श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८२ वा - अन्वयार्थ

श्रीकृष्ण - बलरामांशी गोप - गोपींची भेट -

अथ - नंतर - रामकृष्णयोः द्वारवत्यां वसतोः - बलराम व श्रीकृष्ण द्वारकेत रहात असताना - एकदा - एके दिवशी - यथा कल्पक्षये (तथा) - जसे प्रलयकाळी तसे - सुमहान् सूर्योपरागः आसीत् - मोठे सूर्यग्रहण आले. ॥१॥

राजन् - हे परीक्षित राजा - मनुजाः - मनुष्य - पुरस्तात् एव - पूर्वीच - तं सर्वतः ज्ञात्वा - ते सूर्यग्रहण पूर्णपणे जाणून - श्रेयोविधित्सया - कल्याण करून घेण्याच्या इच्छेने - स्यमन्तपञ्चकं क्षेत्रं ययुः - स्यमन्तपंचक नामक क्षेत्राला गेले. ॥२॥

शस्त्रभृतां वरः रामः - धनुर्धार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा परशुराम - निःक्षत्रियां महीं कुर्वन् - निःक्षत्रिय पृथ्वी करीत - यत्र - जेथे - नृपाणां रुधिरौघेण - राजांच्या रक्ताच्या प्रवाहाने - महाह्लदान् - मोठमोठी सरोवरे - चक्रे - निर्मिता झाला. ॥३॥

ईशः भगवान् रामः - परमेश्वर असा भगवान परशुराम - कर्मणा अस्पृष्टः अपि - कर्माने अलिप्त असताहि - लोकस्य ग्राहयन् - लोकांना सन्मार्ग दाखविण्याच्या उद्देशाने - यत्र - जेथे - अन्यः यथा अघापनुत्तये (तथा) - ज्याप्रमाणे सामान्य पुरुष पापविनाशार्थ यज्ञ करितो त्याप्रमाणे - ईजे - यज्ञ करिता झाला. ॥४॥

महत्यां तीर्थयात्रायां - मोठया तीर्थयात्रेच्या प्रसंगी - भारतीः प्रजाः - भरतखंडातील सर्व प्रजानन - तत्र आगन् - तेथे आले - तथा च - त्याचप्रमाणे - भारत - हे परीक्षित राजा - स्वं अघं क्षपयिष्णवः - आपले पातक दूर करण्याची इच्छा करणारे - अक्रूरवसुदेवाहुकादयः - अक्रूर, वसुदेव, आहुक इत्यादि - गदप्रद्युम्नसाम्बाद्याः - गद, प्रद्युम्न, सांब इत्यादि - वृष्णयः - यादव - तत् क्षेत्रं ययुः - त्या क्षेत्राला गेले - अनिरुद्धः यूथपः कृतवर्मा च - अनिरुद्ध व सेनापति कृतवर्मा - सुचंद्रशुकसारणैः (सह) - सुचंद्र, शुक व सारण ह्यांसह - रक्षायाम् आस्ते - द्वारकेच्या रक्षणासाठी राहिले होते - महातेजाः काञ्चनमालिनः दिव्यस्नग्वस्रसन्नाहाः ते - अत्यंत तेजस्वी सुवर्णाचे हार घातलेले व दैदीप्यमान पुष्पमाळा वस्त्रे यांनी युक्त असे ते - देवधिष्ण्याभैः रथैः - विमानासारख्या रथांनी - तरलप्लवैः हयैः - लाटांप्रमाणे उडया मारणार्‍या घोडयांनी - नदद्‌भिः अभ्राभैः गजैः - गर्जना करणार्‍या मेघवर्ण हत्तींनी - विद्याधरद्युभिः नृभिः च - व विद्याधरांप्रमाणे तेजस्वी अशा मनुष्यांनी - खेचराः कलत्रैः इव - देव जसे आपल्या परिवारांनी त्याप्रमाणे - पथि - मार्गात - व्यरोचंत - शोभले. ॥५-८॥

