|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७४ वा - अन्वयार्थ
भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार - एवं जरासन्धवधं - याप्रमाणे जरासंधाचा वध विभोः कृष्णस्य तं अनुभावं च श्रुत्वा - आणि समर्थ अशा श्रीकृष्णाचा तो पराक्रम श्रवण करून प्रीतः युधिष्ठिरः राजा - प्रसन्न झालेला धर्मराज तम् अब्रवीत् - त्या श्रीकृष्णाला म्हणाला. ॥१॥ ये त्रैलोक्यगुरवः लोकमहेश्वराः सर्वे - जे त्रैलोक्यश्रेष्ठ असे सर्व मोठमोठे लोकपाल स्युः - आहेत (ते) दुर्लभं (तव) अनुशासनं लब्ध्वा - ते दुर्लभ अशा तुझ्या उपदेशाला मिळवून शिरसा एव वहन्ति - मस्तकानेच त्याला धारण करितात. ॥२॥ भूमन् - हे सर्वश्रेष्ठ श्रीकृष्णा सः अरविन्दाक्षः भवान् - तो कमळनेत्र असा तू ईशमानिनां दीनानां (नः) अनुशासनं धत्ते - आपण राजे आहो हा अभिमान बाळगणार्या परंतु दीन अशा आमची आज्ञा धारण करितोस तत् अत्यंतविडम्बनम् - हे तुझे करणे फार अयोग्य आहे. ॥३॥ एकस्य अद्वितीयस्य ब्रह्मणः परमात्मनः तेजः - एक, अद्वितीय व ब्रह्मस्वरूपी परमेश्वराचे तेज यथा रवेः - जसे सूर्याचे तसे कर्मभिः न वर्धते - कर्मांनी वाढत नाही न च हि ह्लसते - व कमीही होत नाही. ॥४॥ अजित माधव - हे अजिंक्य लक्ष्मीपते श्रीकृष्णा ते भक्तानां - तुझ्या भक्तांना अहं मम इति त्वं तव इति च - मी माझे आणि तू तुझे अशा प्रकारची वैकृता नानाधीः - विकार उत्पन्न करणारी द्वैतबुद्धि पशूनाम् इव - पशूंप्रमाणे न वै (अस्ति) - खरोखर असत नाही. ॥५॥ इति उक्त्वा - असे म्हणून कृष्णानुमोदितः सः पार्थः - श्रीकृष्णाचे अनुमोदन घेतलेला तो कुंतीपुत्र धर्मराज यज्ञिये काले - यज्ञाला योग्य अशा वसंतऋतूमध्ये युक्तान् ब्रह्मवादिनः ऋत्विजः ब्राह्मणान् - योग्य ब्रह्मवेत्त्या ऋत्विज ब्राह्मणांना वव्रे - आमंत्रण देता झाला. ॥६॥ द्वैपायनः भरद्वाजः सुमंतुः गौतमः असितः - व्यास, भरद्वाज, सुमंतु, गौतम व असित वसिष्ठः च्यवनः कण्वः मैत्रेयः कवषः त्रितः - वसिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवष व त्रित. ॥७॥ विश्वामित्रः वामदेवः सुमतिः जैमिनिः क्रतुः - विश्वामित्र, वामदेव, सुमति, जैमिनि, व क्रतु पैलः पराशरः गर्गः वैशंपायनः च एव - पैल, पराशर, गर्ग आणि वैशंपायनहि. ॥८॥ अथर्वा कश्यपः धौम्यः रामः भार्गवः आसुरिः - अथर्वा, कश्यप, धौम्य, परशुराम, भार्गव, आसुरि वीतिहोत्रः मधुच्छंदः वीरसेनः अकृतव्रणः - वीतिहोत्र, मधुच्छंद, वीरसेन, अकृतव्रण ॥९॥ तथा - त्याप्रमाणे सहसुतः धृतराष्ट्रः - पुत्रांसह धृतराष्ट्र च महामतिः विदुरः - आणि मोठा बुद्धिमान विदुर तथा च द्रोणभीष्मकृपादयः अन्ये - त्याचप्रमाणे आणखी द्रोण, भीष्म, कृप इत्यादि दुसरेहि उपहूताः - बोलविले गेले. ॥