|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८३ वा - अन्वयार्थ
भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद - गोपीनां गतिः गुरुः सः भगवान् - गोपींचा आश्रय व ज्ञानोपदेशक असा तो भगवान श्रीकृष्ण - तथा अनुगृह्य - तशा रीतीने अनुग्रह करून - युधिष्ठिरं - धर्मराजाला - अथ सर्वान् सुहृदः च - आणखी इतर सर्व मित्रांना - अव्ययं अपृच्छत् - खुशाली विचारिता झाला. ॥१॥ एवं लोकनाथेन परिपृष्टाः - याप्रमाणे श्रीकृष्णाने विचारिलेले - सुसत्कृताः - चांगल्या रीतीने सत्कारिलेले - तत्पादेक्षाहतांहसः - त्या श्रीकृष्णाच्या पायाच्या दर्शनाने नष्ट झाले आहे पाप ज्यांचे असे - हृष्टमनसस्ते - आनंदित झाले आहे अंतःकरण ज्यांचे असे ते सर्व - प्रत्यूचुः - प्रत्युत्तर देते झाले. ॥२॥ प्रभो - हे श्रीकृष्णा - महन्मनस्तः मुखनिः सृतं - मोठया साधूंच्या अंतःकरणांतून मुखद्वारा बाहेर पडलेल्या - देहंभृतां देहकृदस्मृतिच्छिदं - देहधारी पुरुषांना देह उत्पन्न होण्यास कारणीभूत अशा मायेला तोडून टाकणार्या - त्वच्चरणाम्बुजासवं - तुझ्या चरणकमलाचा मकरंद - ये क्वचित् - जे एखादे वेळीहि - कर्णपुटैः अलं पिबन्ति - कानांच्या योगे पूर्णपणे प्राशितात - (तेषां) अशिवं कुतः - त्यांचे अकल्याण कसे बरे होईल ? ॥३॥ श्रात्मधामविधुतात्मकृतत्र्यवस्थं - आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळे नाहीशा झाल्या आहेत आत्म्याने केलेल्या तीन अवस्था ज्यामध्ये अशा - आनन्दसम्प्लवं - आनंदाचा निधि अशा - अखण्डं अकुण्ठबोधं - त्रिकालाबाधित व ज्याची ज्ञानशक्ति कधीहि कुण्ठित होत नाही अशा - कालोपसृष्टनिगमावने आत्तयोगमायाकृतिं - कालाने नष्ट होऊ लागलेल्या वेदांच्या रक्षणासाठी ज्याने योगमायेने मनुष्यरूप धारण केले आहे अशा - परमहंसगतिं त्वा हि नताः स्म - वैराग्यशील साधूंना सद्गति देणार्या तुलाच आम्ही नमस्कार करितो. ॥४॥ इति - याप्रमाणे - जनेषु उत्तमश्लोकशिखामणिं अभिष्टुवत्सु - लोक उत्तमकीर्तीच्या पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा श्रीकृष्णाची स्तुति करीत असता - अन्धककौरवस्त्रियः - यादवांच्या व कौरवांच्या स्त्रिया - समेत्य - एकत्र जमून - त्रिलोकगीताः गोविंदकथाः - त्रैलोक्यात गाइल्या गेलेल्या श्रीकृष्णाच्या कथा - मिथः अगृणन् - आपापसात वर्णित्या झाल्या - (ताः) ते वर्णयामि - त्या तुला मी सांगतो - शृणु - ऐक. ॥५॥ हे वैदर्भि हे भद्रे हे जाम्बवति हे कौसले - हे रुक्मिणि, हे भद्रे, हे जाम्बवति, हे कौसले - हे सत्यभामे कालिन्दि शैब्ये रोहिणि लक्ष्मणे - हे सत्यभामे, हे कालिन्दि, हे मित्रविंदे, हे रोहिणि, हे लक्ष्मणे - हे कृष्णपत्न्यः - अहो कृष्णस्त्रियाहो - भगवान् अच्युतः - भगवान श्रीकृष्ण - स्वमायया लोकम् अनुकुर्वन् - आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत - यथा स्वयं वः उपयेमे - ज्या रीतीने स्वतः तुम्हाला वरिता झाला - एतत् नः ब्रूत - ते आम्हाला सांगा ॥