श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८६ वा - अन्वयार्थ

सुभद्राहरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे -

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - विजयः - अर्जुन - यथा - ज्याप्रकारे - रामकृष्णयोः स्वसारं उपयेमे - बलराम व श्रीकृष्ण यांच्या बहिणीला वरिता झाला - (तत्) वेदितुम् इच्छामः - तो प्रकार जाणण्याची आमची इच्छा आहे - या मम पितामही आसीत् - जी सुभद्रा माझी आजी होती. ॥१॥

सः प्रभुः अर्जुनः - तो समर्थ अर्जुन - तीर्थयात्रायां अवनीं पर्यटन् - तीर्थयात्रेसाठी पृथ्वीवर फिरत - प्रभासं गतः - प्रभास क्षेत्री गेलेला - आत्मनः मातुलेयीं अशृणोत् - आपल्या मामेबहिणीविषयी ऐकता झाला. ॥२॥

रामः - बलराम - तां दुर्योधनाय दास्यति इति - तिला दुर्योधनाला देणार असे - अपरे न (इति) च - व दुसरे देत नाहीत असे - तल्लिप्सुः - त्या सुभद्रेला मिळवू इच्छिणारा - सः - तो अर्जुन - त्रिदण्डी यतिः भूत्वा - त्रिदण्डी संन्यासी होऊन - द्वारकाम् अगात् - द्वारकेला आला. ॥३॥

(तं) अजानता रामेण - त्याला न ओळखणार्‍या बलरामाकडून - पौरैः (च) अभीक्ष्णं सभाजितः - आणि नगरांतील लोकांकडून वारंवार पूजिलेला - सः - तो अर्जुन - तत्र च वै - त्याच ठिकाणी - स्वार्थसाधकः - स्वार्थ साधणारा असा - वार्षिकान् मासान् अवात्सीत् - पावसाळ्याचे चार महिने राहिला. ॥४॥

एकदा - एके दिवशी - आतिथ्येन निमन्त्र्य - अतिथि सत्काराने आमंत्रण देऊन - तं गृहम् आनीय - त्याला घरी आणून - बलेन श्रद्धया उपहृतं भैक्ष्यं - बलरामाने श्रद्धेने जवळ आणलेल्या भक्ष्य पदार्थाला - किल बुभुजे - खरोखर सेविता झाला. ॥५॥

प्रीत्युत्फुल्लेक्षणः - प्रेमाने प्रफुल्लित झाले आहेत नेत्र ज्याचे असा - सः - तो अर्जुन - तत्र - तेथे - वीरमनोहरां महतीं कन्यां - वीरांना मनोहर अशा त्या मोठया कन्येला - अपश्यत् - पहाता झाला - तस्यां भावक्षुब्धं मनः दधे - त्या कन्येच्या ठिकाणी प्रेमाने क्षुब्ध झालेले मन ठेविता झाला. ॥६॥

हसन्ती व्रीडितापाङ्गी तन्न्यस्तहृदयेक्षणा - हसत, लज्जेने कटाक्ष फेकीत ठेविले आहे त्याच्या ठिकाणी आपले अंतःकरण जीने अशी - सा अपि - ती सुभद्रासुद्धा - नारीणां हृदयंगमम् तं वीक्ष्य - स्त्रियांच्या हृदयाला आनंद देणार्‍या त्या अर्जुनाला पाहून - चकमे - इच्छिती झाली. ॥७॥

तां परं समनुध्यायन् - त्या सुभद्रेचे सारखे चिंतन करीत - (तस्याः हरणाय) अन्तरं प्रेप्सुः - तिचे हरण करण्याची संधि पहाणारा - अर्जुनः - अर्जुन - अतिबलीयसा कामेन भ्रमच्चित्तः - अत्यंत बळकट अशा कामाने ज्याचे अन्तःकरण भ्रमिष्ठासारखे झाले आहे असा - शं न लेभे - सुख मिळविता झाला नाही. ॥८॥

महारथः - महारथी अर्जुन - (तस्याः) पित्रोः कृष्णस्य च अनुमतः - तिचे आईबाप वसुदेव, देवकी व कृष्ण ह्यांनी संमति दिलेला - महत्यां देवयात्रायां - मोठया देवयात्रेच्या प्रसंगी - रथस्थां दुर्गनिर्गतां (तां) जहार - रथात बसलेल्या व त्या किल्ल्यातून बाहेर पडलेल्या त्या सुभद्रेला हरिता झाला. ॥९॥

