श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८७ वा - अन्वयार्थ

वेदस्तुती -

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - गुणवृत्तयः श्रुतयः - गुणासंबंधानेच अर्थबोधक सामर्थ्य आहे ज्यांचे असे वेद - सदसतः परे निर्गुणे अनिर्देश्ये ब्रह्मणि - कारण व कार्य यांच्या पलीकडे असणार्‍या, निर्गुण व अमुक म्हणून दाखविता न येणार्‍या अशा ब्रह्माच्या ठिकाणी - साक्षात् कथं चरन्ति - प्रत्यक्ष कसा अर्थबोध करितात. ॥१॥

प्रभुः - परमेश्वर - जनानां मात्रार्थं - लोकांच्या विषयोपभोगासाठी - भवार्थं च - आणि कर्मासाठी - आत्मने च - व आत्म्यासाठी - अकल्पनाय च - आणि कल्पनेच्या निरासासाठी - बुद्धीन्द्रियमनः प्राणान् असृजत् - बुद्धि, इंद्रिये, मन, प्राण हे उत्पन्न करिता झाला. ॥२॥

स एषा - ती ही - पूर्वेषां पूर्वजैः धृता - वाडवडिलांच्याहि पूर्वजांनी धारण केलेली - ब्राह्मी उपनिषत् हि - ब्रह्मविचाराने भरलेले उपनिषत आहे - यः अकिंचनः - जो सर्वसंग टाकलेला पुरुष - श्रद्धया तां ध्यायेत् - आस्तिक्यबुद्धीने तिला धारण करील - (सः) क्षेमं गच्छेत् - तो कल्याणप्रत जाईल. ॥३॥

अत्र - याविषयी - नारदस्य च नारायणस्य ऋषेः च संवादं - नारद व नारायण ऋषि यांचा संवाद असा - नारायणान्वितां गाथां - नारायणाशी संबद्ध असलेला इतिहास - ते वर्णयिष्यामि - तुला सांगतो. ॥४॥

एकदा भगवत्प्रियः नारदः - एकदा भगवत्प्रिय नारदऋषि - लोकान् पर्यटन् - त्रैलोक्यात फिरत फिरत - सनातनं ऋषिं द्रष्टुं - अति प्राचीन अशा नारायण ऋषीचे दर्शन घेण्याकरिता - नारायणाश्रमं ययौ - नारायण ऋषीच्या आश्रमी गेला. ॥५॥

यो वै अस्मिन् भारतवर्षे - जो खरोखर ह्या भरतखंडामध्ये - नृणां क्षेमाय स्वस्तये (च) - मनुष्यांच्या स्वास्थ्याकरिता व कल्याणाकरिता - धर्मज्ञानशमोपेतं तपः - धर्म, ज्ञान व शांति ह्यांनी युक्त अशी तपश्चर्या - आकल्पात् आस्थितः - कल्पाच्या आरंभापासून करीत आहे. ॥६॥

कुरूद्वह - हे कौरवश्रेष्ठा परीक्षित राजा - तत्र उपविष्टं - तेथे बसलेल्या - कलापग्रामवासिभिः ऋषिभिः परीतं (तं) - कलाप गावी रहाणार्‍या ऋषींनी वेष्टिलेल्या त्या ऋषीला - प्रणतः इदम् एव अपृच्छत् - नमस्कार केलेला हेच विचारिता झाला. ॥७॥

भगवान् - नारायण ऋषि - ऋषीणां शृण्वतां - ऋषि श्रवण करीत असता - तस्मै इदं हि अवोचत् - त्या नारदाला हे खरोखर सांगता झाला - यः - जो - जनलोकनिवासिनां पूर्वेषां - जनलोकात रहाणार्‍या पूर्वीच्या सत्पुरुषांध्ये झालेला - ब्रह्मवादः (आसीत्) - ब्रह्मसंबंधी विचार होता. ॥८॥

स्वायंभुव - हे नारदा - पुरा - पूर्वी - जनलोके - जनलोकामध्ये - तत्रस्थानां मानसानां ऊर्ध्वरेतसां मुनीनां - तेथे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अशा वैराग्यशील सनत्कुमार ऋषींचे - ब्रह्मसत्रं - ब्रह्मसत्र - अभवत् - चालू होते. ॥९॥

तदीश्वरं द्रष्टुं - त्या श्वेद्वीपाच्या अधिपतीचे दर्शन घेण्याकरिता - त्वयि श्वेतद्वीपं गतवति - तू श्वेतद्वीपाला गेला असता - ब्रह्मवादः सुसंवृत्तः - ब्रह्मविषयक विचार उत्तम झाला - यत्र श्रुतयः शेरते - ज्या विचारात श्रुति आलेल्या आहेत - तत्र - त्या विचारात - त्वं मां यं अनुपृच्छसि (सः) ह अयं प्रश्नः अभूत् - तू मला जो विचारित आहेस तोच हा प्रश्न उत्पन्न झाला होता - तुल्यश्रुततपःशीलाः - समान आहे शास्त्रश्रवण, तपश्चर्या व शील ज्यांचे असे - तुल्यस्वीयारिमध्यमाः अपि - सारखेच आहेत मित्र, शत्रु व तटस्थ ज्यांना असेही - एकं प्रवचनं चक्रुः - आपल्यापैकी एकाला वक्ता करिते झाले - अपरे शुश्रूषवः (बभूवुः) - इतर श्रोते झाले. ॥१०-११॥