६-७॥ चैद्याय मा अर्पयितुम् उद्यतकार्मुकेषु राजसु - मला शिशुपालाला देण्यासाठी जरासंधादि राजे धनुष्ये सज्ज करून उभे असता - अजेयभटशेखरितांघ्रिरेणुः - अजिंक्य अशा योद्ध्यांनी मस्तकावर तुर्याप्रमाणे धारण केली आहे पायधूळ ज्याची असा - मृगेन्द्रः अजावियूथात् भागम् इव - सिंह मेंढ्यांच्या कळपातून आपला भाग नेतो तसा - (मां) निन्ये - मला नेता झाला - तत् - त्या कारणास्तव - श्रीनिकेतचरणः - लक्ष्मीचे निवासस्थान असा श्रीकृष्णाचा चरण - मम अर्चनाय अस्तु - मला पूजनाकरिता असो ॥८॥ यः - जो श्रीकृष्ण - सनाभिवधतप्तहृदा ततेन - भावाच्या वधामुळे संतप्त झाले आहे हृदय ज्याचे अशा त्याने - लिप्ताभिशापम् अपमार्ष्टुम् - लादिलेला आरोप दूर करण्यासाठी - ऋक्षराजं जित्वा - अस्वलांचा अधिपति अशा जांबवानाला जिंकून - रत्नं उपाजहार - स्यमंतक मणी आणिता झाला - अथ - आणि - (तत् मम पित्रे) अदात् - तो माझ्या पित्याला देता झाला - तेन भीतः सः मे पिता - त्यामुळे भ्यालेला तो माझा पिता सत्राजित - दत्ताम् अपि मां - दिल्याप्रमाणे असलेल्याहि मला - प्रभवे अदिशत - समर्थ अशा श्रीकृष्णाला देता झाला ॥९॥ (मम) देहकृत् - माझा देह उत्पन्न करणारा पिता जांबवान - निजनाथदैवं सीतापतिं अमुं (इति) प्राज्ञाय - आपला स्वामी असा जो देव सीतापति रामचंद्र तोच हा श्रीकृष्ण आहे असे न जाणून - अमुना (सह) त्रिणवहानि अभ्ययुध्यत् - ह्या श्रीकृष्णाबरोबर सत्तावीस दिवस युद्ध करिता झाला - परीक्षितः - झाली आहे स्वरुपाची परीक्षा ज्याला असा - (रामं) ज्ञात्वा - हाच राम आहे असे जाणून - पादौ प्रगृह्य - पाय धरून - मणिना (सह) मां अर्हणं उपाहरत् - स्यमंतक मण्यासह मला भेट म्हणून अर्पिता झाला - (एवम्) अहं अमुष्य दासी (अभवम्) - अशा रीतीने मी ह्या श्रीकृष्णाची दासी झाले. ॥१०॥ स्वपादस्पर्शनाशया तपः चरन्तीं मा आज्ञाय - आपल्या पायांच्या स्पर्शाची इच्छा धरून तप करणार्या मला जाणून - सख्या उपेत्य - मित्र जो अर्जुन त्याच्याबरोबर येऊन - यः पाणिं अग्रहीत् - जो माझे पाणिग्रहण करिता झाला - तद्गृहमार्जनी अहम् (अस्मि) - त्याच्या घराची झाडसारव करणारी मी दासी झाल्ये ॥११॥ श्रियौकः यः - लक्ष्मीचे निवासस्थान असा जो - स्वयंवरे उपेत्य - स्वयंवरात येऊन - द्विपारिः श्वयूथगं आत्मबलिं इव - जसा सिंह कुत्र्यांच्या कळपात सापडलेला आपला बळी घेऊन जातो तसा - अपकुरुतः भूपान् मे भ्रातृन् च - अपकार करणार्या राजांना आणि माझ्या भावांना - विजित्य - जिंकून - मां स्वपुरं निन्ये - मला आपल्या नगरी नेता झाला - तस्य - त्या श्रीकृष्णाचे - अङ्घ्य्रवनेजनत्वं मे अनुभवम् अस्तु - पाय धुण्याचे काम मला जन्मोजन्मी मिळो. ॥