रथस्थः (सः) - रथात बसलेला अर्जुन - धनुः आदाय - धनुष्य घेऊन - मृगराट् स्वभागम् इव - सिंह आपला भाग नेतो तसा - आरुन्धतः शूरान् भटान् विद्राव्य - सर्व बाजूंनी अडविणार्‍या पराक्रमी योद्‌ध्यांना पळवून - स्वानां क्रोशताम् - आपले बांधव यादव आक्रोश करीत असता - (तां) जहार - त्या सुभद्रेला हरिता झाला. ॥१०॥

तत् श्रुत्वा - ते ऐकून - पर्वणि (क्षुभितः) महार्णवः इव - पर्वदिवशीच्या खवळलेल्या महासागराप्रमाणे - क्षुभितः रामः - संतापलेला बलराम - कृष्णेन सुहृद्‌भिः च गृहीतपादः - कृष्णाने व स्नेहीमंडळींनी ज्याचे पाय धरले आहेत असा - अन्वशाम्यत - हळू हळू शांत झाला. ॥११॥

बलः - बलराम - महाधनोपस्करेभरथाश्वनरयोषितः - मौल्यवान साहित्य, हत्ती, रथ, घोडे, दासदासी - पारिबर्हाणि - आंदण म्हणून - वरवध्वोः मुदा प्राहिणोत् - वधुवरांकडे आनंदाने पाठविता झाला. ॥१२॥

कृष्णैकभक्त्या पूर्णार्थः - एकटया श्रीकृष्णाच्याच ठिकाणी भक्ति ठेविल्यामुळे ज्याचा मनोरथ सफल झाला आहे असा - शान्तः कविः अलम्पटः - शांत, ज्ञानी, विषयांवर आसक्ति न ठेवणारा - श्रुतदेव इति श्रुतः द्विजश्रेष्ठः - श्रुतदेव या नावाने प्रसिद्ध असा थोर ब्राह्मण - कृष्णस्य (भक्तः) आसीत् - श्रीकृष्णाचा भक्त होता. ॥१३॥

गृहाश्रमी सः - गृहस्थाश्रमी असा तो श्रुतदेव - अनीहया आगताहार्यनिर्वर्तितनिजक्रियः - प्रयत्‍नावाचून प्राप्त झालेल्या अन्नसामग्रीने पार पाडिल्या आहेत आपल्या क्रिया ज्याने असा - विदेहेषु मिथिलायां उवास - विदेह देशात मिथिला नगरीत रहात असे. ॥१४॥

उत तु - आणि असे की - अहरहः - प्रतिदिवशी - दैवात् - सुदैवाने - यात्रामात्रं - शरीराच्या निर्वाहापुरते - (तम्) उपनमति - त्याला मिळत असे - अधिकं न - अधिक मिळत नसे - तावताः तुष्टः - तेवढ्याने संतुष्ट झालेला - यथोचिताः क्रियाः चक्रे - यथायोग्य क्रिया करीत असे. ॥१५॥

अङग - हे राजा - तथा - त्याचप्रमाणे - तद्राष्ट्रपालः - त्या देशाचा राजा - बहुलाश्वः इति श्रुतः - बहुलाश्व नावाने प्रसिद्ध असा - मैथिलः - जनकाचा वंशज - निरहंमानः (आसीत्) - अहंकाररहित होता - उभौ अपि अच्युतप्रियौ - दोघेहि श्रीकृष्णावर प्रेम करणारे होते. ॥१६॥

तयोः प्रसन्नः भगवान् प्रभुः - त्या दोघांवर प्रसन्न झालेला भगवान श्रीकृष्ण - मुनिभिः साकं - ऋषींसह - दारुकेण आहृतं रथं आरुह्य - दारुक सारथ्याने आणिलेल्या रथात बसून - विदेहान् प्रययौ - विदेह देशाला गेला. ॥१७॥

नारदः वामदेवः अत्रिः कृष्णः रामः असितः अरुणिः - नारद, वामदेव, अत्रि, व्यास, परशुराम, असित, अरुणि - अहं बृहस्पतिः कण्वः मैत्रेयः च्यवनादयः - मी शुक, बृहस्पति, कण्व, मैत्रेय व च्यवन आदिकरून ऋषि. ॥१८॥