स्वदृष्टं इदं आपीय - आपण निर्मिलेल्या ह्या जगाला आपल्या स्वरूपी तल्लीन करून - शक्तिभिः सह शयानं - शक्तीसह निजलेल्या - परं - परमेश्वराला - तदन्त - त्या निद्रेच्या शेवटी - श्रुतयः - वेद - तल्लिङगैः बोधयांचक्रुः - त्याचे वर्णन करणार्‍या वाक्यांनी जागे करिते झाले. ॥१२॥

यथा अनुजीविनः वन्दिनः - ज्याप्रमाणे त्यावरच अवलंबून रहाणारे स्तुतिपाठक - प्रत्यूषे - सकाळी - शयानं सम्राजं अभ्येत्य - निजलेल्या सार्वभौ‌म राजाजवळ येऊन - सुश्‍लोकैः तत्पराक्रमैः - चांगली आहे कीर्ति ज्यांत अशा त्या राजांच्या पराक्रमांच्या वर्णनांनी - (तं) बोधयन्ति - त्याला जागे करितात. ॥१३॥

अजित - हे अजिंक्य परमेश्वरा - जय जय - तू आपला विजय नित्य प्रकट कर - अखिलशक्त्यवबोधक - हे सकलशक्तिप्रकाशका - अगजगदोकसां स्थावर - जंगम शरीरधारक जीवांच्या - दोषगृभीतगुणां अजां जहि - दुष्टपणाकरिता गुणस्वीकार करणार्‍या मायेला नष्ट कर - यत् - कारण - त्वं - तू - आत्मना समवरुद्धसमस्तभगः असि - स्वस्वरूपाने मिळविली आहेत सर्व ऐश्वर्ये ज्याने असा आहेस - निगमः - वेद - क्वचित् - सृष्टीच्या उत्पत्तीसारख्या एखाद्या वेळी - अजया चरतः - मायेसह व्यवहार करणार्‍या - (नित्यं) च आत्मनः (चरतः) - आणि एरवी नित्य व स्वस्वरूपाने संचार करणार्‍या - ते - तुझे - अनुचरेत् - वर्णन करू शकतो. ॥१४॥

अवशेषतया - प्रलयकाळीही अवशिष्ट रहाणारे असल्यामुळे - एतत् उपलब्धं - हे अनुभवाद येणारे जग - बृहत् अवयन्ति - ब्रह्मच असे जाणतात - अविकृतात् यतः - विकाररहित अशा ज्या ब्रह्मापासून - विकृतेः मृदि वा - विकारस्वरूपी घटापासून मृत्तिकेच्या ठायी जशी - (तथा जगतः) उदयास्तमयौ (भवतः) - तशा जगाची उत्पत्ति व नाश ही होतात - अतः - म्हणून - ऋषयः - ऋषि - मनोवचनाचरितं - आपल्या मनाने व वाणीने केलेले कार्य - त्वयि दधुः - तुझ्याकडे लाविते झाले - नृणां भुवि दत्तपदानि - मनुष्यांची पृथ्वीवर ठेविलेली पाऊले - अयथा कथं भवन्ति - तशी ठेविलेली नव्हेत अशी कशी होतील ? ॥१५॥

स्त्र्यधिपते - हे त्रैलोक्याधिपते - सूरयः - विवेकी पुरुष - इति - याप्रमाणे - तव - तुझ्या - अखिललोकमलक्षपणकथामृताब्धिं अवगाह्य - सर्व लोकांचे पातक नष्ट करणार्‍या कथारूपी अमृतसागरात बुडी मारून - तपांसि जहुः - दुःखांचा त्याग करिते झाले - उत - मग - स्वधामविधुताशयकालगुणाः ये - आत्मस्वरूपाच्या तेजाने धुऊन टाकिले आहेत हृदयाचे कामक्रोधादि विकार व कालाने केलेल्या बाल्यादि अवस्था ज्यांनी असे जे - अजस्रसुखानुभवं पदं भजन्ति - पुष्कळ सुखाचा अनुभव ज्यात आहे अशा श्रेष्ठ पदाला सेवितात - (इति) किम्- हे काय सांगावयास पाहिजे ? ॥१६॥

असुभृतः - प्राणधारी मनुष्य - यदि ते अनुविधाः (स्युः) - जर तुझी भक्ति करणारे असतील - (तर्हि ते) श्वसन्ति - तरच ते जिवंत होत - (इतरथा) दृतयः इव - एरवी ते भात्याप्रमाणे होत - अथ - त्याचप्रमाणे - यदनुग्रहतः - ज्या परमेश्वराच्या अनुग्रहामुळे - महदहमादयः अण्डम् असृजन् - महत्तत्व, अहंकार इत्यादि तत्त्वे ब्रह्माण्डाला उत्पन्न करिती झाली - यः पुरुषविधः अत्र अन्वयः (सन्) - जो अंतर्यामि रूपाने या अन्नमयादि कोशात प्रविष्ट असून - अन्नमयादिषु चरमः - अन्नमयादि पांच कोशांमध्ये शेवटचा आहे - यत् सदसतः परं (सत्) - जे कार्यकारणांहून पलीकडे असून - एषु अवशेषम् - या सर्वांच्या मागे अवशिष्ट रहाणारे - अथ ऋतं - आणि त्रिकालाबाधित असे आहे - (तत्) त्वम् (असि) - ते तू आहेस. ॥१७॥

