श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७५ वा - अन्वयार्थ

राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान -

ब्रह्मन् - हे शुकाचार्य ये नृदेवाः (तत्र) समागताः - जे राजे त्या यज्ञामध्ये आले होते (ते) सर्वे - ते सर्व अजातशत्रोः तं राजसूयमहोदयं दृष्टवा - धर्मराजाचे ते राजसूयरूपी मोठे वैभव पाहून मुमुदिरे - आनंदित झाले. ॥१॥

भगवन् - हे शुकाचार्य दुर्योधनं वर्जयित्वा - दुर्योधनाशिवाय सर्षयः राजानः सुराः (च) - ऋषींसह राजे व देव इति नः श्रुतं - असे आम्ही ऐकिले तत्र कारणम् उच्यताम् - असे होण्याचे कारण सांगा. ॥२॥

ते महात्मनः पितामहस्य - तुझा महात्मा आजोबा जो धर्मराजा त्याच्या राजसूये यज्ञे - राजसूय यज्ञामध्ये प्रेमबन्धनाः बांधवाः - प्रेमाने बद्ध झालेले बांधव तस्य परिचर्यायां आसन् - त्या धर्मराजाच्या सेवेत तत्पर होते. ॥३॥

भीमः महासनाध्यक्षः - भीम स्वयंपाकगृहाचा अध्यक्ष होता सुयोधनः धनाध्यक्ष - दुर्योधन भांडारगृहाचा अध्यक्ष होता सहदेवः तु पूजायां - सहदेव पूजेच्या कामी योजिलेला होता नकुलः द्रव्यसाधने - नकुल हा यज्ञासाठी लागणार्‍या वस्तु आणून देण्याच्या कामावर नेमिला होता. ॥४॥

गुरुशुश्रूषणे जिष्णुः - वडील लोकांचे आदरातिथ्य करण्याच्या कामावर अर्जुन योजिला होता कृष्णः पादावनेजने - कृष्ण पाय धुण्याच्या कामावर नेमिला होता द्रुपदजा परिवेषणे - द्रौपदी वाढण्याच्या कामावर होती महामनाः कर्णः दाने - उदार मनाचा कर्ण दानधर्म करण्यावर नेमिला होता. ॥५॥

युयुधानः विकर्णः हार्दिक्यः विदुरादयः च - सात्यकि, विकर्ण, हार्दिक्य आणि विदुर आदिकरून भूर्याद्याः ये बाह्‌लिकपुत्राः (ते) - भूरिसेनादि बाल्हीकाचे जे मुलगे ते (तथा) च संतर्दनादयः - तसेच संतर्दन आदिकरून. ॥६॥

ते - ते तदा - त्या यज्ञाच्या वेळी महायज्ञे नानाकर्मसु निरूपिताः - राजसूय यज्ञातील अनेक कामांवर नियोजिलेले असे राज्ञः प्रियचिकीर्षवः प्रवर्तन्ते स्म - राजा युधिष्ठिराचे प्रिय करण्याची इच्छा करणारे असे आपापल्या कामी प्रवृत्त झाले. ॥७॥

सूनृतसमर्हणदक्षिणाभिः - चांगले भाषण, अहेर आणि दक्षिणा ह्यांनी ऋत्विक्‌सदस्यबहुवित्सु सुहृत्तमेषु (च) स्विष्टेषु - पुरोहित सभासद, विद्वान पुरुष व अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही यांचा सत्कार केला असता चैद्ये च सात्वतपतेः चरणं प्रविष्टे - आणि शिशुपाल श्रीकृष्णाच्या चरणाशी प्रविष्ट झाला असता ततः तु - नंतर द्युनद्यां - गंगेमध्ये अवभृथस्नपनं चक्रुः - अवभृथ स्नान करिते झाले. ॥८॥

आवभृथोत्सवे - अवभृथ स्नानाचा समारंभ चालू असताना मृदंगशंखपणवधुन्धुर्यानकगोमुखाः - मृदंग, शंख, ढोल, नगारे, तुतार्‍या, शिंगे व गोमुख अशी विचित्राणि वादित्राणि नेदुः - चित्रविचित्र वाद्ये वाजत होती. ॥९॥