महाभागाः - ते मोठे भाग्यवान यादव - तत्र स्नात्वा - तेथे स्नान करून - उपोष्य - उपवास करून - सुसमाहिताः - शांतचित्त झालेले - वासःस्नग्रुक्ममालिनीः धेनूः - वस्त्रे, माळा व सुवर्णालंकार यांनी भूषविलेल्या गाई - ब्राह्मणेभ्यः ददुः - ब्राह्मणांना देते झाले. - वृष्णयः - यादव - पुनः विधिवत् रामह्लदेषु आप्लुत्य - पुनः यथाविधि रामसरोवरामध्ये स्नान करून - नः भक्तिः कृष्णे अस्तु इति - आमची भक्ति श्रीकृष्णाच्या ठिकाणी असो असा संकल्प करून - द्विजाग्र्‍येभ्यः स्वन्नं दुदुः - श्रेष्ठ ब्राह्मणांना उत्तम अन्न देते झाले - च - आणि - कृष्णदेवताः वृष्णयः - श्रीकृष्ण आहे उपास्य देवता ज्यांची असे ते यादव - तदनुज्ञाताः - श्रीकृष्णाने आज्ञा दिलेले असे - स्वयं भुक्त्वा - स्वतः भोजन करून - स्निग्धच्छायांघ्रिपाङ्‌घ्रिषु कामं उपविविशुः - थंड छायेच्या झाडांच्या मुळाशी स्वस्थपणे बसले - ते - ते यादव - तत्र आगतान् - तेथे आलेल्या - सुहृत्संबन्धिनः - मित्र व संबंधी अशा. ॥९-१२॥

मत्स्योशीनरकौसल्यविदर्भकुरुसृञ्जयान् नृपान् - मत्स्य, उशीनर, कौसल्य, विदर्भ, कुरु व सृंजय या राजांना - ददृशुः - पहाते झाले - नृप - हे राजा - काम्बोजकैकयान् मद्रान् कुंतीन् आनर्तकेरलान् - काम्बोज, कैकय, मद्र, कुंती व आनर्त ह्या देशांतील राजांना - अन्यान् च आत्मपक्षीयान् - आणि दुसर्‍या स्वतःच्या पक्षातील राजांना - परान् एव च शतशः - आणि कित्येक शत्रुपक्षीय शेकडो राजांनाहि - नंदादीन् सुहृदः गोपान् गोपीः च - नंदादिक प्रेमळ गोपांना आणि गोपींना - उत्कंठिताः चिरं (ददृशुः) - उत्सुक झालेले असे पुष्कळ वेळपर्यंत पहाते झाले - अन्योन्यसंदर्शनहर्षरंहसा - एकमेकांच्या दर्शनाने उत्पन्न झालेल्या आनंदाच्या वेगाने - प्रोत्फुल्लहृद्वक्त्रसरोरुहश्रियः - प्रफुल्लित झाली आहे हृदयरूपी कमळांची शोभा ज्यांची असे - (परस्परान्) गाढं आश्‍लिष्य - एकमेकांना दृढ आलिंगन देऊन - नयनैः स्नवज्जलाः - नेत्रांतून गळत आहेत अश्रु ज्यांच्या असे - हृष्यत्त्वचः - ज्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत असे - रुद्धगिरः - ज्यांचे कंठ भरून आले आहेत असे - (ते) मुदं ययुः - ते यादव आनंदित झाले. ॥१३-१५॥

च - आणि - अतिसौहृदस्मितामलापाङ्गदृशः स्त्रियः - अत्यंत प्रेमळ व मंदहास्ययुक्त निर्मळ कटाक्षांनी अवलोकन करणार्‍या स्त्रिया - मिथः संवीक्ष्य - एकमेकांना पाहून - स्तनैः कुंकुमपंकरूषितान् स्तनान् निहत्य - स्तनांनी केशरांची उटी लाविलेल्या दुसर्‍यांच्या स्तनांना स्पर्श करून - प्रणयाश्रुलोचनाः - ज्यांच्या नेत्रांतून आनंदाश्रू निघत आहेत अशा - दोर्भिः अभिरेभिरे - बाहूंनी आलिंगन देत्या झाल्या - ततः - नंतर - यविष्टैः अभिवादिताः ते - लहानांनी वंदिलेल्या त्यांनी - वृद्धान् अभिवाद्य - वडील मंडळींना वंदन करून - स्वागतं कुशलं पृष्टवा - तुम्ही आला ? बरे झाले, खुशाल आहा ना ? असे प्रश्न विचारिलेले - मिथः कृष्णकथाः चक्रुः - एकमेकांमध्ये श्रीकृष्णासंबंधी गोष्टी बोलते झाले - पृथा - कुंती - भ्रातृन् स्वसृः तत्पुत्रान् पितरौ अपि - भाऊ, बहिणी, त्यांचे मुलगे व आईबाप ह्यांनाहि - भ्रातृपत्‍नीः च मुकुन्दं (च) - भावांच्या स्त्रिया आणि श्रीकृष्ण ह्यांना - वीक्ष्य - पाहून - संकथया शुचः जहौ - समाधानाच्या गोष्टी करून शोक दूर करिती झाली. ॥१६-१८॥