अनंत - हे अविनाशी ईश्वरा - ये - जे - ऋषिवर्त्मसु कूर्पदृशः - ऋषींच्या मार्गांमध्ये अज्ञानरूप खडे आहेत डोळ्यात ज्यांच्या असे लोक - उदरं उपासते - उदर हेच ब्रह्म असे समजून त्याची उपासना करितात - आरुणयः - आरुणिमार्गीय लोक - परिसरपद्धतिं दहरं हृदयं (उपासते) - सभोवार पसरणार्‍या नाड्यांचे मूलस्थान अशा हृदयातील आकाशाची उपासना करितात - ततः - त्या हृदयापासून - तव परमं धाम शिरः उदगात् - तुझे श्रेष्ठ तेज मस्तकापर्यंत गेले आहे - यत् समेत्य - जे मिळविले असता - पुनः इह कृतान्तमुखे न पतन्ति - पुनः या संसाररूप काळाच्या तोंडात पडत नाहीत. ॥१८॥

स्वकृतानुकृतिः - आपणच निर्मिलेल्या जगाचे अनुकरण करणारा - स्वकृतविचित्रयोनिषु - आपण उत्पन्न केलेल्या अनेक योनींमध्ये - हेतुतया विशन् इव - उपादानकारणरूपाने जणू प्रवेश करणारा - अनलवत् तरतमतः चकास्सि - अग्नीप्रमाणे न्यूनाधिक भावाने प्रकाशितोस - अथ - पण - अभिविपण्यवः विरजधियः - सर्व प्रकारे सोडिले आहे व्यवहारकार्य ज्यांनी असे निर्मळ बुद्धीचे सत्पुरुष - वितथासु अमूषु - मिथ्याभूत ह्या योनीमध्ये - अवितथं - सत्यरूप - एकरसं - एकच आहे रूप ज्याचे अशा - समं तव धाम - भेद नसलेल्या त्या तुझ्या स्थानाला - अन्वयन्ति - जाणतात. ॥१९॥

अमीषु स्वकृतपुरेषु - आपल्या पूर्वकर्माने धारण केलेल्या ह्या शरीरामध्ये - अबहिरन्तरसवरणं - बाहेरून व आतून नाही आहे आवरण ज्याला अशा - पुरुषं - पुरुषाला - अखिलशक्तिधृतः तव अंशकृतं वदन्ति - सर्व शक्तिंनी धारण करणार्‍या तुझ्या अंशापासून निर्मिलेला म्हणतात - इति - याप्रमाणे - नृगतिं विविच्य - जीवाच्या गतीचा शोध करून - विश्वसिताः कवयः - विश्वास उत्पन्न झालेले ज्ञानी - निगमावपनं अभवं भवतः अंघ्रिं - वैदिक कर्मांचे क्षेत्र अशा संसारातून मुक्त करणार्‍या तुझ्या चरणाला - भुवि - ह्या लोकी - उपासते - सेवितात. ॥२०॥

ईश्वर - हे परमेश्वरा - दुरवगमात्मतत्त्वनिगमाय - जाणण्यास कठीण अशा ब्रह्मतत्त्वाला दाखविण्यासाठी - आत्ततनोः तव - शरीर धारण करणार्‍या तुझ्या - चरितमहामृताब्धिपरिवर्तपरिश्रमणाः - कथारुपी मोठ्या अमृताच्या समुद्रात पोहल्यामुळे निघून गेले आहेत संसाराचे श्रम ज्यांचे असे - केचित् - कित्येक जण - ते चरणसरोजहंसकुलसंगविसृष्टगृहाः - तुझ्या चरणकमलाच्या ठिकाणी हंसाप्रमाणे रममाण होणार्‍या साधुसंघाची संगति घडल्यामुळे त्यागिले आहे घर ज्यांनी असे - अपवर्गम् अपि न परिलषन्ति - मोक्षालाहि इच्छीत नाहीत ॥२१॥

कुशरीरभृतः - आत्मघातकी व निंद्य शरीर धारण करणारे अज्ञानी लोक - त्वदनुपथं इदं कुलायं - तुझी सेवा करण्यालाच योग्य असे हे मनुष्यशरीर - आत्मसुहृत्प्रियवत् चरति - आत्मा, मित्र व प्रिय यांप्रमाणे वाटते - तथा (अपि) - तरी पण - असदुपासनया - नश्वर अशा त्या देहादिकांच्याच उपासनेने - उन्मुखे हिते प्रिये च आत्मनि त्वयि - साह्य करण्यास सिद्ध, कल्याणकारी व प्रिय अशा आत्मस्वरुपी तुझ्या ठिकाणी - आत्महनः - आत्मघात करणारे लोक - अहो बत न रमन्ति - खरोखर रममाण होतच नाहीत - यदनुशया कुशरीरभृतः उरुभये भ्रमन्ति - ज्यांच्या ठिकाणी वासना ठेवणारे मंद बुद्धीचे प्राणी महाभयंकर अशा संसारात भ्रमण करितात ॥२२॥

