडे असलेल्या तेजस्वी वैकुण्ठास गेला. ॥२५॥ यत्र - जेथे - शान्तानां न्यस्तदण्डानां - शांत व तीन्ही दंड ज्यांनी सोडिले आहेत अशा - न्यासिनां परमा गतिः - सर्वसंगपरित्यागी साधूंचा उत्तम आश्रय असा - साक्षात् नारायणः (वसति) - प्रत्यक्ष नारायण रहातो - यतः गतः न आवर्तते - जेथे गेलेला मनुष्य परत येत नाही. ॥२६॥ वृजिनार्दनः भगवान् - पापाचा नाश करणारा श्रीविष्णु - तथाव्यसनं तं दृष्ट्वा - तशा रीतीचे आहे संकट ज्याचे अशा त्या शंकराला पाहून - योगमायया बटुकः भूत्वा - योगमायेने लहान मुलाचे रूप घेऊन - दूरात् प्रत्युदियात् - दुरून प्रकट झाला. ॥२७॥ च - आणि - मेखलाजिनदण्डाक्षैः - कडदोरा, चर्म व दंड आणि रुद्राक्ष यांनी - तेजसा अग्निः इव ज्वलन् - तेजस्वीपणामुळे अग्नीसारखा प्रकाशणारा - कुशपाणिः (सः) - हातात दर्भ घेतलेला तो बटु - विनीतवत् तं अभिवादयामास - नम्र पुरुषाप्रमाणे त्या असुराला नमस्कार करिता झाला. ॥२८॥ शाकुनेय - हे शकुनिपुत्रा वृका - भवान् व्यक्तं श्रान्तः - तू खरोखर दमला आहेस - दूरं आगतः किम् - लांबून आलास काय - क्षणं विश्रम्यतां - क्षणभर विश्रान्ति घ्यावी - पुंसः अयं आत्मा - पुरुषाचा हा देह - सर्वकामधुक् - सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. ॥२९॥ विभो - हे समर्थ वृकासुरा - युष्मद्व्यवसितं - तुमचे योजिलेले कार्य - यदि नः श्रवणाय अलं - जर आम्हाला ऐकण्यास योग्य असेल - भण्यतां - सांगावे - प्रायशः - बहुधा - धृतैः पुम्भिः - हातांशी धरिलेल्या पुरुषांच्या सहाय्याने - स्वार्थान् समीहते - आपले इष्ट साधू इच्छितो. ॥३०॥ भगवता - श्रीकृष्णाने - अमृतवर्षिणा वचसा - अमृताचा वर्षाव करणार्या भाषणाने - एवं पृष्टः - याप्रमाणे विचारिला गेलेला - गतक्लमः - गेलेला आहे थकवा ज्याचा असा - यथा पूर्वं अनुष्ठितं (तथा) तस्मै अब्रवीत् - पूर्वी जसे केले होते तसे त्याला सांगता झाला. ॥३१॥ एवं चेत् तर्हि - असे असेल तर - वयं तद्वाक्यं न श्रद्दधीमहि - आम्ही त्या शंकराच्या भाषणावर मुळीच विश्वास ठेवीत नाही - यः - जो - दक्षशापात् - दक्षाच्या शापामुळे - पैशाच्यं प्राप्तः - पिशाचपणाला प्राप्त झालेला असा - प्रेतपिशाचराट् (अभवत्) - प्रेतांचा व पिशांचाचा राजा झाला आहे. ॥३२॥ दानवेन्द्र - हे दैत्यांच्या राजा - यदि तत्र जगद्गुरौ वः विश्रम्भः (स्यात्) - जर त्या शंकरावर तुमचा विश्वास असेल - तर्हि - तर - अङग - हे वृका - आशु स्वशिरसि हस्तं न्यस्य प्रतीयताम् - लवकर आपल्याच मस्तकावर हात ठेवून अनुभव घ्यावा. ॥३३॥ दानवर्षभ - हे दानवश्रेष्ठा वृका - यदि कथंचित् शंभोः वचः असत्यं (भवेत्) - जर कदाचित शंकराचे भाषण खोटे ठरेल - तदा असद्वाचं एनं जहि - तर खोटे बोलणार्या ह्या शंकराला ठार कर - यत् पुनः (सः) अनृतं न वक्ता - जेणेकरून पुनः तो खोटे बोलणार नाही. ॥३४॥ इत्थं - याप्रमाणे - भगवतः - श्रीविष्णूच्या - चित्रैः सुपेशलैः वचोभिः - आश्चर्यजनक अत्यंत मोहक भाषणांनी - भिन्नधीः कुमतिः सः - भ्रंश पावली आहे बुद्धि ज्याची असा तो दुष्ट बुद्धीचा वृकासुर - विस्मृतः शीर्ष्णि स्वहस्तं व्यधात् - भान विसरून मस्तकावर स्वतःचा हात ठेवता झाला. ॥३५॥ अथ - तेव्हा - भिन्नशिराः - फुटले आहे मस्तक ज्याचे असा तो - वज्राहतः इव - वज्राने ताडिल्याप्रमाणे - क्षणात् अपतत् - क्षणामध्ये पडला - दिवि - आकाशात - जयशब्दः नमःशब्दः साधुशब्दः अभवत् - जयजयकार असो, नमस्कार असो, चांगले झाले, असा मोठा ध्वनि उत्पन्न झाला. ॥३६॥ पापे वृकासुरे हते - पापी वृकासुर मारिला गेला असता - देवर्षिपितृगन्धर्वाः - देव, ऋषी, पितर व गंधर्व - पुष्पवर्षाणि मुमुचुः - फुलांचा वर्षाव करिते झाले - एवं शिवः संकटात् मोचितः - याप्रमाणे शिव संकटमुक्त केला गेला. ॥३७॥ पुरुषोत्तमः भगवान् - पुरुषश्रेष्ठ श्रीविष्णु - मुक्तं गिरीशं अभ्याह - संकटातून मुक्त झालेल्या शंकराला म्हणाला - अहो देव महादेव - हे देवाधिदेवा शंकरा - अयं पापः स्वेन पाप्मना हतः - हा पापी दानव स्वतःच्या पापकृत्यानेच मारला गेला - ईश - हे शंकरा - महत्सु कृतकिल्बिषः कः नु जन्तुः - मोठयांच्या ठिकाणी केला आहे अपराध ज्याने असा कोणता बरे प्राणी - क्षेमी स्यात् - खरोखर कल्याणसंपन्न होईल - विश्वेशे जगद्गुरौ (त्वयि) कृतागस्कः किमु - मग विश्वाचा अधिपति व जगाचा गुरु अशा तुझा अपराध करणारा कसा सुखी होईल ? ॥३८-३९॥ यः - जो - एवं - याप्रमाणे - अव्याकृतशक्त्युदन्वतः - विकृतिरहित शक्तीचा समुद्रच अशा - परस्य परमात्मनः हरेः - परब्रह्म परमात्मस्वरूपी अशा श्रीविष्णूचे - साक्षात् गिरित्रमोक्षं - प्रत्यक्ष शंकराला संकटातून सोडविल्याचे वृत्त - कथयेत् शृणोति वा - कथन करील किंवा श्रवण करील - (सः) संसृतिभिः तथा अरिभिः विमुच्यते - तो संसारापासून तसाच शत्रूंपासून मुक्त होतो. ॥४०॥ अठ्ठ्याऐंशीवा अध्याय समाप्त |