१०॥ नृप - हे परीक्षित राजा तत्र - तेथे यज्ञदिदृक्षवः - यज्ञ पहाण्यास इच्छिणारे ब्राह्मणाः क्षत्रियाः वैश्याः शूद्राः - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र सर्वराजानः राज्ञां प्रकृतयः च - सर्व राजे व राजांच्या प्रजा ईयुः - आल्या. ॥११॥ ततः ते ब्राह्मणाः - नंतर ते ब्राह्मण स्वर्णलाङगलैः देवयजनं कृष्टवा - सुवर्णाच्या नांगरांनी यज्ञभूमि नांगरून तत्र - तेथे नृपं यथाम्नायं दीक्षयांचक्रिरे - धर्मराजाला वैदिक नियमाप्रमाणे यज्ञदीक्षा देते झाले. ॥१२॥ किल - असे ऐकण्यात आहे की यथा - ज्याप्रमाणे पुरा - पूर्वी वरुणस्य (राजसूये) - वरुणाच्या राजसूयाच्या वेळी हैमाः उपकरणाः - सोन्याची पात्रे विरिञ्चभवसंयुताः इन्द्रादयः लोकपालाः - ब्रह्मदेव व शंकर ह्यांच्यासह इंद्रादि लोकपाल. ॥१३॥ सगणाः सिद्धगन्धर्वाः - गणांसह सिद्ध व गंधर्व विद्याधरमहोरगाः - विद्याधर व मोठमोठे नाग मुनयः यक्षरक्षांसी - ऋषी, यक्ष व राक्षस खगकिन्नरचारणाः - पक्षी, किन्नर व चारण. ॥१४॥ सर्वशः समाहूताः - सर्व ठिकांणाहून बोलाविलेले राजानः च राजपत्न्यः च - राजे व राजस्त्रियाहि पांडुसुतस्य राज्ञः वै राजसूयं - पांडुपुत्र धर्मराजाच्याहि राजसूय यज्ञाला समीयुः स्म - आली होती अविस्मिताः - आश्चर्यचकित न झालेले असे कृष्णभक्तस्य (राजसूयं) सूपपन्नम् मेनिरे - भगवद्भक्त धर्मराजाचा राजसूय सर्व साहित्याने पूर्ण मानिते झाले. ॥१५॥ देववर्चसः याजकाः - देवांप्रमाणे आहे तेज ज्यांचे असे पुरोहित अमराः प्राचेतसम् इव - देव जसे वरुणाच्या यज्ञाला त्याप्रमाणे महाराजं राजसूयेन विधिवत् अयाजयन् - धर्मराजाकडून राजसूय यज्ञाचे अनुष्ठान यथाविधि करविते झाले. ॥१६॥ सुसमाहितः अवनीपालः - स्वस्थ अंतःकरणाचा धर्मराज सौत्ये अहनि - सोमरस काढण्याच्या दिवशी महाभागान् याजकान् सदसस्पतीन् (च) - मोठया भाग्यवान ऋत्विजांना व सभाध्यक्षांना यथावत् अपूजयत् - यथाशास्त्र पूजिता झाला. ॥१७॥ सदस्याग्यार्हणार्हं विमृशन्तः - सभासदांतील कोण अग्रपूजेला योग्य आहे असा विचार करणारे सभासदः - सभेतील शिष्ट लोक अनैकान्त्यात् - अनेक योग्य पुरुष असल्यामुळे न वै अध्यगच्छन् - खरोखर ठरवू शकले नाहीत तदा सहदेवः अब्रवीत् - त्यावेळी सहदेव म्हणाला. ॥१८॥ सात्वतांपतिः भगवान् अच्युतः - यादवाधिपति भगवान श्रीकृष्ण श्रैष्ठयं अर्हति हि - अग्रपूजेचा श्रेष्ठ मान घेण्याला खरोखर योग्य आहे एषः वै - हा कृष्ण खरोखर सर्वाः देवताः - सर्व देवतास्वरूपी देशकालधनादयः - देश, काल, धन इत्यादि. ॥