निभृतमरुन्मनोऽक्षदृढयोगयुजः - प्राण, मन व इंद्रिये ह्यांचे संयमन केल्यामुळे जे बळकट योगाभ्यास करणारे आहेत असे - मुनयः यत् हृदि उपासते - ऋषि ज्याची हृदयात उपासना करितात - तत् अरयः अपि स्मरणात् ययुः - शत्रुहि स्मरणाने त्यालाच प्राप्त होतात - उरगेन्द्रभोगभुजदण्डविषक्तधियः स्त्रियः - सर्पराजाच्या शरीरासारख्या तुझ्या बाहुदंडावर आसक्त आहे मन ज्यांचे अशा गोपी - अंघ्रिसरोजसुधाः वयम् अपि - तुझे चरणकमळ उत्तम रीतीने मनात धरणार्‍या आम्ही श्रुति देखील - समदृशः ते - समदृष्टि ठेवणार्‍या तुला - समाः (स्मः) - सारख्याच आहो ॥२३॥

अवरजन्मलयः - मागाहून झालेली आहेत उत्पत्ति व नाश ज्याची असा - कः - कोणता पुरुष - इह - या जगात - अग्रसरं (त्वां) बत नु वेद - वडील अशा तुला खरोखर जाणतो - यतः ऋषिः उदगात् - ज्यापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला - यम् अनु - ज्या ब्रह्मदेवामागून - उभये देवगणाः (उदगुः) - दोन्ही प्रकारचे देव उत्पन्न झाले - यदा अवकृष्य (भवान्) शयीत - जेव्हा सर्वांचे आकर्षण करून आपण शयन करता - तर्हि - तेव्हा - न सत् न च असत् - कारण नसते व कार्यहि नसते - उभयं न - कारण व कार्य अशा दोघांपासून उत्पन्न होणारे शरीरहि नसते - कालजवः च न - कालाचा वेगहि नसतो - तत्र किमपि शास्त्रं न - तेथे कोणते शास्त्रही नसते ॥२४॥

ये - जे - असतः (विश्वस्य) जनिं वदन्ति - असतापासून जगाची उत्पत्ति होते असे म्हणतात - (ये) सतः (दुःखस्य) मृतिं (वदन्ति) - जे एकवीस प्रकारच्या दुःखांचा नाश होतो असे म्हणतात - (ये) च - आणि जे - उत आत्मनि भिदां - आत्म्याच्या ठिकाणी भेदकल्पना करितात - ते सांख्याः - ते सांख्य - (ये) विपणं ऋतं स्मरन्ति - जे कर्मफलांचा देवदेवीचा व्यवहार सत्य असे म्हणतात - ते आरुपितैः उपदिशन्ति - ते आरोपिलेल्या भ्रमांनीच असे म्हणतात - त्रिगुणमयः पुमान् भिदा - तीन गुणांनी युक्त पुरुष आहे अशी भेदबुद्धी - यत् - ज्या अर्थी - त्वयि अबोधकृता - तुझ्या ठायी अज्ञानामुळे मानलेली आहे - ततः परत्र अवबोधरसे सः न संभवेत् - त्या अज्ञानाच्या पलीकडे असणार्‍या ज्ञानरसामध्ये ते अज्ञान संभवत नाही ॥२५॥

आमनुजात् - पुरुषापर्यंतची सर्व - मनः - मनःस्वरुपी - त्रिवृत् असत् - त्रिगुणात्मक असे मिथ्या जग - त्वाय सत् इव विभाति - तुझ्या ठिकाणी खर्‍याप्रमाणे भासते - आत्मविदः - आत्मज्ञानी लोक - आत्मतया - आत्मस्वरुपामुळे - इदं अशेषं सत् अभिमृशन्ति - हे सर्व सत् असेच जाणतात - (कनकार्थिनः) कनकस्य विकृतिं तदात्मतया न हि त्यजन्ति - सुवर्णाची इच्छा करणारे पुरुष सुवर्णाचा बनविलेला अलंकार सुवर्णमयच असल्यामुळे मुळीच टाकून देत नाहीत - (तथा) स्वकृतं अनुप्रविष्टं इदम् - त्याचप्रमाणे स्वतः निर्मिलेले व मागून प्रवेश केलेले हे जग - आत्मतया अवसितम् - आत्मस्वरुपाने निश्चित केले जाते ॥२६॥

ये - जे - तव अखिलसत्त्वनिकेततया - तुझ्या सर्व प्राण्यांचे निवासस्थान असण्याच्या स्थितीमुळे - (त्वां) परि चरन्ति - तुझी सेवा करितात - उत ते - तेच खरोखर - अविगणय्य - तिरस्कार करून - निऋतेः शिरः पदा आक्रमन्ति - मृत्यूच्या मस्तकावर पायाने आक्रमण करितात - पशून् इव तान् विबुधान् अपि गिरा परिवयसे - पशुंना बांधावे त्याप्रमाणे त्या ज्ञान्यांनाहि तू वाणीने बांधून टाकितोस - ये त्वयि कृतसौहृदाः - जे तुझ्या ठिकाणी मैत्री केलेली असे आहेत - खलु पुनन्ति - खरोखर पवित्र करितात - विमुखाः न (पुनन्ति) - तुला पराङ्‌मुख झालेले लोक पवित्र करीत नाहीत. ॥२७॥