आर्य भ्रातः - हे श्रेष्ठ बंधो - अहं आत्मानं अकृताशिषं मन्ये - मी स्वतःला मनोरथ पूर्ण न झालेली मानिते - यत् वा - किंवा - सत्तमाः (यूयं) - साधुश्रेष्ठ असे तुम्ही - आपत्सु मद्वार्तां न अनुस्मरथ - आपत्तीत सापडलेल्या माझे वर्तमान स्मरत नाही. ॥१९॥

सुहृदः ज्ञातयः पुत्राः भ्रातरः पितरौ अपि - मित्र, संबंधी, पुत्र, भाऊ व आईबाप सुद्धा - यस्य दैवम् अदक्षिणं (भवति तं) स्वजनं - ज्यांचे दैव प्रतिकूल झाले आहे अशा आप्तेष्टांना - न अनुस्मरन्ति - स्मरत नाहीत - अंब - हे माते - दैवक्रीडनकान् अस्मान् नरान् - दैवाचे खेळणे बनलेल्या आम्हा मनुष्याना - मा असूयेथाः - दोष देऊ नको - हि - कारण - ईशस्य वशे (तिष्ठन्) लोकः - परमेश्वराच्या स्वाधीन असलेला मनुष्य - कुरुते अथवा कार्यते - करतो किंवा करविला जातो. ॥२०-२१॥

स्वसः - हे ताई - वयं सर्वे - आम्ही सर्व - कंसप्रतापिताः - कंसाकडून फार पीडिले गेलेले असे - दिशंदिशम् याताः - दिशेदिशेला गेलो - एतर्हि एव - सांप्रतहि - दैवेन - दैवानेच - पुनः स्थानम् आसादिताः - पुनः स्वस्थानाला प्राप्त झालो. ॥२२॥

वसुदेवोग्रसेनाद्यैः यदुभिः - वसुदेव, उग्रसेन इत्यादि यादवांनी - अर्चिताः ते नृपाः - पूजिलेले ते राजे - अच्युतसंदर्शपरमानन्दनिर्वृताः आसन् - श्रीकृष्णाच्या दर्शनामुळे उत्पन्न झालेल्या मोठया आनंदाप्रत प्राप्त झाले. ॥२३॥

भीष्मः द्रोणः अंबिकापुत्रः - भीष्म, द्रोण व अंबिकेचा पुत्र धृतराष्ट्र - तथा ससुता गांधारी - त्याचप्रमाणे दुर्योधनादि शंभर पुत्रांसह गांधारी - सदाराः पाण्डवाः - स्त्रियांसह धर्मादि पाण्डव - कुंती सृंजयः विदुरः कृपः - कुंती, सृंजय, विदुर व कृप. ॥२४॥

कुंतिभोजः विराटः - कुंतिभोज, विराट - भीष्मकः महान् नग्नजित् च - भीष्मक आणि मोठा पराक्रमी असा नग्नजित राजा - पुरुजित् द्रुपदः - पुरुजित, द्रुपद - शल्यः सकाशिराट् धृष्टकेतुः - शल्य व काशिराजासह धृष्टकेतु. ॥२५॥

दमघोषः विशालाक्षः मैथिलः मद्रकेकयौ - दमघोष, विशालाक्ष, मिथिला नगरीचा अधिपति जनक, मद्रराजा व केकय राजा - युधामन्युः सुशर्मा च - युधामन्यु व सुशर्मा - ससुताः बाह्‌लिकादयः - पुत्रांसह बाल्हिक राजे. ॥२६॥