नृप - हे परीक्षित राजा - जानपदाः पौराः - देशात व नगरात रहाणारे लोक - सार्घ्यहस्ताः - हातात पूजासाहित्य घेतलेले - ग्रहैः (सह) उदितं सूर्यम् इव - ग्रहांसह उगवलेल्या सूर्याला नमस्कार करावा त्याप्रमाणे - आयान्तं तं तत्र तत्र उपतस्थुः - आलेल्या श्रीकृष्णाला ठिकठिकाणी नमस्कार करिते झाले. ॥१९॥

नृप - हे परीक्षित राजा - आनर्तधन्वकुरुजाङगलकंकमत्स्यपाञ्चालकुन्तिमधुकेकयकोसलार्णाः - आनर्त, धन्व, कुरु, जांगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधु, केकय, कोसल व अर्ण ह्या देशांतील - नृनार्यः - पुरुष व स्त्रिया - अन्ये च - आणि दुसरे कित्येक - उदारहासस्निग्धेक्षणं तन्मुखसरोजं - गंभीर हास्य व प्रेमळ अवलोकन करणार्‍या श्रीकृष्णाच्या मुखकमळाला - दृशिभिः पपुः - नेत्रांनी प्राशिते झाले. ॥२०॥

स्ववीक्षणविनष्टतमिस्रदृग्भ्यः - आपल्या अवलोकनाने नष्ट झाला आहे अंधकार जीचा अशी दृष्टी आहे ज्यांची अशा - तेभ्यः - त्या लोकांना - क्षेमं अर्थदृशं च यच्छन् - अभय व तत्त्वज्ञान देणारा - त्रिलोकगुरुः - त्रैलोक्याचा गुरु असा श्रीकृष्ण - दिगन्तधवलं अशुभघ्नं च - सर्व दिशांना प्रकाशित करणार्‍या व पापनाश करणार्‍या - सुरैः नृभिः गीतम् - देव व मनुष्य यांनी गायिलेल्या - स्वयशः - आपल्या कीर्तीला - शृण्वन् - श्रवण करीत - शनकैः विदेहान् अगात्- हळू हळू विदेह देशाला गेला. ॥२१॥

नृप - हे परीक्षित राजा - ते जानपदाः पौराः - ते विदेह देशात व मिथिलेत रहाणारे लोक - अच्युतं प्राप्तम् आकर्ण्य - श्रीकृष्णाला आला आहे असे ऐकून - गृहीतार्हणपाणयः - हातात भेटीच्या वस्तू घेतलेले असे - मुदिताः तस्मै अभीयुः - आनंदित होऊन त्याला सामोरे गेले. ॥२२॥

ते - ते लोक - श्रुतपूर्वान् मुनीन् - पूर्वोक्त ऋषींना - तथा - त्याचप्रमाणे - उत्तमश्‍लोकं दृष्टवा - श्रेष्ठ कीर्तीच्या श्रीकृष्णाला पाहून - प्रीत्युत्फुल्लाननाशयाः - प्रेमाने ज्यांची मुखे आनंदित झाली आहेत असे - धृताञ्जलिभिः कैः - हात जोडलेल्या मस्तकांनी - नेमुः - नमस्कार करिते झाले. ॥२३॥

तं जगद्‌गुरुं - त्या त्रैलोक्याधिपति श्रीकृष्णाला - स्वानुग्रहाय संप्राप्तं मन्वानौ - आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी आलेला मानणारे - मैथिलः श्रुतदेवः च - मिथिलाधिपति बहुलाश्व व श्रुतदेव - प्रभोः पादयोः पेततुः - श्रीकृष्णाच्या पाया पडले. ॥२४॥

मैथिलः श्रुतदेवः च - मिथिलाधिपति बहुलाश्व व श्रुतदेव - सहताञ्जलीः - हात जोडून - द्विजेः सह - ब्राह्मणांसह - दाशार्हं - श्रीकृष्णाला - आतिथ्येन युगपत् न्यमन्त्रयेतां - अतिथिसत्कारार्थ एकाच वेळी निमंत्रण देते झाले. ॥२५॥

भगवान् - श्रीकृष्ण - तदभिप्रेत्य - त्यांचा अभिप्राय जाणून - द्वयोः प्रियचिकीर्षया - दोघांचे प्रिय करण्याच्या इच्छेने - उभाभ्यां - दोन रूपांनी - तदलक्षितः - त्यांनी न पाहिलेला असा - उभयोः गेहं आविशत् - दोघांच्या घरात शिरला. ॥२६॥