अकरणः - इंद्रिय रहित - स्वराट् - स्वयंप्रकाशी - त्वं - तू - अखिलकारकशक्तिधरः (असि) - सर्व प्राण्यांच्या इंद्रियशक्ति धारण करणारा आहेस - अजया - मायेने - अनिमिषाः - देव - तव बलिम् उद्वहन्ति - तुला बलि अर्पण करितात - (स्वयं बलिं) समदन्ति - स्वतः बलि भक्षण करितात - वर्षभुजः अखिलक्षितिपतेः इव - मांडलिक राजे सार्वभौ‌म राजाला भिऊन जसे करितात तसे - ये विश्वसृजः यत्र अधिकृताः - जे प्रजापति जेथे अधिकारावर नेमिलेले आहेत - भवतः चकिताः तु विदधाति - तुला भ्यालेले असेच आपली नेमिलेली कार्ये करितात. ॥२८॥

विमुक्त - हे नित्यमुक्त परमेश्वरा - यदि ततः परस्य तव अजया उदीक्षया विहरः (भवति) - जेव्हा मायेच्या पलीकडे असलेल्या तुझी मायेशी केवळ अवलोकनाने क्रीडा चालते - (तदा) उत्थनिमित्तयुजः स्थिरचरजातयः स्युः - तेव्हा त्यापासून उत्पन्न झालेली कर्मजन्य लिंगशरीरे धारण करणारे स्थावरजंगम प्राणिमात्र उत्पन्न होतात - वियतः इव शून्यतुलां दधतः अपदस्य परमस्य तव - आकाशाप्रमाणे शून्याची बरोबरी करणार्‍या, इंद्रियांनी अमुक म्हणून दाखविता न येणार्‍या श्रेष्ठ अशा तुला - कश्चित् अपरः नहि - कोणीही आत्मीय नाही - परः च न भवेत् - आणि परकीही कोणी असणार नाही. ॥२९॥

ध्रुव - हे त्रिकालाबाधित ईश्वरा - यदि - जर - तनुभृतः - प्राणी - अपरिमिताः ध्रुवाः सर्वगताः (स्युः) - अगणित, नित्य व सर्वगामी असतील - तर्हि शास्यता न (घटत) - तर सुव्यवस्था संभवत नाही - इति (त्वया) नियमः न (स्यात्) - म्हणून तुझ्याकडून त्यांचे नियमनहि होणार नाही - इतरथा (स्यात्) - ह्याच्या उलट असल्यास नियमन होईल - यन्मयं च अजनि - आणि ज्याचा विकार म्हणून जीव नामक वस्तु उत्पन्न झाले - तत् - ते - समम् - सर्वांत सारखे असलेले - अविमुच्य - त्याला न सोडता - (तस्य) नियंतृ भवेत् - त्याचे नियामक होईल - अनुजानतां यत् मतदुष्टतया अमतं - जाणता म्हणणार्‍यांना जे ज्ञान वस्तूच्या दोषीपणामुळे वस्तुतः ठाऊक नाही. ॥३०॥

अजयोः प्रकृतिपुरुषयोः उद्‌भवः न घटत - जन्मरहित अशी जी माया व पुरुष त्यांच्यापासून जीवाची उत्पत्ति होणे संभवत नाही - जलबुद्‌बुदवत् असुभृतः उभययुजाः भवन्ति - पाण्याचे बुडबुडे जसे वायु व पाणी यांच्या संयोगाने होतात तसे प्राणी प्रकृति व पुरुष या दोघांच्या संयोगाने होतात - ततः - म्हणून - ते इमे - ते हे प्राणी - विविधनामगुणैः - अनेक प्रकारच्या नावांनी व गुणांनी युक्त असे - सरितः अर्णवे इव - नद्या समुद्रात लीन होतात त्याप्रमाणे - अशेषरसाः (वा) मधुनि (इव) - किंवा सर्व प्रकारचे रस मधात लीन होतात त्याप्रमाणे - परमे त्वयि लिल्युः - तू जो श्रेष्ठ कारण त्या तुझ्या स्वरूपात लीन होतात. ॥३१॥

अमीषु नृषु - या जीवांच्या ठिकाणी - तव मायया (कृतम्) - तुझ्या मायेने उत्पन्न केलेले - अनुप्रभवम् भ्रमम् अवगत्य - वारंवार जन्म मिळणे हे भ्रमण समजून घेऊन - सुधियः - ज्ञानी पुरुष - अभवे त्वयि - संसाराचा निरास करणार्‍या तुझ्या ठिकाणी - भृशं भावं दधति - दृढ भक्ति ठेवितात - (त्वाम्) अनुवर्तताम् - तुझी भक्ति करणार्‍यांना - भवभयं कथं (स्यात्) - संसाराचे भय कसे होईल - यत् - कारण - तव भ्रुकुटिः - तुझी भुवई - त्रिणेमिः - तीन आहेत भाग ज्याचे अशा काळाच्या रूपाने असलेल्या - अभवच्छरणेषु मुहुः भयं सृजति - नाही आहे तुझा आश्रय ज्यांना त्यांनाच वारंवार भय उत्पन्न करिते. ॥३२॥