१९॥ इदं विश्वं यदात्मकं - हे जग ज्या कृष्णाचे स्वरूप आहे क्रतवः च यदात्मकाः - आणि यज्ञ ज्याचे स्वरूप आहेत अग्निः आहुतयः मन्त्राः साङ्ख्यं योगः च - अग्नि, आहुति, मंत्र, सांख्य आणि योग यत्परः - ज्याला श्रेष्ठ मानणारे आहेत. ॥२०॥ सभ्याः - अहो सभासद हो असौ एकः एव अद्वितीयः (अस्ति) - हा एकच द्वैतरहित असा आहे इदं जगत् वा एतदात्म्यं - आणि हे जग त्याचेच स्वरूप आहे आत्मना आत्माश्रयः अजः - आत्म्याच्या योगे स्वतःचा आश्रय घेणारा श्रीकृष्ण सृजति अवति हन्ति - उत्पन्न करितो, रक्षण करितो व संहार करितो. ॥२१॥ इह - ह्या जगामध्ये अयं सर्वः - हा सर्व जनसमूह यदवेक्षया - ज्या श्रीकृष्णाच्या कृपावलोकनाने विविधानि कर्माणि जनयन् - अनेक प्रकारची कर्मे करीत यत् - ज्या कारणास्तव धर्मादिलक्षणं श्रेयः ईहते - धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चार लक्षणांनी युक्त अशा कल्याणाला इच्छितो. ॥२२॥ तस्मात् - म्हणून महते कृष्णाय - श्रेष्ठ अशा श्रीकृष्णाला परमार्हणं दीयताम् - अग्रपूजेचा मान द्यावा एवं चेत् - असे केले असता सर्वभूतानां आत्मनः च अर्हणं भवेत् - सर्व प्राणिमात्रांचे व आत्म्याचेहि पूजन केल्यासारखे होईल. ॥२३॥ दत्तस्य आनन्त्यम् इच्छता - दिलेल्याच्या अनंतपटीने अधिक फलाची इच्छा करणार्या पुरुषाने सर्वभूतात्मभूताय - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणार्या अनन्य दर्शिने शान्ताय पूर्णाय कृष्णाय - समबुद्धीने पहाणार्या, शांत व पूर्ण अशा श्रीकृष्णाला देयं - द्यावे. ॥२४॥ कृष्णानुभाववित् सहदेवः - श्रीकृष्णाचा पराक्रम जाणणारा सहदेव इति उक्त्वा तूष्णीं अभूत् - असे बोलून स्वस्थ बसला तत् श्रुत्वा - ते ऐकून सर्वे सत्तमाः - मोठमोठे सर्व साधु सभासद साधु साधु इति तुष्टुवुः - चांगले चांगले असे म्हणून स्तुती करू लागले. ॥२५॥ प्रणयविह्वलः राजा - प्रेमाने विव्हल झालेला धर्मराज द्विजेरितं श्रुत्वा प्रीतः - ब्राह्मणांचे भाषण ऐकून प्रसन्न झालेला सभासदां हार्दं ज्ञात्वा - सभेतील लोकांचे हृद्गत जाणून हृषीकेशं समर्हयत् - श्रीकृष्णाची पूजा करिता झाला. ॥२६॥ सभार्यः सानुजामात्यः सकुटुंबः (सः) - भार्येसह व भाऊ व प्रधान ह्यांसह व परिवारासह तो धर्मराज तत्पादौ अवनिज्य - त्या श्रीकृष्णाचे पाय धुऊन मुदा - आनंदाने लोकपावनीः अपः शिरसा अवहत् - लोकांना पवित्र करणारे उदक मस्तकाने धारण करिता झाला. ॥२७॥ अश्रुपूर्णाक्षः (सः) - ज्याच्या नेत्रांतून आनंदाश्रु वहात आहेत असा तो धर्मराज पीतकौशेयैः वासोभिः - पिवळ्या रेशमी वस्त्रांनी महाधनैः भूषणैः च - आणि अमूल्य अलंकारांनी अर्हयित्वा - पूजून समवेक्षितुं न अशकत् - पहाण्यास समर्थ झाला नाही. ॥