१२॥ क्षितिपवीर्यपरीक्षणाय पित्रा कृतान् - राजांच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी पित्याने योजिलेल्या अशा - वीरदुर्मदहनः - पराक्रमी पुरुषांचा दांडगेपणा समूळ नष्ट करणार्या - अतिबलवीर्यसुतीक्ष्णशृङगान् - अत्यंत बळकट व पराक्रमी आणि तीक्ष्ण शिंगांच्या - तान् सप्त उक्षणः - त्या सात बैलांना - यथा शिशवः अजनोकान् - जशी लहान मुले लहान मेंढयांना तसा - तरसा निगृह्य - वेगाने धरून - क्रीडन् बबन्ध ह - सहज लीलेने बांधिता झाला. ॥१३॥ यः - जो - इत्थं - याप्रमाणे - पथि राजन्यान् निर्जित्य - मार्गामध्ये क्षत्रियांना जिंकून - दासीभिः (सह) चतुराङ्गिणीं वीर्यशुल्कां मां - दासीसह चतुरंग सेनेने युक्त व पराक्रमच जीचे मूल्य आहे अशा मला - निन्ये - नेता झाला - मे तद्दास्यम् (नित्यं) अस्तु - मला त्या श्रीकृष्णाची सेवा नित्य घडो. ॥१४॥ कृष्णे - हे द्रौपदी - मे पिता - माझा बाप - स्वयं आहूय - स्वतः बोलावून - तच्चित्तां (मां) - त्याच्याच ठिकाणी लागले आहे अंतःकरण जीचे अशा मला - अक्षौहिण्या सखीजनैः (च सह) - अक्षौहिणी सेना व मैत्रिणी यांसह - मातुलेयाय कृष्णाय - मामेभाऊ अशा श्रीकृष्णाला - दत्तवान् - देता झाला. ॥१५॥ कर्मभिः भ्राम्यमाणायाः मे - कर्मांनी जन्ममरणरूपी संसारचक्रात फिरत रहाणार्या मला - जन्मनि जन्मनि - प्रत्येक जन्मामध्ये - अस्य पादसंस्पर्शः भवेत् - ह्याच्या पायांचा स्पर्श होवो - येन - ज्या अर्थी - आत्मनः तत् श्रेयः - जीवाला ती गोष्ट हितकारक आहे. ॥१६॥ राज्ञि - हे महाराणी - नारदगीतं अच्युतजन्मकर्म - नारदाने गायिलेला असा श्रीकृष्णाचा जन्म व त्याची पराक्रमाची कृत्ये - मुहुः श्रुत्वा - वारंवार श्रवण करून - पद्महस्तया किल (सः) वृतः (इति) सुसंमृश्य - हातात कमळ धारण केलेल्या लक्ष्मीनेहि याला वरिले आहे असा गंभीर विचार करून - लोकपान् विहाय - इंद्रादि लोकपालांचा त्याग करून - मम अपि चित्तं मुकुन्दे आस ह - माझेहि अंतःकरण श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त झाले. ॥१७॥ साध्वि - हे पतिव्रते द्रौपदी - दुहितृवत्सलः - कन्येवर प्रेम करणारा - बृहत्सेनः इति ख्यातः - बृहत्सेन नावाने प्रसिद्ध असलेला - मम पिता - माझा बाप - (मे) मतं ज्ञात्वा - माझे मत जाणून - तत्र उपायम् अचीकरत् - त्या बाबतीत उपाय करिता झाला. ॥१८॥ राज्ञि - हे द्रौपदी - यथा - ज्याप्रमाणे - (तव) स्वयंवरे - तुझ्या स्वयंवरामध्ये - पार्थेप्सया मत्स्यः कृतः - अर्जुनाला मिळविण्याच्या इच्छेने मत्स्य केला होता - अयं तु - हा अर्जुनाच्या वेळचा मत्स्य तर - बहिः आच्छन्नः - बाहेरूनच आच्छादिला होता - सः परं जले (एव) दृश्यते - तो माझ्या वेळचा मत्स्य केवळ पाण्यातच दिसत असे. ॥१९॥ एतत् श्रुत्वा - हे ऐकून - सर्वास्त्रशस्त्रतत्त्वज्ञाः - सर्व अस्त्रे व शस्त्रे ह्यांची तत्त्वे जाणणारे - सोपाध्यायाः सहस्त्रशः भूपाः - उपाध्यायांसह हजारो राजे - सर्वतः - सर्व बाजूंनी - मत्पितुः पुरं आययुः - माझ्या पित्याच्या नगराला आले. ॥२०॥ पित्रा यथावीर्यं यथावयः संपूजिताः - पित्याने जसा ज्याचा पराक्रम व जसे ज्याचे वय त्याप्रमाणे पूजिलेले - मद्धियः सर्वे - माझ्याच ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त झाले आहे असे सर्व राजे - पर्षदि वेद्धुं सशरं चापं आददुः - सभेमध्ये मत्स्याचा वेध करण्याकरिता बाणांसह धनुष्य घेते झाले. ॥२१॥ केचित् आदाय - कित्येक राजे धनुष्यबाण हाती घेऊन - सज्यं कर्तुम् अनीश्वराः - धनुष्यास दोरी चढविण्यास असमर्थ असे - व्यसृजन् - टाकून देते झाले - एके - दुसरे कित्येक राजे - ज्यां आकोष्ठ समुत्कृष्य - दोरी धनुष्याच्या मध्यापर्यंत ओढून - अमुना आहताः - त्या धनुष्याने ताडिलेले असे - पेतुः - खाली पडले. ॥२२॥ अपरे वीराः मागधाम्बष्ठचेदिपाः - दुसरे कित्येक पराक्रमी असे जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल इत्यादि राजे - भीमः दुर्योधनः कर्णः - भीम, दुर्योधन व कर्ण - सज्यं कृत्वा (अपि) - धनुष्यावर दोरी चढवूनहि - तदवस्थितिं न अविंदन् - त्या मत्स्याचे स्थान जाणते झाले नाहीत. ॥२३॥ पार्थः - अर्जुन - यत्तः - सज्ज झालेला असा - मत्स्याभासं जले वीक्ष्य - मत्स्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहून - तदवस्थितिं च ज्ञात्वा - आणि त्या मत्स्याचे स्थान जाणून - बाणम् असजृत् - बाण सोडिता झाला - किंतु तं न अच्छिनत् - पण त्या मत्स्याला वेधिता झाला नाही - (तस्य बाणः) परं (मत्स्यं) पस्पृशे - त्याचा बाण मत्स्याला केवळ स्पर्श करिता झाला. ॥२४॥ मानिषु भग्नमानेषु राजन्येषु निवृत्तेषु - पूर्वी अभिमानी असूनहि ज्यांचा अभिमान नष्ट झाला आहे असे क्षत्रिय परावृत्त झाले असता - अथ - नंतर - भगवान् धनुः आदाय - श्रीकृष्ण धनुष्य घेऊन - लीलया सज्यं कृत्वा - सहज त्यावर दोरी चढवून. ॥२५॥ तस्मिन् विशिखं संधाय - त्या धनुष्याला बाण लावून - जले मत्स्यं सकृत् वीक्ष्य - पाण्यात मत्स्याचे प्रतिबिंब एकदाच पाहून - सूर्ये च अभिजिति स्थिते - व सूर्य अभिजित नक्षत्रावर स्थिर असता - इषुणा तं छित्वा अपातयत् - बाणाने त्याला वेधून खाली पाडिता झाला. ॥२६॥ दिवि - आकाशात - जयशब्दयुक्ताः दुन्दुभयः नेदुः - जयजयकार शब्दांनी युक्त असे चौघडे वाजू लागले - हर्षविह्वलाः देवाः च - व आनंदाच्या भराने विव्हळ झालेले देव - भुवि कुसुमासारान् मुमुचुः - पृथ्वीवर फुलांचे वर्षाव करिते झाले. ॥२७॥ अहं - मी - कनकोज्ज्वलरत्नमालां प्रगृह्य - सुवर्णाच्या कोंदणात बसविलेली तेजस्वी रत्नांची माळ हातात घेऊन - नूत्ने कौशिकाग्र्ये निवीय परिधाय च - नवीन सुंदर उंची रेशमी वस्त्रांपैकी एक नेसून व एक पांघरून - कबरीधृतस्रक् - वेणीत घातला आहे फुलांचा गजरा जिने अशी - सव्रीडहासवदना - लज्जा व हास्य ह्यांनी युक्त झाले आहे मुख जीचे अशी - कलनूपुराभ्यां पद्भ्यां - मधुर शब्द करणारे पैंजण घातलेल्या पायांनी - तत् रङगम् आविशम् - त्या सभामंडपात शिरले. ॥२८॥ उरुकुन्तलकुण्डलत्विड्गण्डस्थलं वक्त्रं - लांब केस असलेले व कुंडलाचे तेज गालावर पसरले आहे असे मुख - उन्नीय - वर करून - शिशिरहासकटाक्षमोक्षैः - शीतल हास्ययुक्त कटाक्षांनी - परितः राज्ञः निरीक्ष्य - सभोवार राजांकडे पाहून - (कृष्णे) अनुरक्तहृदया (अहं) - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त आहे चित्त ज्यांचे अशी मी - स्वमालां - आपली माळ - शनकैः - हळू हळू - मुरारेः अंसे निदधे - श्रीकृष्णाच्या खांद्यावर ठेविली. ॥२९॥ तावत् - इतक्यात - शङखभेर्यानकादयः मृदंगपटहाः - शंख, नगारे, मृदंग, ढोल व चौघडे - निनेदुः - वाजू लागली - नटनर्तक्यः - नाटकी लोक व नाचणार्या स्त्रियाहि - ननृतुः - नाचू लागली - गायकाः - गवई - जगुः - गाऊ लागले. ॥३०॥ याज्ञसेनि - हे द्रौपदी - भगवति ईशे एवं मया वृते - भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे मी वरिला असता - हृच्छयातुराः नृपयूथपाः - कामाने पीडिलेले सेनाधिपति राजे - स्पर्धन्तः (तत्) न सेहिरे - चढाओढ करीत ते सहन करते झाले नाहीत. ॥३१॥ चतुर्भुजः - चार बाहु असलेला श्रीकृष्ण - तावत् - तितक्यात - मां - मला - हयरत्नचतुष्टयं रथं आरोप्य - चार उत्तम घोडे जुंपलेल्या रथात बसवून - शार्ङगम् उद्यम्य - शार्ङ्ग धनुष्य उचलून - सन्नद्धः (भूत्वा) आजौ तस्थौ - सज्ज होऊन युद्धभूमीवर उभा राहिला. ॥३२॥ राज्ञि - हे राणी द्रौपदी - दारुकः - दारुक - भूभुजां मिषतां - राजे पहात असता - मृगराट् मृगाणाम् (मिषताम्) इव - सिंह जसा पशूंच्या समक्ष त्याप्रमाणे - काञ्चनोपस्करं रथं चोदयामास - सुवर्णाने मढविलेला रथ हाकिता झाला. ॥३३॥ ते राजन्याः - ते क्षत्रिय - अन्वसज्जन्त - पाठलाग करिते झाले - केचन - कित्येक - पथि निषेद्धुं - मार्गात अडवून धरण्यासाठी - उद्धृतेष्वासाः - उचलले आहे धनुष्य ज्यांनी असे - ग्रामसिंहाः यथा हरिं (तथा) - कुत्रे ज्याप्रमाणे सिंहाला त्याप्रमाणे - संयत्ताः (बभूवुः) - युद्धास सिद्ध झाले. ॥३४॥ ते - ते राजे - शार्ङगच्युतबाणौघैः - शार्ङगधनुष्यापासून सुटलेल्या बाणांच्या समूहांनी - कृत्तबाह्वाङ्घ्रिकंधराः - तुटले आहेत बाहु, मांडया व माना ज्यांच्या असे झाले - केचित् प्रधने निपेतुः - कित्येक युद्धात पडले - एके संत्यज्य दुद्रुवुः - कित्येक युद्ध सोडून पळून गेले. ॥३५॥ ततः - नंतर - यदुपतिः - श्रीकृष्ण - अत्यलंकृतां - अतिशय अलंकृत केलेल्या - रविच्छदध्वजपटचित्रतोरणाम् - सूर्यालाहि झाकून टाकणार्या वस्त्रांनी युक्त असे ध्वज व चित्रविचित्र तोरणे उभारिली आहेत ज्यात अशा - दिवि भुवि च अभिसंस्तुतां - स्वर्गात व पृथ्वीवर स्तविल्या गेलेल्या - कुशस्थलीं पुरीं - द्वारका नगरीत - तरणिः स्वकेतनम् इव - सूर्य जसा आपल्या मंदिरात शिरावा तसा - समाविशत् - शिरला. ॥३६॥ मे पिता - माझा पिता - महार्हवासोलंकारैः शय्यासनपरिच्छदैः - मोठया मूल्यवान वस्त्रांनी व अलंकारांनी तसेच शय्या, आसने इत्यादि साहित्यांनी - सुहृत्संबन्धिबान्धवान् पूजयामास - मित्र, आप्तेष्ट व बंधुवर्ग ह्यांची पूजा करिता झाला. ॥३७॥ भक्तितः - भक्तीने - सर्वसंपद्भिः दासीभिः - सर्व ऐश्वर्यांनी युक्त अशा दासींसह - भटेभरथवाजिभिः - पायदळ, हत्ती, रथ व घोडेस्वार यांसह - महार्हाणि आयुधानि - मोठी मूल्यवान शस्त्रे - पूर्णस्य ददौ - परिपूर्ण अशा कृष्णाला देता झाला. ॥३८॥ इमाः - ह्या - वयं वै - आम्ही खरोखर - सर्वसंगनिवृत्त्या - सर्वसंगपरित्याग करून - तपसा च - आणि तपश्चर्येच्या योगे - अद्धा - साक्षात - आत्मारामस्य तस्य - आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी रममाण होणार्या त्या श्रीकृष्णाच्या - गृहदासिकाः बभूविम - घरातील दासी झालो आहो. ॥३९॥ आप्तकामः यः - पूर्ण आहेत मनोरथ ज्याचे असा जो श्रीकृष्ण - तेन क्षितिजये जितराजकन्याः रुद्धाः ज्ञात्वा - त्या भौमासुराने दिग्विजयप्रसंगी जिंकिलेल्या राजांच्या कन्या बंदीत ठेविल्या आहेत असे जाणून - सगणं भौमं युधि निहत्य - सैनिकांसह भौमासुराला युद्धात मारून - (अस्मान्) निर्मुच्य - आम्हाला बाहेर काढून - अथ - नंतर - संसृतिविमोक्षं पादाम्बुजं अनुस्मरन्तीः नः - संसारातून मुक्त करणार्या चरणकमलाला स्मरणार्या आम्हाला - परिणिनाय - वरिता झाला. ॥४०॥ साध्वि - हे द्रौपदी - वयं - आम्ही - साम्राज्यं - सार्वभौम राज्य - स्वाराज्यं - स्वर्गातील राज्य - भौजम् - ऐश्वर्यसुखोपभोग - अपि उत - आणखीहि - वैराज्यं - अणिमादि अष्टसिद्धी - च पारमेष्ठयं - आणि ब्रह्मादि लोकांचे राज्य - आनन्त्यं - मोक्षसुख - वा हरेः पदं - किंवा भगवान श्रीकृष्णाचे चरणकमल - न कामयामहे - इच्छित नाही - (तर्हि) एतस्य गदाभृतः - तर या श्रीकृष्णाच्या - श्रियः कुचकुंकुमगन्धाढयं - लक्ष्मीच्या स्तनांवरील केशराच्या सुगंधाने युक्त अशी - श्रीमत्पादरजः - शोभायमान चरणावरील धूळ - मूर्ध्ना - मस्तकावर - वोढुं - धारण करण्याची - कामयामहे - इच्छा करितो. ॥४१-४२॥ यत् - जशा - व्रजस्त्रियः - गोपी - पुलिन्द्यः - भिल्लिणी - तृणवीरुधः - गवत व वेली - गोपाः च - व गोप - गावः चारयतः महात्मनः - गाई चारणार्या महात्म्या श्रीकृष्णाच्या - पादस्पर्शं - पायाचा स्पर्श - वाञ्छन्ति - इच्छितात. ॥४३॥ त्र्याऐंशीवा अध्याय समाप्त |