अतिलोलम् - अतिशय चंचल अशा - अदान्तमनस्तुरगम् - दमन न केलेल्या मनरूपी घोड्याला - यन्तुम् - आवरण्यासाठी - ये - जे - इह - या लोकी - गुरोः चरणं समवहाय - गुरूचे पाय सोडून - विजितहृषीकवायुभिः यतन्ति - नियंत्रित अशा इंद्रियांनी व प्राणादि वायूंनी प्रयत्‍न करितात - उपायखिदः - या उपायांनी दुःखित झालेले असे - व्यसनशतान्विताः (भूत्वा) - शेकडो संकटांनी ग्रस्त होऊन - अकृतकर्णधराः जलधौ (गताः) वणिजः इव - नाही घेतले नावाडी साह्याला ज्यांनी अशा समुद्रात गेलेल्या व्यापार्‍यांप्रमाणे - सन्ति - होत ॥३३॥

सर्वरसे आत्मनि त्वयि श्रयतः (प्राप्तव्ये) सति - सर्व मुखे ज्यात आहेत असा आत्मस्वरूपी तू सेवा करणार्‍याला सुलभपणे प्राप्त होण्यासारखा असता - नृणाम् - मनुष्यांना - स्वजनसुतात्मदारधनधामधरासुरथैः किम् - आप्त, पुत्र, देह, स्त्री, द्रव्य, गृह, भूमि, प्राण, रथ इत्यादिकांचा काय उपयोग आहे - इति सत् - हे सत्य - अजानताम् - न जाणणार्‍या - मिथुनतः रतये चरताम् - पतिपत्‍नीसंबंध करून सुखासाठी प्रयत्‍न करणार्‍या माणसांना - स्वविहते स्वनिरस्तभगे इह (संसारे) - आपल्याकडूनच नष्ट केल्या गेलेल्या व आपल्याकडून काढून टाकिले आहे सार ज्यातील अशा या संसारात - कः नु सुखयति - कोणती वस्तू सुख देणार आहे बरे ? ॥३४॥

भवत्पदांबुजहृदः - तुझे चरणकमल हृदयात आहे ज्याच्या असे - अघभिदंघ्रिजलाः - पापनाशक आहे पायांचे तीर्थ ज्यांच्या असे - उत - सुद्धा - विमदाः ते ऋषयः - अहंकाररहित असे ते ऋषि - भुवि - पृथ्वीवर - पुरुपुण्यतीर्थसदनानि (उपासते) - अत्यंत पवित्र अशा तीर्थाच्या स्थानाचेच सेवन करितात - नित्यसुखे आत्मनि त्वयि - शाश्वत आहे सुख जेथे अशा आत्मरूपी तुझ्या ठिकाणी - ये सकृत् मनः दधति - जे एकदा मन ठेवितात - ते - ते - पुरुषसारहरावसथान् पुनः न उपासते - पुरुषाच्या विवेक स्थैर्य इत्यादि गुणरूपी साराचे हरण करणार्‍या घराचे पुनः सेवन करीत नाहीत. ॥३५॥

इदम् (जगत्) सतः उत्थितम् - हे जग सत्य अशा ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे - (तस्मात् इदम्) सत् - म्हणून हे सत्य आहे - इति चेत् (उच्यते न) - असे जर म्हणावे, तर तसे नाही - ननु (तत्) तर्कहतम् - खरोखर हे म्हणणे तर्काने बाधित होणारे आहे - क्वच व्यभिचरति - कोठे कोठे त्याची व्याप्ति दिसत नाही - क्वच मृषा - आणि कोठे कोठे ते खोटेच असते - (तस्मात्) न तथा - म्हणून जग हे तसे म्हणजे ब्रह्मासारखे सत्य नव्हे - (तत्) उभययुक् - ते सत्य ब्रह्म व अज्ञानजन्य भ्रम या दोहोंमुळे झालेले आहे - (सति ब्रह्मणि) विकल्पः व्यवहृतये इषितः - सत्य ब्रह्मावर झालेला असत्य अशा जगाचा आभास व्यवहारासाठी इष्ट आहे - (किन्तु सः) अन्धपरंपरया (जातः) - पण तो अंधपरंपरेनेच उत्पन्न झालेला आहे - ते भारती - तुज परमात्म्याची वेदरूप वाणी - उक्थजडान् (मीमांसकान्) - कर्मामुळे जडबुद्धि झालेल्या मीमांसकांना - उरुवृत्तिभिः भ्रमयति - आपल्या लक्षणा, व्यंजना इत्यादि अनेक अर्थबोधक शक्तींनी भ्रम पाडिते. ॥३६॥