२८॥ सर्वे जनाः - सर्व लोक इत्थं सभाजितं (तं) वीक्ष्य - याप्रमाणे पूजिलेल्या त्या श्रीकृष्णाला पाहून प्राञ्जलयः - हात जोडून जय - तुझा जय असो (ते) नमः (अस्तु) - तुला नमस्कार असो इति - असे म्हणून तं नेमुः - त्या श्रीकृष्णाला नमस्कार करिते झाले (तदा) पुष्पवृष्टयः निपेतुः - त्या वेळी पुष्पवृष्टि झाली. ॥२९॥ इत्थं निशम्य - याप्रमाणे ऐकून कृष्णगुणवर्णनजातमन्युः - श्रीकृष्णाच्या गुणवर्णनांनी ज्याला क्रोध आला आहे असा दमघोषसुतः - दमघोष राजाचा पुत्र शिशुपाल स्वपीठात् उत्थाय - आपल्या आसनावरून उठून अमर्षी - रागावलेला असा बाहुं उत्क्षिप्य - बाहु वर करून अभीतः - भीति न बाळगता सदसि भगवते परुषाणि संश्रावयन् - सभेत श्रीकृष्णाला कठोर भाषणे ऐकवीत इदम् आह - याप्रमाणे बोलला. ॥३०॥ दुरत्ययः कालः ईशः (अस्ति) - अविनाशी काळ हा सर्व काही करण्यास समर्थ आहे इति श्रुतिः सत्यवती - असे जे वैदिक वाक्य ते खरे आहे यत् - कारण बालवाक्यैः - पोरांच्या भाषणांनी वृद्धानाम् अपि बुद्धिः - वृद्धांचीहि बुद्धि विभिद्यते - भेद पावते. ॥३१॥ सदसस्पतयः - अहो सभासद हो पात्रविदां श्रेष्ठाः यूयं सर्वे - पात्रापात्रविचार करणार्यांमध्ये श्रेष्ठ असे तुम्ही सर्व बालभाषितं मा मन्ध्वं - त्या बालाचे भाषण मानू नका यत् - ज्या भाषणावरून कृष्णः - श्रीकृष्ण अर्हणे - अग्रपूजेविषयी (युष्माभिः) संमतः - तुम्हाकडून योग्य मानिला गेला. ॥३२॥ तपोविद्याव्रतधरान् - तपश्चर्या, विद्या व व्रते धारण करणार्या ज्ञानविध्वस्तकल्मषान् - ज्ञानाने नष्ट झाली आहेत पातके ज्यांची अशा लोकपालैः पूजितान् - लोकपालांनी पूजिलेल्या च - आणि ब्रह्मनिष्ठान् सदस्पतीन् परमर्षीन् - ब्रह्मनिष्ठ व सभापति अशा मोठमोठया ऋषींना अतिक्रम्य - वगळून कुलपांसनः गोपालः - कुळाला बटटा लावणारा गवळी श्रीकृष्ण यथा काकःपुरोडाशं (तथा) - जसा कावळा हविर्भागाला तसा सपर्यां कथम् अर्हति - पूजेला कसा योग्य होतो ? ॥३३-३४॥ वर्णाश्रमकुलापेतः - वर्ण, आश्रम आणि कुल ह्यांनी रहित सर्वधर्मबहिष्कृतः - सर्व धर्मांनी ज्याला बाहेर टाकिले आहे असा स्वैरवर्ती - स्वच्छंदाने वागणारा गुणैर्हीनः - एकहि गुण ज्याच्याजवळ नाही असा सपर्यां कथं अर्हति - पूजेला कसा योग्य होतो ? ॥३५॥ एषां कुलं हि ययातिना शप्तं - खरोखर ह्यांच्या कुळाला ययातीने शाप दिला आहे सद्भिः बहिष्कृतं - साधूंनी ते बहिष्कृत केले आहे शश्वत् वृथापानरतं (तत्) - वारंवार निष्कारण मद्य प्राशन करण्यात आसक्त झालेले ते कुळ सपर्यां कथम् अर्हति - अग्रपूजेच्या मानास कसे योग्य आहे ? ॥