महामनाः जनकः - थोर मनाचा बहुलाश्व राजा - असतां श्रोतुं अपि दूरान् - दुर्जनांना ऐकावयासहि दूर असलेल्या अशा - स्वगृहागतान् - आपल्या घरी आलेल्या - आनीतेषु आसनाग्र्येषु - आणिलेल्या श्रेष्ठ आसनांवर - सुखासीनान् - सुखाने बसलेल्या - (मुनीन्) नत्वा - ऋषींना नमस्कार करून - प्रवृद्धभक्त्या - वाढलेल्या भक्तीने - उद्धर्षहृदयास्राविलेक्षणः - उचंबळला आहे हर्ष ज्यात असे आहे हृदय ज्याचे व अश्रूंनी भरून गेले आहेत नेत्र ज्याचे असा - तदङ्‌घ्रीन् प्रक्षाल्य - त्याचे पाय धुवून - लोकपावनीः तदपः - लोकांना पवित्र करणारी ती उदके - सकुटुम्बः मूर्ध्ना वहन् - कुटुंबासह धारण करणारा असा - गन्धमाल्याम्बराकल्पधूपदीपार्घगोवृषैः - गंध, फुले, वस्त्रे, भूषणे, वेष, धूप, दीप, पूजासाहित्य, गाई, बैल ह्यांनी - ईश्वरान् पूजयांचक्रे - समर्थ अशा सर्वांचे पूजन करिता झाला. ॥२७-२९॥

विष्णोः अङकगतौ (कृष्णस्य) पादौ मुदा शनकैः संस्पृशन् - मांडीवर घेतलेले श्रीकृष्णाचे पाय आनंदाने हळूहळू चेपीत - अन्नतर्पितान् (तान्) प्रीणन् - अन्नाने तृप्त झालेल्या त्यांना प्रसन्न करीत - मधुरया वाचा इदं आह - मधुर वाणीने असे म्हणाला. ॥३०॥

विभो - हे परमेश्वरा - भवान् हि - तू खरोखर - सर्वभूतानाम् आत्मा - सर्व प्राण्यांचा अंतर्यामी - साक्षी स्वदृक् (अस्ति) - प्रकाशक व स्वयंप्रकाश आहेस - अथ - म्हणून - त्वत्पदाम्भोजं स्मरतां नः (त्वं) दर्शनं गतः - तुझ्या चरणकमळाला स्मरण करणार्‍या आमच्या तू दृष्टीस पडलास. ॥३१॥

एकान्तभक्तात् - एकनिष्ठ भक्तापेक्षा - अनन्तः श्रीः अजः - शेष, लक्ष्मी, ब्रह्मदेव - मे प्रियः न - मला प्रिय नाही - (इति त्वं) यत् आत्थ - असे तू जे बोलला आहेस - तत् स्ववचः - ते आपले बोलणे - ऋतं कर्तुम् - सत्य करण्याकरिता - भवान् - तु - अस्मदृग्गोचरः (अभवत्) - आमच्या दृष्टिपथात आलास. ॥३२॥

एवंवित् कः नु पुमान् - हे जाणणारा कोणता बरे पुरुष - त्वच्चरणाम्भोजं विसृजेत् - तुझ्या चरणकमळाला सोडून देईल - यः त्वं - जो तू - निष्किञ्चनानां शान्तानां मुनीनां - सर्वसंगपरित्यागी व शांत अशा ऋषींना - आत्मदः (असि) - आत्मज्ञान देणारा आहेस. ॥३३॥

यः यदोः वंशे अवतीर्य - जो यदुवंशात अवतार घेऊन - इह संसरतां नृणां - येथे जन्ममरणरूपी संसारचक्रात फिरणार्‍या मनुष्यांच्या - तच्छान्त्यै - त्या संसाराच्या शान्तीसाठी - त्रैलोक्यवृजिनापहं यशः वितेने - त्रैलोक्याचे पाप नष्ट करणारे यश पसरिता झाला. ॥३४॥

अकुण्ठमेधसे - कोठेहि न अडणारी आहे धारणाशक्ति ज्याची अशा - नारायणाय ऋषये - नारायण ऋषि या नावाने प्रसिद्ध असलेला - सुशान्तं तपः ईयुषे - अत्यंत शांत रीतीने तप करणार्‍या - भगवते कृष्णाय तुभ्यं नमः - भगवान श्रीकृष्ण अशा तुला नमस्कार असो. ॥३५॥