यत् इदम् अग्रे न आस - ज्या अर्थी हे जग सृष्टीपूर्वी नव्हते - निधनात् अनु (च) न भविष्यत् - प्रलयानंतर ते रहाणारे नाही - अतः अन्तरा (अपि) - म्हणून मधल्या अवधीत देखील - एकरसे त्वयि मृषा विभाति - निर्गुण अशा तुझ्य़ा ठिकाणी मिथ्या रूपाने भासते - अतः - म्हणून - द्रविणजातिविकल्पपथैः (तत्) समीयते - मृत्तिकादि द्रव्यांपासून होणार्‍या भिन्न वस्तूंप्रमाणे त्याला उपमा दिली - (तत्) वितथ मनोविलासम् (सत्) - ते मिथ्या अशा मनाच्या खेळाप्रमाणे असून - अबुधाः - अज्ञानी पुरुष - ऋतम् अवयंति - खरे मानितात. ॥३७॥

यत् - जेव्हा - सः - तो जीव - अजया अजां अनुशयीत - मायेमुळे तिला आलिंगितो - (तस्याः) गुणान् तत् अनु च सरूपतां जुषन् - त्या मायेचे गुण घेऊन नंतर तिच्या स्वरूपाचाहि स्वीकार करीत - अपेतभगः - नष्ट झाले आहे ऐश्वर्य ज्याचे असा - मृत्यूं भजति - जन्ममृत्यूरूप संसारात पडतो - उत - पण - त्वम् - तू - अहिः त्वचम् इव - सर्प कात टाकितो त्याप्रमाणे - ताम् जहासि - तिला टाकितोस - आत्तभगः अपरिमेयभगः (च) - स्वाधीन आहे व अमर्याद आहे ऐश्वर्य ज्याचे असा - अष्टगुणिते महसि - अणिमादि आठ प्रकारच्या ऐश्वर्यात - महीयसे - विराजतोस. ॥३८॥

यदि - जर - यतयः - इंद्रियदमन करणारे योगी - हृदि (सतीः) कामजटाः - हृदयात असलेल्या वासनांच्या मुळांना - न समुद्धरन्ति - उपटून काढणार नाहीत - (तेषां) असताम् - त्या भोंदूंना - हृदि गतः (अपि त्वम्) - हृदयात असलेलाहि तू - दुरधिगमः (असि) - प्राप्त होण्यास कठीण आहेस - (यथा) अस्मृतकंठमणिः - जसा विसरलेला गळ्यातील मणि त्याप्रमाणे - असुतृपयोगिनाम् - इंद्रियांना तृप्त करणार्‍या योग्यांना - उभयतः अपि - या लोकी व परलोकी सुद्धा - असुखं (भवति) - दुःख होते - (हे) भगवन् - हे परमेश्वरा - (एकम्) अनपगतान्तकात् - एक दूर न झालेल्या संसारापासून - (अन्यत् च) अनधिरूढपदात् भवतः - आणि दुसरे ज्याच्या पदाची प्राप्ति झाली नाही अशा तुझ्यापासून. ॥३९॥

(हे) सगुण - हे षड्‌गुणैश्वर्यसंपन्न भगवंता - त्वदवगमी - तुझे ज्ञान असलेला पुरुष - भगदुत्थशुभाशुभयोः - तुझ्यापासून उत्पन्न होणार्‍या चांगल्या वाईट कर्मांच्या - गुणाविगुणान्वयान् - सुखदुःखरूपी संबंधाना - न वेत्ति - जाणत नाही - तर्हि च - व तेव्हा - देहभृतां गिरः (न वेत्ति) - देहाभिमानी जीवासाठी असलेली विधिनिषेधरूप वचनेहि जाणत नाही - यतः त्वं - ज्या अर्थी तू - मनुजैः अन्वङ्गं - मनुष्यांनी प्रत्येक दिवशी - अनुयुगं - प्रत्येक युगामध्ये - गीतपरंपरया - गायिलेल्या उपदेश परंपरांनी - श्रवणभृतः - श्रवणद्वारा हृदयामध्ये धारण केलेला - अपवर्गगतिः - मोक्षदायक. ॥४०॥

द्युपतयः एव ते अन्तं न ययुः - स्वर्गादि लोकांचे स्वामी मात्र तुझा अंत जाणत नाहीत - अनंततया त्वम् अपि (तव अंतं न यासि) - तुला अंतच नसल्यामुळे तूही तुझा अंत जाणत नाहीस - यदन्तरा - ज्या तुझ्या उदरामध्ये - ननु - अहो - सावरणाः अंडनिचयाः - सात आवरणांनी वेष्टिलेले असे ब्रह्मांडाचे थवे - रजांसि खे इव - धुळीचे कण आकाशात फिरतात तसे - वयसा सह वांति - कालचक्राच्या योगे एकमेकांसह फिरत असतात - यत् (एवं तत्) - ज्या अर्थी असे आहे त्या अर्थी - भवन्निधनाः श्रुतयः - तुझ्यातच आहे लय ज्यांचा असे वेद - अतन्निरसनेन - ब्रह्माशिवाय इतरांचा निषेध करून - त्वयि हि फलंति - तुझ्याच ठिकाणी आपल्या शब्दाचे पर्यवसान करितात. ॥४१॥