हृष्टाः नर्तक्यः ननृतुः - आनंदित झालेल्या नाचणार्‍या स्त्रिया नाचू लागल्या गायकाः यूथशः जगुः - गवई गटागटाने गाऊ लागले तेषां सः वीणावेणुतलोन्नादः - त्यांचा तो वीणेचा मुरलीचा व टाळ्यांचा शब्द दिवं अस्पृशत् - स्वर्गाला जाऊन भिडला. ॥१०॥

रुक्ममालिनः भूपाः - सुवर्णाच्या माळा धारण केलेले राजे चित्रध्वजपताकाग्रैः - चित्रविचित्र आहेत ध्वज व पताका ह्यांची टोके ज्यांवर अशा इभेंद्रस्यंदनार्वभिः (सह) - मोठमोठे हत्ती, रथ व घोडे ह्यांसह स्वलंकृतैः भटैः च (सह) - व अलंकार घातलेले योद्धे यांसह निर्ययुः - निघाले. ॥११॥

यजमानपुरःसराः - यजमान आहे अग्रेसर ज्यांचा असे यदुसृंजयकाम्बोजकुरुकैकयकोसलाः - यदु, सृंजय, कांबोज, कुरु, कैकय व कोसल ह्या देशांचे राजे सैन्यैः भुवं कम्पयन्तः - सैन्यांनी पृथ्वीला कापवीत. ॥१२॥

सदस्यर्त्विग्द्विजश्रेष्ठाः - सभासद, ऋत्विज व मोठमोठे ब्राह्मण भूयसा ब्रह्मघोषेण - मोठया वेदघोषाने पुष्पवर्षिणः देवर्षिपितृगन्धर्वाः (च) - आणि पुष्पवृष्टि करणारे नारदादि देवर्षि, पितर व गंधर्व हे तुष्टुवुः - स्तुति करिते झाले. ॥१३॥

गन्धस्नग्भूषणाम्बरैः स्वलंकृताः नराः नार्यः (च) - सुगंधी पदार्थ, माळा, अलंकार व वस्त्रे यांनी शोभणारे पुरूष व स्त्रिया विविधैः रसैः विलिम्पन्त्यः अभिषेचन्त्यः - अनेक प्रकारच्या रसांचा शरीरावर लेप करून स्नान करणार्‍या अशा विजह्नुः - विहार करित्या झाल्या. ॥१४॥

पुंभिः - पुरुषांनी तैलगोरसगंधोदहरिद्रासान्द्रकुंकुमैः - तेल, गाईचे दूध, सुगंधी उटी, हळद व घटट केलेले केशराचे पाणी ह्यांनी लिप्ताः - लेपिलेल्या वारयोषितः - वारांगना (तान्) प्रलिंपन्त्यः विजह्नुः - त्या पुरूषांनाहि त्या पदार्थांचा लेप करित्या झाल्या. ॥१५॥

नृभिः गुप्ताः नृदेव्यः - मनुष्यांनी रक्षिलेल्या राजस्त्रिया यथा देव्यः दिवि विमानवरैः (तथा) - ज्याप्रमाणे देवस्त्रिया आकाशात उत्तम विमानामध्ये त्याप्रमाणे एतत् उपलब्धुं निरगमन् - हा उत्सव पहाण्यासाठी बाहेर पडल्या ताः - त्या स्त्रिया मातुलेयसखिभिः परिषिच्यमानाः - मामेभाऊ व मित्र यांनी शिंपिल्या जाणार्‍या सव्रीडहासविकसद्वदनाः विरेजुः - लज्जायुक्त हास्याने ज्यांची मुखे प्रफुल्लित झाली अशा शोभल्या. ॥१६॥

क्लिन्नाम्बराः - ज्यांची वस्त्रे भिजली आहेत अशा विवृतगात्रकुचोरुमध्याः - ज्यांचे अवयव, स्तन, मांडया व मध्यभाग स्पष्ट दिसत आहेत अशा औत्सुक्यमुक्तकबरात् च्यवमानमाल्याः - उत्सुकतेमुळे सुटलेल्या वेणीतून खाली गळत आहेत फुलांचे गजरे ज्यांच्या अशा ताः - त्या स्त्रिया देवरान् उत सखीन् - दीर व मित्र ह्यांना दृतीभिः सिषिचुः - शिंपण्याच्या भांडयांनी शिंपित्या झाल्या (च) रुचिरैः विहारैः - आणि सुंदर जलक्रीडादिकांनी मलधियां क्षोभं दधुः - कामी पुरुषांना क्षुब्ध करित्या झाल्या. ॥१७॥