३६॥ एते दस्यवः - हे चोर ब्रह्मर्षिसेवितान् देशान् हित्वा - ब्रह्मर्षींनी सेविलेले देश टाकून अब्रह्मवर्चसं समुद्रं दुर्गं आश्रित्य - ब्रह्मतेजाचा जेथे अभाव आहे अशा समुद्रातील दुर्गम स्थानाचा आश्रय घेऊन प्रजाः बाधन्ते - प्रजांना पीडा देत आहेत. ॥३७॥ नष्टमंगलः - ज्याचे मंगल नाश पावले आहे असा तो शिशुपाल एवमादिनि अभद्राणि बभाषे - अशा प्रकारची वाईट भाषणे बोलला यथा सिंहः शिवारुतं (न प्रतिवदति) - जसा कोल्हीच्या ओरडण्याला सिंह उत्तर देत नाही त्याप्रमाणे भगवान् किंचित् न उवाच - श्रीकृष्ण काहीहि उत्तर देता झाला नाही. ॥३८॥ सभासदः - सभेतील लोक तत् दुःसहं भगवन्निन्दनं श्रुत्वा - सहन करण्यास कठीण अशी ती भगवंताची निंदा ऐकून रुषा चेदिपं शपन्तः - क्रोधाने शिशुपालाला शाप देत कर्णौ पिधाय निर्जग्मुः - कान झाकून बाहेर गेले. ॥३९॥ यः - जो भगवतः - भगवान श्रीकृष्णाची वा तत्परस्य जनस्य - किंवा भगवान श्रीकृष्णाची सेवा करणार्या पुरुषाची निंदां शृण्वन् - निंदा ऐकत ततः न अपैति - तेथून दूर जात नाही सः अपि - तो सुद्धा सुकृतात् च्युतः - पुण्यापासून भ्रष्ट झालेला असा अधः याति - अधोगतीला जातो. ॥४०॥ ततः - नंतर पांडुसुताः - पांडूचे धर्मराजादि पुत्र मत्स्यकैकयसृञ्जयाः (च) - आणि मत्स्य, कैकय व सृंजय राजे क्रुद्धाः - रागावलेले असे उदायुधाः च - व उचलली आहेत आयुधे ज्यांनी असे शिशुपालजिघांसवः समुत्तस्थुः - शिशुपालाला मारण्याच्या इच्छेने उभे राहिले. ॥४१॥ भारत - हे परीक्षित राजा ततः असंभ्रान्तः चैद्यः तु - नंतर न डगमगणारा स्वस्थान्तःकरणाचा शिशुपाल तर सदसि कृष्णपक्षीयान् राज्ञः भर्त्सयन् - सभेमध्ये श्रीकृष्णाच्या पक्षाच्या राजांची निंदा करून खड्गचर्मणी जगृहे - तलवार व ढाल घेता झाला. ॥४२॥ भगवान् - श्रीकृष्ण तावत् उत्थाय - तितक्यात उठून स्वयं रुषा स्वान् निवार्य - स्वतः क्रोधाने स्वकीयांचे निवारण करून क्षुरान्तचक्रेन - वस्तर्याप्रमाणे धार आहे ज्याची अशा सुदर्शन चक्राने आपततः रिपोः शिरः जहार - चाल करून येणार्या शत्रु अशा शिशुपालाचे मस्तक हरण करिता झाला. ॥४३॥ शिशुपाले हते - शिशुपाल मारिला गेला असता महान् कोलाहलः शब्दः अपि आसीत् - मोठा कलकल शब्दहि उत्पन्न झाला जीवतैषिणः तस्य अनुयायिनः - जगण्याची इच्छा करणारे त्या शिशुपालाचे अनुयायी असे भूपाः - राजे दुद्रुवुः - पळून गेले. ॥४४॥ चैद्यदेहोत्थितं ज्योतिः - शिशुपालाच्या शरीरापासून उत्पन्न झालेले तेज सर्वभूतानां पश्यतां - सर्व लोक पहात असता खात् भुवि च्युता उल्का इव - आकाशांतून जमिनीवर पडलेल्या तेजाच्या गोळ्याप्रमाणे वासुदेवम् उपविशत् - श्रीकृष्णामध्ये प्रविष्ट झाले. ॥