भूमन् - हे विश्वव्यापका - द्विजैः समेतः - ब्राह्मणांसह - कतिचित् दिनानि नः गृहान् निवस - कित्येक दिवस आमच्या घरी रहा - पादरजसा (च) इदं निमेः कुलं पुनीहि - आणि चरणधूलीने ह्या निमिवंशाला पवित्र कर. ॥३६॥

इति राज्ञा उपामन्त्रितः - याप्रमाणे बहुलाश्व राजाने विनविलेला - लोकभावनः भगवान् - लोकरक्षक भगवान श्रीकृष्ण - मिथिलानरयोषितां कल्याणं कुर्वन् (तत्र) उवास - मिथिला नगरीतील स्त्रीपुरुषांचे कल्याण करीत तेथे रहाता झाला. ॥३७॥

श्रुतदेवः - श्रुतदेव - यथा जनकः - जसा बहुलाश्व राजा तसाच - स्वगृहान् प्राप्तम् अच्युतं - आपल्या घरी आलेल्या श्रीकृष्णाला - मुनीन् (च) - आणि मुनींना - नत्वा - नमस्कार करून - सुसंहृष्टः - अति आनंदित झालेला - वासः धुन्वन् ननर्त ह - वस्त्र फडकावीत खरोखर नाचू लागला. ॥३८॥

सभार्या सः - पत्‍नीसह तो श्रुतदेव - आनीतेषु तृणपीठबृसीषु - आणिलेल्या गवताच्या बैठकीवर व आसनावर - एतान् उपवेश्य - ह्यांना बसवून - स्वागतेन अभिनन्द्य - कुशल प्रश्नांनी त्यांचा सत्कार करून - मुदा अंघ्रीन् अवनिजे - आनंदाने त्यांचे पाय धुता झाला. ॥३९॥

उद्धर्षः लब्धसर्वमनोरथः (सः) - उचंबळला आहे आनंद ज्याचा व प्राप्त झाले आहेत सर्व मनोरथ ज्याला असा - महाभागः (सः) - मोठा भाग्यवान तो श्रुतदेव - सगृहान्वयं आत्मानं - घरातील सर्व परिवारासह स्वतःला - तदम्भसा स्नापयांचक्रे - त्या पाय धुतलेल्या उदकाने स्नान घालिता झाला - फलार्हणोशीरशिवामृताम्बुभिः - फळे व सत्कारार्ह असे वाळा घालून सुगंधी व मधुर केलेले जे उदक त्याने - सुरभ्या मृदा - सुगंधी मृत्तिकेने - तुलसीकुशाम्बुजैः - तुळशी, दर्भ व कमळे यांनी - सत्त्वविवर्धनान्धसा - बलवर्धक अन्नाने - यथोपपन्नया सपर्यया - यथाशक्ति मिळविलेल्या पूजासाहित्याने - आराधयामास - पूजिता झाला. ॥४०-४१॥

सः तर्कयामास - तो मनात विचार करू लागला - कृष्णेन - श्रीकृष्णाशी - च - आणि - सर्वतीर्थास्पदपादरेणुभिः अस्य आत्मनिकेतभूसुरैः - सर्व पवित्र स्थानांचा आश्रय आहे पायांची धूळ ज्याच्या अशा ह्या श्रीकृष्णाचे स्वतःचे स्थान झालेल्या ब्राह्मणांशी - यः संगमः - जो समागम - गृहान्धकूपे पतितस्य मम - गृहरूपी काळोखाच्या विहिरीत पडलेल्या मला - कुतः अन्वभूत् - कसा झाला ? ॥४२॥

सभार्यस्वजनापत्यः - भार्या, परिवार व मुले ह्यांसह - अंघ्र्यभिमर्शनः - श्रीकृष्णाच्या पायाला स्पर्श करणारा - श्रुतदेवः - श्रुतदेव - उपस्थितः - जवळ उभा राहिलेला - सूपविष्टान् कृतातिथ्यान् उवाच - स्वस्थपणे आसनावर बसलेल्या व आदरसत्कार केलेल्या त्यांना म्हणाला. ॥४३॥