सदश्वं रुक्ममालिनं रथं आरूढः सः सम्राट् - चांगले घोडे जुंपिलेल्या व सुवर्णाने शोभणार्‍या रथात बसलेला सार्वभौ‌म धर्मराज स्वपत्‍नीभिः - आपल्या स्त्रियांच्या योगाने क्रतुराट् क्रियाभिः इव - राजसूय जसा अंगभूत क्रियांच्या योगे शोभतो त्याप्रमाणे व्यरोचत - शोभला. ॥१८॥

ते ऋत्विजः - ते ऋत्विज पत्‍नीसंयाजाभृथ्यैः - पत्‍नीसंयाज नामक याग व अवभृथ स्नानाचाही विधि यांच्या योगे चरित्वा - यज्ञ पुरा करून कृष्णया सह - द्रौपदीसह आचान्तं तं गंगायां स्नापयांचक्रुः - आचमनविधि केलेल्या त्या युधिष्ठिराला स्नान घालिते झाले. ॥१९॥

नरदुंदुभिभिः सह देवदुंदुभयः नेदुः - मनुष्यांच्या चौ‌घडयांसह देवांचे चौघडे वाजू लागले देवर्षिपितृमानवाः पुष्पवर्षाणि मुमुचुः - देव, ऋषि, पितर व मनुष्य पुष्पवृष्टि करिते झाले ततः - नंतर तत्र - तेथे वर्णाश्रमयुताः सर्वे नराः - ब्राह्मणादि वर्ण व ब्रह्मचर्यादि आश्रम ह्यांनी युक्त असे सर्वजण सस्नुः - स्नान करिते झाले यतः महापातकी अपि - जेथे स्नान केले असता महापातकी सुद्धा सद्यः किल्बिषात् मुच्येत - तत्काळ पातकांपासून मुक्त होतो. ॥२०-२१॥

अथ - नंतर स्वलंकृतः राजा - अलंकार घातलेला धर्मराजा अहते क्षौ‌मे परिधाय - नवी वस्त्रे परिधान करून आभरणांबरैः - अलंकार व वस्त्रे यांनी ऋत्विक्सदस्यविप्रादीन् आनर्च - ऋत्विज, सभासद व ब्राह्मण इत्यादिकांची पूजा करिता झाला. ॥२२॥

नारायणपरः नृपः - श्रीकृष्णालाच श्रेष्ठ मानणारा धर्मराजा बन्धुज्ञातिनृपान् - बांधव, संबंधी राजे ह्यांना मित्रसुहृदः अन्यान् च - मित्र, प्रेमळ मनाचे लोक, तसेच दुसरेहि कित्येक ह्यांना अभीक्ष्णं पूजयामास - वारंवार पूजिता झाला. ॥२३॥

सुररुचः - देवांप्रमाणे कांती असणारे सर्वे जनाः - सर्व पुरुष मणिकुण्डलस्र गुष्णीष कंचुकदुकूलमहार्घ्यहाराः - रत्‍नांची कुंडले, मोत्यांच्या माळा, शिरस्त्राणे, चिलखते, रेशमी वस्त्रे व मोठे मूल्यवान हार यांनी विरेजुः - शोभले नार्यः च - आणि स्त्रिया कुण्डलयुगालकवृंदजुष्टवक्त्रश्रियः - दोन कुंडलांनी व केशपाशांनी आली आहे मुखाला विशिष्ट शोभा ज्यांच्या अशा कनकमेखलया (विरेजुः) - सुवर्णाच्या कंबरपटटयाच्या योगे शोभल्या. ॥२४॥

नृप - हे राजा अथ महाशीलाः ऋत्विजः - नंतर उत्तम शीलवान ऋत्विज ब्रह्मवादिनः सदस्याः - ब्रह्मवेत्ते सभासद (तत्र) समागताः ये राजानः ब्रह्मक्षत्रियविट्‌‌शूद्राः (च) - तेथे आलेले जे राजे आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे ॥२५॥