४५॥ जन्मत्रयानुगुणितवैरसंरब्धया धिया - तीन जन्मांतील वाढलेल्या वैराने पूर्ण भरलेल्या बुद्धीने (तं) ध्यायन् तन्मयतां यातः - ईश्वराचे ध्यान करीत असल्यामुळे ईश्वरस्वरूपाला प्राप्त झाला भावः हि भवकारणम् - कारण भावना हेच उत्पत्तीचे कारण होय. ॥४६॥ एकराट् - सार्वभौम धर्मराजा सर्वान् संपूज्य - सर्वांचे पूजन करून ससदस्येभ्यः ऋत्विग्भ्यः - सभासदांसह ऋत्विजांना विपुलां दक्षिणां अदात् - पुष्कळ दक्षिणा देता झाला विधिवत् च अवभृथं चक्रे - आणि यथाशास्त्र अवभृथ स्नान करिता झाला. ॥४७॥ योगेश्वरेश्वरः कृष्णः - मोठमोठया योग्यांचा अधिपति श्रीकृष्ण राज्ञः क्रतुं साधयित्वा - धर्मराजाचा यज्ञ सिद्धीस नेल्यावर सुहृद्भिः अभियाचितः - मित्रांनी याचिलेला असा कतिचित् मासान् उवास - कित्येक महिने राहिला. ॥४८॥ ततः - नंतर सभार्यः सामात्यः देवकीसुतः ईश्वरः - स्त्रिया व प्रधान यांसह देवकीपुत्र श्रीकृष्ण अनिच्छन्तम् अपि राजानं अनुज्ञाप्य - इच्छा नसलेल्याहि धर्मराजाची अनुज्ञा घेऊन स्वपुरं - द्वारकेला ययौ - गेला. ॥४९॥ मया - माझ्याकडून ते - तुला तत् उपाख्यानम् - ते कथानक विप्रशापात् वैकुण्ठवासिनोः पुनःपुनः जन्म - ब्राह्मणाच्या शापामुळे वैकुंठात रहाणार्या जयविजयांचा वारंवार झालेला जन्म बहुविस्तरं वर्णितं - अत्यंत विस्तृत रीतीने वर्णिला गेला आहे. ॥५०॥ राजसूयावभृथ्येन स्नातः - राजसूय यज्ञातील अवभृथविधीने स्नान केलेला युधिष्ठिरः - धर्मराजा ब्रह्मक्षत्रसभामध्ये - ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या सभेत सुरराट् इव शुशुभे - देवराज इंद्राप्रमाणे शोभला. ॥५१॥ राज्ञा सभाजिताः - धर्मराजाने सत्कारिलेले सर्वे सुरमानवखेचराः - सर्व देव, मनुष्ये आणि प्रमथादि गण यः - जो पाण्डुसुतस्य स्फीतां तां श्रियं दृष्टवा - पांडवांच्या वाढलेल्या त्या संपत्तीला पाहून न सेहे - सहन करिता झाला नाही (तं) पापं कलिं कुरुकुलामयं दुर्योधनं ऋते - अशा त्या पापी, कलह उत्पन्न करणार्या व कुरुकुलाचा रोगच अशा दुर्योधनाशिवाय कृष्णं च क्रतुं शंसन्तः - श्रीकृष्णाची व राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत मुदा स्वधामानि ययुः - आनंदाने आपआपल्या स्थानाला निघून गेले. ॥५२-५३॥ यः - जो कोणी चैद्यवधादिकं - शिशुपालाला मारणे इत्यादि राजमोक्षं वितानं च - राजांची मुक्तता आणि राजसूय यज्ञ इदं विष्णोः कर्म - हे श्रीकृष्णाचे कृत्य कीर्तयेत् - गाईल (सः) सर्वपापैः प्रमुच्यते - तो सर्व पापांपासून मुक्त होईल. ॥५४॥ अध्याय चौर्याहत्तरावा समाप्त |