राजेन्द्र - हे राजश्रेष्ठा परीक्षिता - ये च युधिष्ठिरम् अनुव्रताः (ते) राजानः - जे आणखी धर्मराजाला अनुकूल होते ते राजे - श्रीनिकेतं शौरेः सस्त्रीकं वपुः वीक्ष्य - लक्ष्मीचे वसतिस्थान अशी श्रीकृष्णाची मूर्ति स्त्रियांसह पाहून - विस्मिताः - आश्चर्यचकित झाले. ॥२७॥

अथ - नंतर - रामकृष्णाभ्यां सम्यक्प्राप्तसमर्हणाः - बलराम व श्रीकृष्ण यांजकडून योग्य सत्कार झाला आहे ज्यांचा असे - ते - ते राजे - मुदा युताः - आनंदाने युक्त झालेले असे - कृष्णपरिग्रहान् वृष्णीन् प्रशशंसुः - कृष्णाच्या परिवारातील यादवांना प्रशंसिते झाले. ॥२८॥

अहो भोजपते - हे भोजराजा उग्रसेना - इह नृणां यूयं जन्मभाजः - ह्या लोकी मनुष्यांमध्ये तुम्हीच खरे जन्माला आलेले आहा - यत् - कारण - योगिनाम् अपि दुर्दर्शं कृष्णं - योग्यांनाहि दिसण्यास कठीण अशा श्रीकृष्णाला - असकृत् पश्यथ - वारंवार पहाता. ॥२९॥

श्रुतिनुता यत् विश्रुतिः - वेदांनी स्तविलेली ज्या श्रीकृष्णाची कीर्ति - पादावनेजनपयः च - व पाय धुण्याचे उदक म्हणजे गंगा - वचः शास्त्रं च - व ज्याचे वचनरूप शास्त्र म्हणजे वेद - इदं अलं पुनाति - ह्या जगाला सर्वस्वी पवित्र करितात - कालभर्जितभगा अपि भूः (च) - आणि कालाने दग्ध केले आहे माहात्म्य जीचे अशीहि पृथ्वी - यदङ्‌घ्रिपद्मस्पर्शोत्थशक्तिः - ज्या श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या स्पर्शामुळे प्रगट झाली आहे शक्ति जीची अशी - नः अखिलार्थान् अभिवर्षति - आमचे सर्व मनोरथ पुरविते. ॥३०॥

निरयवर्त्मनि वर्ततां - नरकाच्या मार्गात असणार्‍यांना - स्वर्गापवर्गविरमः - स्वर्ग व मोक्ष ह्यांविषयी निरिच्छ करणारा - विष्णुः - विष्णु - येषां वः गृहे - ज्या तुमच्या घरामध्ये - तद्दर्शनस्पर्शनानुपथप्रजल्पशय्यासनाशनसयौनसपिण्डबन्धः - त्याचे दर्शन घेणे, स्पर्श करणे, त्याला अनुसरणे, गोष्टी सांगणे, निजणे, बसणे, खाणे, विवाहसंबंध व आनुवंशिक देहसंबंध इत्यादिकांनी बद्ध झालेला असा - स्वयम् आस - स्वतः रहाता झाला. ॥३१॥

तत्र - तेथे - नंदः - नंद - कृष्णपुरोगमान् यदून प्राप्तान् ज्ञात्वा - कृष्णप्रमुख यादवांना आलेले जाणून - अनस्थार्थैः गोपैः वृतः - गाडयांवर साहित्य घातले आहे अशा गोपांसह - दिदृक्षया तत्र आगमत् - दर्शनाच्या इच्छेने तेथे आला. ॥३२॥

तं दृष्टवा हृष्टाः - त्या नंदाला पाहून आनंदित झालेले - चिरदर्शनकातराः - पुष्कळ काळाने घडलेल्या दर्शनामुळे चकित झालेले - वृष्णयः - यादव - प्राणं तन्वः इव उत्थिताः - प्राणाच्या आगमनाने जशी शरीरे त्याप्रमाणे उठलेले - गाढं परिषस्वजिरे - दृढ आलिंगन देते झाले. ॥३३॥

संप्रीतः वसुदेवः - प्रसन्न झालेला वसुदेव - परिष्वज्य - आलिंगन देऊन - प्रेमविह्वलः - प्रेमामुळे विव्हल झालेला - कंसकृतान् क्लेशान् - कंसाने दिलेल्या पीडा - गोकुले च पुत्रन्यासं - आणि पुत्राचे गोकुळात ठेवणे - स्मरन् (आसीत्) - स्मरता झाला. ॥३४॥