(तथा) देवर्षिपितृभूतानि - तसेच देव, ऋषि, पितर व भूतगण सहानुगाः लोकपालाः (च) - व अनुचरांसह इंद्रादि लोकपाल पूजिताः - पूजिलेले असे तं अनुज्ञाप्य - त्या धर्मराजाची आज्ञा घेऊन स्वधामानि ययुः - आपापल्या स्थानाला निघून गेले. ॥२६॥

(जनाः) हरिदासस्य राजर्षेः राजसूयमहोदयं प्रशंसन्तः - लोक भगवद्‌भक्त धर्मराजाच्या राजसूय यज्ञातील मोठया उत्सवाची प्रशंसा करीत यथा मर्त्यः अमृतं पिबन् (न तृप्यति) - जसा मनुष्य अमृत पिताना तृप्त होत नाही न एव अतृप्यन् - तृप्त झालेच नाहीत. ॥२७॥

ततः - नंतर त्यागकातरः युधिष्ठिरः राजा - वियोगाला भ्यालेला धर्मराजा सुहृत्संबंन्धिबान्धवान् कृष्णं च - मित्र, संबंधी व बांधव ह्यांना आणि श्रीकृष्णाला प्रेम्णा निवासयामास - प्रेमाने रहावून घेता झाला. ॥२८॥

अंग - हे परीक्षित राजा तत्प्रियंकरः भगवान् अपि - त्या धर्मराजांचे प्रिय करणारा श्रीकृष्णसुद्धा सांबादीन् च यदुवीरान् च - सांबादिकांना व पराक्रमी यादवांनाहि कुशस्थलीं प्रस्थाप्य - द्वारकेस पाठवून (स्वयं) तत्र न्यवात्सीत् - स्वतः तेथे राहिला. ॥२९॥

धर्मसुतः राजा - यमधर्माचा पुत्र असा धर्मराजा इत्थं - याप्रमाणे सुदुस्तरं मनोरथमहार्णवं समुत्तीर्य - तरून जाण्यास कठीण अशा मनोरथरूपी महासागराला ओलांडून कृष्णेन गतज्वरः आसीत् - श्रीकृष्णाच्या साहाय्याने निश्चिंत झाला. ॥३०॥

एकदा दुर्योधनः - एके दिवशी दुर्योधन अच्युतात्मनः तस्य - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त झाले आहे मन ज्याचे अशा धर्मराजाच्या अन्तःपुरे श्रियं - अंतःपुरातील ऐश्वर्य राजसूयस्य च महित्वं वीक्ष्य - आणि राजसूय यज्ञाचे महत्त्व पाहून अतप्यत् - संतप्त झाला. ॥३१॥

यस्मिन् - ज्या अंतःपुरात विश्वसृजा उपक्लृप्ताः - विश्वकर्म्या मयाने संपादिलेल्या नाना नरेन्द्रदितिजेन्द्रलक्ष्मीः किल विभान्ति (स्म) - अनेक प्रकारच्या राजांची, दैत्याधिपतींची व इंद्राची वैभवे लखलखत होती ताभिः - त्या राजवैभवांच्या सहाय्याने द्रुपदराजसुता - द्रौपदी पतीन् उपतस्थे - आपल्या पतींची सेवा करिती झाली यस्यां विषक्तहृदयः कुरुराट् - जिच्याविषयी आसक्त झाले आहे अंतःकरण ज्याचे असा दुर्योधन अतप्यत् - दुःखी झाला. ॥३२॥

यस्मिन् - ज्या अंतःपुरात तदा - त्यावेळी श्रोणीभरेण शनकैः (गच्छन्) कणदङ्‌‌घ्रिशोभं - नितंबांच्या भारामुळे हळूहळू चालणार्‍या व पैंजणांच्या योगे मंजुळ शब्द करणार्‍या पायांनी शोभणार्‍या मध्येसुचारुः - कंबरेच्या भागी सुंदर अशा कुचकुङ्‌‌कुमशोणहारं - स्तनांवरील केशराच्या उटीने रक्तवर्ण झाले आहेत हार ज्यांचे अशा श्रीमन्मुखं - शोभायुक्त आहेत मुखे ज्यांची अशा प्रचलकुण्डलकुन्तलाढयं - हलणारी आहेत कुंडले ज्यांची अशा व कुरळ्या केसांनी युक्त अशा मधुपतेः महिषीसहस्रं - श्रीकृष्णाच्या हजारो स्त्रिया. ॥३३॥