(त्वं) परमपुरुषः अद्य नः दर्शनं प्राप्तः (इति) न - तू श्रेष्ठ पुरुष आज आमच्या दृष्टीस पडलास असे नाही - परम् - पण - यर्हि हि - जेव्हा खरोखर - इदम् शक्तिभिः सृष्ट्वा - हे विश्व आपल्या शक्तींनी उत्पन्न करून - (तत्) आत्मसत्तया (त्वं) प्रविष्टः - त्यात आपल्या सत्तेने तू शिरलास. ॥४४॥

यथा शयानः पुरुषः - जसा निजलेला मनुष्य - मनसा एव - मनानेच - परं लोकं सृष्ट्वा - दुसरा लोक निर्मून - आत्ममायया स्वाप्नं अनुविश्य - आपल्या मायेने स्वप्नसृष्टीत शिरून - अवभासते - प्रतीतीस करितो. ॥४५॥

शश्वत् त्वा शृण्वतां गदतां अर्चतां अभिवन्दतां - नित्य तुझ्या कथा श्रवण करणार्‍या, तुझी स्तुति करणार्‍या, तुझे पूजन करणार्‍या व तुला वंदन करणार्‍या - संवदतां अमलात्मनां नृणां - तुझ्याशी भाषण करणार्‍या निष्पाप अंतःकरणाच्या मनुष्यांच्या - अन्तर्हृदि - हृदयामध्ये - भासि - प्रकाशतोस. ॥४६॥

(त्वं) कर्मविक्षिप्तचेतसां हृदिस्थः अपि अतिदूरस्थः (असि) - तू ज्यांची अंतःकरणे कर्मांनी क्षुब्ध झाली आहेत अशा प्राण्यांच्या हृदयांत असूनहि अत्यंत दूर असल्यासारखाच आहेस - आत्मशक्तिभिः अग्राह्यः अपि - अहंकारादि शक्तिंनी ज्याचे ज्ञान होऊ शकत नाही असा असताहि - उपेतगुणात्मनाम् अन्ति - आलेले आहेत श्रवणकीर्तनादि संस्काररूपी गुण ज्यांत असे आहे अंतःकरण ज्यांचे त्यांना तू जवळ आहेस. ॥४७॥

अध्यात्मविदां परात्मने - ज्ञानी लोकांचा श्रेष्ठ आत्मा अशा - अनात्मने स्वात्मविभक्तमृत्यवे - आत्म्याहून भिन्न जीवाला आपल्यापासून वेगळा करून दिला आहे जन्ममृत्युरूप संसार ज्याने अशा - सकारणाकारणलिंगम् ईयुषे - ज्यांना प्रकृतिरूप कारण आहे अशी महत् आदिकरून भूते व जिला कारण नाही अशी प्रकृति या दोन्ही प्रकारच्या उपाधींचा स्वीकार करणार्‍या - स्वमायया असंवृतरुद्धदृष्टये - आपल्या मायेने स्वतःची उघडी व जीवाची बंद केलेली आहे दृष्टी ज्याने अशा - ते नमः अस्तु - तुला नमस्कार असो. ॥४८॥

देव - हे श्रीकृष्णा - सः त्वं - तो तू - (अतः परं) किं करवामहे - आम्ही आता ह्यापुढे काय करावे - (तत्) स्वभृत्यान् नः शाधि - ते तुझे भक्त जे आम्ही त्यांना शिकव - यत् भवान् अक्षगोचरः - जो तू दृष्टीस पडलास - एतदन्तः नृणां क्लेशः (भवति) - तोपर्यंतच मनुष्यांना दुःख होते. ॥४९॥

इति तदुक्तं उपाकर्ण्य - असे त्या श्रुतदेवाचे भाषण ऐकून - प्रणतार्तिहा भगवान् - शरण आलेल्यांच्या पीडा दूर करणारा भगवान श्रीकृष्ण - पाणिना पाणिं गृहीत्वा - आपल्या हाताने श्रुतदेवाचा हात धरून - प्रहसन् तं उवाच ह - हसत हसत त्या श्रुतदेवाला खरोखर म्हणाला. ॥५०॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा श्रुतदेवा - अमून् मुनीन् - ह्या ऋषींना - ते अनुग्रहार्थाय संप्राप्तान् विद्धि - तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आलेले जाण - (एते मुनयः) मया (सह) - हे ऋषि माझ्यासह - पादरेणुभिः लोकान् पुनन्तः संचरन्ति - पायधुळीने लोकांना पवित्र करीत हिंडतात. ॥५१॥