कुरूद्वह - हे परीक्षित राजा - कृष्णरामौ - श्रीकृष्ण व बलराम - पितरौ अभिवाद्य - आईबाप जे नंद व यशोदा त्यांना वंदन करून - परिष्वज्य च - आणि आलिंगन देऊन - प्रेम्णा साश्रुकण्ठौ - प्रेमाने आनंदाश्रूंनी युक्त झाले आहेत कंठ ज्यांचे असे - किंचन न ऊचतुः - काही एक बोलले नाहीत. ॥३५॥

तौ सुतौ आत्मासनम् आरोप्य - त्या दोन पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून - बाहुभ्यां च परिष्वज्य - आणि दोन्ही बाहूंनी आलिंगून - (नंदः) महाभागा च यशोदा - नंद व भाग्यवती यशोदा - शुचः विजहतुः - विरहजन्य शोक टाकिती झाली. ॥३६॥

अथ - नंतर - रोहिणी देवकी च - रोहिणी व देवकी - व्रजेश्वरीं परिष्वज्य - गोकुळाची स्वामिनी जी यशोदा तिला आलिंगन देऊन - तत्कृतां मैत्री स्मरन्त्यौ - तिच्याशी केलेल्या मैत्रीचे स्मरण करीत - बाष्पकण्ठयौ समूचतुः - अश्रूंनी कंठ भरून आलेल्या अशा बोलू लागल्या. ॥३७॥

व्रजेश्वरि - हे यशोदे - अनिवृत्तां वां मैत्रीं - कोणत्याहि कारणाने नष्ट न होणारी तुमची मैत्री - का विस्मरेत - कोण बरे विसरेल - ऐंद्रम् ऐश्वर्यम् अवाप्य अपि - इंद्राचे ऐश्वर्य मिळाले असताहि - इह यस्याः प्रतिक्रिया न - ह्या ठिकाणी ज्या मैत्रीची फेड करिता येत नाही. ॥३८॥

भवति - हे यशोदे - अदृष्टपितरौ एतौ - ज्यांना पितरांचे दर्शन घडले नाही असे बलराम व श्रीकृष्ण - पित्रोः युवयोः न्यस्तौ - पित्याप्रमाणे पालन करणार्‍या तुम्हा दोघांजवळ ठेवलेले - संप्रीणनाभ्युदयपोषणपालनानि - आनंद, उत्कर्ष व लालनपालन ही - प्राप्य - मिळवून - यद्वत् ह अक्ष्णोः पक्ष्म - ज्याप्रमाणे खरोखर डोळ्यांना पापण्या त्याप्रमाणे - अकुत्र भयौ च - ज्यांना कोठेही भय नाही असे - ऊषतुः स्म - राहिले - सतां परः स्वः न - सज्जनांना आपपर भेद नाही. ॥३९॥

सर्वाः गोप्यः - सर्व गोपी - अभीष्टं कृष्णं चिरात् उपलभ्य - अत्यंत इष्ट अशा श्रीकृष्णाला पुष्कळ काळाने पाहून - यत्प्रेक्षणे च - ज्याच्या अवलोकनाविषयी - दृशिषु पक्ष्मकृतं शपन्ति - नेत्रांवर पापण्या निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवाला शापित्या झाल्या - दृग्भिः हृदीकृतं - दृष्टीच्या योगे हृदयात साठविलेल्या श्रीकृष्णाला - अलं परिरभ्य - गाढ आलिंगन देऊन - नित्ययुजः दुरापम् अपि तद्‌भवम् आपुः - नित्य योगसमाधि करणार्‍यांनाहि दुर्मिळ अशा त्याच्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. ॥४०॥

भगवान् - श्रीकृष्ण - विविक्ते - एकांतात - तथाभूताः ताः उपसंगतः - तशा तर्‍हेच्या झालेल्या त्या गोपींच्या जवळ गेलेला - आश्‍लिष्य - आलिंगन देऊन - अनामयं पृष्टवा - खुशाली विचारून - प्रहसन् इदम् अब्रवीत् - हसतहसत ह्याप्रमाणे म्हणाला. ॥४१॥