क्वापि - एका प्रसंगी अधिराट् धर्मसुतः - सार्वभौ‌म धर्मराजा मयक्लृप्तायां सभायां - मयासुराने निर्मिलेल्या सभेत अनुजैः बंधुभिः च - धाकटया भावांनी व इतर संबंधितांनी वृतः - वेष्टिलेला कृष्णेन अपि - आणि श्रीकृष्णाने स्वचक्षुषा (दृष्टः) - चांगले वाईट सुचविणार्‍या आपल्या नेत्राने पाहिला गेलेला असा. ॥३४॥

काञ्चने आसने - सुवर्णाच्या आसनावर साक्षात् मघवान् इव आसीनः - प्रत्यक्ष इंद्राप्रमाणे बसलेला पारमेष्ठयश्रिया जुष्टः - सार्वभौ‌म ऐश्वर्याने युक्त असा बन्दिभिः च स्तूयमानः - आणि स्तुतिपाठक भाटांनी स्तविलेला. ॥३५॥

नृप - हे परीक्षित राजा तत्र - त्या सभेत भ्रातृभिः परीतः - दुःशासनादि भावांनी वेष्टिलेला मानी - अभिमानी किरीटमाली असिहस्तः दुर्योधनः - मुकुटाने शोभणारा व हातात तलवार घेतलेला दुर्योधन रुषा क्षिपन् - रागाने लोकांची निंदा करीत न्यविशत् - प्रविष्ट झाला. ॥३६॥

मयमायाविमोहितः - मयासुराच्या मायेने मोहिलेला (सः) स्थले जलं मत्वा - तो दुर्योधन भूमीच्या ठिकाणी उदक मानून वस्त्रान्तं अभ्यगृह्‌णात् - वस्त्रांची टोके वर उचलून धरिता झाला स्थले च अपतत् - व त्यामुळे भूमीवर पडला स्थलवद्‌भ्रांत्या (च) जले (अपतत्) - आणि पाण्याच्या ठिकाणी जमीन आहे अशी कल्पना झाल्यामुळे पाण्यात पडला. ॥३७॥

अंग - हे परीक्षित राजा भीमः तं दृष्टवा जहास - भीम या दुर्योधनाला पाहून हसला अपरे नृपतयः स्त्रियः (च) - दुसरे राजे व स्त्रिया ही राज्ञा निवार्यमाणाः अपि - राजाकडून निषेधिली जात असताहि कृष्णानुमोदिताः (जहसुः) - श्रीकृष्णाकडून संमति मिळालेली अशी हसली. ॥३८॥

व्रीडितः अवाग्वदनः सः - लज्जित होऊन खाली मुख केलेला तो दुर्योधन रुषा ज्वलन् - रागाने जळफळत तूष्णीं निष्क्रम्य - मुकाटयाने निघून गजाह्वयं प्रययौ - हस्तिनापुराला गेला सतां सुमहान् हाहा इति शब्दः अभूत् - सज्जनांचा हा हा असा मोठा शब्द झाला अजातशत्रुः विमनाः इव अभवत् - धर्मराजा दुःखित झाल्याप्रमाणे दिसू लागला यदृशा भ्रमति स्म - ज्याच्या दृष्टीच्या योगे दुर्योधन भ्रम पावला भुवः भारं समुज्जिहीर्षुः - पृथ्वीचा भार दूर करण्याची इच्छा करणारा भगवान् - श्रीकृष्ण तूष्णीं बभूव - स्तब्ध राहिला. ॥३९॥

राजन् - हे राजा राजसूये महाक्रतौ - राजसूय नामक मोठया यज्ञामध्ये यत् सुयोधनस्य दौरात्म्यं - जे दुर्योधनाचे दुराचरण त्वया अहं पृष्टः - तू मला विचारलेस (तत्) एतत् ते इह अभिहितं - ते हे आता मी तुला सांगितले. ॥४०॥

पंचाहत्तरावा अध्याय समाप्त

GO TOP