देवाः क्षेत्राणि तीर्थानि - देव, क्षेत्रे, व तीर्थे - दर्शनस्पर्शनार्चनैः - दर्शन, स्पर्श व पूजा ह्यांनी - शनैः पुनन्ति - हळूहळू पवित्र करितात - तत् अपि - ते सर्वहि - अर्हत्तमेक्षया - अत्यंत पूजा अशा भगवद्‌भक्तांच्या केवळ दर्शनाने - कालेन (भवति) - तत्काळीच सिद्ध होते. ॥५२॥

ब्राह्मणः - ब्राह्मण - जन्मना (एव) - जन्मानेच - इह - या जगात - सर्वेषां प्राणिनां श्रेयान् - सर्व प्राणिमात्रांचा कल्याणकर्ता आहे - किमु तपसा विद्यया तुष्टया मत्कलया युत (सः) - मग तपाने, ज्ञानाने, संतोषाने आणि माझ्या अंशाने युक्त असा तो असल्यास काय विचारावे ? ॥५३॥

एतत् चतुर्भुजं रूपं - हे चतुर्भुज स्वरूप - मे ब्राह्मणात् न दयितं - मला ब्राह्मणापेक्षा प्रिय नाही - विप्रः सर्ववेदमयः - ब्राह्मण हा सर्व वेदांची मूर्ति - हि अहं सर्वदेवमयः - आणि खरोखर मी सर्व देवांची मूर्ति आहे. ॥५४॥

दुष्प्रज्ञाः - मंद बुद्धीचे लोक - एवं - याप्रमाणे - विप्रं - ब्राह्मणाला - गुरुं मां आत्मानं अविदित्वा - गुरुस्वरूपी, मत्स्वरूपी व आत्मस्वरूपी असे न ओळखता - असूयवः - मत्सर करणारे असे - अर्चादौ इज्यदृष्टयः - मूर्तीच्या ठिकाणी पूज्य बुद्धि आहे ज्यांची असे - अवजानंति - अपमानितात. ॥५५॥

विप्रः - ब्राह्मण - चराचरम् इदं विश्वं - स्थावरजंगमात्मक हे जग - ये च अस्य हेतवः भावाः (ते) - व जे काही ह्या जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत असे प्रकृत्यादि पदार्थ ते - मद्रूपाणि (सन्ति) - माझी रूपे होत - इति - असे - मदीक्षया चेतसि आधत्ते - मीच सर्वत्र भरलेला आहे अशा कल्पनेने मनात ठसवितो. ॥५६॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा श्रुतदेवा - तस्मात् - म्हणून - एतान् ब्रह्मऋषीन् - ह्या ब्रह्मर्षीची - मच्छ्‌रद्धया - हे मीच आहेत अशी श्रद्धा ठेवून - अर्चय - पूजा कर - एवं चेत् - ह्याप्रमाणे जर होईल - (तर्हि एव) अद्धा (अहं) अर्चितः अस्मि - तरच साक्षात मी पूजिला गेलो असे होईल - अन्यथा भूरिभूतिभिः न - नाहीतर मोठया संपत्तीनेहि मी पूजिला गेलो असे होणार नाही. ॥५७॥

इत्थं प्रभुणा आदिष्टः सः - याप्रमाणे श्रीकृष्णाने उपदेशिलेला तो श्रुतदेव - मैथिलः च - आणि मिथिलाधिपति बहुलाश्व राजा - एकात्मभावेन - ऐक्य बुद्धीने - सहकृष्णान् द्विजोत्तमान् आराध्य - श्रीकृष्णासह सर्व ब्राह्मणांची पूजा करून - सद्‌गतिं आप - चांगली गति मिळविते झाले. ॥५८॥

राजन् - हे परीक्षित राजा - भक्तभक्तिमान् भगवान् - भक्तांवर भक्ति करणारा श्रीकृष्ण - उषित्वा - तेथे राहून - एवं - याप्रमाणे - स्वभक्तयोः सन्मार्गं आदिश्य - आपल्या भक्तांना सन्मार्ग दाखवून - पुनः द्वारवतीं अगात् - पुनः द्वारकेला गेला. ॥५९॥

शाहाऐंशीवा अध्याय समाप्त

GO TOP