सिद्धाः ब्रह्मणः पुत्राः - पूर्णज्ञानी असे ते ब्रह्मदेवाचे पुत्र - इति एतत् आत्मानुशासनम् आश्रुत्य - याप्रमाणे हा अध्यात्मज्ञानाचा उपदेश श्रवण करून - अथ - नंतर - आत्मनः गतिं ज्ञात्वा - आत्म्याची गती जाणून - सनन्दनम् आनर्चुः - सनंदनाची पूजा करिते झाले. ॥४२॥

इति - याप्रमाणे - अशेषसमाम्नायपुराणोपनिषद्रसः - सर्व वेद, पुराणे व उपनिषदे ह्यांतील सार - पूर्वजातैः व्योमयानैः महात्मभिः - प्राचीन अशा आकाशमार्गांनी संचार करणार्‍या महात्म्यांनी - समुद्धृतः - काढिले आहे. ॥४३॥

ब्रह्मदायाद - हे ब्रह्मपुत्रा नारदा - त्वं च - तू पण - नृणां कामानां भर्जनं - मनुष्यांच्या वासना दग्ध करणारा - एतत् आत्मानुशासनं - हा आत्मोपदेश - श्रद्धया धारयन् - श्रद्धेने धारण करीत - कामं गां चर - यथेच्छ पृथ्वीवर संचार कर. ॥४४॥

राजन् - हे परीक्षित राजा - आत्मवान् - ज्ञानी - वीरव्रतः श्रुतधरः पूर्णः सः मुनिः - नैष्ठिक व्रत पाळणारा व ऐकिलेले मनात धारण करणारा तो कृतकृत्य नारद ऋषि - एवं ऋषिणा आदिष्टं श्रद्धया गृहीत्वा - याप्रमाणे ऋषि नारायणाने उपदेशिलेले आत्मज्ञान श्रद्धापूर्वक स्वीकारून - आह - म्हणाला. ॥४५॥

अमलकीर्तये भगवते तस्मै कृष्णाय नमः - निर्मळ कीर्ती असणार्‍या षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा त्या श्रीकृष्णाला नमस्कार असो - यः - जो - सर्वभूतानां अभवाय - सर्व प्राण्यांच्या संसाराचा निरास करण्यासाठी - उशतीः कलाः धत्ते - मनोहर अवतार धारण करितो. ॥४६॥

इति आद्यं ऋषिं महात्मनः तच्छिष्यान् च आनम्य - याप्रमाणे प्राचीन अशा नारायण ऋषीला व थोर अंतःकरणाच्या त्याच्या शिष्यांना नमस्कार करून - ततः - नंतर - मे साक्षात् पितुः द्वैपायनस्य आश्रमं अगात् - माझा प्रत्यक्ष पिता व्यास महर्षि त्यांच्या आश्रमाला गेला. ॥४७॥

भगवता सभाजितः कृतासनपरिग्रहः - भगवान व्यास महर्षीने पूजिलेला व केला आहे आसनाचा स्वीकार ज्याने असा - नारायणमुखात् श्रुतं तत् - नारायण ऋषीच्या मुखाने श्रवण केलेले ते - तस्मै वर्णयामास - व्यास महर्षींना सांगिता झाला. ॥४८॥

राजन् - हे परीक्षित राजा - यत् त्वया नः प्रश्नः कृतः - ज्या संबंधाने तू आम्हाला प्रश्न विचारिला - इति एतत् (मया) वर्णितं - ते हे मी सांगितले आहे - श्रुतिः - श्रुति - यथा - ज्या रीतीने - अनिर्देश्ये निर्गुणे अपि ब्रह्मणि चरेत् - बोटाने अमुक म्हणून दाखविता न येणार्‍या निर्गुण अशाहि ब्रह्माच्या ठिकाणी अर्थबोध करिते. ॥४९॥

यः - जो - अस्य - ह्या जगाच्या - आदिमध्यनिधने उत्प्रेक्षकः - उत्पत्ति, रक्षण व संहार ह्या विषयीची व्यवस्था पहाणारा - यः - जो - अव्यक्त जीवेश्वरः - दृग्गोचर न होणार्‍या जीवांचा चालक आहे - यः - जो - इदं सृष्टवा - हे विश्व उत्पन्न करून - ऋषिणा अनुप्रविश्य - जीवासह त्यात प्रविष्ट होऊन - पुरः चक्रे - शरीरे निर्मिता झाला - ताः (च) शास्ति - आणि त्यांचे रक्षण करितो - यं संपद्य - ज्याला प्राप्त होऊन - अनुशयी - पाया पडणारा पुरुष - अजां जहाति - मायेला टाकितो - यथा सुप्तः कुलायं (जहाति) - जसा निजलेला पुरुष स्वतःच्या शरीराला टाकितो तसा - कैवल्यनिरस्तयोनिं - ब्रह्मज्ञानाने नाहीसे केले आहे मायारूप मूळकारण ज्याने अशा - अभयं तं हरिं - भय नाहीसे करणार्‍या त्या परमेश्वराचे - अजस्रं ध्यायेत् - सतत ध्यान करावे. ॥५०॥

सत्याऐंशीवा अध्याय समाप्त

GO TOP