सख्यः - मैत्रिणीहो - स्वानां अर्थचिकीर्षया गतान् - स्वकीयांचे कार्य संपादण्याच्या इच्छेने गेलेल्या - शत्रुपक्षक्षपणचेतसः - शत्रुपक्षीयांचा नाश करण्याकडे आहे लक्ष ज्याचे अशा - चिरायितान् नः - पुष्कळ काळाने आलेल्या आम्हाला - स्मरथ अपि - स्मरता काय ? ॥४२॥

अपिस्वित् अकृतज्ञाः (इति) अविशंकया अस्मान् अवध्यायथ - आम्ही कृतघ्न आहोत अशी थोडीशी शंका घेऊन आम्हाविषयी कल्पना करिता काय - भगवान् - परमेश्वर - नूनं - खरोखर - भूतानि युनक्ति वियुनक्ति च - प्राण्यांना एकत्र व वेगळे करितो. ॥४३॥

यथा वायुः - ज्याप्रमाणे वायु - घनानीकं तृणं तूलं रजांसि च - मेघसमूह, गवत, कापूस व धूळ ह्यांना - तथा भूतकृत् - त्याप्रमाणे सृष्टिकर्ता ईश्वर - भूतानि - प्राण्यांना - संयोज्य - एकत्र करून - भूयः आक्षिपते - पुनः वेगळे करितो. ॥४४॥

मयि भूतानां भक्तिः - माझ्या ठिकाणी असणारी प्राण्यांची भक्ति - अमृतत्वाय हि कल्पते - मोक्षाला खरोखर कारण होते - यत् - कारण - भवतीनां मदापनः मत्स्नेहः - तुमचे माझी प्राप्ती करून देणारे माझ्यावरील प्रेम - दिष्टया आसीत् - सुदैवाने उत्पन्न झाले आहे. ॥४५॥

अंगनाः - सुंदरी हो - यथा भौतिकानां (अंतः बहिः च) - ज्याप्रमाणे पाच भौतिक वस्तूंच्या आत बाहेर - खं वाः भूः वायुः ज्योतिः (सन्ति) - आकाश, उदक, पृथ्वी, वायु व तेज आहेत - (तथा) अहं हि - त्याचप्रमाणे मी खरोखर - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांच्या - आदिः अन्तः अन्तरं बहिः (अस्मि) - आरंभी व शेवटी तसेच आत व बाहेर आहे. ॥४६॥

एवं हि एतानि भूतानि - याप्रमाणे खरोखर ही महाभूते - भूतेषु - वस्तूंच्या ठिकाणी - तेषु च आत्मा आत्मना ततः - आणि त्यामध्ये आत्मा स्वस्वरूपाने (भोक्तृरूपाने) भरला आहे - अथ उभयं - व आत्मा व भूते अशी दोन्ही - अक्षरे परे मयि आभातं - निर्विकार व परिपूर्ण अशा माझ्या ठिकाणी भासमान झालेली - पश्यत - पहा. ॥४७॥

एवं - याप्रमाणे - कृष्णेन अध्यात्मशिक्षया शिक्षिताः - श्रीकृष्णाने अध्यात्मज्ञानाचा उपदेश करून शिकविलेल्या - गोप्यः - गोपी - तदनुस्मरणध्वस्तजीवकोशाः - त्याच्या नित्य स्मरणाच्या योगाने नष्ट झाला आहे लिंगदेह ज्यांचा अशा - तम् अध्यगन् - त्या श्रीकृष्णाच्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. ॥४८॥

आहुः च - आणि म्हणाल्या - नलिननाभ - हे पद्मनाभ श्रीकृष्णा - अगाधबोधैः योगेश्वरैः हृदि विचिन्त्यं - गंभीर ज्ञान असणार्‍या योगाधिपतींनी हृदयात चिंतिण्यास योग्य असे - संसारकूपपतितोत्तरणावलम्बम् च - व संसाररूपी विहिरीत पडलेल्यांना बाहेर निघण्यासाठी आश्रयभूत असलेले - ते पदारविन्दं - तुझे चरणकमळ - गेहंजुषां अपि नः मनसि - गृहस्थाश्रमात रहाणार्‍याहि आमच्या मनात - सदा उदियात् - नित्य प्रगट होवो. ॥४९॥

ब्यायशींवा अध्याय समाप्त

GO TOP